दिवस – ३४. वारकरी प्रस्थानत्रयी नित्यनेम पारायण

अनुक्रमणिका

ये मे मतमिदं नित्यमनुतिष्ठन्ति मानवा:| श्रद्धावन्तोऽनसूयन्तो मुच्यन्ते तेऽपि कर्मभि: ॥३१॥
हें अनुपरोध मत माझें | जिहीं परमादरें स्वीकारिजे | श्रद्धापूर्वक अनुष्ठिजे | धनुर्धरा ॥९२॥
तेही सकळ कर्मीं वर्ततु | जाण पां कर्मरहितु | म्हणौनि, हें निश्चितु | करणीय गा ॥९३॥
ये त्वेतदभ्यसूयन्तो नानुतिष्ठन्ति मे मतम्‌‍| सर्वज्ञानविमूढांस्तान्विद्धि नष्टानचेतस:॥३२॥
नातरी, प्रकृतिमंतु होऊनी | इंद्रिया लळा देउनी | जें हें माझें मत अव्हेरुनी | ओसंडिती ॥९४॥
जे सामान्यत्वें लेखिती | अवज्ञा करूनि देखिती | कां, हा अर्थवादु म्हणती | वाचाळपणें ॥९५॥
ते मोहमदिरा भुलले | विषयविखें घारले | अज्ञानपंकीं बुडाले | निभ्रांत मानीं ॥९६॥
देखैं, शवाच्या हाती दिधलें | जैसें रत्न कां वायां गेलें | नातरी, जात्यंधा पाहलें!| प्रमाण नोहे ॥९७॥
कां, चंद्राचा उदयो जैसा | उपयोगा न वचे वायसा | मूर्खा विवेकु हा तैसा | रुचेल ना ॥९८॥
तैसें जें पार्था | विमुख या परमार्था | तयांसी संभाषण सर्वथा | करावे ना ॥९९॥
म्हणौनि ते न मानिती | आणि निंदाही करूं लागती | सांगैं, पतंगु काय साहती | प्रकाशातें?॥२००॥
पतंगा दीपीं आलिंगन | तेथ त्यासी अचुक मरण | तेंवीं विषयाचरण | आत्मघाता ॥१॥
सदृशं चेष्टते स्वस्या: प्रकृतेर्ज्ञानवानपि | प्रकृतिं यान्ति भूतानि निग्रह: किं करिष्यति ॥३३॥
म्हणौनि इंद्रिये एकें | जाणतेनी पुरुखें | लाळावीं ना; कौतुकें | आदिकरुनी ॥२॥
हां गा, सर्पेसीं खेळो येईल?| कीं, व्याघ्रसंसर्ग सिद्धि जाईल?| सांगैं, हळाहळ जिरेल | सेविलिया काई?॥३॥
देखैं, खेळतां अग्नि लागला | मग तो न सांवरे, जैसा उधवला | तैसा इंद्रियां लळा दिधला | भला नोहे!॥४॥
एऱ्हवीं तरी, अर्जुना | या शरीरा पराधीना | कां नाना भोगरचना | मेळवावी? ॥५॥
आपण सायासेंकरुनि बहुतें | सकळही समृद्धिजातें | उदो अस्तु या देहातें | प्रतिपाळावें कां? ॥६॥
सर्वस्वें शिणोनि एथें | अर्जवावी संपत्तिजातें | तेणें स्वधर्मु सांडुनि देहातें | पोखावें काई ॥७॥
मग हे तंव पांचमेळावा | शेखीं अनुसरेल पंचत्वा | ते वेळीं, केला, कें गिवसावा | शीणु आपुला?॥८॥
म्हणौनि, केवळ देहभरण | ते जाणें उघडी नागवण | यालागी, एथ अंत:करण | देयावेंना ॥९॥
इन्द्रियस्येन्द्रियस्यार्थे रागद्वेषौ व्यवस्थितौ| तयोर्न वशमागच्छेत्तौ ह्यस्य परिपन्थिनौ॥३४॥
एऱ्हवीं, इंद्रियांचिया अर्था-| सारिखा विषो पोखितां | संतोषु कीर चित्ता | आपजेल ॥२१०॥
परी तो संवचोराचा सांगातु | जैसा नावेक स्वस्थु | जंव नगराचा प्रांतु | सांडिजेना ॥११॥
बापा, विषाची मधुरता | झणें आवडी उपजे चित्ता?| परी तो परिणामु विचारितां | प्राणु हरी ॥१२॥
देखैं, इंद्रियीं कामु असे | तो लावी सुखदुराशे | जैसा, गळीं मीनु आमिषें | भुलविजे गा ॥१३॥
परी तयामाजी गळु आहे | जो प्राणातें घेऊनि जाये | तो जैसा ठाउवा नोहे | झांकलेपणें ॥१४॥
तैसें अभिलाषे येणें कीजेल | विषयांची आशा धरिजेल | तरी वरपडा होईजेल | क्रोधानळा॥१५॥
जैसा कवळोनिया पारधी | घातेचिये संधी | आणी मृगातें बुद्धि | साधावया ॥१६॥
एथ तैसीचि परी आहे | म्हणौनि संगु हा तुज नोहे | पार्था, दोन्ही कामक्रोध हे | घातुक जाणें ॥१७॥
म्हणौनि हा आश्रयोचि न करावा | मनेंहि आठवो न धरावा | एकु निजवृत्तीचा वोलावा | नासों नेदी ॥१८॥

