
अनुक्रमणिका
- श्रीज्ञानेश्वरी नित्यनेम पारायण क्रमश: नित्यनेम पारायण अध्याय – ३. ओवी क्र. १४६ ते १६८
- श्रीएकनाथी भागवत क्रमश: नित्यनेम पारायण अध्याय – ३, ओवी क्र. ३५१ ते ३९९
- सत्संग-असत्संग (३५१ ते ३५४)
- प्रश्रय (विनय) (३५५ ते ३५८)
- दया (३५९ ते ३६५)
- मैत्री (३६६ ते ३६८)
- भाव (श्रद्धा) (३६९ ते ३७७)
- शुचिता (३७८ ते ३९९)
- श्रीतुकाराम महाराजांची गाथाअभंग क्र. ४८८ ते ५०३
- ग्रंथ
या कुन्देन्दुतुषारहारधवला या शुभ्रवस्त्रावृता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना ।
या ब्रह्माच्युतशङ्करप्रभृतिभिर्देवै: सदा वन्दिता सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापहा ॥
जयांचे केलिया स्मरण । होय सकळ विद्यांचे अधिकरण । तेचि वंदूं श्रीचरण । श्रीगुरूंचे ॥१॥
ते नमस्कारोनि आता ॥
श्रीगणेशाय नमः । श्रीसरस्वत्यै नमः । श्रीविठ्ठलाय नमः ।
श्रीमातापितृभ्यां नमः । श्रीगुरुभ्यो नमः ॥
ॐ नमो भगवते वासुदेवाय ।
रामकृष्णहरि । रामकृष्णहरि । रामकृष्णहरि ॥
श्रीज्ञानेश्वरी नित्यनेम पारायण
क्रमश: नित्यनेम पारायण
अध्याय – ३. ओवी क्र. १४६ ते १६८
ओव्या: देखें, असतेनि देहधर्में । एथ तोचि एकु न लिंपे कर्में । जो अखंडित रमे । आपणपांचि ॥४६॥
जे, तो आत्मबोधें तोषला । तरी, कृतकृत्य देखें जाहला । म्हणौनि सहजें सांडवला । कर्मसंगु ॥४७॥
ओव्या: तृप्ति जालिया जैसी । साधनें सरती अपैसीं । देखें, आत्मतुष्टी तैसीं । कर्में नाहीं ॥४८॥
जंववरी अर्जुना । तो बोधु भेटेना मना । तंवचि यया साधना । भजावें लागे ॥४९॥
ओव्या: म्हणौनि तूं नियतु । सकळ कामनारहितु । होऊनियां; उचितु । स्वधर्में राहाटें ॥१५०॥
जें स्वधर्में निष्कामता । अनुसरले, पार्था । ते कैवल्यपद तत्त्वतां । पातले जगीं ॥५१॥
ओव्या: देख पां, जनकादिक । कर्मजात अशेष । न सांडितां, मोक्षसुख । पावते जाहले ॥५२॥
याकारणें, पार्था । होआवी कर्मी आस्था । हे आणीकही एका अर्था । उपकारैल ॥५३॥
जे-“आचरतां आपुणपां । देखौ लागेल लोका यया । तरी चुकेल हा अपाया । प्रसंगेंचि’ ॥५४॥
देखें प्राप्तार्थ जाहले । जे निष्कामता पावले । तयाही कर्तव्य असे उरलें । लोकांलागीं ॥५५॥
मार्गीं अंधासरिसा । पुढें देखणाही चाले जैसा । अज्ञाना प्रगटावा धर्मु तैसा । आचरोनि ॥५६॥
हां गा, ऐसें जरी न कीजे । तरी अज्ञाना काय उमजे? । तिहीं कवणें परी जाणिजे । मार्गातें या? ॥५७॥
ओव्या: एथ वडील जें जें करिती । तया नाम धर्मु ठेविती । तेंचि येर अनुष्ठिती । सामान्य सकळ ॥५८॥
