दिवस – ३९. वारकरी प्रस्थानत्रयी नित्यनेम पारायण

अनुक्रमणिका

यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत । अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् ॥७॥
जें-“धर्मजात आघवें । युगायुगीं म्यां रक्षावें ।’ ऐसा ओघु हा स्वभावें । आद्यु असे ॥४९॥
म्हणौनि अजत्व परतें ठेवीं । मी अव्यक्तपणही नाठवीं । जे वेळीं धर्मातें अभिभवी । अधर्मु हा ॥५०॥
परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृताम् । धर्मसंस्थापनार्थाय सम्भवामि युगे युगे ॥८॥
ते वेळीं आपुलियाचेनि कैवारें । मी साकारु होऊनि अवतरें । मग अज्ञानाचें आंधारें । गिळूनि घालीं ॥५१॥
अधर्माची अवधी तोडीं । दोषांचीं लिहिलीं फाडीं । सज्जनांकरवीं गुढी । सुखाची उभवीं ॥५२॥
दैत्यांचीं कुळें नाशीं । साधूंचा मानु गिंवसीं । धर्मासी नीतीशीं । शेंस भरीं ॥५३॥
मी, अविवेकाची काजळी । फेडूनि, विवेक-दीप उजळीं । तैं योगियां पाहे दिवाळी । निरंतर ॥५४॥
स्वसुखें विश्व कोंदे । धर्मुचि जगीं नांदे । भक्तां निघती दोंदें । सात्त्विकाचीं ॥५५॥
तैं पापाचा अचळु फिटे । पुण्याची पहाट फुटे । जैं मूर्ति माझी प्रगटे । पांडुकुमरा ॥५६॥
ऐसेया काजालागीं । अवतरें मी युगीं युगीं । परि हेचि वोळखे जो जगीं । तो विवेकिया ॥५७॥
जन्म कर्म च मे दिव्यमेवं यो वेत्ति तत्त्वतः । त्यक्त्वा देहं पुनर्जन्म नैति मामेति सोऽर्जुन ॥९॥
माझें अजत्वें जन्मणें । अक्रियताचि कर्म करणें । हें अविकार जो जाणे । तो परममुक्त ॥५८॥
तो चालिला संगें न चळे । देहींचा देहा नाकळे । मग पंचत्वीं तंव मिळे । माझ्याचि रूपीं ॥५९॥
वीतरागभयक्रोधा मन्मया मामुपाश्रिताः । बहवो ज्ञानतपसा पूता मद्भावमागताः ॥१०॥
एऱ्हवीं, परापर न शोचिती । जे कामनाशून्य होती । वाटा कें वेळीं न वचती । क्रोधाचिया ॥६०॥
सदा मियांचि आथिले । माझिया सेवा जियाले । कीं आत्मबोधें तोषले । वीतराग जे ॥६१॥
जे तपोतेजाचिया राशी । कीं एकायतन ज्ञानासी । जे पवित्रता तीर्थांसी । तीर्थरूप ॥६२॥
ते मद्भावा सहजें आले । मी तेचि ते होऊनि ठेले । जे, मज तयां उरलें । पदर नाहीं ॥६३॥
सांगें, पितळेची गंधिकाळिक । जैं फिटली होय निःशेख । तैं, सुवर्ण, काई आणिक । जोडून जाइजे? ॥६४॥
तैसें, यमनियमीं कडसले । जे तपोज्ञानें चोखाळले । मी तेचि ते जाहले । एथ संशयो कायसा? ॥६५॥
ये यथा मां प्रपद्यन्ते तांस्तथैव भजाम्यहम् । मम वर्त्मानुवर्तन्ते मनुष्याः पार्थ सर्वशः ॥११॥