अहिंसा (४५० ते ४६२)

आतां अहिंसेची स्थिती । ऐकें राया चक्रवर्ती । भंवई उचलणें नाहीं भूतीं । स्वप्न सुषुप्ती-जागतां ॥४५०॥
पावो आदळतां देख । झणीं पृथ्वी पावेल दुःख । या काकुलती आवश्यक । पाउलें अलोलिक हळुवार ठेवी ॥५१॥
आकाश दचकेल देख । यालागी नेदी सैरा हांक । वाचा परिपक्क पीयूख । वचनें परम सुख सर्वांसी देतु ॥५२॥
त्याचा शब्दु जैं गगनीं भरे । तेणें शब्दानंदचमत्कारें । गगनचि निजसुखें भरे । येणें सुखोद्गारे वचनोक्ती ॥५३॥
जळामाजी घालितां उडी । झणी उदक दडपे बुडीं । तरंगन्यायें देणे बुडी । जीवनाची दुथडी न हेलावतां ॥५४॥
त्यासी जळीं होतां निमग्न । जळाचा तापु शमे संपूर्ण । यापरी करी स्नान । जीवना जीवन निववितु ॥५५॥
झणीं दुःख पावेल वारा । म्हणौनि श्वासु न घाली सैरा । नेमूनि प्राणसंचारा । निजशरीरा वागवी ॥५६॥
निजदेहा करावया घातु । सर्वथा जेवीं नुचले हातु । तेवीं भूतांवरी निघातु । ज्याच्या पोटांतु उपजेना ॥५७॥
अत्यंत न्याहारे पाहतां । वचकु पडेल प्राण्यांच्या चित्ता । यालागीं बाह्यदृष्टी क्रूरता । न पाहे भूतां भूतभावें ॥५८॥
रोम रगडतील संपूर्ण । यालागीं न करी अंगमर्दन । एवं स्वदेहाचें देहपण । भूतहिंसाभेण अहंत्वा नाणी ॥५९॥
भूतां देतां दुःखलेशु । भूती दुखवेल भूतेशु । ऐसा ज्याचा दृढ विश्वासु । तेथ रहिवासु अहिंसेचा ॥४६०॥
कायिक-वाचिक-मानसिक । भूतां उपजे त्रिविध दुःख । तें जेथें निमाले निःशेख । अहिंसा देख ते ठायीं ॥६१॥
या नांव गा शुद्ध ‘अहिंसा’ । सत्य जाण नृपवरेशा । आतां द्वंद्वसाम्याची दशा । आइक क्षितीशा सांगेन ॥६२॥

द्वंद्वसाम्य (४६३ ते ४७६)

