अनुक्रमणिका
या कुन्देन्दुतुषारहारधवला या शुभ्रवस्त्रावृता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना ।
या ब्रह्माच्युतशङ्करप्रभृतिभिर्देवै: सदा वन्दिता सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापहा ॥
जयांचे केलिया स्मरण । होय सकळ विद्यांचे अधिकरण । तेचि वंदूं श्रीचरण । श्रीगुरूंचे ॥१॥
ते नमस्कारोनि आता ॥
श्रीगणेशाय नमः । श्रीसरस्वत्यै नमः । श्रीविठ्ठलाय नमः ।
श्रीमातापितृभ्यां नमः । श्रीगुरुभ्यो नमः ॥
ॐ नमो भगवते वासुदेवाय ।
रामकृष्णहरि । रामकृष्णहरि । रामकृष्णहरि ॥
श्रीज्ञानेश्वरी नित्यनेम पारायण
क्रमश: नित्यनेम पारायण
अध्याय – ३. ओवी क्र. ११९ ते १४५
यज्ञशिष्टाशिनः सन्तो मुच्यन्ते सर्वकिल्बिषैः।
भुञ्जते ते त्वघं पापा ये पचन्त्यात्मकारणात् ॥१३॥
देखा विहित क्रियाविधि । निहेतुका बुद्धि ।
जो असतिये समृद्धि । विनियोगु करी ॥११९॥
गुरु, गोत्र, अग्नि पूजी । अवसरीं भजे द्विजी ।
निमित्तादिकिं यजी । पितरोद्देशें ॥१२०॥
या यज्ञक्रिया उचिता । यज्ञेशीं हवन करितां ।
हुतशेष स्वभावतः । उरे जें जें ॥१२१॥
तें सुखें आपुले घरीं । कुटुंबेंसी भोजन करी ।
कीं, भोग्यचि तें निवारी । कल्मषातें ॥१२२॥
तें यज्ञावशिष्ट भोगी । म्हणौनि सांडिजे तो अघीं ।
जयापरी महारोगी । अमृतसिद्धि ॥१२३॥
कीं, तत्त्वनिष्ठु जैसा । नागवे भ्रांतिलेश ।
तो “शेष-भोगी” तैसा । नाकळे दोषा ॥१२४॥
म्हणौनि स्वधर्में जें अर्जे । तें स्वधर्मेचि विनियोजिजे ।
मग, उरे तें, भोगिजे । संतोषेंसीं ॥१२५॥
हें वांचूनि, पार्था । राहाटो नये अन्यथा ।
ऐसी आद्य हे कथा । श्रीमुरारि सांगे ॥१२६॥
जे देहचि आपणपें मानिती । आणि विषयांतें भोग्य म्हणती ।
यापरतें न स्मरती । आणिक कांहीं ॥१२७॥
हें यज्ञोपकरण सकळ । नेणतसांते बरळ ।
अहंबुद्धि केवळ । भोगूं पाहती! ॥१२८॥
इंद्रियरुचीसारिखें । करविती पाक निके ।
ते पापिये, पातकें । सेवती; जाण ॥१२९॥
संपत्तिजात आघवें । हें हवनद्रव्य मानावे ।
मग स्वधर्मयज्ञें अर्पावें । आदिपुरुषीं ॥१३०॥
हें सांडोनियां, मूर्ख । आपणपेंयालागी देख ।
निजविती पाक । नानाविध ॥१३१॥
जिहीं य्ज्ञु सिद्धी जाये । परेशा तोषु होये ।
तें हें सामान्य अन्न न होये । म्हणौनियां ॥१३२॥
हें न म्हणावें साधारण । अन्न ब्रह्मरूप जाण ।
जें जीवनहेतु कारण । विश्वा यया ॥१३३॥
अन्नाद्भवन्ति भूतानि पर्जन्यादन्नसम्भवः।