हें ऐसें असे स्वभावें । म्हणौनि कर्म न सांडावें । विशेषें आचरावें । लागे, संतीं ॥५९॥
ओव्या: आतां आणीकांचीया गोष्टी । कायसा सांगो, किरीटी? । देखें, मीच इये राहाटी । वर्ततु असें ॥१६०॥
काय सांकडें कांहीं मातें? । कीं, कवणें एकें आर्तें । आचरें मी धर्मातें । म्हणसी जरी ॥६१॥
तरी पुरतेपणालागी । आणीकु दुसरा नाहीं जगीं । ऐसी सामुग्री माझ्या अंगी । जाणसी तूं ॥६२॥
मृत गुरुपुत्र आणिला । तो तुंवां पवाडा देखिला । तोही मी; उगला । कर्मी वर्तें ॥६३॥
ओव्या: परी स्वधर्में वर्तें कैसा । साकांक्षु कां होय जैसा । तयाची एका उद्देशा- । लागोनियां ॥६४॥
जें, भूतजात सकळ । असे आम्हांचि आधीन केवळ । तरी न व्हावें बरळ । म्हणौनियां ॥६५॥
ओव्या: आम्ही पूर्णकाम होऊनी । जरी आत्मस्थिती राहुनी । तरी प्रजा हे, कैसेनि । निस्तरेल?॥६६॥
इहीं आमुची वास पाहावी । मग वर्ततीपरी जाणावी । तें लोकस्थिति आघवी । नासिली होईल ॥६७॥
म्हणौनि समर्थु जो येथें । आथिला सर्वज्ञते । तेणें सविशेषें कर्मातें । त्यजावें ना ॥६८॥
॥ पुंडलिकवरदा हरी विठ्ठल श्रीज्ञानदेव तुकाराम ॥
श्रीएकनाथी भागवत
क्रमश: नित्यनेम पारायण
अध्याय – ३, ओवी क्र. ३५१ ते ३९९
श्रीगणेशाय नमः ॥ श्रीसरस्वत्यै नमः ॥ श्रीगुरुभ्यो नमः ॥ श्रीदत्तात्रेयाय नमः ॥ श्रीरुक्मिणीपाण्डुरङ्गाभ्यां नमः ॥
सत्संग-असत्संग (३५१ ते ३५४)
हेचि सद्गुरु उपदेशिती । असत्संगतित्यागार्थ ॥५१॥
(प्रथम विषयांचे ठिकाणी चित्ताची विरागस्थिती, सज्जनांचे ठिकाणी अनुराग, ज्याच्या त्याच्या योग्यतेनुसार दया, मैत्री व नम्रता प्रत्यक्ष आचरणात आणावी. ॥२३॥)
ओव्या: सर्वांपासोनि निःसंग । जरी मनी होणे आहे चांग ।
तें अवश्य धरावा सत्संग । असत्संग त्यागावा ॥५२॥
मुख्य असत्संग देहसंगती । त्याची समूळ करावी निवृत्ती ।
जगी दाटुगी सत्संगती । जाण निश्चितीं नृपनाथा ॥५३॥
जेथें दया मैत्री प्रश्रयो पूर्ण । मुख्यत्वे हे त्रिविध लक्षण ।
अवश्य करावे आपण । सत्संग प्रमाण स्वहितासी ॥५४॥
प्रश्रय (विनय) (३५५ ते ३५८)
सांडोनियां देहाभिमान । त्यासी लोटांगण घालावें ॥५५॥
साधूपरता पूज्य पहा हो । जगीं नाहीं आन देवो ।
संतपूजनें देवाधिदेवो । स्वयमेवो संतुष्टे ॥५६॥
संतपदींचे रजःकण । शिरीं वंदावे श्रद्धेनें पूर्ण ।
संतांपुढे जाणपण । सर्वथा आपण न मिरवावें ॥५७॥
देखोनि संतसमुदावो । अनन्यगती भगवद्भावो ।
भगवद्भावें नम्र स्वभावो । ‘प्रश्रयो’ पहा हो या नांव ॥५८॥
दया (३५९ ते ३६५)
हे दयेचें निजलक्षण । सावधान अवधारीं ॥५९॥
भूतांसी कठिणपण । देखतां निघों पाहे प्राण ।
