
अनुक्रमणिका
या कुन्देन्दुतुषारहारधवला या शुभ्रवस्त्रावृता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना ।
या ब्रह्माच्युतशङ्करप्रभृतिभिर्देवै: सदा वन्दिता सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापहा ॥
जयांचे केलिया स्मरण । होय सकळ विद्यांचे अधिकरण । तेचि वंदूं श्रीचरण । श्रीगुरूंचे ॥१॥
ते नमस्कारोनि आता ॥
श्रीगणेशाय नमः । श्रीसरस्वत्यै नमः । श्रीविठ्ठलाय नमः ।
श्रीमातापितृभ्यां नमः । श्रीगुरुभ्यो नमः ॥
ॐ नमो भगवते वासुदेवाय ।
रामकृष्णहरि । रामकृष्णहरि । रामकृष्णहरि ॥
श्रीज्ञानेश्वरी नित्यनेम पारायण
क्रमश: नित्यनेम पारायण
अध्याय – ४. ओवी क्र. ९३ ते ११४
आणि कर्तव्यतेलागी । जया दुसरें नाहीं जगीं । ऐसिया नैष्कर्म्यता तरी चांग । बोधला असे ॥९४॥
तरी क्रियाकलापु आघवा । आचरतु दिसे बरवा । तोचि तो ये चिन्हीं जाणावा । ज्ञानिया गा ॥९५॥
जैसा, कां जळापाशीं उभा ठाके । तो जरी आपणपें जळामांझि देखे । तरी तो निभ्रांत वोळखे । म्हणे “मी वेगळा आहें” ॥९६॥
अथवा नावे हन जो रिगे । तो थडियेचें रुख जातां देखें वेगें । तेचि साचोकारें जो पाहों लागे । तंव “रुख” म्हणे “अचळ” ॥९७॥
तैसें, सर्व कर्मी असणें । तें फुडें मानूनि वायाणें । मग आपणपें जो जाणे । नैष्कर्म्यु ऐसा ॥९८॥
आणि उदोअस्तुचेनि प्रमाणें । जैसें न चालतां सूर्याचें चालणें । तैसें नैष्कर्म्यत्व जाणे । कर्मीचि असतां ॥९९॥
तो मनुष्यासारिखा तरी आवडे । परी मनुष्यत्व तया न घडे । जैसें जळीं जळामाजीं न बुडे । भानुबिंब ॥१००॥
तेणें न पाहतां विश्व देखिलें । न करितां सर्व केलें । न भोगितां भोगिलें । भोग्यजात ॥१०१॥
एकेचि ठायीं बैसला । परि सर्वत्र तोचि गेला । हें असो; विश्व जाहला । आंगेंचि तो ॥१०२॥
आणि हें कर्म, मी करीन । अथवा आदरिलें सिद्धि नेईन । येणें संकल्पेंही जयाचें मन । विटाळेना ॥१०४॥
ज्ञानाग्निचेनि मुखें । जेणें जाळिलीं कर्में अशेखें । तो परब्रह्मचि मनुष्यवेखें । वोळख तूं ॥१०५॥
जो संतोषाचा गाभारा । आत्मबोधाचिये वोगरां । पुरे न म्हणेचि; धनुर्धरा । आरोगितां ॥१०७॥
कैसी अधिकाधिक आवडी! । घेत महासुखाची गोडी । सांडोनियां आशा कुरोंडी । अहंभावेंसीं ॥१०८॥
यदृच्छालाभसंतुष्टो द्वंद्वातीतो विमत्सरः । समः सिद्धावसिद्धौ च कृत्वापि न निबध्यते ॥२२॥
तो दिठी जें पाहे । तें आपणचि होऊनि जाये । आईके तें आहे । तोचि जाहला ॥११०॥
