
अनुक्रमणिका
या कुन्देन्दुतुषारहारधवला या शुभ्रवस्त्रावृता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना ।
या ब्रह्माच्युतशङ्करप्रभृतिभिर्देवै: सदा वन्दिता सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापहा ॥
जयांचे केलिया स्मरण । होय सकळ विद्यांचे अधिकरण । तेचि वंदूं श्रीचरण । श्रीगुरूंचे ॥१॥
ते नमस्कारोनि आता ॥
श्रीगणेशाय नमः । श्रीसरस्वत्यै नमः । श्रीविठ्ठलाय नमः ।
श्रीमातापितृभ्यां नमः । श्रीगुरुभ्यो नमः ॥
ॐ नमो भगवते वासुदेवाय ।
रामकृष्णहरि । रामकृष्णहरि । रामकृष्णहरि ॥
श्रीज्ञानेश्वरी नित्यनेम पारायण
क्रमश: नित्यनेम पारायण
अध्याय – ४. ओवी क्र. ७१ ते ९२
तेथ जें जें अपेक्षित । तें तैसेंचि पावती समस्त । परी तें कर्मफळ, निश्चित । वोळख तूं ॥७२॥
वांचूनि; देतें घेतें आणिक । निभ्रांत नाही सम्यक । एथ कर्मचि फळसूचक । मनुष्यलोकीं ॥७३॥
जैसें, क्षेत्रीं जें पेरिजे । तें वांचूनि, आन न निपजे । कां, पाहिजे तेंचि देखिजे । दर्पणाधारें ॥७४॥
नातरी, कडेयातळवटीं । जैसा आपलाचि बोलु, किरीटी । पडिसादु होऊनि उठी । निमित्तयोगें ॥७५॥
तैसा, समस्तां यां भजना । मी साक्षिभूतु पें अर्जुना । एथ प्रतिफळे भावना । आपुलाली ॥७६॥
जे-“प्रकृतीचेनि आधारें । गुणाचेनि व्यभिचारें । कर्में तदनुसारें । विवंचिली ॥७८॥
एथ एकचि हे, धनुष्पाणी । परी जाहले गा चहूं वर्णी । ऐसी गुण-कर्म-कडसणी । केली सहजें ॥७९॥
म्हणौनि ऐकें पार्था । हे वर्णभेदसंस्था । मी कर्ता नव्हें सर्वथा । याचिलागीं ॥८०॥
परि तीं, बीजें जैशीं दग्धलीं । नुगवतीचि; पेरलीं । तैशीं कर्मेंचि परी तयां जाहलीं । मोक्षहेतु ॥८३॥
एथ आणिकही एक, अर्जुना । हे कर्माकर्म-विवंचना । आपुलिये चाडें सज्ञाना । योग्य नोहे ॥८४॥
जैसें कां कुडें नाणें । खऱ्याचेनि सारखेपणें । डोळ्यांचेहि देखणें । संशयीं घाली ॥८६॥
तैसें नैष्कर्म्यतेचेनि भ्रमें । गिवसिजत आहाति कर्में । जे दुजी सृष्टि मनोधर्में । करूं शकती ॥८७॥
वांचूनि; मूर्खाची गोठी कायसी? । एथ मोहले गा क्रांतदर्शी । म्हणौनि आतां तेंचि परियेसीं । सांगेन तुज ॥८८॥
मग वर्णाश्रमासि उचित । जें विशेष कर्म विहित । तेंही ओळखावें, निश्चित । उपयोगेंसी ॥९०॥
पाठीं, जें निषिद्ध म्हणिपे । तेंही बुझावें स्वरूपें । येतुलेंनि कांहीं न गुंपे । आपैसेंचि ॥९१॥
एऱ्हवीं, जग हें कर्माधीन । ऐसी याची व्याप्ति गहन । परी तें असो; ऐकें चिन्ह । प्राप्ताचें गा ॥९२॥
॥ पुंडलिकवरदा हरी विठ्ठल श्रीज्ञानदेव तुकाराम ॥
