
अनुक्रमणिका
या कुन्देन्दुतुषारहारधवला या शुभ्रवस्त्रावृता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना ।
या ब्रह्माच्युतशङ्करप्रभृतिभिर्देवै: सदा वन्दिता सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापहा ॥
जयांचे केलिया स्मरण । होय सकळ विद्यांचे अधिकरण । तेचि वंदूं श्रीचरण । श्रीगुरूंचे ॥१॥
ते नमस्कारोनि आता ॥
श्रीगणेशाय नमः । श्रीसरस्वत्यै नमः । श्रीविठ्ठलाय नमः ।
श्रीमातापितृभ्यां नमः । श्रीगुरुभ्यो नमः ॥
ॐ नमो भगवते वासुदेवाय ।
रामकृष्णहरि । रामकृष्णहरि । रामकृष्णहरि ॥
श्रीज्ञानेश्वरी नित्यनेम पारायण
क्रमश: नित्यनेम पारायण
अध्याय – ४. ओवी क्र. २७ ते ४८
हें जीवीं चें निज गुज । परी केवीं राखो तुज? । जे, पढियसि तूं मज । म्हणौनिर्या ॥२८॥
तूं प्रेमाचा पुतळा । भक्तीचा जिव्हाळा । मैत्रियेचि चित्कळा । धनुर्धरा ॥२९॥
तूं अनुसंगाचा ठावो । आतां तुज काय वंचूनि जावों? । जऱ्ही संग्रामारूढ आहों । जाहलों आम्हीं ॥३०॥
तरी नावेक हें सहावें । गाजाबज्यही न धरावें । परी तुझें अज्ञानत्व हरावें । लागे, आधीं ॥३१॥
अपरं भवतो जन्म परं जन्म विवस्वतः । कथमेतद्विजानीयां त्वमादौ प्रोक्तवानिति ॥४॥
तूं संसारश्रांतांची साउली । अनाथा जीवांची माउली । आमुतें कीर प्रसवली । तुझीच कृपा ॥३३॥
देवा, पांगुळ एकादें विइजें । तरी जन्मोनि जोजारू साहिजे । हें बोलो काय तुझें । तुजचि पुढां! ॥३४॥
आतां पुसेन जें मी कांहीं । तेथ निकें चित्त देईं । तेवीचि देवें कोपावें ना कांहीं । बोला एका ॥३५॥
तरी मागील जे वार्ता । तुवां सांगितली होती अनंता । ते नावेक मज चित्ता । मानेचिना ॥३६॥
जे तो विवस्वतु म्हणजे कायी । ऐसें हें वडिलां ठाउवें नाहीं । तरी तुवांचि केवीं, पाहीं । उपदेशिला? ॥३७॥
तो तरी आइकिजे बहुतां काळांचा । आणि तूं तंव, श्रीकृष्ण, सांपेचा । म्हणौनि गा इये मातुचा । विसंवादु ॥३८॥
तेवींचि, देवा चरित्र तुझें । आपण कांहींचि नेणिजे । हें, लटिकें केवीं म्हणिजे । एकिहेळां? ॥३९॥
परि हेचि मातु आघवी । मी परियेसें ऐसी सांगावी । जे तुवांचि तया रवी केवीं । उपदेशु केला? ॥४०॥
बहूनि मे व्यतीतानि जन्मानि तव चार्जुन । तान्यहं वेद सर्वाणि न त्वं वेत्थ परन्तप ॥५॥
तरी तूं गा हें नेणसी । पें जन्मे आम्हां तुम्हांसी । बहुतें गेलीं; परी तियें न स्मरसी । आपुलीं तूं ॥४२॥
मी जेणें जेणें अवसरें । जें जें होऊनि अवतरें । तें समस्तही स्मरें । धनुर्धरा ॥४३॥
