दिवस – ४४. वारकरी प्रस्थानत्रयी नित्यनेम पारायण

अनुक्रमणिका

तद्विद्धि प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया । उपदेक्ष्यन्ति ते ज्ञानं ज्ञानिनस्तत्त्वदर्शिनः ॥३४॥
तें ज्ञान पें गा बरवें । जरी मनीं आथि आणावें । तरी संतां या भजावें । सर्वस्वेंसीं ॥१६५॥
जे ज्ञानाचा कुरुठा । तेथ सेवा हा द्वारवंठा । तो स्वाधीन करी, सुभटा । वोळगोनी ॥१६६॥
तरी तनुमनुजीवें । चरणांसी लागावें । आणि अगर्वता करावें । दास्य सकळ ॥१६७॥
मग, अपेक्षित जें आपुलें । तेंही सांगती; पुसिलें । जेणें अंतःकरण बोधलें । संकल्पा न ये ॥१६८॥
यज्ज्ञात्वा न पुनर्मोहमेवं यास्यसि पाण्डव । येन भूतान्यशेषेण द्रक्ष्यस्यात्मन्यथो मयि ॥३५॥
जयाचेनि वाक्य उजिवडें । जाहलें चित्त निधडें । ब्रह्माचेनि पाडें । निःशंकु होय ॥१६९॥
तें वेळीं आपणपेयां सहितें । इयें अशेषेंही भूतें । माझ्या स्वरूपीं अखंडितें । देखसी तूं ॥१७०॥
ऐसें ज्ञानप्रकाशें पाहेल । तैं मोहांधकारु जाईल । जैं श्रीगुरुकृपा होईल । पार्था गा ॥१७१॥
अपि चेदसि पापेभ्यः सर्वेभ्यः पापकृत्तमः । सर्वं ज्ञानप्लवेनैव वृजिनं संतरिष्यसि ॥३६॥
जरी कल्मषांचा आगरु । तूं भ्रांतीचा सागरु । व्यामोहाचा डोंगरु । होऊनि अससी ॥१७२॥
तऱ्ही ज्ञानशक्तीचेनि पाडें । हें आघवेंचि गा थोकडें । ऐसें सामर्थ्य असे चोखडें । ज्ञानीं इये ॥१७३॥
देखें, विश्वभ्रमाऐसा । जो अमूर्ताचा कडवसा । तो जयाचिया प्रकाशा । पुरेचिना ॥१७४॥
तया कायसे हे मनोमळु । हें बोलतांांचि, अति किडाळु । नाहीं येणें पाडें ढिसाळु । दुजें जगीं ॥१७५॥
यथैधांसि समिद्धोऽग्निर्भस्मसात्कुरुतेऽर्जुन । ज्ञानाग्निः सर्वकर्माणि भस्मसात्कुरुते तथा ॥३७॥
सांगें, भुवनत्रयाची काजळी । जे गगनामाजि उधवली । तिये प्रळयींचे वाहुटुळी । काय अभ्र नुरे? ॥१७६॥
कीं पवनाचेनि कोपें । पाणियेंचि जो पलिपे । तो प्रळयानळु दडपे । तृणें काष्ठें काई? ॥१७७॥
न हि ज्ञानेन सदृशं पवित्रमिह विद्यते । तत्स्वयं योगसंसिद्धः कालेनात्मनि विन्दति ॥३८॥
म्हणौनि, असो हें न घडे । तें विचारितांचि असंगडें । पुढती ज्ञानाचेनि पाडें । पवित्र न दिसे ॥१७८॥
एथ ज्ञान हें उत्तम होये । आणिकही एक, तैसें कैं आहे? । जैसें चैतन्य कां नोहे । दुसरें गा ॥१७९॥
या महातेजाचेनि कसें । जरी चोखाळु प्रतिबिंब दिसे । कां, गिंवसिलें गिंवसे । आकाश हें! ॥१८०॥
नातरी, पृथ्वीचेनि पाडें । कांटाळें जरी जोडे । तरी उपमा ज्ञानीं घडे । पांडुकुमरा ॥१८१॥