मा स्वयें करील आपण । हे सर्वथा जाण स्वप्नीं न घडे ॥३६०॥
जेणे आपणासी होय दुःख । तें भूतांसी करीना निःशेख ।
जेणे आपणासी होय सुख । तें आवश्यक करी दीना ॥६१॥
सर्व भूती दया समान । कदा न बोले कठिणपण ।
भूतांची पीडा निवारण । करोनि आपण सुखोपाय चिंती ॥६२॥
जीवमात्रीं दुरुक्ती बोलतां । जिव्हेच्या घेवों पाहे जीविता ।
भूती दुष्टपण चाळितां । समूळ निजचित्ता निर्दाळू पाहे ॥६३॥
भूतांसी जेथ पीडा पावे । त्यातळी जीव घालूं धांवे ।
जीवापरीस भूतें सर्वें । दयागौरवें पढियंतीं ॥६४॥
ऐसे जें कारुण्य पूर्ण । त्या नांव ‘दया’ संपूर्ण ।
आतां मैत्रीचे लक्षण । असाधारण तें ऐका ॥६५॥
मैत्री (३६६ ते ३६८)
तरी न करितांचि मैत्री पाहीं । ठायींचे ठायीं अलोलिक॥६६॥
जे विषयवियोगें न विटे । नाना विकल्पी न तुटे ।
आलिया परम संकटें । ‘मैत्री’ नेटेपाटें सदा ग्राह्य ॥६७॥
या नांव गा मित्रभावो । प्राण गेलिया न तुटे पहा हो ।
देखतां कल्पांतकाळघावो । निजमित्रसमुदावो एकवटे की ॥६८॥
भाव (श्रद्धा) (३६९ ते ३७७)
त्या श्रद्धेची व्युत्पत्ती । यथानिगुती सांगेन ॥६९॥
नवल श्रद्धेचे लक्षण । ब्रह्मा मुंगी समसमान ।
तरी यथोचित विधान । सर्वथा जाण चुकेना ॥३७०॥
अर्घ्यपाद्यादि पूजन । सकळ दान आणि सन्मान ।
हे श्रद्धा ब्राह्मणी संपूर्ण । एकासी तें जाण अन्नमात्रचि ॥७१॥
एका अन्न आच्छादन । एकासी ते कोरडे कण ।
तृण आणि जीवन । एका पयःपान यथोचित ॥७२॥
जेणें ज्यासी सुख संपूर्ण । तें तें करी उचित श्रद्धे जाण ।
अनुचित श्रद्धेचें विंदाण । दुःखकारी संपूर्ण सर्वार्थीं ॥७३॥
जेवीं ब्राह्मणा वाढिलें तृण । गाईस वाढिलें मिष्टान्न ।
श्वानासी बैसणे सिंहासन । साधूसी आसन थारोळा ॥७४॥
व्याघ्रासी पडिल्या लंघन । त्यासी अर्पू नये गोदान ।
गाय गादल्या संपूर्ण । तैलाभ्यंजन करूं नये ॥७५॥
हो कां देह-इंद्रिये जरी एकें । तरी जिव्हाकर्म नव्हे नाकें ।
तेवीं एक भूतात्मा भूतवेखें । उचितोन्मुखें यजावा ॥७६॥
करितां यथोचित अर्पण । जरी क्रिया दिसे भिन्न भिन्न ।
तरी अंतरश्रद्धा अभिन्न । हे मुख्य लक्षण भागवतधर्मी ॥७७॥
शुचिता (३७८ ते ३९९)
हेच आतुडे कैशा रीतीं । प्रबुद्ध तदर्थी उपाव सांगे ॥७८॥
तेचि नव श्लोकी श्लोकोक्ती । समूळ भागवतधर्मस्थिती ।
प्रबुद्ध सांगे रायाप्रती । साधकां निजप्राप्ती साधावया ॥७९॥
(अर्थ – देहमनाची शुद्धी, वर्णाश्रमाचा उचित आचार, चरफडल्यावाचून सहन करणे, वायफळ न बोलणे, शास्त्राध्ययन, मनाचा सरळपणा, इंद्रियनिग्रह, काया-वाचा-मनाने दुसऱ्यास पीडा न देणे, आणि (सुखदु:खादी)द्वंद्वाविषयी समबुद्धी.)