श्रीएकनाथी भागवत
क्रमश: नित्यनेम पारायण
अध्याय – ३, ओवी क्र. ७५४ ते ७९१
श्रीगणेशाय नमः ॥ श्रीसरस्वत्यै नमः ॥ श्रीगुरुभ्यो नमः ॥ श्रीदत्तात्रेयाय नमः ॥ श्रीरुक्मिणीपाण्डुरङ्गाभ्यां नमः ॥
कर्मयोगनिरूपणाची विदेहाची विनंती (७५४ ते ७५८)
जेणें तुटे कर्मबंधन । त्या कर्मयोगाचे लक्षण । समूळ ऐकावया जाण । राजा आपण सादरें पुसतु ॥५५॥
(राजा म्हणाला- ज्याचे आचरण केले असता पुरुष विमलचित्त होतो, कृतकर्माचा नाश होऊन त्याला नैष्कर्म्यस्थिती प्राप्त होते तो कर्मयोग आपण आम्हांला सांगा. ॥४१॥)
कोणे कर्मे कर्म तुटे । नैष्कर्म्यसिद्धि स्वयें प्रगटे । पुरुषा पुरुषोत्तम भेटे । हे मज गोमटें वर्म सांगा ॥५७॥
(पूर्वी हाच प्रश्न वडिलांच्या (इक्ष्वाकूच्या) समक्ष सनत्कुमारांना मी विचारला असताना त्यांनी ह्याचे उत्तर मला दिले नाही ह्याचेही कारण मला सांगा.॥४२ ॥)
कर्मयोगनिरूपण (७५९ ते ८०२)
(आविर्होत्र म्हणाले—-विहित कर्म, निषिद्ध कर्म व विकर्म (विहित कर्म न करणे) हा विषय लौकिक वचनांनी कळणारा नसून वेदवचनसाध्यच आहे. वेद हे ईश्वरस्वरूपच असल्याने. हा कर्माचा निर्णय घेताना देवादिकांनासुद्धा मोह पडतो. (तू बाळ असल्याने त्यावेळी ऋषींनी तुला सांगितले नाही.)॥४३॥)
जे स्वयें प्रतिसृष्टिकारी । तेही भुलले कर्मविभागावरी । जे समुद्र घोटिती चुळेकरी । तेही कर्मसागरी बुडाले ॥६१॥
येचि कर्मविवंचनेसाठीं । ऋषिमहर्षींचिया कोटी । मताभिमाने झाले हिंपुटी । त्यांसीही शेवटी नुगवेचि ॥६२॥
कर्माकर्मविभाग जाणा । स्वयें नुगवेचि चतुरानना । इतरांची कोण गणना । कर्मविवंचना करावया ॥६३॥
कर्म वेदमूळ जाण । वेदु स्वयें नारायण । वेदवादविवंचन । करितां मौन श्रुतिशास्त्रां ॥६४॥
कर्म-अकर्म-विकर्म जाण । एकचि परी त्रिविध भिन्न ।तेंही विभागविवंचन । सावधान अवधारीं ॥६५॥
श्वेत मृदु मधुर । त्रिविधभेदें एक साखर । तेवीं एकचि त्रिप्रकार । कर्मठ नर मानिती कर्म ॥६६॥
भिन्न करितां मधुरता । तीमाजीं ये मृदु-श्वेतता । श्वेतताचि भिन्न करितां । मृदु-मधुरता तीमाजी ॥६७॥
तेवीं भिन्न करितां ‘कर्म’ । कर्मा सर्वांगी ‘अकर्म’ । कर्म अकर्मामाजीं ‘विकर्म ‘ । मिरवे परम सौभाग्ये ॥६८॥
मुख्य मूळी जे कां निपजे । ‘कर्म’ ऐसें त्यातें म्हणिजे । विहिताविहितक्रिया जे जे । ‘विकर्म’ म्हणिजे तिये नांव ॥६९॥
कर्म अकर्मयोगें चळे । ऐसें विकर्मी ज्यासी विवळे । त्यास ‘निष्कर्मता’ आकळे । गुरुकृपाबळे तत्काळ ॥७७०॥
कर्मावरी कर्म विशेष वाढे । ‘विकर्म ‘ त्याते म्हणणे घडे । जेथें कर्म रिघों न शके पुढे । ‘अकर्म’ चोखडें या नांव ॥७१॥
