दिवस – ४३. वारकरी प्रस्थानत्रयी नित्यनेम पारायण

अनुक्रमणिका

द्रव्ययज्ञास्तपोयज्ञा योगयज्ञास्तथापरे । स्वाध्यायज्ञानयज्ञाश्च यतयः संशितव्रताः ॥२८॥
एक द्रव्ययज्ञु म्हणिपती । एक तप-सामग्रीया निजविती । एक योगयागुही आहाती । जे सांगितलें ॥१४१॥
एकीं शब्दीं शब्दु यजिजे । तो वाग्यज्ञु म्हणिजे । ज्ञानें ज्ञेय गमिजे । तो ज्ञानयज्ञु ॥१४२॥
हें, अर्जुना, सकळ कुवाडें । जे अनुष्ठितां अतिसांकडें । परी जितेंद्रियासिचि घडे । योग्यतावशें ॥१४३॥
ते प्रवीण तेथ भले । आणि योगसमृद्धि आथिले । म्हणौनि आपणपां तिहीं केलें । आत्महवन ॥१४४॥
अपाने जुह्वति प्राणं प्राणेऽपानं तथापरे । प्राणापानगती रुद्ध्वा प्राणायामपरायणाः ॥२९॥
मग अपानाग्निचेनि मुखीं । प्राणद्रव्यें देखीं । हवन केलें एकीं । अभ्यासयोगें ॥१४५॥
एक अपानु प्राणीं अर्पिती । एक दोन्हींतेही निरुंधिती । ते प्राणायामी म्हणिपती । पांडुकुमरा ॥१४६॥
अपरे नियताहाराः प्राणान्प्राणेषु जुह्वति । सर्वेऽप्येते यज्ञविदो यज्ञक्षपितकल्मषाः ॥३०॥
एक वज्रयोगक्रमें । सर्वाहारासंयमें । प्राणीं प्राणु संभ्रमें । हवन करिती ॥१४७॥
ऐसें मोक्षकाम सकळ । समस्त हे यजनशीळ । जिहीं यज्ञद्वारां मनोमळ । क्षाळण केले ॥१४८॥
जया अविद्याजात जाळितां । जें उरलें निजस्वभावतां । जेथ अग्नि आणि होता । उरेचिना ॥१४९॥
जेथ यजितयाचा कामु पुरे । यज्ञाचें विधान सरे । मागुतें जेथूनि वोसरे । क्रियाजात ॥१५०॥
विचार जेथ न रिगे । हेतु जयाते नेघे । जें द्वैत-दोषसंगें । सिंपेचिना ॥१५१॥
यज्ञशिष्टामृतभुजो यान्ति ब्रह्म सनातनम् । नायं लोकोऽस्त्ययज्ञस्य कुतोऽन्यः कुरुसत्तम ॥३१॥
ऐसें अनादिसिद्ध चोखट । जें ज्ञान यज्ञावशिष्ट । तें सेविती ब्रह्मनिष्ठ । ब्रह्माहंमंत्रें ॥१५२॥
ऐसें शेषामृतें धाले । कीं अमर्त्यभावा आले । म्हणौनि ब्रह्म ते जाहाले । अनायासें ॥१५३॥
येरां विरक्ति माळ न घालीचि । जयां संयमाग्नीची सेवा न घडेचि । जे योगयागु न करितीचि । जन्मलेसांते ॥१५४॥
ज्यांचें ऐहिक धड नाहीं । तयांचें परत्र पुससी काई? । म्हणौनि असो हे गोठी; पाहीं । पांडुकुमरा ॥१५५॥
एवं बहुविधा यज्ञा वितता ब्रह्मणो मुखे । कर्मजान्विद्धि तान्सर्वानेवं ज्ञात्वा विमोक्ष्यसे ॥३२॥
ऐसें बहुतीं परी अनेग । जे सांगितले तुज कां याग । ते विस्तारूनि वेदेंचि “चांग’ । म्हणितले आहाती ॥१५६॥
परी तेणें विस्तारें काय करावें । हेंचि कर्मसिद्ध जाणावें । येतुलेनि, कर्मबंधु स्वभावें । पावेल ना ॥१५७॥
श्रेयान्द्रव्यमयाद्यज्ञाज्ज्ञानयज्ञः परन्तप । सर्वं कर्माखिलं पार्थ ज्ञाने परिसमाप्यते ॥३३॥
अर्जुना, वेदु जयांचें मूळ । जे क्रियाविशेषें स्थूळ । जया नव्हाळियेचें फळ । “स्वर्गसुख’ ॥१५८॥
ते द्रव्यादियागु कीर होती । परी ज्ञानयज्ञाची सरी न पवती । जैसी तारातेज-संपत्ती । दिनकरापाशीं ॥१५९॥
देखें, परमात्मसुखनिधान । साधावया, योगीजन । जें न विसंबिती अंजन । उन्मेषनेत्रीं ॥१६०॥
जें धांवतया कर्माची लाणी । जे नैष्कर्म्यबोधाची खाणी । जें भुकेलिया धणी । साधनाची ॥१६१॥
जेथ प्रवृत्ति पांगुळ जाहली । तर्काची दिठी गेली । जेणें इंद्रियें विसरलीं । विषयसंगु ॥१६२॥
मनाचें मनपण गेलें । जेथ बोलाचें बोलकेंपण ठेलें । जयामाजि सांपडलें । ज्ञेय दिसे ॥१६३॥
जेथ वैराग्याचा पांगु फिटे । विवेकाचाही सोसु तुटे । जेथ न पाहतां सहज भेटे । आपणपें ॥१६४॥