यज्ञाद्भवति पर्जन्यो यज्ञः कर्मसमुद्भवः ॥१४॥
अन्नास्तव भूतें । प्ररोहो पावती समस्तें ।
मग पर्जन्य या अन्नातें । सर्वत्र प्रसवे ॥१३४॥
कर्म ब्रह्मोद्भवं विद्धि ब्रह्माक्षरसमुद्भवम्।
तस्मात्सर्वगतं ब्रह्म नित्यं यज्ञे प्रतिष्ठितम् ॥१५॥
तया पर्जन्या यज्ञीं जन्म । यज्ञातें प्रगटी कर्म ।
कर्मासि आदि ब्रह्म । वेदरूप ॥१३५॥
तया वेदांतें परात्पर । प्रसवतसे अक्षर ।
म्हणौनि हे चराचर । ब्रह्मबद्ध ॥१३६॥
परी कर्माचिये मूर्ति । यज्ञीं अधिवासु श्रुति ।
ऐके सुभद्रापति । अखंड गा ॥१३७॥
एवं प्रवर्तितं चक्रं नानुवर्तयतीह यः।
अघायुरिन्द्रियारामो मोघं पार्थ स जीवति ॥१६॥
ऐसी हे आदि परंपरा । संक्षेपें, तुज, धनुर्धरा ।
सांगितली, या अध्वरा- । लागुनियां ॥१३८॥
म्हणौनि समूळ हा उचितु । स्वधर्मरूप क्रतु ।
नानुष्ठी जो मत्तु । लोकीं इये ॥१३९॥
तो पातकांची राशी । जाण, भार भूमीसी ।
जो कुकर्में इंद्रियांसी । उपेगा गेला ॥१४०॥
तें जन्म,कर्म, सकळ । अर्जुना, अति निष्फळ ।
जैसें कां अभ्रपटल । अकाळींचें ॥१४१॥
कां; गळां स्तन अजेचे । तैसें जियालें देखें तयाचें ।
जया अनुष्ठान स्वधर्माचें । घडेचिना ॥१४२॥
म्हणौनि, ऐकें पांडवा । “हा स्वधर्मु कवणें न संडावा ।
सर्वभावें भजावा । हाचि एकु” ॥१४३॥
हां गा, शरीर जरी जाहलें । तरी कर्तव्य ओघें आलें ।
मग उचित कां आपुलें । ओसंडावें? ॥१४४॥
परिस पां, सव्यसाची । मूर्ति लाहोनि देहाची ।
खंती करिती कर्माची । ते गावंढे गा ॥१४५॥
॥ पुंडलिकवरदा हरी विठ्ठल श्रीज्ञानदेव तुकाराम ॥
श्रीएकनाथी भागवत
क्रमश: नित्यनेम पारायण
अध्याय – ३, ओवी क्र. २९६ ते ३५०
श्रीगणेशाय नमः ॥ श्रीसरस्वत्यै नमः ॥ श्रीगुरुभ्यो नमः ॥ श्रीदत्तात्रेयाय नमः ॥ श्रीरुक्मिणीपाण्डुरङ्गाभ्यां नमः ॥
सद्गुरुलक्षणे (२९६ ते ३२४)
आतां सद्गुरूची जी निजलक्षणे । राया सांगेन तुजकारणें ।
जे ऐकतां अंतःकरणें । सुखी होणे सद्भावें ॥२९६॥
तरी जो कायावाचामनें । अतिकृपाळू दीनाकारणें ।
तोडी शिष्याची भवबंधनें । उठवी ठाणे अहंकाराचें ॥२९७॥
जो शब्दज्ञानें पारंगतु । ब्रह्मानंदें सदा डुल्लतु ।
शिष्यप्रबोधनी समर्थु । यथोचितु निजभावें ॥२९८॥
ज्याचा जैसा जैसा भावो । तैसा तैसा करी अनुभवो ।
तरी गुरुत्वाचा अहंभावो । अणुमात्र पहा हो धरीना ॥२९९॥
शिष्यापासूनि सेवा घेणें । हे स्वप्नीही न स्मरे मनें ।
