
अनुक्रमणिका
- श्रीज्ञानेश्वरी नित्यनेम पारायण क्रमश: नित्यनेम पारायण अध्याय – ४. ओवी क्र. १ ते २६
- श्रीएकनाथी भागवत क्रमश: नित्यनेम पारायण अध्याय – ३, ओवी क्र. ६०७ ते ६४६
- शिष्याच्या परमानंदाने गुरूस संतोष (६०७ ते ६१४)
- भागवतधर्माने मायातरण (६१५ ते ६२३)
- ब्रह्मस्वरूपनिरूपणाची विदेहाची विनंती (६२४ ते ६२८)
- ब्रह्मस्वरूपनिरूपण (६२९ ते ६८६)
- श्रीतुकाराम महाराजांची गाथाअभंग क्र. ५७७ ते ५९२
- ग्रंथ
या कुन्देन्दुतुषारहारधवला या शुभ्रवस्त्रावृता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना ।
या ब्रह्माच्युतशङ्करप्रभृतिभिर्देवै: सदा वन्दिता सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापहा ॥
जयांचे केलिया स्मरण । होय सकळ विद्यांचे अधिकरण । तेचि वंदूं श्रीचरण । श्रीगुरूंचे ॥१॥
ते नमस्कारोनि आता ॥
श्रीगणेशाय नमः । श्रीसरस्वत्यै नमः । श्रीविठ्ठलाय नमः ।
श्रीमातापितृभ्यां नमः । श्रीगुरुभ्यो नमः ॥
ॐ नमो भगवते वासुदेवाय ।
रामकृष्णहरि । रामकृष्णहरि । रामकृष्णहरि ॥
श्रीज्ञानेश्वरी नित्यनेम पारायण
क्रमश: नित्यनेम पारायण
अध्याय – ४. ओवी क्र. १ ते २६
अध्याय चौथा
आधींचि विवेकाची गोठी । वरी प्रतिपादी श्रीकृष्ण जगजेठी । आणि भक्तराजु किरीटी । परिसत असे ॥२॥
जैसा पंचमळापु सुगंधु । कीं परिमळु आणि सुस्वादु । तैसा भला जाहला विनोदु । कथेचा इये ॥३॥
कैसी आगळीक दैवाची । जे-“गंगा जोडली अमृताची । हो कां जपतपें श्रोतयांचीं । फळा आली” ॥४॥
आतां इंद्रियजात आघवें । तिहीं श्रवणाचें घर रिघावें । मग संवादसुख भोगावें । गीताख्य हें ॥५॥
हा अतिसो अतिप्रसंगें । सांडूनि, कथाचि ते सांगें । जे कृष्णार्जुन दोघे । बोलत होते ॥६॥
ते वेळीं संजयो रायातें म्हणे । अर्जुन अधिष्ठिला दैवगुणें । जे, अतिप्रीति श्रीनारायणें । बोलतु असे ॥७॥
जें न सांगेचि पितया वसुदेवासी । जे न सांगेचि माते देवकीसी । जें न सांगेचि बंधु बळिद्रासी । तें गुह्य अर्जुनेंशी बोलत ॥८॥
देवी लक्ष्मीयेएवढी जवळीक । परी तेही न देखे या प्रेमाचें सुख । आजि कृष्णस्नेहाचें बिक । यातेंचि आथि ॥९॥
सनकादिकांचिया आशा । वाढीनल्या होत्या कीर बहुवसा । परी, त्याही येणें मानें यशा । येतीचिना ॥१०॥
या जगदीश्वराचें प्रेम । एथ दिसतसे निरुपम । कैसें पार्थें येणें सर्वोत्तम । पुण्य केलें! ॥११॥
हो कां जयाचिया प्रीती । अमूर्त हा आला व्यक्ती । मज एकवंकी याची स्थिती । आवडतु असे ॥१२॥
एऱ्हवीं, हा योगियां नाडळे । वेदार्थासी नाकळे । जेथ ध्यानाचेही डोळे । पावतीना ॥१३॥
तो हा निजस्वरूप । अनादि निष्कंप । परी कवणें मानें सकृप । जाहला आहे! ॥१४॥
हा त्रैलोक्यपटाची घडी । आकाराची पैलथडी । कैसा याचिये आवडी । आवर्ला असे ॥१५॥