॥ श्री: ॥
॥ ॐ तत्सत्-श्रीकृष्ण प्रसन्न ॥
श्रीएकनाथी भागवत – अध्याय चौथा
श्रीगणेशाय नमः ॥ श्रीकृष्णाय नमः॥

ब्रह्मस्वरूप-जनार्दन-नमन (१ ते १९)

ॐ नमो श्रीगुरु शिवशिवा । नमने जीवत्व जीवा । नुरविसी, तेथे देहभावा । कैसेनि रिघावा होईल ॥१॥
जीवें घेऊनि जीवा । देहत्व मोडूनि देहभावा । याहीवरी करविसी सेवा । हे लाघव देवा नवल तुझें ॥२॥
जीव घेऊनि शंखासुरा । त्याच्या वागविसी कलेवरा । तो तूं रिघोनि मजभीतरा । माझिया शरीरा वागविसी ॥३॥
शंख मधुर ध्वनी गाजे । तो वाजवित्याचेनि वाजे । तेवीं म्यां जें जें बोलिजे । तें तें बोलणे साजे तुझेनि ॥४॥
आतां माझें ‘शरीर’ जें चळे । तें तुझेनि आंगिकें मेळें । ‘कर्मे निपजती सकळे । सत्ताबळे तुझेनि ॥५॥
माझे देहींचें जें ‘मीपण’ । तें तूंचि झालासी आपण । तुझेनि प्राणे ‘प्राण’। माझाही जाण चळे देवा ॥६॥
‘दृष्टी’ जें जें कांहीं देखे । तें तें तुझेनि ज्ञानउन्मेखें । ‘श्रवणीं’ जें कांहीं ऐकें । तें तें नेटकें अवधान तुझें ॥७॥
‘रसना’ जें जें कांहीं चाखे । तें तें तुझेनि स्वादमुखें । ‘बुद्धि’ जाणपणे तोखे । तेंही अतिनिकें वेदकत्व तुझें ॥८॥
‘मन’ मनपणे अतिचपळ । तेंही तुझेंचि आंगिक बळ । विवेका ‘विवेकु’ प्रबळ । अतिसोज्ज्वळ तुझेनि ॥९॥
‘वाचा’ जें जें कांहीं वदे । तें वाचिकत्व तुझेनि शब्दें । ‘बोधु’ जेणे उद्‌बोधे । तो तुझेनि प्रबोधे प्रबोधु ॥१०॥
‘जागृती’ जागे तुझेनि हरिखें । ‘स्वप्न’ स्वप्ना तुझेनि देखे । ‘सुषुप्ती’ सुखावे जेणें सुखें । पूर्ण संतोखें तुझेनि ॥११॥
मी जें जें ‘विषय’ भोगीं । तें भोक्तेपण तुझे अंगीं । तुझेनि निजसंयोगीं । मीपणे जगी वर्तविशी मज ॥१२॥
माझें करूनि खांबसूत्र । तूं झालासी सूत्रधार । हालवूनियां निजसूत्र । कर्मे विचित्र करविशी ॥१३॥
ऐशिया श्रीजनार्दना । जग चेतवित्या चिद्‌घना । कृपाळुवा जगजीवना । नमन श्रीचरणा तुझेनि तुज ॥१४॥
यापरी मजमाजीं तूं चाळिता । चाळकत्वें करविसी ग्रंथा । तेथे मी एक कवित्वकर्ता । हे जाणावी तत्त्वतां स्थूळबुद्धी ॥१५॥
एका एकु जनार्दनीं । की जनार्दनु एकपणीं । इये पृथक् नामांची लेणीं । लेऊनि एकपणी मिरविसी तूं ॥१६॥
जेवीं कनकाचे भूषण । की भूषणी कनक संपूर्ण । तेवीं एका आणि जनार्दन । एकत्वें जाण जनार्दनचि ॥१७॥
ऐशी ऐकोन विनवणी । सद्‌गुरु तुष्टला संतोषोनी । येथे भिन्न भिन्न सोसणी । न लगे निरूपणी करणे तुज ॥१८॥
जेव्हां कापुरा आगी झगटे । तेव्हांचि कापुरत्व खुंटे । सच्छिष्यासी सद्गुरु भेटे । तेव्हांचि फिटे भिन्नभेदु ॥१९॥