म्हणौनि, बहुतीं परी पाहतां । पुढतपुढती निर्धरितां । हें ज्ञानाची पवित्रता । ज्ञानींचि आथि ॥१८२॥
जैसी अमृताची चवी निवडिजे । तरी अमृताचिसारिखी म्हणिजे । तैसें ज्ञान हें उपमिजे । ज्ञानेसींचि ॥१८३॥
आतां यावरी जें बोलणें । तें वायाची वेळु फेडणें । तंव “साचचि हें’ पार्थ म्हणे । जें “बोलत असां’ ॥१८४॥
परी तेंचि ज्ञान केवीं जाणावें? । ऐसें अर्जुनें जंव पुसावें । तंव, तें मनोगत देवें । जाणितलें ॥१८५॥
मग म्हणतसे “किरीटी । आतां चित्त देई इये गोठी । सांगेन ज्ञानाचिये भेटी । उपावो तुज’ ॥१८६॥

यत्काय एष भुवनत्रयसन्निवेशो यस्येन्द्रियैस्तनुभृतामुभयेन्द्रियाणि । ज्ञानं स्वतः श्वसनतो बलमोज ईहा सत्त्वादिभिः स्थितिलयोद्भव आदिकर्ता ॥४॥
(अर्थ – ज्याचे शरीराचे ठिकाणी हा त्रिभुवनाचा सर्व पसारा साठविलेला आहे, ज्याच्या इंद्रियांच्या योगाने देहधारी प्राण्याचे ज्ञानेंद्रिय-कर्मेंद्रियादी व्यवहार चालतात, ज्याच्या स्वरूपापासून जीवांना ज्ञानप्राप्ती होते, ज्याच्या श्वासापासून शारीरिक बल, तेज आणि कर्मप्रवणता (प्राण्यांना) मिळते, सत्त्व, रज व तम यांनी जो ब्रह्मांडाची उत्पत्ती, रक्षण व नाश करतो, तोच आदिकारण, आदिदेव पुरुष जाण. ॥४॥)
त्रैलोक्य वसे जें कांहीं । तेंचि शरीर त्याचे पाहीं । ज्याचेनि योगें देहीं । ठायींच्या ठायीं वर्तती ॥४९॥
ब्रह्मादिक जे तनुधारी । त्यांच्या ज्ञानकर्मेद्रियांची थोरी । ज्याचेनि इंद्रियेंकरीं । निजव्यापारी वर्तती ॥५०॥
जो जगाचे नयनांचा नयन । जो जगाच्या घ्राणांचे घ्राण । जो जगाच्या श्रवणांचे श्रवण । रसनेची जाण रसना जो कां ॥५१॥
जो जगाच्या हातांचे हात । ज्याचे पाय जगाच्या पायांत । जो वाचेची वाचा निश्चित । एवं उभय इंद्रियांआंत इंद्रियें ज्याची ॥५२॥
जीवाच्या ठायीं जे कां ज्ञान । तेंही त्याचेनि ज्ञाने जाण । त्यासी ज्ञानदाता नाहीं आन । स्वयें ज्ञानघन स्वभावतांचि ॥५३॥
ज्याचेनि प्राणे जाण । जगाचा चळे प्राण । बळ तेज क्रियाचरण । जगासी संपूर्ण ज्याचेनि ॥५४॥
रजतमसत्त्वादिगुणयुक्त । उत्पत्तिस्थितिप्रळयान्त । मूळी आदिकर्ता भगवंत । जाण तो निश्चित ‘पुरुषावतार’ ॥५५॥
सत्त्वादि त्रिगुणावस्था । उत्पत्तिस्थितिलयकर्ता । तेही गुणावतारकथा । ऐक नृपनाथा सांगेन ॥५६॥
आदावभूच्छतधृती रजसाऽस्य सर्गे विष्णुः स्थितौ क्रतुपतिर्द्विजधर्मसेतुः । रुद्रोऽप्ययाय तमसा पुरुषः स आद्य इत्युद्भवस्थितिलयाः सततं प्रजासु ॥५॥
