दिवस – ४२. वारकरी प्रस्थानत्रयी नित्यनेम पारायण

अनुक्रमणिका

गतसङ्गस्य मुक्तस्य ज्ञानावस्थितचेतसः । यज्ञायाचरतः कर्म समग्रं प्रविलीयते ॥२३॥
तो देहसंगें तरी असे । परी चैतन्यासारिखा दिसे । पाहतां परब्रह्माचेनि कसें । चोखाळु भला ॥११५॥
ऐसाही परी कौतुकें । जरी कर्म करी यज्ञादिकें । तरी तियें लया जाती निःशेषें । तयाच्याचि ठायीं ॥११६॥
अकाळींचीं अभ्रें जैशीं । ऊर्मीविण आकाशीं । हारपती; आपैशीं । उदयलीं सांती ॥११७॥
तैशीं विधि-विधानें विहितें । जरी आचरे तो समस्तें । तरी तियें ऐक्यभावें ऐक्यातें । पावतीचि गा ॥११८॥
ब्रह्मार्पणं ब्रह्म हविर्ब्रह्माग्नौ ब्रह्मणा हुतम् । ब्रह्मैव तेन गन्तव्यं ब्रह्मकर्मसमाधिना ॥२४॥
हें हवन, मी होता । कां, इयें यज्ञां हा भोक्ता । ऐसिया बुद्धिसि नाहीं भिन्नता । म्हणौनियां ॥११९॥
जे इष्टयज्ञ यजावे । तें हविमंत्रादि आघवें । तो देखतसे अविनाशभावें । आत्मबुद्धि ॥१२०॥
म्हणौनि, ब्रह्म तेंचि कर्म । ऐसें बोधा आलें जया सम । तया “कर्तव्य तें नैष्कर्म्य’ । धनुर्धरा ॥१२१॥
आतां अविवेक कुमारत्वा मुकले । जयां विरक्तीचें पाणिग्रहण जाहलें । मग उपासन जिहीं आणिलें । योगाग्नीचें ॥१२२॥
दैवमेवापरे यज्ञं योगिनः पर्युपासते । ब्रह्माग्नावपरे यज्ञं यज्ञेनैवोपजुह्वति ॥२५॥
जे यजनशील अहर्निशीं । जिहीं अविद्या हविली मनेंसीं । गुरुवाक्य हुताशीं । हवन केलें ॥१२३॥
तिहीं योगाग्निकीं यजिजे । तो दैवयज्ञु म्हणिजे । जेणें आत्मसुख कामिजे । पांडुकुमरा ॥१२४॥
दैवास्तव देहाचें पाळण । जो चिंतीना देहभरण । तो महायोगी जाण । दैवयोगें ॥१२५॥
आतां अवधारीं, सांगेन आणिक । जे ब्रह्माग्नी साग्निक । तयातें यज्ञेंचि यज्ञु देख । उपासिती ॥१२६॥
श्रोत्रादीनीन्द्रियाण्यन्ये संयमाग्निषु जुह्वति । शब्दादीन्विषयानन्य इन्द्रियाग्निषु जुह्वति ॥२६॥
एक संयमाग्निहोत्री । ते युक्तित्रयाच्या मंत्रीं । यजन करिती पवित्रीं । इंद्रियद्रव्यीं ॥१२७॥
एकां वैराग्य-रवि निवळे । तंव संयती विहार केले । तेथ अपावृत जाहले । इंद्रियानळ ॥१२८॥
तिहीं विरक्तीची ज्वाळा घेतली । तंव विकारांची इंधनें पळिपलीं । तेथ आशाधूमें सांडिलीं । पांचही कुंडें ॥१२९॥
मग वाक्यविधीचिया निरवडी । विषय आहुती उदंडीं । हवन केलें कुंडीं । इंद्रियाग्नीच्या ॥१३०॥
सर्वाणीन्द्रियकर्माणि प्राणकर्माणि चापरे । आत्मसंयमयोगाग्नौ जुह्वति ज्ञानदीपिते ॥२७॥
एकीं ययापरी पार्था । दोषु झाळिला सर्वथा । आणिकीं हृदयारणीं मंथा । विवेकु केला ॥१३१॥
तो उपशमें निहटिला । धैर्यभारें दाटिला । गुरुवाक्यें काढिला । बळकटपणें ॥१३२॥
ऐसें समरसें मंथन केलें । तेथ झडकरी काजा आलें । जें, उज्जजीवन जाहलें । ज्ञानाग्नीचें ॥१३३॥
पहिला ऋद्धिसिद्धीचा संभ्रमु । तो निवतौनि गेला धूमु । मग प्रगटला सूक्ष्म । विस्फुलिंगु ॥१३४॥
तया मनाचें मोकळें । तेंचि पेटवण घातलें । जें यम-नियमीं हळुवारलें । आयतें होतें ॥१३५॥
तेणें सादुकपणें ज्वाळा समृद्धा । मग वासनांतरांचिया समिधा । स्नेहेंसीं नानाविधा । जाळिलिया ॥१३६॥
तेथ सोऽहंमंत्रें दीक्षितीं । इंद्रियकर्मांच्या आहुती । तियें ज्ञानानळीं प्रदीप्तीं । दिधलिया ॥१३७॥
पाठीं प्राणक्रियेचिये स्रुवेनिशीं । पूर्णाहुती पडली हुताशीं । तेथ अवभृथ समरसीं । सहजें जाहलें ॥१३८॥
मग आत्मबोधीचें सुख । जें संयमाग्नीचें हुतशेष । तोचि पुरोडाशु देख । घेतला तिहीं ॥१३९॥
एक ऐशिया इहीं यजनीं । मुक्त ते जाहले त्रिभुवनीं । या यज्ञक्रिया तरी आनानी । परि प्राप्य तें एक ॥१४०॥