सुख दुःख अदृष्टाधीन । तें अदृष्ट देहाचे माथां पूर्ण । ऐसें जाणोनि आपण । निर्द्वद्व संपूर्ण सद्गुरूवाक्ये ॥६३॥
अदृष्टें देह सुखदुःख भोगी । मूर्ख तेथ रागी विरागी । शिष्यु लागों नेदी निजांगीं । गुरुवाक्यरंगी रंगला ॥६४॥
देहींचेनि सुखें सुखावतां । सवेंचि दुःख चढे माथां । हे गुरूने जाणोनि तत्त्वतां । देहअहंता सांडविली ॥६५॥
निरभिमान्याच्या अंगीं । दुःख नुरेचि दुःखनियोगीं । सुख नुरेचि सुखसंभोगीं । तो उभयभागी अलिप्त ॥६६॥
छाया उष्णामाजीं तापली । ते छाया छायेंचि निवाली । तेवीं सुखदुःखें मिथ्या जाहलीं । स्थिति सुखावली यथानुलाभे ॥६७॥
अदृष्टें देही वर्ततां देख । बाधूं न शके सुखासुख । हे गुरुगम्य अलोलिक । शिष्य विश्वासिक पावती ॥६८॥
विश्वासेंवीण सर्वथा । गुरुगम्य न ये हाता । गुरुगम्येंवीण तत्त्वतां । द्वंद्वसमता कदा न घडे ॥६९॥
देहीं दृढता जंव मीपण । तंव तंव द्वंद्वबाधा दारुण । जे गुरुवाक्ये निरभिमान । त्यांसी द्वंद्वे जाण अतिमिथ्या ॥४७०॥
स्वप्नींचें दरिद्र-समर्थता । जेवीं दोनी मिथ्या जागृता । तेवीं द्वंद्वबाधेची वार्ता । न बाधे गुरुभक्तां अपरोक्षबोधे ॥७१॥
लेंकुरांच्या खेळापाशीं । पारणें तैशी एकादशी । द्वंद्वाची दशा तैशी । गुरुवाक्यासरिसी समूळ उडे ॥७२॥
जेवीं चंदनाचिया द्रुतीं । आरीबोरी चंदन होती । तेवीं गुरुवाक्यप्रतीती । सकळ द्वंद्वे येती निजसाम्या ॥७३॥
चंदनासभोंवती झाडें । तीही कोरडी लांकडें । देवद्विजांचे मस्तकी चढे । भाग्य एवढे सत्संगीं ॥७४॥
सद्गुरू तोचि सत्संगती । तत्संगें शिष्य पालटती । स्वयें ब्रह्मरूप होती । तेव्हां द्वंद्वे येती निर्द्वंद्वा ॥७५॥
एवं गुरूवाक्यी विश्वासतां । द्वंद्वसाम्य चढे हाता । तें गुरुवाक्यही तत्त्वतां । ऐक आतां सांगेन ॥७६ ॥

अद्वैतबोध-परब्रह्मप्राप्ती (४७७ ते ४९१)