शिष्याची सेवा स्वयें करणें । पूज्यत्वे पाहणें निजशिष्यां ॥३००॥
शिष्य देखावा पुत्रासमान । हें स्मृतिवाक्य असे प्रमाण ।
दृष्टीं देखों नेणे गौण । शिष्या देखे पूर्ण ब्रह्मत्वें ॥३०१॥
शिष्य सेवा करी निजभावार्थे । परी तो सेवक न म्हणे त्यातें ।
ज्यासी भगवद्रूप सर्व भूतें । शिष्य वेगळा तेथें सेवकत्वें नुरे ॥३०२॥
ऐसा मी एक महायोगी । हेही न मिरवी तो जगीं ।
गुरुत्वाचा ताठा अंगीं । सर्वथा शिगी लागों नेदी ॥३०३॥
आपुल्या योगक्षेमाचे सांकडें । स्वप्नीही न घाली शिष्याकडे ।
शिष्यसंकट अतिगाढें । निवारी रोकडे निजांगें जो ॥३०४॥
मी एक अकर्ता निजात्मयोगी । म्हणौनि विषयांतें न भोगी ।
अथवा विषयो निःशेष त्यागी । हाही आग्रहो अंगी असेना ॥३०५॥
तो विषय भोगी ना स्वयें त्यागी । तो अदृष्टाच्या निजविभागीं ।
लावूनियां देहाच्या अंगीं । परब्रह्मयोगी विचरत ॥३०६॥
देह दैवें पालखीमाजी चढे । अथवा विष्ठेमाजीं पडे ।
तें दोहींचें सुखदुःख त्याकडे । मी म्हणौनि पुढे कदा न रिघे ॥३०७॥
देही असोनि नाही अहंकृती । गेही असोनि नाहीं गृहासक्ती ।
शेखी लोकांमाजीं लौकिकस्थिती । सुखें वर्तती लोकांसरिसें ॥३०८॥
त्यासी स्त्री म्हणे माझा भर्ता । पुत्र म्हणे माझा पिता ।
शिष्य म्हणती गुरु तत्त्वतां । तो त्यांहूनि परता त्यांमाजी वर्ते ॥३०९॥
ऐशिया पूर्णप्रतीती । आचरोनि दावी भक्ती ।
हरि भजावा सर्वां भूतीं । हेंच शिष्यांप्रती उपदेशी ॥३१०॥
ही सद्गुरूंची निजलक्षणे । पंडितां न कळती ज्ञातेपणें ।
पूर्णानुभवी जाणती खुणे । इतरांचे जाणणे पांगुळे तेथ ॥३११॥
त्याचे गुरुत्वाची वोळखण । अंगीं निजशांति पूर्ण ।
हेचि सद्गुरुत्वाचे लक्षण । मुख्य भूषण हेचि राया ॥३१२॥
जगी शांति जाली परदेशी । कोठेही ठावो न मिळे तिशीं ।
ते आली सद्गुरुपायांपाशीं । सुखवासासी वसावया ॥३१३॥
यापरी सद्गुरुपाशी शांती । स्वयें आली सुखवासवस्ती ।
जेवीं कां माहेरा आंतौती । स्वानंदें क्रीडती कन्या जैशी ॥३१४॥
जाणोनि वेदशास्त्र निश्चितीं । जो न मिरवी गा व्युत्पत्ती ।
ज्यासी अपरोक्षे पूर्ण शांती । तो सद्गुरुमूर्ति निश्चयें राया ॥३१५॥
झणीं श्रोते कोपती येथ । म्हणतील ग्रंथ वाढविला व्यर्थ ।
‘निष्णात’ या पदाचा अर्थ । काढितां तेथ स्फुरलें हो ॥३१६॥
हे माझे गांठीची नव्हे युक्ती । सद्गुरु आपण आपली स्थिती ।
बोलवीतसे ग्रंथार्थी । पदपदार्थी साधूनि ॥३१७॥
तरी सद्गुरूची लक्षणे । न वर्णवती अगाधपणें ।