ओव्या: मुख्य साधावया परमार्था । अवश्य पाहिजे गा ‘शुचिता’ ।
शुचित्वावांचोनि तत्त्वता । न लाभे हाता निजस्वार्थु ॥३८०॥
यालागीं गा नृपनाथा । शुद्ध शौचाची आइक कथा ।
आंतर मळ न क्षाळितां । न लाभे हाता बाह्यशुद्धी ॥८१॥
मन मळिण वासनामळे । तें न करितां सोंवळे ।
बाह्य पवित्रता अहंबळें । तें जाण आंधळे न्याहाळी जैसें ॥८२॥
मन मळिण वासनामळे । तें प्रक्षाळूनि सोविळे ।
करावें गा भावबळें । गुरुवाक्यमेळे निजनिष्ठा ॥८३॥
सोने जेवीं पुटीं पडे । मळ तुटे वाणी चढे ।
तेवीं गुरुसेवा जडत्व मोडे । चित्तशुद्धी जोडे निर्दुष्ट ॥८४॥
आरशासी सहाणी तोडिजे । तेणें स्वमुखा शुद्धत्व जोडिजे ।
तेवीं चित्तशुद्धी उघडिजे । सहजीं सहजें निजशुद्धी ॥८५॥
लोहें परिसु झांकिजे । तंव लोहत्वा मुकिजे ।
तेवीं अंतरशुद्धीने कीजे । महा निर्बुजे स्थूळबुद्धि ॥८६॥
सूर्यासन्मुख सूर्यकांत । जाहलिया शुद्धत्वें होय दीप्त ।
ते प्रभा बाह्य प्रकाशत । अग्निहोत्रार्थ महायागा ॥८७॥
तेवीं गुरुवाक्ये अंतरशुद्धता । सबाह्य आली शुचिता ।
हे न करिती जे पवित्रता । ते जाण तत्त्वतां अतिभंडिमा ॥८८॥
अल्प जळ शौचाप्रती । तेणें हात करकटले ठाती ।
शेवटीं गिरबडे बृहती । तेवीं विकल्पी होती अपवित्र ॥८९॥
भरलें काळकूट जीवीं । वरी टवटव अतिबरवी ।
तें इंद्रावण कोणीही न सेवी । अंतरस्वभावी अतिमळिण ॥३९०॥
तीर्थी धुतला रजकराजु । तो काय होईल शुद्ध द्विजु ।
नटें घेतला राजध्वजु । तो नव्हे पूज्यु बाह्यक्रियावशें ॥९१॥
सुंदरी सुकुमार साजिरी । वोठी कुष्ठता तिळभरी ।
जाहलिया तीते कोणी न वरी । वरीवरी बरी दिसताही ॥९२॥
नागवी माथां मोत्यांची जाळी । शिंबरी सुपाणीदाणा ल्याली ।
तेवीं बाह्य पवित्रता दाविली । ते ते केली निजभंडिमा ॥९३॥
दहें माखला वायसु । तो काय होईल राजहंसु ।
दही म्हणोनि मथितां कापुसु । तृप्ती नव्हे उपहासु जगीं प्रगटे ॥९४॥
तेवीं अंतरीं विकल्पु असतां । बाह्य जे जे पवित्रता ।
ते ते क्रिया नृपनाथा । जाण तत्त्वतां अतिभंडिमा ॥९५॥
अंतर क्षाळिलें गुरुप्रतीती । बाह्य क्षाळिलें शास्त्रयुक्तीं ।
ऐसें शुचित्व निजनिश्चितीं । अद्वैत स्थिती तेथे नांदे ॥९६॥
अंतरीं शुचित्व पूर्ण वसे । तें बाह्यकर्मीं स्वयें प्रकाशे ।