भागवतमहिमा (२०, २१)

जेणे फिटे भिन्नभेदु । तो श्रीभागवतीं निजबोधु । वसुदेवाप्रती नारदु । सांगत संवादु इतिहासाचा ॥२०॥
ज्या इतिहासाचा अर्थ । परिसतां प्रगटे परमार्थ । स्वानंदबोध हृदयांत । श्रवणें सदोदित श्रोते होती ॥२१॥

गुरुस्तवनात ब्रह्मानंद (२२ ते २४)

तंव श्रोते संतसमुदावो । म्हणती कैसा नवलावो । सद्गुरुस्तवनी ब्रह्मभावो । साधिला आवो अभेदत्वें ॥२२॥
हे सद्गुरूची विनवणी । की ब्रह्मसुखाची खाणी । परिसतां सप्रेम बोलणीं । रिझली आयणी सज्जनांची ॥२३॥
या देशभाषा वाणी । उघडिली परमार्थाची खाणी । बोल नव्हती हे स्पर्शमणी । लागतां श्रवणीं पालटे जीव ॥२४॥

अवतारनिरूपणाची विदेहाची विनंती (२५ ते ३४)

यापरी श्रीभागवतीं । अनुपम अगाध स्थिति । ते कथेची संगति । लावी सुनिश्चिती अर्थावबोधे ॥२५॥
ऐकोनि संतांचे वचन । शिरीं वंदोनि त्यांचे चरण । पुढील कथानिरूपण । श्रोतीं सावधान परिसावें ॥२६॥
येथे तृतीय अध्यायाचे अंतीं । निरूपितां तांत्रिक भक्ति । भजावें आवडेल ते मूर्ति । रायासी तदर्थी प्रश्न स्फुरला ॥२७॥
देवो एकचि त्रिजगतीं । त्याच्या किती अवतारमूर्ति । जन्म कर्म अनेक व्यक्ती । हेंचि मुनीप्रति पुसतु ॥२८॥
राजोवाच – यानि यानीह कर्माणि यैर्यैः स्वच्छन्दजन्मभिः । चक्रे करोति कर्ता वा हरिस्तानि ब्रुवन्तु नः॥१॥
(राजा म्हणाला – स्वेच्छेने भगवंताने निरनिराळे अवतार घेऊन जी जी कर्मे केली, करीत आहे व करील ती तीआम्हांला सांगावी. ॥१॥)
मुनीश्वरांचे अगाध ज्ञान । त्याहीवरी रसाळ निरूपण । तेणें रायाचें वेधलें मन । प्रश्नावरी प्रश्न यालागी पुसे ॥२९॥
तो म्हणे देवाधिदेवो हरि । स्वलीला कैसीं जन्में धरी । स्वेच्छा जी जी कर्में करी । ते अगाध थोरी मज सांगा ॥३०॥
म्हणती देवा नाही जन्म । तेथें कैंचें पुसशी कर्म । देवो अरूप अनाम । त्यासी जन्म कर्म असेना ॥३१॥
तो ‘अजन्मा’ परी जन्म धरी । ‘अकर्मा’ परी कर्मे करी । ‘विदेही’ तो देहधारी । होऊनि संसारी स्वधर्म पाळी ॥३२॥
त्याच्या अवतारांची स्थिति । कवण जन्म कवण व्यक्ति । किती अवतार किती मूर्ति । कृपेनें मजप्रती सांगा स्वामी ॥३३॥
जे कां अतीत अनागत । वर्तमान जे प्रस्तुत । ते अवतार समस्त । इत्थंभूत सांगावे ॥३४॥