एऱ्हवीं तरी पाहीं । जे जैसें माझ्या ठायीं । भजती, तयां मीही । तैसाचि भजें ॥६६॥
देखें, मनुष्यजात सकळ । हें स्वभावता भजनशीळ । जाहलें असे केवळ । माझ्या ठायीं ॥६७॥
परी ज्ञानेंवीण नाशिले । जे बुद्धिभेदासी आले । तेणेंचि एकीं कल्पिलें । अनेकत्व ॥६८॥
म्हणौनि अभेदीं भेदु देखती । यया अनाम्या नामें ठेविती । देवी देवो म्हणती । अचर्चातें ॥६९॥
जे सर्वत्र सदा सम । तेथ विभाग अधमोत्तम । मतिवशें संभ्रम । विवंचिती ॥७०॥

अद्वैत-द्वैत (६९९ ते ७३६)

ब्रह्म पूर्वी एकाकी एक । तेंचि केवीं झालें अनेक । तो मायायोगपरिपाक । विशद अर्थ देख पिप्पलायनु सांगे ॥९९॥
मुळी मुख्य ब्रह्म ‘ओंकार’ । तें एकचि झालें त्रिप्रकार । आकार-उकार-मकार । सत्त्वादि विकार गुणत्रयात्मक ॥७००॥
गुणत्रय समसमान । त्या नांव बोलिजे प्रधान’ । तेंचि क्रियाशक्तिसूत्र जाण । तेथें प्रगटल्या ज्ञान ‘महत्तत्त्व’ म्हणती ॥१॥
‘अहंब्रह्म’ हे पूर्णस्फूर्ति । तें ‘अहं’ आलें देहाकृती । देहाभिमाने निश्चितीं । ‘जीव’ म्हणती वस्तूतें ॥२॥
‘क्रिया’ म्हणिजे दशधा करणे । ‘ज्ञान’शब्दें देवताधिष्ठानें । ‘अर्थ’ ऐसे विषयांसी म्हणणे । तेथ ‘फळ’ जाणणे सुखदुःख ॥३॥
गुण-भूतें-विषय-करणें । जीव भोक्ता सुखदुःखपणें । ज्ञान क्रिया कर्माचरणें । हे सर्वही जाणणे पूर्ण ब्रह्म ॥४॥
साखरेचा फणस प्रबळ । तेथें कांटे त्वचा बीजगोळ । अवघी साखरचि केवळ । तेवीं ब्रह्मचि सकळ जगदाकारें ॥५॥
जेवीं पाटाऊ पुतळीकृत । तेथ विषमावयवीं समान सूत । तेवीं जगदाकारें आकारवंत । दिसे अविकृत परब्रह्म ॥६॥
‘जग-विश्व-प्रपंचु’ नाम । परी ते निखळ परब्रह्म । हा उपनिषदार्थ उत्तम । वेदांती परम परमार्थु तो हा ॥७॥
जगदाकारें ब्रह्म निश्चित । जग अवघे विकारवंत । तैं ब्रह्मासही विकार प्राप्त । म्हणती तो अर्थ न घडे राया ॥८॥
नात्मा जजान न मरिष्यति नैधतेऽसौ, न क्षीयते सवनविद्व्यभिचारिणां हि । सर्वत्र शश्वदनपाय्युपलब्धिमात्रं, प्राणो यथेन्द्रियबलेन विकल्पितं सत् ॥३८॥
(हा आत्मा कधी जन्माला येत नाही, मरत नाही, वृद्धी पावत नाही व क्षीणही होत नाही. जन्ममरणादी विकार पावणाऱ्या सर्व दृश्यादृश्य पदार्थांचा तो द्रष्टा असून त्यांची कालमर्यादा तो जाणतो. तो ज्ञानरूप असून सर्वत्र आहे आणि नित्य व अजरामर आहे. प्राण जसा देहभेदाने भिन्न कल्पिला जातो, वस्तुत: एकच आहे. तसा परमात्मा अनेक रूपांत एकत्वाने व्यापलेला आहे.॥३८ ॥)