चरणीं हन चाले । मुखें जें जें बोले । ऐसें चेष्टाजात तेतुलें । आपणचि जो ॥१११॥
हें असो विश्व पाहीं । जयासि आपणपेंवांचूनि नाहीं । आतां कवण तें कर्म कायी । बाधी तयातें? ॥११२॥
हा मत्सरु जेथ उपजे । तेतुलें नुरेचि जया दुजें । तो निर्मत्सरु, काई म्हणिजे । बोलावरी? ॥११३॥
म्हणौनि सर्वांपरी मुक्तु । तो सकर्मुचि, कर्मरहितु । सगुण, परि गुणातीतु । एथ भ्रांति नाहीं ॥११४॥
॥ पुंडलिकवरदा हरी विठ्ठल श्रीज्ञानदेव तुकाराम ॥
श्रीएकनाथी भागवत
क्रमश: नित्यनेम पारायण
अध्याय – ३, ओवी क्र. ७९२ ते ८४६
श्रीगणेशाय नमः ॥ श्रीसरस्वत्यै नमः ॥ श्रीगुरुभ्यो नमः ॥ श्रीदत्तात्रेयाय नमः ॥ श्रीरुक्मिणीपाण्डुरङ्गाभ्यां नमः ॥
(जो स्वत: आसक्ती सोडून वेदविहित कर्माचे आचरण करतो आणि ते कर्म ईश्वराला अर्पण करतो त्याला नैष्कर्म्य सिद्धी प्राप्त होते. वेदामध्ये स्वर्गादिक फळे जी सांगितलेली आहेत ती सत्कर्माच्या केवळ गोडीसाठीच होत.॥४६॥)
मी एकु कर्मकर्ता । ऐशी उठों नेदी अहंता । तें कर्मचि स्वभावतां । अर्पी श्रीअनंता ईश्वरातें ॥९३॥
एवं ईश्वरी जें अर्पें कर्म । तें कर्म होय निर्धर्म । याचि नांव परम । ‘नैष्कर्म्य’ निजसिद्धी ॥९४॥
वेदें बोलिलें कर्मफळ । ज्याची वासना निष्काम निर्मळ । त्यासि वेदोक्त फळ प्रबळ । भोगावया केवळ स्वप्नीं न दिसे ॥९५॥
ऐसें असतां कर्मफळ । वांछितां नाडिजे केवळ । जेवीं परिसु देऊनि सोज्ज्वळ । मागिजे पोफळ तांबूलासी ॥९६॥
कर्मा निष्कामता नित्य फळ । तेथ फळाशा नाडले सकळ । चंदन सर्वांगी सफळ । तेथ मागतां फळ नाडिजे स्वयें ॥९७॥
हाती आंतुडावया मासा । गळी लाविजे अल्प आमिषा । तेवीं निष्काम करावया मानसा । वेदु फळाशा प्रलोभी ॥९८॥
आमिष घालूनि मासे पाळी । की तद्योगे जळाबाहेर गाळी । तेवीं कर्म कर्मातें निर्दाळी । हें नेणिजे मुळी फळकामीं ॥९९॥
हो कां फळाचिये चाडे । स्वधर्मकर्मी प्रवृत्ति घडे । तेणें नैष्कर्म्यसिद्धि आंतुडे । हे वेदांचे फुडें निजगुह्य ॥८००॥
कर्म ब्रह्मत्वें सदा सफळ । फळ वांच्छी त्यातें निष्फळ । हे जाणोनि कर्मकुशळ । फळाशा समूळ छेदिती ॥१॥
ऐसें आचरतां वैदिक कर्म । तेणें कर्मे पाविजे नैष्कर्म्य । याहोनियां अति सुगम । सांगेन वर्म तें ऐक ॥२॥
आगमविधिपूजाविधान (८०३ ते ८४६)
(ज्यास देहसंबंधाने प्राप्त झालेल्या जिवाच्या अंत:करणातील आपला अहंकाररूप बंध तोडावयाचा आहे त्याने वैदिक आणि तांत्रिक (पंचतंत्रादी) विधीने केशवमाहात्म्याची पूजा करावी.)