इमं विवस्वते योगं प्रोक्तवानहमव्ययम् । विवस्वान्मनवे प्राह मनुरिक्ष्वाकवेऽब्रवीत् ॥१॥
मग, तेणें विवस्वतें रवी । हे योगस्थिति आघवी । निरोपविली बरवी । मनूप्रति ॥१७॥
मनूनें आपण अनुष्ठिली । मग इक्ष्वाकुवा उपदेशिली । ऐसी परंपरा विस्तारिली । आद्य हे गा ॥१८॥
जे, प्राणियां कामीं भरु । देहाचिवरी आदरु । म्हणौनि पडिला विसरु । आत्मबोधाचा ॥२०॥
अव्हांटलिया आस्थाबुद्धि । विषयसुखाची परमावधि । जीवि तैसा उपाधि । आवडे लोकां ॥२१॥
एऱ्हवीं तरी, खवणेयांच्या गांवीं । पाटाउवें काय करावी? । सांगे, जात्यंधा रवी । काय आथि? ॥२२॥
कां, बहिरांच्या आस्थानीं । कवण गीतातें मानी? । कीं, कोल्हेया चांदणी । आवडी उपजे? ॥२३॥
पै चंद्रोदया आरोतें । जयांचे डोळे फुटती असते । ते काउळे केवीं चंद्रातें । ओळखती? ॥२४॥
तैसी वैराग्याची शिव न देखती । जे विवेकाची भाष नेणती? । ते मूर्ख केवीं पावती । मज ईश्वरातें? ॥२५॥
कैसा, नेणों, मोहो वाढीनला! । तेणें बहुतेक काळु व्यर्थ गेला । म्हणौनि, योगु हा लोपला । लोकीं इये ॥२६॥
॥ पुंडलिकवरदा हरी विठ्ठल श्रीज्ञानदेव तुकाराम ॥
श्रीएकनाथी भागवत
क्रमश: नित्यनेम पारायण
अध्याय – ३, ओवी क्र. ६०७ ते ६४६
श्रीगणेशाय नमः ॥ श्रीसरस्वत्यै नमः ॥ श्रीगुरुभ्यो नमः ॥ श्रीदत्तात्रेयाय नमः ॥ श्रीरुक्मिणीपाण्डुरङ्गाभ्यां नमः ॥
शिष्याच्या परमानंदाने गुरूस संतोष (६०७ ते ६१४)
बाळका लेवविल्या लेणें । जेवीं माउली निवों जाणे । कां शिष्यसुखें सुखावणें । हे सद्गुरु जाणे परिपूर्णबोधें ॥८॥
इंद्रिये नेणती ज्याचें घर । जें मना वचना अगोचर । बुद्धीसि न कळे ज्याची मेर । ऐसी निर्विकार निजवस्तु ॥९॥
दृष्टी दाविजे साक्षात । हाती देईजे पदार्थ । तैसा नव्हे गा परमार्थ । तोही सद्गुरूनाथ प्रबोधी शिष्यां ॥६१०॥
शिष्यासी करावया प्रबोध । बोधिता सद्गुरु अगाध । यालागी शिष्यसुखें स्वानंद । भोगी परमानंद गुरुरावो ॥११॥
शिष्यासी आकळे परब्रह्म । तंव तंव निरसे त्याचा भ्रम । तेणें सद्गुरूसी परम । सुखसंभ्रम उल्हासे ॥१२॥
सेवकु परचक्र विभांडी । तंव राजा उभारी यशाची गुढी । शिष्य परमानंदी दे बुडी । तेणें गुरूसी गाढी सुखावस्था ॥१३॥
ऐसी शिष्यकृपेची कळवळ । ज्या सद्गुरूमाजी प्रबळ । तेथें भागवतधर्म हे सकळ । शिकावे अविकळ अनन्यश्रद्धा ॥१४॥
भागवतधर्माने मायातरण (६१५ ते ६२३)
(याप्रमाणे भागवतधर्माचा अभ्यास करून, अभ्यासाने प्राप्त झालेल्या भगवद्भक्तीने तो परमात्म्याच्या ठिकाणी अनन्य होतो आणि एरवी तरून जाण्यास कठीण अशी ईश्वरी माया लीलेने तरून जातो.॥३३॥)
माया वेदशास्त्रां अनावर । ब्रह्मादिकां अतिदुस्तर । ते सुखे तरती भगवत्पर । हरिनाममात्र-स्मरणार्थे॥१६॥