ब्रह्मासी नाहीं माता पिता । यालागी न घडे जन्मकथा । आत्मा एकदेशी होता । तरी जन्मा येता जननीजठरा ॥९॥
आत्म्यावेगळा काहीं । तिळभरी ठावो रिता नाहीं । यापरी पूर्णत्वें पाहीं । ‘जन्म’ ते ठायीं स्पर्शेना ॥७१०॥
जन्मापूर्वी बाळाचें नास्तिक्य । जन्मापाठी मानिती आस्तिक्य । या अस्तिनास्तीची भाख । आत्म्यासी देख असेना ॥११॥
आतां आहे पूर्वी नाहीं । ऐसें ‘आस्तिक्य’ आत्म्याचे ठायीं । कदाकाळी न रिघे कांहीं । तो नित्य पाहीं निरंतर ॥१२॥
देहीं जन्मल्या बाळकासी । वाढी दिसे दिवसदिवसीं । तो बाळजन्म नाहीं आत्म्यासी । यालागीं ‘वृद्धि’ त्यासी घडेना ॥१३॥
ज्यासी वृद्धि नाही तत्वतां । त्यासी न ये ‘विपरिणमता’ । बाल्य तारुण्य वृद्धावस्था । आत्म्यासी सर्वथा असेना ॥१४॥
जो मी बाळत्वे होतों धाकुटा । तोचि मी तारुण्ये जाहलों मोठा । तो मी वृद्ध जाहलों कटकटा । ऐसा त्रिकाळद्रष्टा परमात्मा॥१५॥
द्रष्टा साक्षी जो अवस्थातीत । तो कदा नव्हे अवस्थाभूत । देही असोनि अवस्थारहित । जाण तो निश्चित परमात्मा ॥१६॥
निरवस्थ आत्मा अविकारी पूर्ण । त्यासी कदा न ये ‘क्षीणपण’ । ज्यासी जन्मचि नाही जाण । त्यासी ‘ मरण’ असेना ॥१७॥
जो अविकारी निरवस्थ पूर्ण । ज्यासी नाहीं जन्ममरण । ऐसा तूं आत्मा म्हणशील कोण । तरी जाण सर्वज्ञ ज्ञानस्वरूप ॥१८॥
म्हणसी ज्ञानही क्षणिक असे । घटज्ञानें पटज्ञान निरसे । तेथ इंद्रियार्थवृत्तिचि नासे । ज्ञान जैसे तैसें अविनाशी ॥१९॥
तेचि अर्थीचा पूर्ण दृष्टांत । जेवीं प्राण देहाते वाढवीत । तो देहोचि होय अवस्थाभूत । प्राण निरवस्थ जैसा तैसा ॥७२०॥
प्राणु देहातें चाळितां । त्यासी न बाधी देहावस्था । आत्मा प्राणातें चेतविता । त्यासी देहावस्था असेना ॥२१॥
येणेंचि प्राणदृष्टांतें । साधूनि घ्यावें परब्रह्मातें । देहेंद्रियावेगळे आत्म्यातें । पुढील श्लोकार्थे प्रबोधी ॥२२॥
अण्डेषु पेशिषु तरुष्वविनिश्चितेषु, प्राणो हि जीवमुपधावति तत्र तत्र । सन्ने यदिन्द्रियगणेऽहमि च प्रसुप्ते, कूटस्थ आशयमृते तदनुस्मृतिर्नः ॥३९॥
(अंडज, जरायुज (जरा म्हणजे गर्भाशयात देहाभोवती असणारे वेष्टन), उद्भिज आणि स्वेदज वगैरे योनीत जेथे जेथे जीव जातो तेथे तेथे प्राणही असतोच. तसेच निद्रासमयी इंद्रिये लीन झालेली असतात व अहंवृत्ती ही मालवलेली असते त्यावेळी हा कूटस्थ उपाधिशून्य आत्मा मात्र जागृत असतो हे जागृत झाल्यानंतर सहजच अनुभवाला येते.॥३९॥)