(अर्थ – प्रथम या आदिपुरुषापासून विश्वाच्या उत्पत्तीच्या वेळी रजोगुणाच्या साह्याने ब्रह्मदेव निर्माण झाला, उत्पन्न झालेल्या विश्वाच्या (ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य या द्विजांच्या व त्यांच्या धर्माच्या) रक्षणाकरिता सत्त्वगुणापासून यज्ञफलदाता असा विष्णू निर्माण झाला, नंतर संहाराकरिता तमोगुणापासून रुद्र झाला. याप्रमाणे प्रजेचे उत्पत्ती, स्थिती व लय हे सतत चालले आहेत. ॥५॥)
तोचि आदिकल्पी उत्पत्ती । रजोगुणें राजसा शक्तीं । स्वयें झाला शतधृती । ‘ब्रह्मा’ म्हणती जयातें ॥५७॥
एवं ब्रह्मरूपें उत्पत्ति । सृजिता झाला राजसा शक्तीं । तेथे प्रतिपाळावया स्वधर्मस्थिति । सत्त्वगुणें निश्चितीं ‘श्रीविष्णु’ जाहला ॥५८॥
तो द्विजधर्मप्रतिपाळणु । यज्ञभोक्ता श्रीविष्णु । देखतां धर्माचा अवगुणु । अवतरे नारायणु नानावतारीं ॥५९॥
तोचि ये सृष्टीचे प्रांतीं । तमोगुणें तामसा शक्तीं । स्वयें जाहला ‘रुद्रमूर्ति’। सकळ कल्पांती निर्दाळितु ॥६०॥
जो शेताची पेरणी करी । तोचि राखे देखे सोकरी । तोचि वाळलियावरी । संवगणी करी सर्वांची ॥६१॥
तेवीं उत्पत्तिकाळी तोचि ब्रह्मा । स्थितिकाळी तोचि विष्णुनामा । प्रळयकाळीही रुद्रप्रमा । ये पुरुषोत्तमा तेचि नामें ॥६२॥
यालागीं तो आदिकर्ता । श्रुतिशास्त्रीं दृढ वार्ता । दक्षकश्यपादिकां कर्तव्यता । त्यांसी समर्थता याचेनि ॥६३॥
यापरी विचारितां । हाचि एक सकळ कर्ता । यावांचून कर्तव्यता । अणुमात्रता नव्हे आना ॥६४॥
जो सृष्टीपूर्वी स्वयंभ असे । जेणें उत्पत्तिस्थितिप्रळयो भासे । तोचि आदिकर्ता अनायासें । तोचि निजांशें पुरुषावतारु ॥६५॥

नारायणावतार (६६ ते १९९)

ऐक राया अतिविचित्र । जे परिसतां पुण्य पवित्र । तो नारायणाचा अवतार । ज्याचें चरित्र अलोलिक ॥६६॥
धर्मस्य दक्षदुहितर्यजनिष्ट मूर्त्यां नारायणो नरऋषिप्रवरः प्रशान्तः । नैष्कर्म्यलक्षणमुवाच चचार कर्म योऽद्यापि चास्त ऋषिवर्यनिषेविताङ्‌घ्रि: ॥६॥
(अर्थ – धर्मऋषीपासून दक्षप्रजापतीची कन्या मूर्ती हिच्या ठिकाणी ऋषिश्रेष्ठ, अत्यंत शांत असे नर व नारायण ह्या दोन स्वरूपांनी प्रत्यक्ष भगवानांनीच अवतार घेतले. त्यांनी कर्माचे निर्हरण व आत्मस्वरूपाचे ज्ञान असा नैष्कर्म्यलक्षण धर्म सांगून त्याप्रमाणे आचरणातही आणला. अद्यापि त्यांचे तपाचरण चालू असून नारदादी ऋषी त्यांच्या चरणकमलांची सेवा करीत राहिले आहेत. ॥६॥)