हरिनामाच्या गजरापुढे । माया पळे लवडसवडें । यालागीं तरणोपावो घडे । सुख सुरवाडे हरिभक्तां ॥१७॥
परात्पर नारायणाची माया । भजतां नारायणाच्या पायां । सुखेंचि तरिजे गा राया । त्या भजनउपाया सांगितलें ॥१८॥
मायातरणोपायस्थिति । राया तुवां पुशिली होती । तदर्थी मुख्य भगवद्भक्ति । जाण निश्चिती नृपनाथा॥१९॥
भक्तीपाशी नित्य तृप्ति । भक्तीपाशी नित्यमुक्ति । भक्तीपाशी भगवत्प्राप्ति । मायानिवृत्ति हरिभजनें॥६२०॥
हरिनामभजनकल्लोळे । माया जीवित्व घेऊन पळे । भक्त तरती बाळेभोळे । हरिभजनबळें महामाया ॥२१॥
करितां नारायणाची भक्ती । निजभक्त सुखें माया तरती । ते नारायणाची मुख्य स्थिती । स्वयें चक्रवर्ती पुसतु ॥२२॥
(राजा म्हणाला-नारायणनामक ब्रह्मस्वरूप जो परमात्मा त्याचे खरेखुरे स्वरूप सांगण्यास तुम्हीच योग्य आहात. कारण आपण ब्रह्मनिष्ठ मुनी आहात.॥३४॥)
ब्रह्मस्वरूपनिरूपणाची विदेहाची विनंती (६२४ ते ६२८)
‘ब्रह्म-परमात्मा नारायण’ । वस्तुसीच म्हणणे जाण । ते वस्तुनिष्ठा परिपूर्ण । राजा आपण पुसतु ॥२५॥
सकळांमाजी अधिष्ठान । सबाह्य ज्याचेनि परिपूर्ण । त्या स्वरूपातें ‘नारायण’ । स्वयें वेदज्ञ बोलती ॥२६॥
तुम्हांऐसे ज्ञाननिधि । भाग्यें जोडलेति त्रिशुद्धी । तुमच्या वचनामृतबोधीं । अहंबुद्धि उपजेना ॥२७॥
तुमचिया वचनोक्तीं । वोसंडली स्वानंदस्फूर्ति । लांचावली चित्तवृत्ति । श्रवणें तृप्ति कदा न मनीं ॥२८॥
ब्रह्मस्वरूपनिरूपण (६२९ ते ६८६)
(पिप्पलायन मुनी म्हणाले – हे राजा, जे जगाच्या उत्पत्ति-स्थिति संहाराला कारण असते परंतु स्वत: ज्याला कोणीच कारण नाही, जे स्वप्न, जागृती व सुषुप्तीमध्ये त्याचप्रमाणे बहिः म्हणजे प्रलय आणि मुक्त स्थितीमध्येही सतत असते, जीवांचे पंचभौतिक शरीर, ज्ञानकर्मेंद्रिये, पंचप्राण, अंत:करण व मन ज्याच्या सत्तेने चेतनायुक्त होऊन कार्यप्रवण होतात, तेच श्रेष्ठ असे परमात्मतत्त्व समज.॥३५ ॥)
यापरी जो जगाचा हेतु । स्वयें स्वसत्ता हेतुरहितु । सच्चिदानंदें सदोदितु । तो जाण निश्चितु नारायणु ॥३१॥
जेंवी सायंप्रातर्मध्यान्ह । तिहीं काळी अलिप्त गगन । तेवीं उत्पत्तिस्थितिप्रळयी जाण । अलिप्त नारायण परमात्मा ॥३२॥
उत्पत्तिस्थितिप्रळयान्त । म्हणसी कोण देखे येथ । तेचि अर्थीचा दृष्टांत । स्फुरदर्थ अवधारीं ॥३३॥
जागृति स्वप्न आणि सुषुप्ति । तिन्ही व्यापूनि समाधीही परती । ज्याची साक्षित्वें स्फुरे स्फूर्ति । तो जाण निश्चिती नारायण ॥३४॥
जागृतीचे जाणपण । स्वप्नाचें मिथ्या भान । सुषुप्तीचा साक्षी पूर्ण । तो नारायण निश्चित ॥३५॥
एवं परमात्मा परंज्योति । आत्मा हृदयस्थ त्रिजगतीं । त्यातें ‘नारायण’ म्हणती । जाण निश्चितीं नृपनाथा ॥३६॥