वेद वेडावले मुकेपणें । तेथें माझें बोलणे सरे केवीं ॥३१८॥
येथ आश्चर्य कैसें देखा । श्रीभागवत देशभाखा ।
परमार्थु साधिला नेटका । तुष्टला निजसखा जनार्दनस्वामी ॥३१९॥
एका जनार्दना शरण । त्याची जैं होय कृपा परिपूर्ण ।
त्या देही असतां देहबंधन । नातळे जाण गुरुभक्तां ॥३२०॥
ज्याचे सेवितां निजचरण । देहीं न बाधी देहबंधन ।
त्यासी जाहलिया अनन्य शरण । दे अगाध कोण हे न कळे वेदां ॥३२१॥
न करितां सद्गुरुभक्ती । कदा नव्हे परमार्थप्राप्ती ।
यालागीं सद्गुरुभक्ती । बोलिली ग्रंथीं शिष्यहितार्थ ॥३२२॥
यालागीं पूर्ण सद्गुरूपाशीं । अनन्य शरण होतां त्यासी ।
तो सद्भावें निववी शिष्यासी । निजबोधेसी यथार्थ ॥३२३॥
सद्गुरुस्थितीचे निरूपण । राया सांगितलें संपूर्ण ।
आतां शिष्याचे लक्षण । सावधान अवधारीं ॥३२४॥
मायिक शिष्य (३२५ ते ३२९)
तत्र भागवतान् धर्मान् शिक्षेद्गुर्वात्मदैवतः ।
अमाययाऽनुवृत्त्या यैस्तुष्येदात्माऽऽत्मदो हरिः ॥२२॥
तेथे गुरू हेच आपले दैवत आहे असे मानून, भगवंतांनी सांगितलेल्या आत्मप्राप्तीच्या उपायांचे निष्कपट अशा सेवावृत्तीने शिक्षण घ्यावे. त्या योगाने केवळ आत्मरूप असा आणि आत्मरूप देणारा जो परमात्मा तो संतुष्ट होवो.
वरीवरी दिसती सात्विक । भीतरी विकल्पी शिष्य एक ।
एक ते केवळ दांभिक । एक ज्ञानठक अतिधूर्त ॥३२५॥
एक ते केवळ प्रतिष्ठाकाम । एकासी पूज्यतेचा संभ्रम ।
एकासी जाणिवेचा आक्रम । एकाचे पोटीं भ्रम महासिद्धीचा ॥३२६॥
एक वाग्वादी वांजट । एक अतिशयेंसी कर्मठ ।
एक केवळ कर्मनष्ट । आम्ही ब्रह्मनिष्ठ अभिमानें ॥३२७॥
एका आवडे वायुधारण । एका आसनजयाभिमान ।
एकाचे संशयी मन । विश्वास पूर्ण दृढ नाहीं ॥३२८॥
एक आदरें उपदेशु घेती । मग होय नव्हे विकल्प चित्तीं ।
ऐशा अनेक शिष्यपंक्ती । ते जाण निश्चिती मायिक ॥३२९॥
अमायिक शिष्य (सच्छिष्य) (३३० ते ३४८)
आतां जे कां अमायिक । शोधितसत्त्वाचे सात्त्विक ।
मुख्य परमार्था साधक । जे अवंचक सर्वस्वे ॥३३०॥
जे गुरुचरणाचे अंकिले । जे गुरुवाक्या जीवें विकले ।
सद्गुरूलागी वहिलें । सर्वस्व आपुलें वोवाळिती ॥३३१॥
जो सद्गुरूच्या बोलावरी । जीविताची कुरवंडी करी ।
जो गुरुआज्ञेबाहेरी । तिळभरी हों न शके ॥३३२॥
सद्गुरूतें मनुष्यबुद्धी । पाहोंचि नेणे जो त्रिशुद्धी ।
सेवेलागी निरवधी । हर्षानंदी तत्पर ॥३३३॥
निजभावार्थे सादर । सेवेलागी अतितत्पर ।