सर्वत्रात्मेश्वरान्वीक्षां कैवल्यमनिकेतताम् । विविक्तचीरवसनं सन्तोषं येन केनचित् ॥२५ ॥
सद्गुरुवचनविश्वासें । मानी सर्वत्र परमात्मा ऐसें । तेचि निजबुद्धी निश्चयवशें । निजमानसें विवंची ॥७७॥
मजमाजी परमात्मा वसे । तेणें स्थूळदेहो वर्ततसे । त्याचेनि पूर्ण चित्प्रकाशें । जग भासे जगद्रूपें ॥७८॥
तेणें निजात्मप्रकाशें । माझे दृष्टीसी दृश्य दिसे । दृश्यद्रष्टृदर्शनविलासें । विलसतसे परमात्मा ॥७९॥
दृश्य दृश्यपणे जें जें उठी । तें तें निजात्मता पाठींपोटीं । तेणें अन्वयें देवो देखे दृष्टी । आहाळबाहाळ सृष्टि दुमदुमित ॥४८०॥
तेव्हां जें जें देखे भूताकृती । तेथ परमात्मा ये प्रतीती । मी नियंता ईश्वर त्रिजगतीं । हेही स्फूर्ती स्फुरों लागे ॥८१॥
जग वर्ते माझिया सत्ता । मी कळिकाळाचा नियंता । मी उत्पत्तिस्थितिप्रलयकर्ता । हे मूळ अहंता स्वभावें स्फुरे ॥८२॥
येणें पूर्वान्वयें जंव पाहे । तंव सर्वी सर्व मीचि आहे । तें पाहते पाहणे पाहों ठाये । तेथें ‘अहं’ जाये विरोनि ॥८३॥
तेथें परब्रह्मैक प्रसिद्ध । कोंदला ठाके सच्चिदानंद । ऐसा गुरुवाक्यें प्रबोध । शिष्य अतिशुद्ध पावती ॥८४॥
तेव्हां वैकुंठी देवो आहे । हे बोलणे त्या आहाचि होये । क्षीरसागरी देवो राहे । हे ऐकतांचि पाहें अनिवार हांसे ॥८५॥
देवावांचोनि तत्त्वतां । तिळभरी ठावो नाहीं रिता । त्याते एकदेशी नेमितां । न मने वस्तुतां सच्छिष्यासी ॥८६॥
वैकुंठ आणि क्षीराब्धी । ज्याचेनि प्रकाशे ज्यामधीं । तो वैकुंठवासी अथवा क्षीराब्धीं । हे बोल सोपाधी शबलत्वाचे ॥८७॥
जेथ सर्वी सर्व परमात्मा । तेथ एकदेशी न सरे महिमा । तो पूर्णब्रह्म अनाश्रमा । वैकुंठादि आश्रमा वश नव्हे ॥८८॥
अखंडातें आवाहन । अधिष्ठानातें आसन । सर्वगता सिंहासन । कल्पिती स्थान निजकल्पना । ।८९॥
तेहीं कल्पिती निजवृत्ती । जे ब्रह्मरूप नित्य पाहती । त्यांची परब्रह्मस्थिती । कदा कल्पांती भंगेना ॥४९०॥
ऐसी परब्रह्म आवाप्ती । साधकीं पावावया निश्चितीं । नित्य बसावें एकांतीं । द्वैताची स्फूर्ती त्यागोनी ॥९१॥

अन्न-आच्छादन (साधकांचे) (४९२ ते ५०२)

साधितां परमार्थनिधान । साधकां आडवी वस्त्र अन्न । निमोली वल्कलें परिधान । कां त्यागिली अतिजीर्ण वस्त्रे घ्यावीं ॥९२॥
शाकफलमूलकंदभोजन । येणे करावें जठरतर्पण । सांडूनि परमार्थसाधन । जोडावया अन्नधन न वचावें कदा ॥९३॥
चौपालवी बांधोनि करीं । भीक मागावी दारोदारीं । परी अन्नआच्छादनावरी । आयुष्य तिळभरी न वेंचावें ॥९४॥
मेळवावया अन्नआच्छादन । न शिणती साधक सज्ञान । देह अदृष्टाधीन । तें सहजें जाण प्रतिपाळी ॥९५॥
स्वयें शिणतां अहोराती । अदृष्टावेगळी अणुभरी प्राप्ती । कदा न चढे कोणाचे हातीं । हे साधक जाणती सज्ञान ॥९६॥
यालागीं अदृष्टें जें प्राप्त । तेणें निर्वाहें सदा निश्चित । साधक परमार्थ साधित । संतोषयुक्त गुरुवाक्ये ॥९७॥
देहअदृष्टपरवडी । होती सुखदुःखघडामोडी । साधकां संतोषु चढोवढी । गुरुवाक्य गोडी दृढ लागली ॥९८॥
जैसें देहाचे प्राक्तन । तैसें होय अशन-वसन । परी गुरुवाक्यसुख सांडून । देहावरी मन ममत्वें न ये ॥९९॥
याञ्चेवीण यथाकाळें । यदृच्छया जे जे मिळे । तें तें सेवी सकळ मंगळें । गुरुवाक्यमेळे स्वानंदें ॥५००॥
शरीरनिर्वाहाविखीं । कोठे कांहीं नाभिलाखी । जे जे मिळे तेणेंचि सुखी । निजात्मतोखीं संतुष्ट ॥१॥
प्रारब्धे सुखदुःख भोगितां । संतोष साधकांच्या चित्ता । हे गुरुवाक्ये विश्वासतां । चढे हाता शिष्याच्या ॥२॥