माझे अव्ययत्व तरी न नसे । परी होणें जाणें एक दिसे । तें प्रतिबिंबे मायावशें । माझ्याचि ठायीं ॥४५॥
माझी स्वतंत्रता तरी न मोडे । परी कर्माधीनु ऐसा आवडे । तोही, भ्रांतिबुद्धि, तरी घडे । एऱ्हवीं नाहीं ॥४६॥
कीं एकचि दिसे दुसरें । तें दर्पणाचेनि आधारें । एऱ्हवीं, काय वस्तुविचारें । दुजें आहे? ॥४७॥
तैसा अमूर्तचि मी; किरीटी । परी प्रकृति जें अधिष्ठीं । तें साकारपणें नट नटी । कार्यालागीं ॥४८॥
॥ पुंडलिकवरदा हरी विठ्ठल श्रीज्ञानदेव तुकाराम ॥
श्रीएकनाथी भागवत
क्रमश: नित्यनेम पारायण
अध्याय – ३, ओवी क्र. ६४७ ते ६९८
श्रीगणेशाय नमः ॥ श्रीसरस्वत्यै नमः ॥ श्रीगुरुभ्यो नमः ॥ श्रीदत्तात्रेयाय नमः ॥ श्रीरुक्मिणीपाण्डुरङ्गाभ्यां नमः ॥
(अग्नीच्या ठिणग्या ज्याप्रमाणे अग्नीला जाणू शकत नाहीत किंवा प्रकाशित करू शकत नाहीत, त्याचप्रमाणे मन, वाणी किंवा चक्षु, बुद्धी, प्राणेंद्रिय ही त्या भगवत्स्वरूपापर्यंत जाऊ शकत नाहीत किंवा त्याला जाणू शकत नाहीत. श्रुतीही परमात्मस्वरूपाचा बोध करून देण्यास प्रमाणभूत आहे, पण ती साक्षात नसून अर्थापत्तीद्वारा सांगते. भगवत्स्वरूपाचा बोध करून देणारे जेवढे पदार्थ आहेत त्या सर्वांचा निषेध करूनच ती अर्थबोध करून देते. हे ते नाही, हे ते नाही, असे म्हणूनच व म्हणण्यातच शेवटी ब्रह्मस्वरूपाचा अनुभव व साक्षात्कार होतो. ॥३६॥)
स्वयें कल्पी त्रिभुवन । तें स्वरूपी रिघों न शके मन । बुद्धि निश्चयात्मक पूर्ण । तीसही जाण अगम्य वस्तु ॥४८॥
जे मनबुद्धि अगोचर । तें वाचेसी अति दुस्तर । वस्तु नव्हे शब्दगोचर । परात्पर परब्रह्म ॥४९॥
मोटे बांधतां आकाशातें । चारी पालव पडती रिते । तेवीं शब्दे बोलावें वस्तूतें । तंव शब्द शब्दार्थे निर्धर्म ॥६५०॥
प्राणाचेनि निज ढाळे । जे का क्रियाशक्ति चळे । ते क्रियेसी वस्तु नातळे । मा इंद्रियां आकळे कैसेनी ॥५१॥
जेवीं थिल्लरा आंतोता । बिंबोनि वोला नव्हे सविता । तेवीं मनबुद्धिइंद्रियांपरता । जाण तत्त्वतां परमात्मा ॥५२॥
जो मनाचें अनादि मन । जो बुद्धीची बुद्धि सज्ञान । जो नयनाचें आदि नयन । जो श्रवणाचे श्रवण सावधानत्वें ॥५३॥
जो घ्राणाचे निजघ्राण । जो रसनेची रसना आपण । जो त्वचेची निजत्वचा पूर्ण । जीवाचा जो जाण जीवु स्वयें ॥५४॥
जो इंद्रियांचा प्रकाशिता । जो कर्म करोनि अकर्ता । तो इंद्रियीं इंद्रियार्था । विषयी सर्वथा हों नेणे ॥५५॥
जेथ बुद्धीची दृष्टि न वळंघे । तेथ मन मनपणे केवीं रिघे । मा श्रवणनयनघ्राणयोगें । विषयसंयोगें केवीं भेटे ॥५६॥