अंडज स्वेदज जारज । चौथे जाण गा उद्भिज । त्यांचे ठायीं प्राणु सहज । आत्मयोगें सदा वर्ते ॥२३॥
प्राणयोगें आत्मा वर्ततां । त्यासी ‘जीव’ म्हणती तत्त्वतां । त्या प्राणासी न बाधिती देहावस्था । मा जीवाचे माथां त्या कैंच्या ॥
देहेंद्रियामाजीं वर्ततां । आत्मा अलिप्त देहावस्था । तो कैसा म्हणती आतां । ऐक त्याही दृष्टांता सांगेन ॥२५॥
आत्मा जागृतिदेही वर्ते । तैं सविकार मानिती त्यातें । तोचि सांडूनि देहेंद्रियांतें । स्वप्नीं वर्ते पूर्वानुध्यासें ॥२६॥
देहेंद्रियाविहीन । केवळ ‘लिंगदेह’ जाण । निजात्मा देखे स्वप्न । जागृत्यभिमानसंकल्पें ॥२७॥
तें उपरमल्या स्वप्न । देहाभिमान झालिया लीन । सर्वविकारविहीन । सुषुप्तिकाळी पूर्ण परमात्मा उरे ॥२८॥
देहेंद्रियासी अभिमान लीन । कोणीही स्फुरेना स्फुरण । तरी तें झालें सर्व शून्य । आत्मा चिद्घन नाही म्हणसी ॥२९॥
जरी सुषुप्तीसी आत्मा नाहीं । तरी सुखें निजेलो होतो पाहीं । हे उपजे ज्याच्या ठायीं । तो सर्वथा नव्हे कहीं शून्य ॥७३०॥
जो मी जागृती जागता । तोचि मी स्वप्नातें देखता । तोचि मी सुषुप्ती सुखभोक्ता । एवं तिही अवस्था साक्षी जो ॥३१॥
जो अवस्थात्रयीं साक्षी पूर्ण । तो सर्वथा नव्हे शून्य । तोचि परमात्मा परिपूर्ण । शुद्ध चिद्घन तो राया ॥३२॥
सुषुप्ती ब्रह्मानुभवो आहे । तरी कां पुढती संसारु पाहे । तेथ अविद्येसीं अहं लीन राहे । यालागीं होये भवभ्रमु ॥३३॥
ते अविद्या अहंकारेंसी नाशे । तैं जगद्रूपें ब्रह्मचि भासे । जन्ममरणांचा ठावोचि पुसे । जीव समरसे परब्रह्मीं ॥३४॥
तेथ हेतुमातु दृष्टांत । प्रमाण-प्रमेयविवर्जित । परमात्मा सदोदित । परब्रह्म निश्चित परमानंदें ॥३५॥
तेथ सुखावरी सुख नांदे । आनंदु भोगिजे आनंदें । जग दुमदुमी परमानंदें । स्वानंद बोधे संपूर्ण ॥३६॥

भक्तीने निर्विकारस्वरूपप्राप्ती (७३७ ते ७५३)

निरसोनियां निजमाया । ऐसा अनुभवो मुनिवर्या । कैं होईल म्हणसी राया । तैं भजावें यदुवर्या निष्कामभावें ॥३७॥
यर्ह्यब्जनाभचरणैषणयोरुभक्त्या, चेतोमलानि विधमेद्गुणकर्मजानि । तस्मिन् विशुद्ध उपलभ्यत आत्मतत्त्वं, साक्षाद्यथाऽमलदृशोः सवितृप्रकाशः ॥४०॥