जया तांत्रिक महापूजा । संतोष होय गरुडध्वजा । तें तांत्रिक विधान वोजा । महाराजा अवधारीं ॥४॥
वैदिक मंत्र तांत्रिक तंत्र । हे मिश्रपूजा अतिपवित्र । शीघ्र निष्काम करी नर । तो पूजाप्रकार अतिउत्तम ॥५॥
वैदिक अथवा तांत्रिक । गुरुमार्गे सिद्धिदायक । यालागीं गा आवश्यक । सद्गुरूसी देख शरण जावें ॥६॥
(सद्गुरूपासून मंत्रलाभरूप अनुग्रह घेऊन त्यांच्या मार्गदर्शनानुसार वैदिक पूजाविधीने आपल्याला प्रिय असलेल्या (रामकृष्णादी) मूर्तीच्या द्वारा परमेश्वराचे सेवन करावे.॥४८॥)
भोयी पाय सिद्ध आहेती । भोयाळेंवीण वृथा भ्रमती । तेवीं गुरूवीण जें जें करिती । तें तें अहंमती दृढ भ्रमले ॥८॥
गुरु ब्रह्म दोनी एक । ऐशिया भावना आवश्यक । सेवा करूनि भावपूर्वक । संतोषवूनि देख अनुग्रहो घ्यावा ॥९॥
तेथ निजाधिकारप्राप्तें । जे मूर्ति आवडेल आपणियातें । तेचि मंत्रविद्या तेथें । श्रद्धासंभरितें अंगीकारावी ॥८१०॥
तेव्हां गुरुमुखें मिश्र वोजा । पुरुषोत्तममहापूजा । शिकोनियां निजकाजा । भजावें अधोक्षजा शिक्षिता मतीं ॥११॥
तेचि भजती हातवटी । आगमोक्त निजपुष्टी । राया सांगेन गोमटी । सावधानदृष्टी अवधारीं ॥१२॥
(प्राणायामादी साधनांनी शरीर शुद्ध करून प्रसन्न अंत:करणाने परमात्म्याच्या समोर बसावे. शास्त्रोक्त न्यास करून अवयवांना स्थैर्य आणावे व हरिची पूजा करावी.)
केशवादि नामी जाण । अंगप्रत्यंगी न्यासितां पूर्ण । तेव्हां हरिरूप होय आपण । हे नेणोनि अज्ञान आगमीं भरती ॥१४॥
करूनि आगमोक्त संध्यास्नान । मूर्तीपासीं येऊन जाण । संमुख घालावें आसन । चैलाजिनकुशयुक्त ॥१५॥
रेचक-पूरक-कुंभकें जाण । प्राणायामें प्राणसंयमन । भूतशुद्ध्यादिकी जाण । शरीरशोधन करावें ॥१६॥
भूतविलय भूतशुद्धी । प्राणप्रतिष्ठा पिंडादिशुद्धी । मूळमंत्रे न्यास प्रबुद्धीं । गुरुदीक्षाविधी विध्युक्त कीजे ॥१७॥
हृदय कवच शिखा शिर । नेत्र अस्त्रादि फट्कार । एवंविधान अनुकार । आगमोक्तप्रकार करावे न्यास ॥१८॥
यापरी मूळमंत्रदीक्षा । करोनि दिग्बंधादि संरक्षा । मग मूर्तिपूजनपक्षा । नृपाध्यक्षा अवधारीं ॥१९॥
द्रव्यशुद्धि मुख्यशोधन । भूमिशुद्धि संमार्जन । आत्मशुद्धि सावधान । काढिल्या अनुलेपन मूर्तिशुद्धी ॥२१॥
पूजासंभार सिद्ध करून । समस्त शंखतोयें प्रोक्षून । निजासनीं सावधान । एकाग्र जाण बैसावें ॥२२॥
ज्यासी ध्यानी मूर्ति न ये संपूर्ण । तेणें प्रतिमामूर्ति अधिष्ठान । तेथेंचि करावें पूजन । लब्धोपचारें जाण आगमोक्त ॥२३॥