ऐसी सांगतां ब्रह्मस्फूर्ति । अगम्य वाटेल ब्रह्मप्राप्ति । सहजें ब्रह्म आतुडे हातीं । ऐक ते उपपत्ति सांगेन ॥३७॥
तरी परमात्मा ब्रह्म पूर्ण । तुझे हृदयीं नांदे आपण । ज्याचेनि मन बुद्धि प्राण । इंद्रियें जाण वर्तती ॥३८॥
नयनें तेणें तेजें देखणें । रसना तेणें स्वादें चाखों जाणे । श्रवण तेणें अवधानें । शब्दज्ञानें प्रबोधती ॥३९॥
तेणें अहंकारा अहंभाव । तेणेंचि मनासी मंतव्य । तेणेंचि चित्तासी चेतव्य । बुद्धीसि बोद्धव्य तेणें ब्रह्मावबोधे ॥६४०॥
तेणें जड देह सचेतन । तेणेंचि कळे मृदु कठिण । तेणेंचि चरणाच्या ठायीं गमन । करी कर ग्रहण त्याचिये सत्ता ॥४१॥
त्याचेनि प्राण परिचरती । त्याचेनि निमिषोन्मेषस्फूर्ति । त्याच्या आनंदलेशस्थितीं । आनंद उपस्थीं भोगिती प्राणी ॥४२॥
एवं चाळकु जो त्रिजगतीं । जो स्वानंदें नांदे हृदयस्थितीं । त्यातें ‘नारायण’ म्हणती । तोचि निश्चितीं परमात्मा ॥४३॥
ज्याचेनि मन बुद्धि प्राण । इंद्रियें विचरती संपूर्ण । तो तूं म्हणसी त्यां आधीन । हे कल्पांती जाण कदा न घडे ॥४४॥
तेथ जाणपणे जाणों जासी । तैं जाणावें तेंचि नेणसी । तेथ ज्ञातेपणे ज्ञानासी । स्वरूपापाशीं रिगू नाहीं ॥४५॥
जाणीव आणि नेणीव । हे सोडूनि सर्व भाव । जैं उपजे ‘सद्भाव’ । तैं ब्रह्म स्वयमेव पाविजे ॥४६॥
॥ पुंडलिकवरदा हरी विठ्ठल श्रीज्ञानदेव तुकाराम ॥
श्रीतुकाराम महाराजांची गाथा
अभंग क्र. ५७७ ते ५९२
अनाथाचा बंधु विठ्ठल कृपासिंधु । तोडी भवबंधु यमपाश ॥ध्रु॥
तोचि शरणागतां विठ्ठल मुक्तिदाता । विठ्ठल या संतां समागमें ॥३॥
विठ्ठल गुणनिधि विठ्ठल सर्वसिद्धि । लागली समाधि विठ्ठल नामें ॥४॥
विठ्ठलाचे नाम घेतां झालें सुख । गोडावले मुख तुका म्हणे ॥५॥
लागे आपणचि हातीं । कींव भाकावी काकुलती । करी मग चित्तीं । असेल तें तयाचें ॥ध्रु॥
एकलिया भावबळें । कैं सांपडे तो काळें । वैष्णवांच्या मेळे । उभा ठाके हांकेसी ॥३॥
बांधा माझिया जीवासी । तुका म्हणे प्रेमपाशीं । न सोडी तयासी । सर्वस्वासी उदार ॥४॥
धन्य धन्य हरीचे दास । तया सुलभ गर्भवास । ब्रह्मादिक करिती आस । तीर्थें वास भेटीची ॥ध्रु॥
कथा श्रवण व्हावयास । यमधर्मा थोर आस । पाहे रात्रंदिवस । वाट कर जोडोनि ॥३॥
रिद्धिसिद्धि न पाचारितां । त्या धुंडिती हरिभक्ता । मोक्षसायुज्यता । वाट पाहे भक्तांची ॥४॥
असती जेथे उभे ठेले । सदा प्रेमसुखें धाले । आणीकही उद्धरिले । महादोषी चांडाळ ॥५॥
सकळ करिती त्यांची आस । सर्वभावें ते उदास । धन्य भाग्य त्यांस । तुका म्हणे दर्शनें ॥६॥
पारखी तो जाणे तयाचे जीवींचें । निवडी दोहींचे वेगळालें ॥ध्रु॥
क्षीरा नीरा कैसे होय एकपण? । स्वादी तोचि भिन्न भिन्न काढी ॥३॥
तुका म्हणे थीता आपणचि खोटा । अपमान मोठा पावईल ॥४॥