तें शुचित्वचि अनायासें । परमार्थदशे प्रकाशी ॥९७॥
ईश्वरभावाचे निजवर्म । ज्याचे पोटी रिघालें सप्रेम ।
त्याचे कर्मचि होय ब्रह्म । त्या देहभ्रम बाधीना ॥९८॥
या नाम ‘शुचिष्मता’ । सत्य जाण गा नृपनाथा ।
तपाचीही स्थिती आतां । ऐक तत्त्वतां सांगेन ॥९९॥
॥ पुंडलिकवरदा हरी विठ्ठल श्रीज्ञानदेव तुकाराम ॥
श्रीतुकाराम महाराजांची गाथा
अभंग क्र. ४८८ ते ५०३
पाहातां, ‘काशा तूं सारिखा । तिहीं लोकांच्या जनका’ ॥ध्रु॥
आरुष हे वाणी । गोड करूनि घेतां कानीं ॥३॥
आवडीने खेळे । तुका पुरवावे सोहळे ॥४॥
जीव आला पायांपाशीं । येथें असें कलिवरेसीं ॥ध्रु॥
कांहींच नाठवें । ठायीं बैसले नुठवें ॥३॥
जीव असतां पायीं । तुका ठकावला ठायीं ॥४॥
विश्व तूं व्यापक काय मी निराळा? । काशासाठी बळा येऊं आतां? ॥ध्रु॥
काय सारोनियां काढावे बाहेरी । आणूनि भीतरी काय ठेवूं?॥३॥
केला तरि उरे वादच कोरडा । बळे घ्यावी पीडा स्वप्नींची ते? ॥४॥
अवघेचि वाण आले तुम्हां घरा । मजुरी मजुरा रोजकीर्दी ॥५॥
तुका म्हणे कांहीं नेणें लाभ हानी । असेल तो धनी राखो वाडा ॥६॥
कां हो विचाराचे पडिलें सांकडें । काय ऐसे कोडें उपजलें? ॥ध्रु॥
कां हो उपजेना द्यावी ऐसी भेटी । काय द्वैत पोटीं धरिलें देवा! ॥३॥
पाप फार किंवा झालासी दुर्बळ । मागिल ते बळ नाहीं आतां? ॥४॥
काय झालें देणें, निघालें दिवाळें । की बांधलासि बळें ऋणेपायीं? ॥५॥
तुका म्हणे कां रे ऐसी केली गोवी? । तुझी माझी ठेवी निवडुनी ॥६॥
काय सेवूं वन शीत उष्ण तहान । साहों की मोहन धरूनि बैसों? ॥ध्रु॥
काय लावूं अंगीं भस्म उधळण । हिंडूं देश कोण खुंट चारी? ॥३॥
काय त्यजूं अन्न करूं मी उपवास । काय करूं नास जीवित्वाचा? ॥४॥
तुका म्हणे काय करावा उपाव । ऐसा देईं भाव पांडुरंगा! ॥५॥
अंतरती तुझे पाय मज दुरी । धरितां हे थोरी जाणिवेची ॥ध्रु॥
पिंडाच्या पाळणें धांवतीं विकार । आहे दावेदार मजमाजीं ॥३॥
कैसा करूं घात आपुला आपण । धरूनि गुमान लोकलाज ॥४॥
तुका म्हणे मज दावीं तो सोहळा । देखें पाय डोळां तुझे देवा! ॥५॥
आइकाजी देवा ऐसी आहे नीत । काय तें उचित सांभाळावें ॥ध्रु॥
देशोदेशी धाक जयाच्या उत्तरें । तयाचें कुतरें परि भलें ॥३॥
तुका म्हणे हे कां सुचलें उत्तर । जाणोनि अंतर ओळखावें ॥४॥