शरीर आठही प्रहर । अणुमात्र वंचीना ॥३३४॥
उंच अथवा नीच काम । म्हणों नेणे मनोधर्म ।
गौण करोनि नित्यकर्म । मानी उत्तमोत्तम गुरुसेवा ॥३३५॥
सेवेलागी निष्कपट । नित्य निजभावें चोखट ।
जंव जंव सेवा पडे सदट । तंव तंव उद्भट उल्हासु ॥३३६॥
सच्छिष्य असच्छिष्य समुदावो । सद्गुरूसी सारिखेचि पहा वो ।
ज्याचे हृदयीं जैसा भावो । तैसा पहा हो फळभोग ॥३३७॥
‘भावेषु विद्यते देवो’ । हा उपदेशी मुख्य निर्वाहो ।
आपुला आपणया भावो । फळभोग पहा हो भोगवी ॥३३८॥
चुकवावया मृत्यूचा ठावो । जाणिवे आणितां निजभावो ।
हिरण्यकशिपु नाडला पहा हो । संधी साधोनि देवो निर्दळी त्यासी ॥३३९॥
तेथेंचि प्रल्हादाचा भावो । मज रक्षिता देवाधिदेवो ।
त्यासी साक्षेपें मारितां रावो । मरणचि वावो भावार्थे केलें ॥३४०॥
परमार्थी जें जाणपण । ते जाणावी नागवण ।
यालागीं सद्भावें जो संपूर्ण । तो जन्ममरणछेदकु ॥३४१॥
मी शिष्यपरीक्षकु ज्ञाता । हे सद्गुरूसी नाहीं अहंता ।
तेथें जैशी त्याची भावार्थता । तैशा तैशा अर्था तो पावे ॥३४२॥
हे असो सच्छिष्याचा सद्भावो । राया अभिनव कैसा पहा हो ।
गुरु ब्रह्म ऐक्यभावो । निजनिर्वाहो निष्टंक ॥३४३॥
माझ्या इंद्रियवृत्ती चाळिता । सद्गुरु ‘निजात्मा’ मजआंतौता ।
बाह्य सेवेलागी सर्वथा । ‘ब्रह्ममूर्ति’ तत्त्वतां सद्गुरु मानी ॥३४४॥
सद्गुरुचरणीं आपण । चित्त-वित्त-जीवितेंसी पूर्ण ।
करूनि घाली आत्मार्पण । सर्वस्वे संपूर्ण सर्वभावें ॥३४५॥
तेथें संतुष्टला स्वामी पूर्ण । तोही सर्वस्वे भुलोन ।
आवडी निजांगें आपण । सेवका आधीन स्वामी होये ॥३४६॥
आत्मार्पण करितां बळी । द्वारी द्वारपाळ जाहला वनमाळी ।
ऐसी भजनभावाची नवाळी । सेवकाजवळी स्वामी तिष्ठे ॥३४७॥
एवढी ये अगाध प्रीती । उत्तम भक्त स्वयें पावती ।
भाळ्याभोळ्यां हेचि स्थिती । कैशा रीती आतुडे ॥३४८॥
भागवतधर्म गुरूपाशी शिकावे (३४९ ते ३५०)
याचिलागी सद्गुरूपाशीं । शरण रिघावें सर्वस्वेशीं ।
तो संतोषोनियां शिष्यासी । भजनधर्मासी उपदेशी ॥३४९॥
जेणे भजनें भगवंत । भजोनि जाहले उत्तम भक्त ।
ते भागवतधर्म समस्त । शिकावे निश्चित सद्भावेंसीं ॥३५०॥
॥ पुंडलिकवरदा हरी विठ्ठल श्रीज्ञानदेव तुकाराम ॥
श्रीतुकाराम महाराजांची गाथा
अभंग क्र. ४७० ते ४८७
४७०.नावडे तरी का येतील हे भांड? । घेऊनियां तोंड काळे येथे ॥१॥
नासोनियां जाय रस या संगती । खळाचे पंगती नारायणा! ॥ध्रु॥