ज्यासी ध्याना मूर्ति ये अतिसंकटीं । तेणें बाह्योपचार आटाटी । सांडूनियां ध्यानदृष्टीं । करावी गोमटी मानसपूजा ॥२४॥
ज्याचे हृदयींचें न विकरे ध्यान । बाह्यमूर्तिपूजेसी सावधान । तेणें उभयतां पूजन । करावें संपूर्ण आगमोक्त ॥२५॥
(पूजाद्रव्ये, भूमी, आपण स्वतः आणि मूर्ती यांना प्रोक्षणाने शुद्ध करावे, आसनही शुद्ध करावे, मिळतील त्या (शुद्ध) उपचारांनी तसेच स्थिर अंत:करणाने पाद्यादिकांची अर्घ्यपात्रे जवळ ठेवावीत, आणि हृदयादिकांचा न्यास करून वैदिक मंत्राने मूर्तीचे ठिकाणी व हृदयाचे ठिकाणी ईशभावनेने पूजा करावी.॥५०-५१॥)
जैंसेचि न्यास आपणास । तैसेचि करावे मूर्तीस । हा आगमोक्त गुरुसौरस । मूळमंत्रे न्यास मूर्तीसी ॥२७॥
आगमोक्त करितां न्यास । अंगप्रत्यंगी विन्यास । तेणें कर्ता होय हृषीकेश । हा अर्थसौरस दृढ करावा ॥२८॥
दृढ करोनि अनुसंधान । मूळमंत्रे मूर्तिपूजन । हृदयीं आणि प्रतिमेसी जाण । पूजाविधान दोंही ठायीं ॥२९॥
मूर्ति चतुर्भुज वेल्हाळ । शंख चक्र गदा कमळ । सुनंदादि पार्षदमेळ । चिंतावे सकळ आयुधादिक ॥३१॥
यथोक्त मधुपर्कविधान । अर्घ्यपाद्यादि आचमन । पुरुषसूक्त मंत्रे जाण । करावें स्नान निर्मळ जळें ॥३२॥
मुकुट कुंडलें कटी मेखला । कांसे मिरवे सोनसळा । आपाद रुळे वनमाळा । कौस्तुभ तेजाळा कंठी झळके ॥३३॥
पाद पद्मांकित सुकुमार । ऊर्ध्वरेखा ध्वज वज्र । वांकी अंदुवांचा गजर । चरणीं तोडर गर्जतु ॥३४॥
(मूर्तीचे हृदयादिक अवयव व शंखचक्रादी उपांगे आणि गरुडादी पार्षद यांच्यासह पाद्य, अर्घ्य, आचमनीय, यांनी व अभिषेक, वस्त्रे, अलंकार, गंध, फुले, अक्षता, माळा, धूप, दीप, नैवेद्य इत्यादी उपचारांनी मूर्तीची यथासांग पूजा करून आणि स्तोत्रपाठांनी स्तुती करून श्रीहरीला साष्टांग नमस्कार घालावा.॥५२-५३॥)
सुमनें गुंफिली वीरगुंठी । त्यांवरी मधुकरांची घरटी । तुळसीकमळमाळा कंठीं । चंदनाची उटी श्यामांगी शोभे ॥३६॥
धूप दीप उपहार । तांबूल अर्पावा सकर्पूर । निरंजनें जयजयकार । मंत्रावसर अर्पावा ॥३७॥
स्तुति करावी वेदोक्त मंत्रे । कां पुराणोक्त नाना स्तोत्रें । अथवा प्राकृत नामोच्चारें । नाना प्रकारें गद्यपद्यें ॥३८॥
स्तवनें संतोष अधोक्षजा । ऐसें भावावें महाराजा । मग साष्टांगें अतिवोजा । गरुडध्वजा नमस्कारावें ॥३९॥