जेथ प्राणशक्ति न चले पुढे । जेथ वाचा स्वयें लाजिली मुरडे । मा कर्मेद्रियांसी कोणीकडे । पवाडु पुढे जोडेल ॥५७॥
अग्नीपासूनि आह्या अनेग । क्षणक्षणां निघती चांग । परी आह्यांमाजी अग्नीचें अंग । सर्वथा साङ्ग प्रगटेना ॥५८॥
का सूर्यापासून सूर्यकांत । प्रकाशती असंख्यात । परी सूर्यकांताआंत । कदा भास्वत प्रगटेना ॥५९॥
जेवी सिंधूपासूनि तरंग । प्रकाशति अति अनेग । परी तरंगी सिंधूचे अंग । सर्वथा साङ्ग प्रगटेना ॥६६०॥
तेवीं ब्रह्मापासोनि करणे । प्रकाशती अनेकपणें । तरी त्या इंद्रियां ब्रह्म जाणणें । हें जीवें प्राणे घडेना ॥६१॥
जरी केळापासूनि केळी निपजे । कां साखरेपासूनि ऊस उपजे । तरी इंद्रियीं ब्रह्म जाणिजे । हे न ये निजवोजें ब्रह्मादिकां ॥६२॥
आशंका॥ इंद्रियीं नव्हे ब्रह्मज्ञान । तैं जीवाचें भवबंधन । कदा काळी न तुटे जाण । जन्ममरण अनिवार ॥६३॥
‘शब्दादेवापरोक्षमति’ । ऐशी श्रुतिशास्त्र-उपपत्ति । तेही मिथ्या वाटे वदंती । ऐसें तूं निश्चितीं मानिसी राया ॥६४॥
तेही अर्थीचे निरूपण । ऐक राया सावधान । शब्द निमोनि आपण । दे ब्रह्मज्ञान जीवासी ॥६५॥
(पूर्वील श्लोकार्ध) ‘शब्दोपि बोधकनिषेधतयात्ममूलमर्थोक्तमाह यदृते न निषेधसिद्धिः’ ।
जीवु सोडवावया होडा । शब्दें सवेग उचलिला विडा । तेणे घेतां तत्त्वांचा झाडा । आपणही पुढां निमाला ॥६६॥
श्रुति ‘नेति नेति’ येणे शब्दें । अतद्व्यावृत्तिनिषेधबोधे । परी साक्षात् वेदानुवादें । निज वस्तु शब्दें न बोलवे ॥६७॥
शब्दासी जे वाच्य नोहे । तेंचि परब्रह्म जाणावें । तेथील जो खुणे पावे । तो ब्रह्म सद्भावें स्वयें होय ॥६८॥
श्रुति ‘नेति नेति’ येणे वचनें । शब्द निषेधूनि वस्तु दावणें । शब्दी निःशब्द जो लक्षू जाणे । तेणें पावणे परब्रह्म ॥६९॥
शब्दु निजनिषेधे जें बोधी । तेथ समरसे ज्याची बुद्धि । तेंचि परब्रह्म गा त्रिशुद्धि । निषेधावधि तो ठावो ॥६७०॥
शब्द निमोनि सर्वशक्तीं । जीवासी दे ब्रह्मप्राप्ति । ‘शब्दादेवापरोक्षेति’ । जाण निश्चितीं या नांव ॥७१॥
वाचा निःशेष निवर्ते । मन बुद्धि न पवे जेथें । तेचि अवधि निषेधातें । ‘परब्रह्म’ त्यातें बोलिजे ॥७२॥
जें वाचेचे वदवितें । परी वाचा वदों न शके ज्यातें । जें मनबुद्ध्यादिकां जाणतें । परी मन बुद्धि ज्यातें नेणती ॥७३॥
जें नयनातें दाखवितें । परी नयन न देखती ज्यातें । जें श्रवणघ्राणांतें चेतवितें । परी श्रवण घ्राण ज्यातें नेणती ॥७४॥
एवं सर्वांचे जाणतें । परी सर्व सर्वथा नेणे ज्यातें । ज्यासी जाणावयालागी येथें । आणिक जाणते असेना ॥७५॥