तोंडावाटे नर्क काढी अमंगळ । मिष्टान्ना विटाळ करी सुणे ॥३॥
तुका म्हणे नाहीं संतांची मर्यादा । निंदें तोचि निंदा मायझवा ॥४॥
४७१.लेंकरा आइतें पित्याचे जतन । दावी निजधन सर्व जोडी ॥१॥
त्यापरी आमुचा झालासे सांभाळ । देखिलाचि काळ नाहीं आड ॥ध्रु॥
भुकेचे सन्निध वसे स्तनपान । उपायाची भिन्न चिंता नाहीं ॥३॥
आळवूनि तुका उभा पैलथडी । घातली या उडी पांडुरंगें ॥४॥
४७२.शुद्धचर्या हे संतांचे पूजन । लागतचि धन नाहीं वित्त ॥१॥
सगुणाचे सोई सगुण विश्रांति । आपणचि येती चोजवीत ॥ध्रु॥
कीर्तनींच वोळे कृपेचा वोरस । दुरीपणे वास सन्निधता ॥३॥
तुका म्हणे वर्म सांगतों, ‘सवेगें । मन लावा लागें स्वहिताच्या’ ॥४॥
४७३.जीवींचे जाणावें या नांवें ‘आवडी’ । हेकड तें ओढी अमंगळ ॥१॥
चित्ताच्या संकोचें कांहींच न घडे । अतिशय वेडे चार तेचि ॥ध्रु॥
काळाविण कांहीं नाहीं रुचों येत । करूनि संकेत ठेवियेला ॥३॥
तुका म्हणे कळे वचनें चांचणी । काय बोलवूनि वेळोवेळां? ॥४॥
४७४.कामातुर चवी सांडीं । बरळ तोंडी बरळे ॥१॥
रंगलें तें अंगी दावी । विष देववी आसडे ॥ध्रु॥
धनसोसें लागे वेड । ते बडबड शमेना ॥३॥
तुका म्हणे व्यसने दोन्हीं । नर्कखाणी भोगावया ॥४॥
४७५.कृष्णांजने झाले सोज्वळ लोचन । तेणे दिले वाण निवडूनि ॥१॥
निरोपाच्या मापें करी लड-बड । त्याचें तेणें गोड नारायणे ॥ध्रु॥
भाग्यवंता घरी करितां विश्वासें । कार्य, त्यासरिसे होईजेतें ॥३॥
तुका म्हणे पोट भरे बऱ्या वोजा। निज ठाव निजा निजस्थानीं ॥४॥
४७६.मैंद आला पंढरीस । हाती घेऊनि प्रेमपाश ॥१॥
पुढे नाडियलें जग । नेतो लागों नेदी माग ॥ध्रु॥
उभारोनि बाहे । दृष्टादृष्टी वेधिताहे ॥३॥
वैकुंठीहूनि पेणें । केले पंढरीकारणे ॥४॥
पुंडलिकें थारा । देऊनि आणिलें या चोरा ॥५॥
तुका म्हणे चला । तुम्ही आम्ही धरूं त्याला ॥६॥
४७७.भांडवी माउली कवतुकें बाळा । आपणा सकळां साक्षित्त्वेसी ॥१॥
माझी माझी म्हणे एकएका मारी । हें तो नाही दुरी उभयतां ॥ध्रु॥
तुझे थोडें भातें माझें बहु फार । छंद करकर वाद मिथ्या ॥३॥
तुका म्हणे एके ठायीं आहे वर्म । हेंचि होय श्रम निवारितें ॥४॥
४७८.लटिकियाच्या आशा । होतो पडिलों वोळसा । होऊनियां दोषां-। पात्र मिथ्या अभिमानें ॥१॥
बरवी उघडली दृष्टी । नाहीं तरी होतों कष्टी । आक्रंदते सृष्टी-। मात्र या चेष्टांनीं ॥ध्रु॥
मरणाची नाही शुद्धि । लोभी प्रवर्तली बुद्धि । परती तो कधीं । घडेचि ना माघारी ॥३॥