ऐशी कर्मविवंचना अटक । हा प्रश्न केला तैं तूं बाळक । त्याचिलागीं गा राया देख । सनकादिक न सांगतीचि ॥७२॥
कर्माकर्मविवंचना । अधिकारेंवीण कोणा । सांगों नये नृपनंदना । कर्म सज्ञाना अतिदुर्बोध ॥७३॥
(लहान मुलांना ज्याप्रमाणे औषध-प्रवृत्ती होण्याकरिता आमिष दाखवितात, त्याप्रमाणे अज्ञाला योग्य शिक्षण देण्याकरिताच वेद ईशस्वरूपबोधक असूनसुद्धा कर्ममार्गाचाच उपदेश करतात. वस्तुतः वेद समूळ कर्माचा बंध तुटण्यासाठीच कर्माचे अनुष्ठान प्रतिपादन करतात.॥४४॥)
तेवीं वेदांचा परोक्षवाद । सत्य मानिती बुद्धिमंद । कर्मे छेदवी कर्मबाध । हा वेदानुवाद मुख्यत्वें ॥७५॥
वेदु बोले स्वर्गादि फळ । तो प्रवृत्तिलोभ केवळ । परी कर्मे छेदी कर्ममूळ । हे मुख्यत्वे फळ वेदोक्तीं ॥७६॥
लोहाची बेडी पडली पायीं । ते तोडावया घणु आणिला पाहीं । तो घणुचि विकून खादला जिहीं । त्यांचे बंधन कहीं तुटेना ॥७७॥
तेवीं कर्मे छेदावें कर्मबंधन । तें कर्म वेंचिती विषयीं पूर्ण । त्यांचे कदा न तुटे भवबंधन । जन्ममरण सरेना ॥७८॥
आम्ही स्वर्गफळा विरक्त । म्हणोनि नाचरे जो वेदोक्त । त्याचे ज्ञान जाले विपरीत । अति अनर्थ पावे तो ॥७९॥
(आपण स्वतः अज्ञानी आणि इंद्रियाधीन असूनही जो वेदात सांगितल्याप्रमाणे आचरण करीत नाही व अधर्माने विरुद्ध कर्माचे आचरण करतो तो वारंवार जन्ममृत्यूच्या चक्रात सापडतो.॥४५॥)
जरी शास्त्रज्ञ ज्ञाता झाला । आणि वेदोक्ता विमुख ठेला । तरी तो जाणपणेंचि नागवला । जाण बुडाला दुःखार्णवीं ॥८१॥
नाचरे जो वेदोक्त कर्म । त्यक्तकर्मे मानी निष्कर्म । त्यासी थोर पडला भ्रम । नाडला परम अभिमानें ॥८२॥
जरी विषयो निग्रहिला । आणि वेदोक्ता जो दुरावला । तो निजघाता प्रवर्तला । स्वयें बुडाला नरकार्णवीं ॥८३॥
वेद निजमूळ परमार्था । तें वेदोक्त नाचरतां । जें जें करणें नृपनाथा । तें तें तत्त्वतां अधःपाती ॥८४॥
डोळे देखणे तत्त्वतां । ते काढोनि पाहों जातां । न देखे आपुली डोळसता । मा इतर पदार्था कोण देखे ॥८५॥
तैसा नाचरोनि वेदार्थु । जो जो मानिला परमार्थु । तेणें आंवतूनियां अनर्थु । जाण निश्चितु आणिला घरा ॥८६॥
तेणें आचार अनर्थपाटें । वाहावले जन्ममरणवाटे । तेथ नानायोनिगर्भसंकटें । सोसितां न सुटे कल्पांतीं ॥८७॥
तेथें जन्मजन्मों जन्म न टके । मरमरों मरण न चुके । जैं वेदविहित चुके । तैं अतिदुःखें दुःखभोगु ॥८८॥
‘विकर्मणा ह्यधर्मेण’ । हे मूळींचे पदनिरूपण । तेणें विकर्मामाजी अधर्म पूर्ण । परी अकर्म तें जाण अधर्म नव्हे ॥८९॥