पूजास्थाने (८४७ ते ८६५)

एवमग्न्यर्कतोयादावतिथौ हृदये च यः । यजतीश्वरमात्मानमचिरान्मुच्यते हि सः॥५५॥
इति श्रीमद्भागवते महापुराणे एकादशस्कन्धे तृतीयोऽध्यायः॥
(याप्रमाणे अग्नी, सूर्य, नदी, अतिथी आणि हृदय या ठिकाणी जो परमात्म्याचे पूजन करतो तो लवकरच (भवबंधातून) मुक्त होतो.॥५५॥)
हे पूजा नव्हे एकदेशी । बहुत स्थानें ये पूजेसी । त्यांत शीघ्रतर जें प्राप्तीसी । तें मी तुजपासी सांगेन राया ॥४७॥
येणेंचि विधानें यथाकाळीं । साङ्ग पूजा कीजे ‘जळी’ । अथवा ‘सूर्यमंडळीं । पूजा सोज्ज्वळी हरिध्याने कीजे ॥४८॥
‘अग्नीच्या’ ठायीं होय दीप्ति । पूजा कीजे कमळापति । अवघ्यापरीस शीघ्रप्राप्ति । पूजावा ‘अतिथि’ भगवद्भावें ॥४९॥
आलिया वैश्वदेवाचे अंतीं । तो भलता हो भलते याती । त्यासी जे भगवद्भावें पूजिती । त्यांचे घरा पूर्ण प्राप्ति वोरसोनि ये ॥८५०॥
पूर्वी अनोळखु निश्चितीं । आलिया वैश्वदेवाचे अंतीं । त्यातें ब्रह्मभावें जे पूजिती । त्यांसी भुक्तिमुक्ती आंदणी ॥५१॥
त्या वैश्वदेवाचे अंती जाण । निजभाग्ये आलिया शुद्ध ब्राह्मण । तया श्रद्धेनें पूजितां आपण । ते घरी नारायण स्वानंदें वसे ॥५२॥
राया वैश्वदेवाचे अंतीं । अतिथीसवें ये भुक्तिमुक्ति । विमुख जाहल्या त्या लाभा नाडती । पूजकां सुखप्राप्ति परमानंदें ॥५३॥
अतिथीच्या ठायीं मूर्तिध्यान । सर्वथा करणे न लगे जाण । तो स्वरूपें स्वयें नारायण । पूजितां संपूर्ण सर्वार्थसिद्धि ॥५४॥
एवं अतिथीसी जें अर्पे । तें भगवंतमुखीं समर्पे । यालागीं अतिसाक्षेपें । अतिथि ब्रह्मरूपें पूजिजे सदा ॥५५॥
जें जें बोलिलें पूजास्थान । तेथें निजश्रद्धाचि प्रमाण । श्रद्धेवेगळे राया जाण । प्राप्ति संपूर्ण कदा न लभे ॥५६॥
निजश्रद्धेचें ‘हृदय’ स्थान । ते हृदयीं विध्युक्त पूजन । करितां श्रद्धेने आपण । प्राप्ति संपूर्ण उद्‌बोधे स्वयें ॥५७॥
येऱ्हवीं तरी आपुल्या देहीं । चाळक ईश्वरु आहे हृदयीं । श्रद्धेनें भजतां त्याचे ठायीं । निजप्राप्ति पाहीं सहजें लाभे ॥५८॥
जे जे आपण सेविजे । तें तें भगवन्मुखीं भाविजे । येणे निजभजनें पाविजे । जाण सहजें परमात्मा ॥५९॥
सांडोनि देहींची अहंता । सकळ भोग ईश्वर भोक्ता । ऐसी दृढ भावना भावितां । पाविजे परमार्था अपरोक्षसिद्धी ॥८६०॥
देह जड मूढ अचेतन । सकळ भोगभोक्ता ईश्वर पूर्ण । तेथ वाढवूनि देहाभिमान । भोगिती अज्ञान अनेक दुःखें ॥६१॥
ते सांडूनि देहअहंता । हृदयस्था शरण जातां । पाविजे पूर्ण परमार्था । जाण तत्त्वतां नृपवर्या ॥६२॥
निःशेष सांडिजे मीपण । याचि नांव हृदयस्था शरण । तूं सहजें परब्रह्म परिपूर्ण । मिथ्या देहाभिमान धरूं नको ॥६३॥
राया येणेंचि कर्मे जाण । तुटे कर्माचें कर्मबंधन । पाविजे पूर्ण समाधान । तें हे मुख्य लक्षण नृपनाथा ॥६४॥
आगमोक्त निजभजन । कर्मयोगाचे मुख्य लक्षण । ऐकतां राजा समाधान । परमानंदें पूर्ण निवाला ॥६५॥