अवतारनिरूपणाचा प्रस्ताव-अवतारगुण (३५ ते ४३)

हरिचरित्र अवतारगुण । प्रतिपादन करावयाचा प्रश्न । तो सांगावया जयंतीनंदन । स्वानंदें पूर्ण ‘द्रुमिल’ सांगे ॥३५॥
द्रुमिल उवाच – यो वा अनन्तस्य गुणाननन्ताननुक्रमिष्यन् स तु बालबुद्धिः । रजांसि भूमेर्गणयेत्कथञ्चित् कालेन नैवाखिलशक्तिधाम्नः ॥२॥
(द्रुमिल ऋषी म्हणाले – अनंत जो परमात्मा त्याचे असंख्य गुणांचे मापन करता येईल असे कोणी म्हणेल तर त्याला पोरकट समजावे. कदाचित काही विशेष कालगणनेने पृथ्वीचे रजःकण मोजता येतील परंतु सर्वसामर्थ्यसंपन्न परमेश्वराचे गुणवर्णन करणे शक्य होणार नाही. ॥२॥)
ज्याची लीलाशक्ति अपरिमित । ऐशा अनंत शक्ति ज्याच्या नखांत । यालागीं तो ‘अनंत’ म्हणत । त्याचे गुण समस्त गणवती कोणा?॥३६॥
त्या अनंताची गुणसमृद्धी । गणू म्हणे तो बालबुद्धी । जेवीं कां आकाशाची वृद्धी । मुंगिये त्रिशुद्धी न करवी माप ॥३७॥
सागरींचे जळ संपूर्ण । केवीं गणूं शके लवण । तेवीं अनंताचे अनंत गुण । आकळी कवण निजसत्ता ॥३८॥
पर्जन्याचिया धारा । गणितां येतील नृपवरा । पृथ्वीचिया दूर्वांकुरां । सुखें महावीरा गणितां येती ॥३९॥
वारा अफाट धांवे । तोही गणितातें पावे । निमेषोन्मेषांचे यावे । त्यांसीही संभवे गणित राया ॥४०॥
पृथ्वीचिया परिमाणा । काळे काळे होय गणना । परी भगवंताचिया गुणां । वेदांसहि जाणा गणित नव्हे ॥४१॥
भगवंताचें नाम एक । घेतां वेद झाले मूक । त्याचे गुण गणितां सकळिक । शेषाचे मुख दुखंड झालें ॥४२॥
त्या अनंताचे अनंत गुण । येथ गणूं शके कवण । कांहीं एक संक्षेपें जाण । सांगेन लक्षण अवतारांचें ॥४३॥

पुरुषावतार (४४ ते ६५)

भूतैर्यदा पञ्चभिरात्मसृष्टैः पुरं विराजं विरचय्य तस्मिन् । स्वांशेन विष्टः पुरुषाभिधानमवाप नारायण आदिदेवः॥३॥
(अर्थ – सर्वांना आदिकारण, आदिदेव नारायण (नार म्हणजे शरीर, त्याचा आश्रय करणारा) याने आपणच उत्पन्न केलेल्या पंचमहाभूतांच्या योगाने ब्रह्मांड (विराट शरीर) निर्माण करून त्यामध्ये आपल्या अंशाने प्रवेश केला, तेंव्हा त्याला विराट हे नाम प्राप्त झाले. ॥३॥)
अवतारांमाजी प्रथमतां । ‘पुरुषावतारांची’ कथा । द्रुमिल झाला सांगता । ऐक तत्त्वतां महाराजा ॥४४॥
नारायणे आत्मशक्तीं । पंचमहाभूतें भूताकृती । सृजूनियां यथानिगुतीं । ब्रह्मांडाची स्थिति निर्माण केली ॥४५॥
‘विराजपुर’ ब्रह्मांडा नाम । तेथ लीला प्रवेशे देवोत्तम । यालागी ‘पुरुष’ हे नाम । पुरुषोत्तम स्वांशें पावे ॥४६॥
त्याचेनि अंशयोगें प्रकृति । झाली प्रजांतें प्रसवती । यालागी ‘पुरुष’ नामस्थिति । जाण निश्चितीं पावला ॥४७॥
तो अकर्तात्मयोगयुक्तीं । जग चेतवी चिच्छक्ती । ज्याचेनि जगा जगत्वें स्फूर्ति । त्याची गुणकीर्ति दों श्लोकीं सांगों ॥४८॥