(ज्यावेळी नाभिकमळ परमात्मा विष्णूच्या चरणकमलांचीच इच्छा धरून (इतर विषयांची आसक्ती सोडून) त्याच्या ठिकाणी केलेल्या श्रेष्ठ प्रकारच्या भक्तीने, गुणकर्मांनी उत्पन्न झालेले दोष अंत:करणातून पार निघून जातील त्यावेळी डोळे स्वच्छ असणाऱ्या माणसाला सूर्यप्रकाश ज्याप्रमाणे अगदी स्वच्छ दिसतो त्याचप्रमाणे निर्दोष अंत:करणात परमात्मस्वरूप प्रत्यक्षपणे प्रगट होते.॥ ४०॥)
निर्विकारस्वरूपप्राप्ति । अवश्य पावणें आहे चित्तीं । तैं करावी भगवद्भक्ति । उत्कटा प्रीति अविश्रम ॥३८॥
त्यजूनि पुत्रवित्तेषणेचें काज । जिणौनि लौकिकाची लाज । पद्मनाभभजनें भोज । अतिनिर्लज नाचावें ॥३९॥
पुत्रवित्तलोकेषणा । त्यजूनि भजतां हरिचरणां । तंव तंव चित्ताचे चैत्यमळ जाणा । क्षणक्षणां नासती ॥७४०॥
रजतमादि कर्मज मळ । चित्तीं बैसले जे सबळ । ते प्रक्षाळती सकळ । भक्तिप्रेमजळक्षाळणें ॥४१॥
जंव जंव थोरावे सप्रेम भक्ति । तंव तंव पाया लागे विरक्ति । स्वयें विरमे विषयासक्ति । होय चित्तवृत्ति निर्मळ ॥४२॥
निर्मळ जाहलिया चित्तवृत्ति । परमात्मया सर्व भूतीं । भजों लागे अनन्यप्रीतीं । हे ‘चौथी भक्ति’ उदार ॥४३॥
हे भक्ति अतिशयें उदार । निर्दाळी भक्तांचा अहंकार । उद्धरी सुर नर स्त्रिया शूद्र । आनंदनिर्भर करी जीवु ॥४४॥
हे भक्ति जैं लागे हातीं । तैं भवभयाची निःशेष शांति । पायां लागती चारी मुक्ती । ऐशी उदार भक्ति हरीची ॥४५॥
जेवीं डोळां असतां पडळ । सविता उगवे सर्व काळ । तो सन्मुख न देखे रविमंडळ । मा पदार्थ सकळ त्या कैंचे ॥४६॥
तेचि फिटलिया पडळ । दृष्टी होय अतिनिर्मळ । देखों लागे पदार्थ सकळ । रविमंडळसमन्वयें ॥४७॥
तेवीं निजात्मा हृदयीं वसे । परी चित्तवृत्ति मळिण असे । तंव परब्रह्म न प्रकाशे । चित्त वासनादोषे दूषित ॥४८॥
तेथ करितां भगवद्भक्ति । निर्मळ होय चित्तवृत्ति । तेव्हां निर्विकारस्वरूपप्राप्ति । भक्त पावती निजभजनें ॥४९॥
पावावया परमप्राप्ति । जगी दाटुगी भगवद्भक्ति । ते म्यां सांगितली तुजप्रती । यथानिगुती नृपनाथा ॥७५०॥
जेवीं डोळ्यांचे पडळ फिटे । तेथ प्रकाशेंसी सविता भेटे । तेवीं कल्पनालोपें प्रगटे । नेटेपाटें परब्रह्म ॥५१॥
जेथ निर्विकल्प समान । निश्चयेंसी जाहलें मन । त्यासी देहीं वर्ततांही जाण । भवबंधन स्पर्शेना ॥५२॥
ऐसें गर्जोनिया जाण । हर्षे बोले पिप्पलायन । तंव राजा सुखावला संपूर्ण । जीवींची खूण बाणली ॥५३॥

६११.काय आम्ही आतां पोटचि भरावें । जग चाळवावें भक्त म्हूण? ॥१॥
ऐसा तरी एक सांगा जी विचार । बहु होतो फार कासावीस ॥ध्रु॥