चौथ्या अध्यायाचा प्रस्ताव (८६६ ते ८७३)

जंव जंव रायाचे पुरे कोड । तंव तंव कथा लागे गोड । अतिशयें श्रवणाची चाड । विशेषे वाड थोरावली ॥६६॥
राजा निवालेनि परमानंदें । सुखावलेनि निजबोधे । लांचावलेनि स्वानंदें । पुढां प्रश्न विनोदें पुसेल ॥६७॥
उगें राहतां आपण । उठून जाती मुनिगण । यालागी प्रश्नावरी प्रश्न । विचित्रविंदान पुसतु ॥६८॥
स्वानंदें लोधली चित्तवृत्ती । इंद्रिये वेधली सुखस्थिती । राजा निवाला निश्चितीं । तरी प्रश्नोक्ती पुसत ॥६९॥
पुसेल हरीचे अवतार । ते कथा सुंदर मनोहर । निरूपण अतिअरुवार । निजजिव्हार निववील ॥८७०॥
त्या प्रश्नाचे प्रत्युत्तर । कथाकौतुक सनागर । एका जनार्दनाचा किंकर । उपानहधर संतांचा ॥७१॥
संत सज्जन कृपास्थिती । श्रीजनार्दन वरदमूर्ती । पुढील कथेची व्युत्पत्ती । सांगेन यथार्थी अर्थुनी ॥७२॥
श्रीभागवताचे राशीवरी । एकाजनार्दन केला मापारी । तो निजबोधाचे कुडुवावारीं । भरील वखारी श्रवणाच्या ॥८७३॥
इति श्रीमद्भागवते महापुराणे एकादशस्कंधे निमिजायन्तसंवादे मायाकर्मब्रह्मनिरूपणं नाम परमहंससंहितायां एकाकारटीकायां तृतीयोऽध्यायः ॥३
श्रीकृष्णार्पणमस्तु ॥
तिसरा अध्याय समाप्त (श्लोक ५५; ओव्या ८७३)