५२३.आमुच्या हें आलें भागा । जिव्हार या जगाचें ॥१॥
धरोनियां ठेलों जिवें । बळकट भावें एकविध ॥ध्रु॥
आणूनियां केला रूपा । उभा सोपा जवळी ॥३॥
तुका म्हणे अंकित केला । खाली आला वचनें ॥४॥
५२४.खरे भांडवल सांपडलें गांठी । जेणें नये तुटी उदिमासी॥१॥
सवंगाचे केणें सांपडलें घरीं । भरूनि वैखरी सांठविलें ॥ध्रु॥
घेतां देतां लाभ होतसे सकळां । सदैवा दुर्बळां भाव तैसा ॥३॥
फडा आलिया, तो न वजे निरास । जरी काही त्यास न कळतां ॥४॥
तुका म्हणे आतां झालीसे निश्चिंती । आणीक तें चित्तीं न धरूं दुजें ॥५॥
५२५.पदोपदीं दिलें अंग । झालें सांग कारण ॥१॥
रूंधवूनि ठेलों ठाव । जागा वाव सकळ ॥ध्रु॥
पुढती चाली मना लाहो । वाढे देहो संतोष ॥३॥
तुका म्हणे क्षरभागीं । झालों जगी व्यापक ॥४॥
५२६.निवडूनि दिले नवनीत । संचित तें भोगीतें ॥१॥
आतां पुढे भाव सार । जीवना थोर पहावया ॥ध्रु॥
पारखियाचे पडिले हातीं । चाचपती आंधळीं ॥३॥
तुका म्हणे सेवन घडे । त्यासी जोडे लाभ हा ॥४॥
५२७.उचित न कळे इंद्रियांचे ओढी । मुखें बडबडी शिकलें तें ॥१॥
आपण जाऊन न्यावें नरकास । बळें बेता-ळीस कुळे, जग ॥ध्रु॥
अबोलणे बोले डोळे झांकूनियां । बडबडी वायां दंभासाठीं ॥३॥
तुका म्हणे आम्ही तेथील पारखी । नाचे देखोवेखीं जाणों खरें ॥४॥
५२८.एक मन तुझ्या अवघ्या भांडवला । वांटितां तें तुला येईल कैसें? ॥१॥
म्हणऊनि दृढ धरी पांडुरंग । देहा लावीं संग प्रारब्धाचा ॥ध्रु॥
आणिका संकल्पा नको गोऊं मन । तरीच कारण साध्य होय ॥३॥
तुका म्हणे ऐसें जाणावें उचित । तरी सहज स्थित येईल कळों ॥४॥
५२९.गावें म्हणऊनि गीत । धरूनि राहें तैसें चित्त ॥१॥
हेंचि थोर अवघड आहे । अन्न देखोनि भूक राहे? ॥ध्रु॥
ऐकावी म्हूण कथा । राहें तैसें धरूनि चित्ता ॥३॥
तुका म्हणे धणी । नव्हे जेविल्यावांचूनि ॥४॥
५३०.कळेल हे खुण । तरी दावी नारायण ॥१॥
सत्य संतांपाशी राहे । येरां भय आड आहे ॥ध्रु॥
अणुचिया ऐसें । असे भरलें प्रकाशें ॥३॥
इंद्रियांचे धनी । ते हे जाती समजूनि ॥४॥
तर्क कुतर्क वाटा । नागवण घटापटा ॥५॥
तुका म्हणे ल्यावें । डोळां अंजन बरवें ॥६॥
५३१.जातो, न येतिया वाटा । काय निरवितो करंटा ॥१॥
कैसा झालासे बेश्रम। लाज नाहीं, न म्हणे ‘राम’ ॥ध्रु॥
पाहे वैरियाकडे । डोळे वासूनियां, रडे॥३॥
बांधू-निया यमा हातीं । दिला, नाहीं त्याची खंती ॥४॥
नाहीं यापें काम। ऐसें जाणे तो अधम ॥५॥
अझुन तरी मुका । कां रे झालासि म्हणे तुका ॥६॥
५३२.वांटा घेईं लवकरी । मागें अंतरसी दुरी । केली भरोवरी । सार नेती आणीक ॥१॥