ऐसें स्वसंवेद्य निजज्ञातें । ज्यासी दुजें नाहीं जाणतें । शब्द रिघावया तेथें । रिगमु त्यातें असेना ॥७६॥
जें कृश ना पुष्कळ । जें वक्र ना वर्तुळ । जें सूक्ष्म ना नव्हे स्थूळ । वस्तु केवळ निर्विकार ॥७७॥
ज्यासी नाहीं रूपगुण । ज्यासी नाहीं आश्रमवर्ण । ज्यासी नाहीं मीतूंपण । ज्यासी जन्ममरण असेना ॥७८॥
जे हळुवट ना गहिंस । जे चिवळ ना सपोस । जें वसते ना वोस । जे कां निःशेष निर्धर्म ॥७९॥
जे ऱ्हस्व ना मोठे । जे वडील ना धाकुटें । जे विचारितां विवेकवाटे । विवेकुही आटे निःशेष ॥६८०॥
ज्यासी आदि ना अंतु । जें मध्यस्थितीरहितु । जें गुण ना गुणातीतु । अच्युतानंतु अद्वयत्वें ॥८१॥
त्या स्वरूपाचा वचनपाठ । करावया वेदें केली खटपट । तेथ श्रुतीचाही बोभाट । लाजिला करूनि कष्ट नेतिनेतिवादें ॥८२॥
वेदु काय नेणोनि परतला । जाणोनि न बोलिवेचि बोला । याचिलागीं तो मौनावला । तटस्थ ठेला निःशब्दें ॥८३॥
वेदें धरितां दृढ मौन । शास्त्रे भांबावली जाण । तिहीं धरोनि मताभिमान । करिती वल्गन अतिवादें ॥८४॥
‘शब्दांती ब्रह्मज्ञान’ । हे वेदें पावोनि पूर्ण खूण । शब्दें शब्द निषेधून । दृढ मौन तेणें धरिलें ॥८५॥
वेदरायें धरितां मौन । शास्त्रे भांबावली जाण । शोधितां शब्दांचे रान । निजसमाधान न पावती ॥८६॥
ब्रह्म-सृष्टि-ऐक्य (अद्वैतानुभव) (६८७ ते ६९१)
ब्रह्म एकाकी अद्वयस्थिति । तुवांचि दाविली उपपत्ति । तेथें ऐक्यरूपें त्रिजगती । म्हणसी कवणाप्रती आभासे ॥८८॥
ज्याची तुटली वासनाफांसोटी । विराली अहंकाराची गांठी । प्रारब्ध उतरलें देहाचे तटीं । त्यासी ऐक्ये सृष्टी आभासे ॥८९॥
त्याच्या अनुभवाची गोड गोष्टी । सांगावया उल्हास पोटीं । पिप्पलायनु स्वानंदतुष्टी । ब्रह्मैक्ये सृष्टी वाखाणी ॥६९०॥
(प्रथमारंभी एक ब्रह्मस्वरूपच असून त्यालाच सत्त्वरजतमात्मक प्रधान म्हणतात. हिरण्यगर्भही तोच असून महान अहंरूपी जीव अशी त्यालाच संज्ञा येते. ज्ञान, क्रिया, अर्थ इत्यादी निरनिराळ्या रूपांनी अत्यंत सामर्थ्यसंपन्न असा हा परमात्माच प्रकाशत आहे. स्थूल व सूक्ष्म या सर्वांचे तोच आदिकारण आहे. (तात्पर्य : सर्व रूपांनी तोच नटला असल्याने त्याला कोणती शक्ती प्रकाशित करणार ?)॥३७॥)
मायेची शक्ती (६९२ ते ६९८)
अगाध तिचा पतिव्रताधर्म । नपुंसकी उपजवी काम । अनाम्या ठेवी नाम । की निष्कर्मा कर्म तिचेनी ॥९३॥
ते निःसंगसंगा रातली । स्पर्शेविण गुर्विणी झाली । प्रधान-महत्तत्त्वें गर्भा आली । तेथ त्रिगुणातें व्याली विकारयुक्त ॥९४॥