(आपले स्वरूप व भगवत्स्वरूप यांमध्ये अभेदबुद्धीने ध्यान करून श्रीहरीच्या मूर्तीची पूजा करावी, निर्माल्य मस्तकी धारण करावे आणि पूजित मूर्तीला हृदयामध्ये साठवून पूजा समाप्त करावी.॥५४॥)
मूर्तिध्याने तन्मय स्थिति । ऐक्यत्वें राहे निश्चळ वृत्ति । याचि नांव मुख्य भक्ति । उठलिया पुढती नमावें हरी ॥४१॥
ऐशी पूजा करूनि हरी । शेष प्रसादु धरोनि शिरीं । मग देवो आपणियाभीतरीं । हृदयमंदिरी निजविजे ॥४२॥
एवं पूजेचे उद्वासन । ध्यानमूर्ति हृदयीं शयन । प्रतिमा पर्यंकी निजवून । विधिविधानसमाप्ति ॥४३॥
जाहलिया पूजाविसर्जन । विसर्जू नये अनुसंधान । अखंड हरीचे स्मरण । सर्वस्वे आपण सर्वदा कीजे ॥४४॥
या नांव गा आगमविधि । राया जाण त्रिशुद्धि । सदा पाळिती सद्बुद्धि । परमात्मसिद्धिप्रापक ॥४५॥
आगमोक्त विधिलक्षण । प्रतिमाचि मुख्य नव्हे जाण । ज्यासी जेथ श्रद्धा पूर्ण । तेथ हे विधान सुखें कीजे ॥४६॥
॥ पुंडलिकवरदा हरी विठ्ठल श्रीज्ञानदेव तुकाराम ॥
श्रीतुकाराम महाराजांची गाथा
अभंग क्र. ६४७ ते ६६४
उभे केलें विटेवरी । पेठ इनाम पंढरी ॥ध्रु॥
वाहाती मारग । अवघे मोहोरले जग ॥३॥
तुका म्हणे माप। खरे आणा माझे बाप ॥४॥
सुख वसे तुझे पायीं । मज ठेवीं तेचि ठायीं ॥ध्रु॥
माझी अल्प हे वासना । तूं तो उदाराचा राणा ॥३॥
तुका म्हणे भोगें । पीडा केली, धाव वेगें ॥४॥
प्रेमें झोंबे कंठीं । देह धरणिये लोटीं॥ध्रु॥
राहो लोकाचार । पडो अवघा विसर ॥३॥
तुका म्हणे ध्यावें । तुज, व्यभि-चारभावें ॥४॥
जाल तरी कोणी जा गा! । करा शिदोरी ते वेगा ॥ध्रु॥
जाती सादावीत । तेथें असों द्यावें चित्त ॥३॥
तुका म्हणे बोल । जाती बोलत ‘विठ्ठल’ ॥४॥
आतां जोडोनियां हात । उभा राहिलों निवांत ॥ध्रु॥
करावें तें काय । न कळे, अवलोकितों पाय ॥३॥
तुका म्हणे दान । दिले, पदरी घेईन ॥४॥
आम्हां विठ्ठल एक देव । येर अवघेचि वाव॥ध्रु॥
पुंडलिकाचे पाठीं । उभा हात ठेवूनि कटीं ॥३॥
तुका म्हणे चित्तीं । वाहूं रखुमाईचा पती ॥४॥
आतां करूं काय । न चले करितां उपाय । तुम्हां आम्हां सये । विघडाविघड केली ॥ध्रु॥
बोलतां दुश्चिती । मी वो पडियले भ्रांती । आठव हा चित्तीं । न ये, म्हणतां मी माझें ॥३॥
भलतेंचि चावळे । जना अवघिया वेगळे । नाठवती बाळें । आपपर सारिखें ॥४॥
नका बोलों सये । मज वचन न साहे । बैसाल त्या राहें । उग्या वाचा खुंटोनि ॥५॥
तुम्हां आम्हां भेटी । नाहीं, झाली जीवेंसाटी । तुका म्हणे दृष्टी । पाहा जवळी आहे तो ॥६॥