आपला घात आपणचि करी । आणिकां सांगतां नाइके तरी ॥ध्रु॥
भुकेभेणें विष घेऊं पाहे आतां । आपलाचि घात करूं पाहे ॥३॥
तुका म्हणे एक चालतील पुढें । तयासी वांकडें जातां ठके ॥४॥
बुडतां हे जन न देखवे डोळां । येतो कळवळा म्हणऊनि ॥ध्रु॥
तुका म्हणे माझे देखतील डोळे । भोग देते वेळे येईल कळों ॥३॥
होईं बा जागा, होईं बा जागा । वाउगा कां गा शिणसील?॥ध्रु॥
जाणिवेच्या भारें भवाचिये डोहीं । बुडसी तो कई निघसि ना ॥३॥
तुका म्हणे देवा पावसील भावें । जाणतां तें ठावें काही नव्हे ॥४॥
फुकाचा विभाग पतन दु:खासि । दोहींमुळे त्यासी तेंचि साधे ॥ध्रु॥
नाइकावी निंदा स्तुति माझ्या कानें । सादर या मने होऊनियां ॥३॥
तुका म्हणे देव असाध्य यामुळे । आशा मोहजाळी गुंतलिया ॥४॥
मनासी विचार तोचि साच भाव । ‘व्यापक हा देव अंतर्बाहीं’ ॥ध्रु॥
शुद्ध भावा न लगे सुचावा परिहार । उमटे साचार आणिके ठायीं ॥३॥
भोगित्यासी काज अंतरींचे गोड । बाहिरल्या चाड नाहीं रंगे ॥४॥
तुका म्हणे भाव शुद्ध हे कारण । भाट नारायण होईल त्याचा ॥५॥
कांहीं न धरावी खंती । हित होईल धरा चित्तीं ॥ध्रु॥
खोटी ते अहंता । वाट टाकिली सांगतां ॥३॥
ज्याचें तोचि जाणे । मी मापाडें तुका म्हणे ॥४॥
या नांव ‘अंतरा आला नारायण’ । ‘चित्त-समाधान’ खूण त्याची ॥ध्रु॥
सर्वकाळ हाचि करणे विचार । विवेकी सादर आत्मत्त्वाचे ॥३॥
तुका म्हणे जो जो भजनासी वळे । अंगें, तो तो कळे सन्निधता ॥४॥
अबोल्याचा काळ आतां ऐशावरी । वचनाची उरी उरली नाही ॥ध्रु॥
करूं आला तो तो केला लवलाहो । उरोंचि संदेहो दिला नाहीं ॥३॥
तुका म्हणे मोहो परतेचि ना मागें । म्हणऊनि त्यागें त्याग झाला ॥४॥
तुम्हां आम्हां आतां न पडे यावरी। आहों तेंचि बरी जेथे तेथे ॥ध्रु॥
आपणापासूनि नसावें अंतर । वेंचिलें उत्तर म्हणऊनि ॥३॥
तुका म्हणे अंगा आली कठिणता । आमच्या, अनंता तुम्हा ऐसी ॥४॥
पहावा जी ठायीं करूनि विचार । न्यून कोठे फार असेचि ना ॥ध्रु॥
ठेविलिये ठायीं आज्ञेचे पाळण । करूनि जतन राहिलोंसें ॥३॥
तुका म्हणे आतां बोलतसे स्पष्ट । झालों क्रियानष्ट तुम्हा ऐसा ॥४॥
म्हणऊनि कांहीं न ठेवींचि उरी । आलों वर्मावरी एकाएकी ॥ध्रु॥
न देखोंचि कांहीं परती माघारी । उरली ते उरी नाहीं मुळीं ॥३॥
तुका म्हणे आला अंतरासी खंड । तरी माझे तोंड खवळिलें ॥४॥
ऐसें आलें अनुभवा । मजही सेवा करितां ॥ध्रु॥
शून्याकारी बहु मोळा। भेंडोळा हे पवाडे॥३॥
तुका म्हणे ताळी नाहीं । एके ठायीं चपळत्त्वें ॥४॥
॥ पुंडलिकवरदा हरी विठ्ठल श्रीज्ञानदेव तुकाराम ॥
संपूर्ण वारकरी प्रस्थानत्रयी नित्यनेम पारायण अनुक्रमणिका
ज्यांना प्रत्यक्षात ग्रंथावरून पारायण करायचे आहे त्यांनी खालील लिंकवरून ग्रंथ मागवावे.