विद्याअविद्या निजस्वभावीं । जीवशिवांची भेदपदवी । प्रिया पुरुषातें भोगवी । ज्ञानाज्ञानगांवीं वसोनियां ॥५९॥
जेवीं सुवर्णी अलंकार । तंतूमाजीं पटाकार । भिंतीवरी भासे चित्र । तेवीं माया साकार ब्रह्मीं भासे ॥९६॥
मृत्तिकेची गोकुळे केली । नाना नामाकारी जरी पूजिलीं । तरी मृत्तिकाचि संचली । तेवीं ब्रह्मीं भासली जगद्रूपें माया ॥९७॥
जैशा घृताच्या कणिका । घृतेंसी नव्हती आणिका । तेवीं ब्रह्मीं मायाशक्ति देखा । दावी अनेका अर्थांतें ॥९८॥
॥ पुंडलिकवरदा हरी विठ्ठल श्रीज्ञानदेव तुकाराम ॥
श्रीतुकाराम महाराजांची गाथा
अभंग क्र. ५९३ ते ६१०
उदास तूं नारायणा । मीही म्हणा तुम्हीच ॥ध्रु॥
ठका महा-ठका जोडा । हे धडफुडा लागासी ॥३॥
एकांगीच भांडे तुका । नाहीं धोका जीवित्त्वें ॥४॥
आतां काशासाठी देवा! । मिथ्या हेवा वाढवूं? ॥ध्रु॥
तुम्हां आम्हां झाली तुटी । आतां भेटी चिंतनें ॥३॥
तुका म्हणे लाजिरवाणे । अधीर जिणें इच्छेचें॥४॥
मढ्यापाशी करुणा केली । तैसी गेली वृथा हे ॥ध्रु॥
न यावा तो कैसा राग? । खोटें मग देखोनि ॥३॥
तुका म्हणे कैंचा बोला । शोध विठ्ठला माझिया ॥४॥
लटकियाची न करूं स्तुति । इच्छा चित्तीं धरूनि ॥ध्रु॥
हिशोबें तें आले घ्यावें । तें तो ठावें सकळांसी ॥३॥
तुका म्हणे स्वामिसेवा । येथे देवा, काशाची ? ॥४॥
घडेल तें भेटीसवें । दिसेल बरवें सकळां हें ॥ध्रु॥
न घडतां दृष्टादृष्टी । काय गोष्टी कोरड्या? ॥३॥
अबोल्याने असे तुका । अंतर एका साक्षी तें ॥४॥
तरी धरिला विश्वास । ठेलों होऊनियां दास ॥ध्रु॥
पुरली आवडी । पायीं लागलीसे गोडी ॥३॥
तुका म्हणे कंठीं नाम । अंगीं भरलें सप्रेम ॥४॥
आतां नको मज खोट्याने फटवूं । कोठे येऊं जाऊं वेळोवेळां? ॥ध्रु॥
गेला तरी काय जीवाचे सांकडें । वांचऊनि पुढे काय काज? ॥३॥
तुका म्हणे कसीं निवडा जी बरें । केली तैसी पोरें आळी पायीं ॥४॥
आम्ही ऐसें कैसें राहावें निश्चळ? । पाठिलागा काळ जिंकितसे ॥ध्रु॥
वाढवितां पोट दंभाचे पसारे । येतील माघारे मुदला तोटे ॥३॥
तुका म्हणे बरें जागवितां मना । तुमच्या नारायणा! अभयकरें ॥४॥
काय तुमची नेणों कवतुक विंदाने । सर्वोत्तमपणे खेळतसां ॥ध्रु॥
नाना छंदें आम्हां नाचवावें जीवां । वाढवाव्या हांवा भलत्या पुढें ॥३॥
तुका म्हणे तुम्ही आपुली प्रतिष्ठा । वाढावया चेष्टा करीतसां ॥४॥
झाले तेव्हां झालें मागील तें मागें । आतां वर्म लागे ठावें झालें ॥ध्रु॥
तोडावया अवघ्या चेष्टांचा संबंध । शुद्ध त्यासी शुद्ध बुद्ध व्हावें ॥३॥