तया एकाविण दुजें । कांहीं नेणे पंढरीराजें ॥ध्रु॥
दास विठ्ठलाचा । अंकित अंकिला ठायींचा ॥३॥
तुका म्हणे आतां । नव्हे पालट सर्वथा ॥४॥
अवघी झाली आराणूक। मागे पुढे सकळिक । त्रिपुटीचे दु:ख । प्रारब्ध सारिलें॥ध्रु॥
गोदातटें निर्मळे । देव देवांची देउळे । संत महंत मेळे। दिवस जाय सुखाचा ॥३॥
तुका म्हणे पंढरीनाथा! । आणिक नाहीं मज चिंता । योगक्षेम माथां । भार तुझ्या घातला ॥४॥
ऐसें एक दुराचारी गा देवा । आपुलिया जीवा घात करी ॥ध्रु॥
नाक गेलें तरि लाज ना विचार । हिंडें फजितखोर दारोदारी ॥३॥
तुका म्हणे कर्म बळिवंत गाढें । नेदी तया पुढे मागे सरों ॥४॥
अवघाचि संसार केला ब्रह्मरूप । विठ्ठलस्वरूप म्हणोनियां ॥ध्रु॥
पुराणी उपदेश साधन उद्भट । आम्हां सोपी वाट वैकुंठींची ॥३॥
तुका म्हणे जनां सकळांसहित । घेऊ अखंडित प्रेमसुख ॥४॥
भारें भवनदी नुतरवे पार । दुरावती दूर तुमचे पाय ॥ध्रु॥
तुका म्हणे गर्व पुरवील पाठी । होईल माझ्या तुटी विठोबाची ॥३॥
नवविधा काय बोलिली जे भक्ती। द्यावी माझ्या हातीं संतजनीं ॥ध्रु॥
तुका म्हणे तुमच्या पायांच्या आधारें । उतरेन खरें भवनदी ॥३॥
नाहीं नफा नागवे आपण । गमाविले कान हात पाय ॥ध्रु॥
बुद्धिहीन नये कांहींचि कारणा । तयासवें जाणा तेंचि सुख ॥३॥
तुका म्हणे नाहीं ठाउकें वर्म । तयासी तें कर्म वोढवलें ॥४॥
अवगुणी जरि झालें ते वोंगळ । करावा सांभाळ लागे त्याचा ॥२॥
तुका म्हणे तैसा मी एक पतित । परि मुद्रांकित झालो तुझा ॥३॥
सहज गुण जयाचिये देहीं । पालट तो काही नव्हे तया ॥ध्रु॥
माकडाचे गळां मोलाचा मणी । घातला चावूनि थुंकोनि टाकी ॥३॥
तुका म्हणे खळा नावडे हित । अविद्या वाढवीत आपुले मतें ॥४॥
शिकविलें कांहीं न चलती तया । बोलियेले वायां बोल जाती ॥ध्रु॥
क्षीर ओकूनियां खाय अमंगळ । आपुली तें ढाळ जाऊं नेदी ॥३॥
वंदूं निंदूं काय अभक्त दुराचार । खळाचा विचार तुका म्हणे ॥४॥
म्हणऊनि पंढरीनाथा वाटतसे चिंता । प्रगट बोलतां लाज वाटे ॥ध्रु॥
संतां ब्रह्मरूप झाले अवघे जन । ते माझे अवगुण न देखती ॥३॥
तुका म्हणे मी तों आपणासी ठावा । आहे बरा देवा जैसा तैसा ॥४॥
॥ पुंडलिकवरदा हरी विठ्ठल श्रीज्ञानदेव तुकाराम ॥
संपूर्ण वारकरी प्रस्थानत्रयी नित्यनेम पारायण अनुक्रमणिका
ज्यांना प्रत्यक्षात ग्रंथावरून पारायण करायचे आहे त्यांनी खालील लिंकवरून ग्रंथ मागवावे.








रामकृष्णहरी माऊली 🙏
रामकृष्णहरी माऊली 🙏
रामकृष्णहरी माऊली 🙏