६८१.माझी विठ्ठल माउली । प्रेमपान्हा पान्हाइली ॥१॥
कुर्वाळुनि लावी स्तनीं । न वजे दुरी जवळूनि ॥ध्रु॥
केली पुरवी आळी। नव्हे निष्ठुर, कोवळी॥३॥
तुका म्हणे घांस । मुखीं घाली ब्रह्मरस ॥४॥
६८२.आम्ही उतराई । भाव निरोपोनि पायीं ॥१॥
तुम्ही पुरवावी आळी। करावी ते लडिवाळीं ॥ध्रु॥
आमचा हा नेम । तुम्हां उचित हा धर्म॥३॥
तुका म्हणे देवा! । जाणों सांगितली सेवा ॥४॥
६८३.केले पाप जेणे दिले अनुमोदन । दोघांसि पतन सारिखेंचि ॥१॥
विष नवनीता विष करी संगें । दुर्जनाच्या त्यागें सर्व हित ॥ध्रु॥
देखिले ओढाळ निघालिया सेता । टाळावें निमित्ता थैक म्हूण ॥३॥
तुका म्हणे जोडे केल्याविण कर्म । देखता तो श्रम न मानितां ॥४॥
६८४.विठ्ठल गीती विठ्ठल चित्तीं । विठ्ठल विश्रांति भोग जया ॥१॥
विठ्ठल आसनी विठ्ठल शयनीं । विठ्ठल भोजनी ग्रासोग्रासीं ॥ध्रु॥
विठ्ठल जागृति स्वप्नसुषुप्ती । आन दुजें नेणती विठ्ठलाविण ॥३॥
भूषण अळंकार सुखाचे प्रकार । विठ्ठल निर्धार जयां नरां ॥४॥
तुका म्हणे तेही विठ्ठलचि झाले । संकल्प मुराले दुजेपणें ॥५॥
६८५.संतांचे सुख झाले या देवा । म्हणऊनि सेवा करी त्यांची ॥१॥
तेथे माझा काय कोण तो विचार? । वर्णावया पार महिमा त्यांचा ॥ध्रु॥
निर्गुण आकार झाला गुणवंत । घाली दंडवत पूजोनियां ॥३॥
तीर्थें त्यांची इच्छा करिती नित्यकाळ । व्हावया निर्मळ आपणांशी ॥४॥
अष्ट महासिद्धींचा कोण आला पाड? । वागों नेदी आड कोणी तया ॥५॥
तुका म्हणे ते हे बळिया शिरोमणी । राहिले चरणीं निकटवासें ॥६॥
६८६.जो मानी तो देईल काई? । न मानी तो नेईल काई? ॥१॥
आम्हां विठ्ठल सर्व भूतीं । राहो चित्ती भलतैसा ॥ध्रु॥
साध्य न तें जना काई । जल्पे वायांविण ठायीं ॥३॥
वंदी निंदी तुज तो गा । तुका म्हणे पांडुरंगा! ॥४॥
६८७.भावबळें कैसा झालासी लहान । मागे संतीं ध्यान वर्णियेलें ॥१॥
तें मज उचित करूनियां देवा! । दाखवीं केशवा मायबापा! ॥ध्रु॥
पाहोनियां डोळां बोलेन मी गोष्टी । आलिंगूनि मिठी देईन पायीं ॥३॥
चरणीं दृष्टि उभा राहेन समोर । जोडोनियां कर पुढे दोन्हीं ॥४॥
तुका म्हणे उत्कंठित हे वासना । पुरवी नारायणा आर्त माझें ॥५॥
६८८.‘कृपाळु’ म्हणोनि बोलती पुराणें । निर्धार वचनें यांचि मज ॥१॥
आणीक उपाय नेणेंचि मी कांहीं । तुझें वर्म ठायीं पडे तैसें ॥ध्रु॥
नये धड कांहीं बोलतां वचन । रिघालों शरण सर्वभावें ॥३॥
कृपा करिसी तरि थोडें तुज काम । माझा तरि श्रम बहु हरे ॥४॥
तुका म्हणे मज दाखवीं श्रीमुख । हरेल या भूक डोळियांची ॥५॥
६८९.सर्वभावें आलों तुजचि शरण । कायावाचामनसहित देवा! ॥१॥