तुका म्हणे आम्हां आत्मत्त्वाची सोय । आपणचि होय तैसाचि तूं ॥४॥
कासया घातला लांबणी उद्धार? । ठेवा करकर वारूनियां॥ध्रु॥
सुटो नयें ऐसे कळलें निरुतें । कां घ्यावे मागुतें आळवूनि? ॥३॥
तुका म्हणे तुम्ही सभाग्य जी देवा! । माझा तुम्हां केवा काय आला? ॥४॥
‘पतितपावन’ ब्रीदें मिरविसी । याचा काय देसी झाडा सांग? ॥ध्रु॥
आहाच मी नव्हे अर्थाचे भुकेलें । भलत्या एका बोले वारेन तें ॥३॥
तुका म्हणे देह देईन सांडणें । सहित अभिमानें ओवाळूनि ॥४॥
ठेवी निवारूनि आधीं । अवकाश तोंचि बुद्धी । सापडली संधी । मग बळ कोणासी? ॥ध्रु॥
गळा बांधीन पायीं । हालों नेदीं ठायींचे ठायीं । निवाड तो तईं । अवकळा केलिया ॥३॥
तुका म्हणे ठावे। आम्हां असां जी बरवे । बोभाटाची सवे। मुळींहुनी विठोबा! ॥४॥
माझें मज देईं देवा । असे ठेविला तो ठेवा । नाहीं करीत हेवा । कांहीं अधिक आगळा ॥ध्रु॥
नाहीं गळां पडलों झोंड । तुमचें तेंचि माझें तोंड । चौघाचार खंड । लांबणी हे अनुचित ॥३॥
नाही येत बळा । आतां तुम्हांसी गोपाळा! । तुका म्हणे गळा । उगवा पाया लागतो ॥४॥
आहों तैसीं पुढे असों दीनपणें । वेंचूनि वचनें करुणेची ॥ध्रु॥
धरूनि भय आता काय वाहों चिंता । काय करूं आतां आप्तपण? ॥३॥
तुका म्हणे आम्ही भावहीन जीव । म्हणऊनि देव दुरे दूर ॥४॥
आशंकित मनें करी आळवण । नाहीं समाधान निश्चिंतीचें ॥ध्रु॥
दासाचा विसर हे तो अनुचित । असे सर्व नीत पायांपाशीं ॥३॥
तुका म्हणे तुम्हां लाज येत नाहीं? । आम्हां चिंताडोहीं बुडवितां ॥४॥
दुर्बळ कीं, नाहीं आइकत कानीं? । काय नारायणी न्यून झालें? ॥ध्रु॥
क्षणक्षणा माझा नेघावा सांभाळ । अभाग्याचा काळ ऐसा आला ॥३॥
तुका म्हणे नाहीं वचनासी रुचि । फलकट वेंचीं तें तें होय ॥४॥
कां नाहीं वचन प्रतिउत्तराचें । मीच माझ्या वेंचें अट्टाहासें ॥ध्रु॥
कासयाने गोडी उपजावा विश्वास । प्रीति कांहीं रस वांचूनियां ॥३॥
तुका म्हणे अगा चतुराशिरोमणी । विचारावें मनीं केशीराजा! ॥४॥
॥ पुंडलिकवरदा हरी विठ्ठल श्रीज्ञानदेव तुकाराम ॥
संपूर्ण वारकरी प्रस्थानत्रयी नित्यनेम पारायण अनुक्रमणिका
ज्यांना प्रत्यक्षात ग्रंथावरून पारायण करायचे आहे त्यांनी खालील लिंकवरून ग्रंथ मागवावे.








I am very much pleased with this broadcast.
I try to read every day, some missed, but complete next day.
I am very much pleased with this broadcast.
I try to read every day, some missed, but complete next day.
I have given true fact.