ज्यासी लावितां न लागे कर्म । या नांव मुख्य निष्कर्म । निष्कर्मलक्षण हाचि धर्म । येणेंचि परम मुक्त साधु ॥७९०॥
ज्यासी शुद्ध आकळे अकर्म । तो तत्काळ होय निष्कर्म । अकर्माचे कळल्या वर्म । मुक्तता परम पायां लागे ॥९१॥
॥ पुंडलिकवरदा हरी विठ्ठल श्रीज्ञानदेव तुकाराम ॥
श्रीतुकाराम महाराजांची गाथा
अभंग क्र. ६२८ ते ६४६
झाली पापा तापा तुटी । दैन्य गेले उठाउठीं ॥ध्रु॥
झाले समाधान । पायीं विसांवलें मन ॥३॥
तुका म्हणे आले घरा । तोचि दिवाळी दसरा ॥४॥
येणें भाग्यें असो जीत । एवढे समर्पूनि चित्त ॥ध्रु॥
सांभाळिलें देवा! । मज अनाथा जी जीवा ॥३॥
जोडूनियां कर । तुका विनवितों किंकर ॥४॥
स्नेहवादें दु:ख जडलेंसें अंगीं । निष्ठुर हे जगीं प्रेमसुख ॥ध्रु॥
निंदास्तुति कोणी करो दया माया । न धरी चाड या सुखदु:खा ॥३॥
योगीराज कां रे न राहती बैसोनि । एकिये आसनीं याचि गुणें ॥४॥
तुका म्हणे मना पाहें विचारून । होई रे कठिण वज्राऐसें ॥५॥
तूं स्वामी मी सेवक । उंच पद नीच एक । ऐसें करावें कौतुक। नको करूं खंडणा ॥ध्रु॥
जळ न खाती जळा । वृक्ष आपुलिया फळा । भोक्ता तो निराळा । तेणें गोडी निवडिली ॥३॥
हिरा शोभला कोंदणें । अळंकारी मिरवें सोनें । एक असतां तेणें । काय दुजें जाणावें? ॥४॥
उष्णे छाये सुख वाटे । बाळें माते पान्हा फुटे । एका एक भेटे । कोण सुख ते काळीं? ॥५॥
तुका म्हणे हित । हेंचि मानी माझें चित्त । नव्हे आतां मुक्त । ऐसा झाला भरंवसा ॥६॥
जातीचें तें झुरें येरयेरासाठीं । वियोगेंही तुटी नेघे कधीं ॥ध्रु॥
भेटीची अपेक्षा वारता आदर । पुसे, नव्हे धीर, मागुतालें ॥३॥
तुका म्हणे माझ्या जीवाचें जीवन । सोइरे हरिजन प्राणसखे ॥४॥
पंढरीसि जावें उद्वेग मानसीं । धरिल्या, पावसी संदेह नाहीं ॥ध्रु॥
नसो बळ देह असो पराधीन । परि हे चिंतन टाको नको ॥३॥
तुका म्हणे देह पडों या चिंतनें । पुढे लागे येणे याजसाठीं ॥४॥
साधन ते सेवा संतांची उत्तम । आवडीने नाम गाईन तें ॥ध्रु॥
न पुसते कोणी कोठेही असतां । समाधान चित्ताचिया सुखें ॥३॥
तुका म्हणे जन अव्हेरितें मज । तरी केशीराज सांभाळितां ॥४॥
आतां पुढे वायां जावें हें तें काईं? । कामक्रोधें ठायीं वास केला ॥ध्रु॥
गुणदोष आले जगाचे अंतरा । भूतांच्या मत्सरावरी बुद्धि ॥३॥
तुका म्हणे करूं उपदेश लोकां । नाहीं झालों एका परता दोषा ॥४॥
येथे उपकारासाठीं । आले, घर ज्यां वैकुंठीं ॥ध्रु॥
लटिकें वचन । नाहीं, देही उदासीन ॥३॥
मधुरा वाणी होटीं । तुका म्हणे वाव पोटीं ॥४॥