आणीक दुसरें नये माझ्या मना । राहिली वासना तुझ्या पायीं ॥ध्रु॥
माझिये जीवींचें कांहीं जडभारी । तुजविण वारी कोण दुजें? ॥३॥
तुझे आम्ही दास आमुचा तूं ऋणी। चालत दुरूनि आले मागें ॥४॥
तुका म्हणे आतां घेतलें धरणे । हिशोबाकारणे भेटी देईं ॥५॥
६९०.कईं मात माझे ऐकती कान? । बोलतां वचन संतां मुखीं ॥१॥
‘केला पांडुरंगें तुझा अंगीकार’। मग होईल धीर माझ्या जीवा ॥ध्रु॥
म्हणऊनि मुख अवलोकितों पाय । हेचि मज आहे थोरी आशा ॥३॥
माझिया मनाचा हाचि पैं विश्वास । न करी सायास साधनांचे ॥४॥
तुका म्हणे मज होईल भरंवसा । तरलों मी ऐसा साच भावें ॥५॥
६९१.दोन्ही हात ठेवूनि कटीं । उभा भीवरेच्या तटीं । कष्टलासी साठीं । भक्तिकाजे विठ्ठला! ॥१॥
भागलासी मायबापा! । बहु श्रम केल्या खेपा। आम्हांलागी सोपा। दैत्या काळ कृतांत॥ध्रु॥
होतासी क्षीरसागरीं । मही दाटली असुरीं । म्हणोनियां घरीं । गौळियाचे अवतार ॥३॥
केला पुंडलिकें गोवा। तुज पंढरीसी देवा । तुका म्हणे भावा-। साठी हातीं सांपडसी ॥४॥
६९२.गोड झालें पोट धालें। अवचिता वाचे आलें । म्हणतां पाप गेलें । विठ्ठलसें वाचेसी ॥१॥
सत्य माना रे सकळ । उद्धरिला अजामेळ । महापातकी चांडाळ । नामासाठी आपुलिया ॥ध्रु॥
चित्त पावलें आनंदा । सुख-समाधीतें सदा । म्हणतां ‘गोविंदा’ । वेळोवेळां वाचेसी ॥३॥
हे जाणती अनुभवी । जया चाड तो चोजवी । तुका म्हणे दावी । रूप तेंचि अरूप ॥४॥
६९३.रवि दीप हिरा दाविती देखणें । अदृश्य दर्शनें संतांचिया ॥१॥
त्यांचा महिमा काय वर्णूं मी पामर । न कळे तो साचार ब्रह्मादिकां ॥ध्रु॥
तापली चंदन निववितो कुडी । त्रिगुण तो काढी संतसंग ॥३॥
मायबापें पिंड पाळियेला माया। जन्ममरण जाया संतसंग ॥४॥
संतांचे वचन वारी जन्मदु:ख । मिष्टान्न तें भूक निवारण ॥५॥
तुका म्हणे जवळी न पाचारितां जावें । संतचरणीं भावें रिघावया ॥६॥
६९४.‘हरि हरि’ तुम्ही म्हणारे सकळ । तेणें मायाजाळ तुटईल॥१॥
आणिक नका कांहीं गाबाळाचे भरी। पडों येते थोरी नागवण ॥ध्रु॥
भावें तुळसीदळ पाणी जोडा हात । म्हणावें ‘पतित’ वेळोवेळां ॥३॥
तुका म्हणे हा तंव कृपेचा सागर । नामासाठी पार पाववील ॥४॥

संपूर्ण वारकरी प्रस्थानत्रयी नित्यनेम पारायण अनुक्रमणिका


ग्रंथ

1 thought on “दिवस – ४३. वारकरी प्रस्थानत्रयी नित्यनेम पारायण”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Page Reader Press Enter to Read Page Content Out LoudPress Enter to Pause or Restart Reading Page Content Out LoudPress Enter to Stop Reading Page Content Out LoudScreen Reader Support
error: Content is protected !!
Scroll to Top