सांचवूनि मरे धन । लावी पोरांसी भांडण । नाहीं नारायण । तुका म्हणे स्मरला ॥४॥
४७९.जवळी मुखापाशीं । असतां नेघे अहर्निशी ॥१॥
भवनिर्दळण नाम । विठ्ठल विठ्ठल नासी काम ॥ध्रु॥
सुखाचे शेजार । करूं का नावडे घर? ॥३॥
तुका म्हणे ठेवा । कां हा न करीच बरवा? ॥४॥
४८०.बरवें देशाउर झालों । काय बोले बोलावें? ॥१॥
लाभे लाभ दुणावला । जीव धाला दर्शनें ॥ध्रु॥
भाग्ये झाली संतभेटी । आवडी पोटी होती ते ॥३॥
तुका म्हणे श्रम केला । अवघा आला फळासी ॥४॥
४८१.सांगतां हें नये सुख । कीर्ति मुख न पुरे ॥१॥
आवडीने सेवन करूं । जीवींचें धरूं जीवींच ॥ध्रु॥
उपमा या देतां लाभा । काशा शोभा सारिखी ॥३॥
तुका म्हणे नुचलीं डोईं । ठेविली पायीं संतांचे ॥४॥
४८२.आपुलाला लाहो करूं । केणें भरूं हा विठ्ठल ॥१॥
भाग्यें पावलों या ठाया । आतां काया कुरवंडी ॥ध्रु॥
पुढती कोठे घडे ऐसें? । बहुतां दिसें फावले ॥३॥
तुका म्हणे झाली जोडी । चरण घडी न विसंबें ॥४॥
४८३.उजळलें भाग्य आतां । अवघी चिंता वारली ॥१॥
संतदर्शने हा लाभ । पद्मनाभ जोडला ॥ध्रु॥
संपुष्ट हे हृदयपेटी । करूनि पोटी सांठवूं ॥३॥
तुका म्हणे होता ठेवा । तो या भावा सांपडला ॥४॥
४८४.आम्हांसी आपुलें नावडे संचित । चरफडे चित्त कळवळ्याने॥१॥
न कळतां झाला खोळंबा मारगा । जगी झालों जगा बहुरूपी ॥ध्रु॥
कळों आलें बरे, उघडले डोळे । कर्णधार मिळे तरी बरें ॥३॥
तुका म्हणे व्हाल ऐकत करुणा । तरी नारायणा उडी घाला॥४॥
४८५.बरगासाठी खादले शेण । मिळतां अन्न न संडी ॥१॥
फजित तो केला, लाहे । ताडण, साहे, गौरव ॥ध्रु॥
ओढाळाची ओंगळ ओढी । उगी खोडी नवजाय ॥३॥
तुका फजीत करी बुच्या । विसरे कुच्च्या खोडी तेणें ॥४॥
४८६.धांव घालीं आई । आतां पाहातीस काई? ॥१॥
धीर नाहीं माझें पोटीं । झालों वियोगें हिंपुटी ॥ध्रु॥
करावें शीतळ । बहु झाली हळहळ ॥३॥
तुका म्हणे डोई । कईं ठेवीन हे पायीं? ॥४॥
४८७.तुम्हां ठावा होता देवा । माझे अंतरींचा हेवा ॥१॥
होती काशानें सुटका । तरी हे वैकुंठनायका! ॥ध्रु॥
नसते सांभाळिलें । जरी तुम्ही आश्वासिलें ॥३॥
तुका म्हणे कृपाळुवा! । बरवा केला सावाधांवा ॥४॥
॥ पुंडलिकवरदा हरी विठ्ठल श्रीज्ञानदेव तुकाराम ॥
संपूर्ण वारकरी प्रस्थानत्रयी नित्यनेम पारायण अनुक्रमणिका
ज्यांना प्रत्यक्षात ग्रंथावरून पारायण करायचे आहे त्यांनी खालील लिंकवरून ग्रंथ मागवावे.
ग्रंथ