ऐसी भांबावली किती । काय जाणों नेणों किती । समय नेणती । माथां भार वाहोनि ॥ध्रु॥
नाहीं सरलें तोवरी । धांव घेईं वेग करी । घेतले पदरीं । फावलें तें आपुलें ॥३॥
फटलंडी म्हणे तुका । एक न साहावे धक्का । तरीच या सुखा । मग कैसा पावसी? ॥४॥
५३३.चालावा पंथ, तो पाविजे त्या ठाया। ऐकि-लिया वायां वारता त्या ॥१॥
ऐका जी वोजे पडतसे पायां । भावचि ते जाया वाट, नव्हे ॥ध्रु॥
व्याली कुमारीचा अनुभवें अनुभव । सांगतां तो भाव येत नाहीं ॥३॥
तुका म्हणे येथे पाहिजे आरालें। बिंबी निवळले तरी भासे॥४॥
५३४.काय नाही लवत झाडें । विसरे वेडे देहभाव? ॥१॥
जया न फळे उपदेश । धस ऐसें त्या नांव ॥ध्रु॥
काय नाहीं असत जड । दगड तो अबोलणा? ॥३॥
तुका म्हणे कुचर दाणा । तैसा म्हणा डेंग हा ॥४॥
५३५.देखीचा दिमाख शिकोनियां दावी । हिऱ्याऐसी केवीं गारगोटी ॥१॥
मर्यादा ते जाणे, अरे अभागीया! । देवा-च्या ऐसिया सकळ मूर्ति ॥ध्रु॥
काय पडिलासी लटि-क्याचे भरी। वोवाळूनि थोरी परती सांडी ॥३॥
तुका म्हणे पुढे दिसतसे घात । करितों फजित म्हणऊनि ॥४॥
५३६.संसाराचा माथां भार । कांहीं पर न ठेवीं ॥१॥
भक्तीची ते जाती ऐसी । सर्वस्वासी मुकावें ॥ध्रु॥
भिक्षा आणि वेवसाव। काला करी तो गाढव ॥३॥
करूनि वस्ती बाजारी । म्हणवी कासया ‘निस्पृही’? ॥४॥
प्रसादा आडूनि कवी । केलें तूप पाणी तेवीं ॥५॥
तुका म्हणे होईं शूर । किंवा निसुर मजूर ॥६॥
५३७.तेज्या इशारती। तट्टा फोकावरी घेती ॥१॥
काय सांगावें, त्याहूनि । ऐका रे, धरा मनीं ॥ध्रु॥
नव्हे भांड-खोर । धरूं ओढूनि पदर ॥३॥
तुका म्हणे तोंड । काळे करा खाली मुंड ॥४॥
५३८.मागें संतीं होतें जें जें सांगितलें । तें येऊ लागले अनुभवा ॥१॥
आचारभ्रष्ट होती लोक कली । पुण्य क्षीण, बळी झालें पाप ॥ध्रु॥
वर्णधर्म कोणी न धरी विटाळ । घालिती गोंधळ एके ठायीं ॥३॥
वेदाचे पाठक सेवितील मद्य । न देखती भेद विषयीं भांड ॥४॥
तुका म्हणे किती करावे फजित । तेचि छंद नित्य बहु होती ॥५॥
५३९.अक्षरांचा श्रम केला । फळा आला तेणें तो ॥१॥
अवघियाचा तळ धरी । जीवा उरी नुरवुनी ॥ध्रु॥
फळलें तें लवे भारें । पिक खरें आलें तई ॥३॥
तुका म्हणे ‘हा गे देव’ । पुढे, भाव सारावा ॥४॥

संपूर्ण वारकरी प्रस्थानत्रयी नित्यनेम पारायण अनुक्रमणिका


ग्रंथ

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Page Reader Press Enter to Read Page Content Out LoudPress Enter to Pause or Restart Reading Page Content Out LoudPress Enter to Stop Reading Page Content Out LoudScreen Reader Support
error: Content is protected !!
Scroll to Top