काय कवित्वाची घालूनियां रूढि । करूं जोडाजोडी अक्षरांची ॥३॥
तुका म्हणे काय गुंफोनि दुकाना । राहों नारायणा! करूनि घात ॥४॥
६१२.वर्म तरी आम्हां दावा । काय देवा जाणे मी? ॥१॥
बहुतां रंगी हीन झालों । तरी आलो शरण ॥ध्रु॥
द्याल जरी तुम्ही धीर । होईल स्थिर मन ठायीं ॥३॥
तुका म्हणे सत्ताबळें । लडिवाळे राखावीं ॥४॥
६१३.सांगों देवा, नेणा काय? । बोलाची ये आवडी ॥१॥
वायां मज चुकुर करा । विश्वंभरा, विनोदें॥ध्रु॥
आवडीच्या करा ऐसें । अंतर्वासे जाणतसा ॥३॥
तुका म्हणे समाधानें । होईन मनें मोकळा ॥४॥
६१४.निर्धाराचे अवघे गोड । वाटे कोड कौतुक ॥१॥
बैसलिया भाव पायीं । बरा तईं नाचेन ॥ध्रु॥
स्वामी कळे सावधान । तरी मन उल्हासे ॥३॥
तुका म्हणे आश्वा-सावें । प्रेम द्यावें विठ्ठले ॥४॥
६१५.झाली तडातोडी । अवघीं पडिलों उघडीं॥१॥
नव्हों कोणाचीच कांहीं । तुझें भरलियां वाहीं ॥ध्रु॥
पारु-षला संवसार । मोडली बैसण्याची थार ॥३॥
आतां म्हणे तुका । देवा अंतरें राखों नका ॥४॥
६१६.आधार तो व्हावा । ऐसी आस करी देवा! ॥१॥
तुम्हांपाशी काय उणें। काय वेंचे समाधानें? ॥ध्रु॥
सेवेच्या अभिळासें। मन बहु झाले पिसें॥३॥
अरे भक्त-पराधीना । तुका म्हणे नारायणा! ॥४॥
६१७.तुमचा तुम्ही केला गोवा । आतां चुकवितां देवा! ॥१॥
कैसे सरे चाळवणें? । केले काशाला शाहाणे? ॥ध्रु॥
कासया हो रूपा-। नांवा आलेति, गा बापा! ॥३॥
तुका म्हणे आतां । न सरे हवाले घालितां ॥४॥
६१८.माझी भक्ति भोळी । एकविध भाव बळी ॥१॥
मी का पडेन निराळा । ऐसा सांडूनि सोहळा॥ध्रु॥
आतां अनारिसा । येथे न व्हावें सहसा ॥३॥
तुका म्हणे जोडूनि पाय । पुढे उगा उभा राहे ॥४॥
६१९.आहे तरी सत्ता । ऐशा करितों वारता ॥१॥
अंग-संगाची उत्तरें । सलगी सेवन लेकुरें ॥ध्रु॥
तरी निकट-वासें । असों, आशंकेच्या नासें ॥३॥
तुका म्हणे रुची । येथें भिन्नता कैंची? ॥४॥
६२०.काळ सारावा चिंतनें । एकांतवासी गंगास्नानें । देवाचें पूजनें । प्रदक्षणा तुळसीच्या ॥१॥
युक्त आहार विहार। नेम इंद्रियांसी सार । नसावी बासर। निद्रा बहु भाषण ॥ध्रु॥
परमार्थ महाधन । जोडी देवाचे चरण । व्हाव-या जतन । हे उपाय लाभाचे ॥३॥
देह समर्पिजे देवा । भार कांहींच न घ्यावा । होईल आघवा । तुका म्हणे आनंद ॥४॥
६२१.मऊ मेणाहून आम्ही विष्णुदास । कठिण वज्रास भेदूं ऐसे ॥१॥
मेले जित असों, निजोनियां जागे । जो जो जें जें मागे तें तें देऊ ॥ध्रु॥