६६५.काम क्रोध माझे जीताती शरीरीं । कोवळे तें वरी बोलतसें ॥१॥
कैसा सरता झालों तुझ्या पायीं । पांडुरंगा कांहीं न कळे हें ॥ध्रु॥
पुराणींची ग्वाही वदतील संत । तैसें नाहीं चित्त शुद्ध झालें ॥३॥
तुका म्हणे मज आणूनि अनुभवा । दाखवीं हे देवा साच खरें ॥४॥
६६६.स्तुति करिजेसा नाहीं अधिकार । न कळे विचार योग्यतेचा ॥१॥
तुमचे मी दास संतांचे दुर्बळ । करूनि सांभाळ राखा पायीं ॥ध्रु॥
राम कृष्ण हरि मंत्र उच्चारणा । आवडी चरणां विठोबाच्या ॥३॥
तुका म्हणे तुमचें सेवितों उच्छिष्ट । क्षमा करा, धीट होऊनिया ॥४॥
६६७.बहु दूरवरी । वेठी ओझें होतें शिरीं ॥१॥
आतां उतरला भार । तुम्हीं केला अंगीकार ॥ध्रु॥
बहु काकुलती । आलों असें मागे किती ॥३॥
तुका म्हणे देवा! । आजि सफल झाली सेवा ॥४॥
६६८.बुद्धीचा पालट धरा रे कांहीं । मागुता हा नाहीं मनुष्यदेह ॥१॥
आपुल्या हिताचे न होती सायास । गृह दारा आस धनवित्त ॥ध्रु॥
अवचित निधान लागले हे हातीं । भोगावी विपत्ति गर्भवास ॥३॥
यावें जावें पुढें ऐसेचि कारण । भोगावे पतन नरकवास ॥४॥
तुका म्हणे धरी आठव या देहीं । नाहीं तरि कांही बरे नव्हे ॥५॥
६६९.आम्हीं पतितांनी घालावें सांकडें । तुम्हां लागे कोडे उगवणे ॥१॥
आचरतां दोष न धरूं सांभाळ । निवाड उकल तुम्हां हाती ॥ध्रु॥
न घेतां कवडी करावा कुढावा। पाचारितां देवा नामासाठी ॥३॥
‘दयासिंधु’ नाम ‘पतितपावन’ । हे आम्हां वचन सांपडले ॥४॥
तुका म्हणे करूं अन्यायाच्या कोटी । कृपावंत पोटीं तुम्ही देवा! ॥५॥
६७०.जो भक्तांचा विसांवा । उभा पाचारितो धांवा ॥१॥
हाती प्रेमाचे भातुकें। मुखीं घाली कवतुकें । भवसिंधु सुखें। उतरी कासे लावूनि ॥ध्रु॥
थोर भक्ताची आस । पाहे भोवताली वास॥३॥
तुका म्हणे कृपादानी। फेडी आवडीची धणी ॥४॥
६७१.अखंड जया तुझी प्रीति । मज दे तयाची संगति । मग मी कमळापती । तुज बा! नाणीं कांटाळा ॥१॥
पडोन राहेन तये ठायीं । उगाचि संतांचिये पायीं । न मगें न करीं कांहीं । तुझी आण गा विठोबा ॥ध्रु॥
तुम्ही आम्ही पीडों जेणें । दोन्ही वारती एकानें । बैसलों धरणे । हाका देत दाराशीं ॥३॥
तुका म्हणे या बोला । चित्त द्यावें बा विठ्ठला! । न पाहिजे केला । अवघा माझा अव्हेर॥४॥
६७२.पुनित केलें विष्णुदासीं। संगें आपुलिया दोषी ॥१॥
कोण पाहे तयांकडे? । वीर विठ्ठलाचे गाढे । अशुभ त्यापुढें । शुभ होऊनियां ठाके ॥ध्रु॥
प्रेमसुखा-चिया राशी । पाप नाहीं ओखदासी ॥३॥
तुका म्हणे त्यांनीं । केली वैकुंठ मेदिनी ॥४॥
६७३.‘जन देव’ तरि पायाचि पडावें । त्याचिया स्वभावें चाड नाहीं ॥१॥
अग्नीचे सौजन्य शीत निवारण । पालवीं बांधोन नेतां नये ॥२॥
तुका म्हणे विंचू सर्प नारायण । वंदावे दुरोन शिवों नये ॥३॥
६७४.भूत भविष्य कळों यावें वर्तमान । हे तो भाग्य-हीन त्याची जोडी ॥१॥