होसी निवारिता आमुचें सकळ । भय तळमळ पापपुण्य ॥ध्रु॥
भोगिले ते भोग लावूं तुझें अंगीं । अलिप्त या जगी होऊनि राहों ॥३॥
तुका म्हणे आम्ही लाडिकीं लेकरें । न राहों अंतरें पायांविण ॥४॥
सर्वकाळ होतों आठवीत मनीं । फिटली ते धणी येणें काळे ॥ध्रु॥
तुका म्हणे वाचा राहिली कुंठित । पुढे झाले चित्त समाधान ॥३॥
विठ्ठले हे अंग व्यापिली ते काया । विठ्ठल हे छाया माझी मज ॥ध्रु॥
बैसला विठ्ठल जिव्हेचिया माथां । न वदे अन्यथा आन दुजें ॥३॥
सकळां इंद्रियां मन हे प्रधान । तेंही करी ध्यान विठोबाचें ॥४॥
तुका म्हणे या हो विठ्ठलासी आतां । नये विसंबतां माझें मज ॥५॥
काय करावी साधनें । फळ अवघेचि येणें ॥ध्रु॥
अभिमान नुरे । कोड अवघेचि पुरे ॥३॥
तुका म्हणे डोळां । विठो बैसला सांवळा ॥४॥
अवघा होय पांडुरंग । राहे धरूनियां अंग ॥ध्रु॥
न लगे धन मान । देहभावें उदासीन ॥३॥
तुका म्हणे मळ । नासी तात्काळ तें स्थळ ॥४॥
ऐसें येते नित्य माझ्या अनुभवा । मनासी हा ठावा समाचार ॥ध्रु॥
जागृतीचा नाहीं अनुभव स्वप्नीं । जातों विसरूनि सकळही ॥३॥
प्रपंचाबाहेरी नाही आले चित्त । केले करी नित्य वेवसाव ॥४॥
तुका म्हणे मज बहुरूप्याची परी । झाले सोंग वरी आंत तैसें ॥५॥
गातों नाचतों तें दाखवितों जना । प्रेम नारायणा नाहीं अंगीं ॥ध्रु॥
पाविजे तें वर्म न कळेचि कांहीं । बुडालों या डोहीं दंभाचिया ॥३॥
भांडवल काळे हातोहाती नेलें । माप या लागले आयुष्यासी ॥४॥
तुका म्हणे ‘वायां गेलों’ ऐसा दिसें । होईल या हांसें लौकिकाचें॥५॥
येऊनियां वास करिसी हृदयीं । ऐसें घडे कईं कासयानें ॥ध्रु॥
साच भावें तुझें चिंतन मानसीं । राहे हे करिसी कैं गा देवा! ॥३॥
लटिकें हें माझें करूनियां दुरी । साच तूं अंतरी येऊनि राहें ॥४॥
तुका म्हणे मज राखावें पतिता । आपुलिया सत्ता पांडुरंगा! ॥५॥
रात्री न कळे दिवस न कळे । अंगी खेळे दैवत हे ॥ध्रु॥
नवसियाचे पुरवी नवस । भोगी त्यास भिन्न नाहीं ॥३॥
तुका म्हणे समचि देणें । समचरणीं उभा असे ॥४॥
॥ पुंडलिकवरदा हरी विठ्ठल श्रीज्ञानदेव तुकाराम ॥
संपूर्ण वारकरी प्रस्थानत्रयी नित्यनेम पारायण अनुक्रमणिका
ज्यांना प्रत्यक्षात ग्रंथावरून पारायण करायचे आहे त्यांनी खालील लिंकवरून ग्रंथ मागवावे.