भले तरी देऊं गांडिची लंगोटी । नाठ्याळाचे काठी देऊं माथां ॥३॥
मायबापाहुनी बहु मायावंत । करुं घातपात शत्रुहूनि ॥४॥
अमृत तें काय गोड आम्हांपुढे । विष तें बापुडें कडू किती ॥५॥
तुका म्हणे आम्ही अवघेचि गोड। ज्याचे पुरे कोड त्याचे परी॥६॥
६२२.गाढवाचें तान्हें । पालटते क्षणक्षणे ॥१॥
तैसे अधमाचे गुण । एकविध नाहीं मन ॥ध्रु॥
उपजतां बरें दिसे । रूप वाढतां तें नासे ॥३॥
तुका म्हणे भुंकते वेळे । वेळ अवेळ न कळे ॥४॥
६२३.विटाळ तो परद्रव्य परनारी । येथूनि जो दुरी तो सोंवळा ॥१॥
गद्य पद्य कांहीं न धरावी उपाधी । स्वाधीनची बुद्धि करूनि ठेवा ॥ध्रु॥
विचाराचें कांहीं करा रे स्वहित । पापपुण्यातीत भांडवल ॥३॥
तुका म्हणे न लगे जावें वनांतरा । विश्व विश्वंभरा सारिखेंचि ॥४॥
६२४.‘कल्पतरु’ रुया नव्हती बाभुळा । पुरविती फळां इच्छितिया? ॥१॥
उदंड त्या गाई म्हैसी आणि शेळ्या । परि त्या निराळ्या कामधेनु ॥२॥
तुका म्हणे देव दाखविल दृष्टी । तयासवें भेटी थोर पुण्य ॥३॥
६२५.जळो तैसा प्रेम रंग । जाय भुलोनि पतंग॥१॥
सासुसाठी रडे सून । भाव अंतरींचा भिन्न ॥२॥
मैंद मुखींचा कोवळा। भाव अंतरी निराळा ॥३॥
जैसी वृंदावनकांती। उत्तम, धरूं नये हातीं ॥४॥
बक ध्यान धरी । दावी सोंग मत्स्य मारी ॥५॥
तुका म्हणे सर्प डुले । तैसा कथेमाजीं खुले ॥६॥
६२६.वेशा नाहीं बोल अवगुणा दूषिलें । ऐशा बोला भले झणी क्षोभा ॥ध्रु॥
कोण नेणे अन्न जीवाचें जीवन? । विष मेळवण विष होय ॥२॥
सोने शुद्ध नेणे कोण हा विचार । डांकें हीनवर केले त्यासी ॥३॥
याति शुद्ध परि अधम लक्षण । वायां गेलें तेणे सोंग हित॥४॥
तुका म्हणे शूर तोचि पावे मान । आणीक मंडण भारवाही॥५॥
६२७.अणुरेणुया थोकडा । तुका आकाशा एवढा ॥१॥
गिळूनि सांडिलें कलेवर । भवभ्रमाचा आकार ॥ध्रु॥
सांडिली त्रिपुटी । दीप उजळला घटीं ॥३॥
तुका म्हणे आतां । उरलों उपकारा पुरता ॥४॥
(मासिक पारायण चौथा विसांवा)

संपूर्ण वारकरी प्रस्थानत्रयी नित्यनेम पारायण अनुक्रमणिका


ग्रंथ

1 thought on “दिवस – ३९. वारकरी प्रस्थानत्रयी नित्यनेम पारायण”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Page Reader Press Enter to Read Page Content Out LoudPress Enter to Pause or Restart Reading Page Content Out LoudPress Enter to Stop Reading Page Content Out LoudScreen Reader Support
error: Content is protected !!
Scroll to Top