राग नको धरूं मनीं । गांडमणी सांगतों ॥ध्रु॥
तरटापुढे बरे नाचे । सुते काचें मुसळ ॥३॥
तुका म्हणे काठी सार । करी फार शाहाणे ॥४॥
जाणतांचि होतो घात । परिसा मात देवा हे ॥ध्रु॥
आंविसासाठी फांसा मान । पाडी धन इच्छा ते ॥३॥
तुका म्हणे होणार खोटें । कर्म मोठे बळिवंत ॥४॥
लक्ष्मी ते ऐशा नांवें । भाग्यें ज्यावें तरी त्यांनीं ॥ध्रु॥
नमन ते नम्रता अंगीं । नेघे रंगी पालट ॥३॥
तुका म्हणे त्यांची नांवें । घेतां व्हावें संतोषी ॥४॥
विसर तो न पडावा । माझा देवा तुम्हांसी ॥ध्रु॥
पुढे फार बोलों कायी? । अवघे पायीं विदित ॥३॥
तुका म्हणे पडिलों पायां । करा छाया कृपेची ॥४॥
माझीये युक्तीचा नव्हे हा प्रकार । मज विश्वंभर बोलवितो ॥ध्रु॥
काय मी पामर जाणे अर्थभेद । वदवी गोविंद तेंचि वदें ॥३॥
निमित्त मापासी बैसविलों आहे । मी तो कांहीं नव्हे, स्वामिसत्ता ॥४॥
तुका म्हणे आहे पाईकचि खरा । वागवितों मुद्रा नामाची हे ॥५॥
म्हणा राम राम टाळी वाजवा हातें । नाचा डोला प्रेमें आपुलिया स्वहितें ॥ध्रु॥
सहज घडे तया आळस करणे ते काई? । अग्नीचें भातुकें हात पाळितां कां पायीं? ॥३॥
येथें नाहीं लाज भक्तिभाव लौकिक । हांसे तया घडे ब्रह्महत्या पातक ॥४॥
जया जैसा भाव निरोपण करावा । येथे नाही चाड ताल विताल या देवा ॥५॥
सदैव ज्या कथाकाळी घडे श्रवण । तुका म्हणे येर जन्मा आले ते पाषाण ॥६॥
देव नलगे देव नलगे । सांठवणीचे रुधले जागे ॥ध्रु॥
देव मंदला देव मंदला । भाव बुडाला काय करूं ॥३॥
देव घ्या फुका देव घ्या फुका । नलगे रुका मोल कांहीं ॥४॥
दुबळा तुका भावेंविण । उधारा देव घेतला ऋण ॥५॥
साधन संकट सर्वांलागी शीण । व्हावा लागे क्षीण अहंभाव ॥ध्रु॥
भाव हा कठीण वज्र हे भेदवें । परि न छेदवें मायाजाळ ॥३॥
तुका म्हणे वर्म भजनेंचि सांपडे । येरासी तो पडे वोस दिशा ॥४॥
कोणी व्हारे अधिकारी । त्यासी हरी देईल ॥ध्रु॥
अंगीं वैराग्याचे बळ । साही खळ जिणावे ॥३॥
उरेल ना उरी । तुका करीं बोभाट ॥४॥
अवघे आले आंत पोटा पडिलें थीत । सारूनि निश्चिंत झालों देवा ॥ध्रु॥
द्यावयासी आतां नाहीं तोळा मासा । आधील मवेशा तुज ठावी ॥३॥
तुझ्या रिणे गेले बहुत बांधोनि । झाले मजहूनि थोर थोर ॥४॥
तुका म्हणे तुझे खतीं जें गुंतलें । करूनि आपुलें घेईं देवा ॥५॥
॥ पुंडलिकवरदा हरी विठ्ठल श्रीज्ञानदेव तुकाराम ॥
संपूर्ण वारकरी प्रस्थानत्रयी नित्यनेम पारायण अनुक्रमणिका
ज्यांना प्रत्यक्षात ग्रंथावरून पारायण करायचे आहे त्यांनी खालील लिंकवरून ग्रंथ मागवावे.








रामकृष्णहरी माऊली 🙏