आम्हीं विष्णुदासीं देव ध्यावा चित्तें । होणार तें होतें प्रारब्धेचि ॥ध्रु॥
जगरुढीसाठी घातला दुकान । जातो नारायण अंतरोनि ॥३॥
तुका म्हणे हा हो प्रपंच गाढा। थोरली ते पीडा रिद्धि सिद्धि ॥४॥
६७५.सर्प भुलोन गुंतला नादा । गारुडिये फांदा घातलासे । हिंडवूनि पोट भरी दारोदारी । कोंडूनि पेटारी असे रया ॥१॥
तैसी परी मज झाली पांडुरंगा! । गुंतलों तो मी गा सोडवीं आतां । माझें मज कांहीं न चलेसें झालें । कृपा हे तुज न करितां ॥ध्रु॥
आविसे मीन लावियला गळीं । भक्ष तो गिळी म्हणूनियां । काढूनि बाहेरी प्राण घेऊ पाहे । तेथें बाप माये कवण रया! ॥३॥
पक्षी पिलयां पातलें आशा। देखोनियां फासां गुंते बळें । मरण सायासें नेणें धांवोनि वोरसे । जीवित्त्वा नास झाली बाळे ॥४॥
गोडपणे मासी लिगाडी गुंतली । सांपडे फडफडी अधिकाधिक । तुका म्हणे प्राण घेतला आशा । पंढरीनिवासा धांव घालीं ॥५॥
६७६.यातिहीन मज काय तो अभिमान । मानी तुज जन नारायणा! ॥१॥
काय सुख मज तयाची हे खंती । आपुलाला घेती गुणभाव ॥ध्रु॥
द्रव्यामुळे माथां वाहियेली चिंधी । होन जयामधीं होता गांठी ॥३॥
तुका म्हणे जन वंदितो वेगळा । मजसी दुर्बळा काय चाड? ॥४॥
६७७.शीतळ साउली आमुची माउली । विठाई वोळली प्रेमपान्हा ॥१॥
जाऊनि वोसंगा रिघेन वोरसें । लागेल तें इच्छे पीईन वरी ॥ध्रु॥
कृपा तनु माझी सांभाळी दुभोनि । अमृत संजीवनी लोटलीसे ॥३॥
आनंदाचा ठाव नाही माझे चित्तीं । सागर तो किती उपमेसी? ॥४॥
सैर जाय पडे तयेसी सांकडें । सांभाळीत पुढे मागे असे ॥५॥
तुका म्हणे चिंता कैसी ते मी नेणें । लडिवाळ तान्हें विठाईचें ॥६॥
६७८.सुटायाचा कांहीं करितों उपाय । तो हे देखें पाय गोवियेले ॥१॥
ऐसिया दु:खाचे सांपडलों संदी । हारपली बुद्धि बळ माझें ॥ध्रु॥
प्रारब्ध क्रियमाण संचिताचे । वोढत ठायींचे आले साचे ॥३॥
विधिनिषेधाचे सांपडलों चेपे। एक एका लोपे निवडेना ॥४॥
सारावें तें वाढे त्याचियाची अंगें । तृष्णेचिया संगें दु:खी झालों ॥५॥
तुका म्हणे आतां करी सोडवण । सर्व शक्तिहीन झालों देवा! ॥६॥
६७९.भय वाटे पर । न सुटे हा संसार ॥१॥
ऐसा पडिलों काचणीं । करीं धांवा म्हणऊनि ॥ध्रु॥
विचारितां कांहीं । तो हे मन हातीं नाहीं ॥३॥
तुका म्हणे देवा! । येथें न पुरे रिघावा ॥४॥
६८०.ये गा ये गा पांडुरंगा! । घेई उचलूनि वोसंगा ॥१॥
ऐसी असोनिया वेसी । दिसतों मी परदेसी ॥ध्रु॥
उगवूनि गोवा । सोडवूनि न्यावें देवा! ॥३॥
तुज आड कांहीं । बळ करी ऐसें नाहीं ॥४॥
तुका म्हणे हृषीकेशी! । काय उशीर लाविलासी? ॥५॥

संपूर्ण वारकरी प्रस्थानत्रयी नित्यनेम पारायण अनुक्रमणिका


ग्रंथ

1 thought on “दिवस – ४२. वारकरी प्रस्थानत्रयी नित्यनेम पारायण”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top