जो अजन्मा नित्य त्रिभुवनीं । जो न जन्मोनि जन्मला योनीं । तेणें धर्माची धर्मपत्नी । केली जननी दक्षकन्या ‘मूर्ती’ ॥६७॥
ते मूर्तिमातेच्या उदरीं । नर-नारायण अवतारी । एकचि दोरूपेंकरीं । धर्माच्या घरी अवतरले ॥६८॥
तेणें नारदादिकांसी जाण । निरूपिलें नैष्कर्म्यलक्षण । स्वयें आचरला आपण । तें कथन ऐक राया ॥६९॥
‘नारायण’ म्हणसी कोणे देशी । तो बदरिकाश्रमी आश्रमवासी । नारद सनकादिक ऋषि । अद्यापि त्यापासी सेवेसी असती ॥७०॥
त्यासी स्वस्वरूपाचे लक्ष । सहजीं असे प्रत्यक्ष । ते स्वरूपनिष्ठेचा पक्ष । अलक्ष्याचे लक्ष्य प्रबोधी स्वयें ॥७१॥
तया स्वरूपाचा निजबोध । स्वयें पावावया विशद । अद्यापवरी ऋषिवृंद । नित्य संवाद करिताति त्यासीं ॥७२॥
जे स्वरूप लक्षेना जनीं । तें विशद करूनि दे वचनीं । तेंचि अनुग्रहेंकरूनी । अनुभवा आणी तत्काळ ॥७३॥
ज्ञाते बहुसाल ऋषीश्वर । त्यांमाजी नारायण अवतार । तेथ वर्तलें जें चरित्र । अतिविचित्र ऐक राया ॥७४ ॥
इन्द्रो विशङ्क्य मम धाम जिघृक्षतीति कामं न्ययुङ्क्त सगणं स बदर्युपाख्यम् । गत्वाऽप्सरोगणवसन्तसुमन्दवातैः स्त्रीप्रेक्षणेषुभिरविध्यदतन्महिज्ञ: ॥७॥
(अर्थ – (आपल्या तपाचरणाने) हे नरनारायण स्वर्गाचे राज्य बळकावतील अशी इंद्राला शंका येऊन त्याने सपरिवार मदनाला पाठविले. त्या ऋषींचा महिमा न ओळखता तो मदन अप्सरा, वसंत व सुगंधी वायू यांसह बदरिकाश्रमी गेला. स्त्रियांच्या कामोद्दीपक नेत्रकटाक्षादी मन्मथबाणांनी त्याने ऋषींचे चित्त वेधण्याचा प्रयत्न केला.॥७॥)
ऐसा नारायणाचा प्रताप । देखोनि निष्ठा दृढ तप । तेणें इंद्रासी आला कंप । म्हणे ‘स्वर्ग निष्पाप घेईल माझा’ ॥७५॥
त्याचे तप देखोनि परम । म्हणे गेलें गेलें स्वर्गधाम । इंद्रे कोपें प्रेरिला काम । अप्सरासंभ्रमसमवेत ॥७६॥
कामसमवेत अप्सरा । सवें वसंतही दुसरा । क्रोधु अवघियां पुढारा । जो तापसांतें पुरा नागवी सदा ॥७७॥
तीर्थोतीर्थीच्या अनुष्ठाना । क्षमा नुपजे अंतःकरणा । कोपु येतांच जाणा । करी उगाणा तपाचा ॥७८॥
क्रोधु तापसांचा उघड वैरी । तापसां नागवी नानापरी । तोही नारायणावरी । अवघ्यां अग्री चालिला ॥७९॥
ऐशी मिळोनि बिरुदायितें । आली बदरिकाश्रमा समस्ते । नारायणु तप करी जेथें । उठावली तेथें अतिआक्रमेंसीं ॥८०॥
वसंतें शृंगारिलें वन । कोकिळा कलरवे गायन । सुगंध शीतळ झुळके पवन । पराग संपूर्ण वरुषती सुमनें ॥८१॥
तेथ भ्रमरांचे झणत्कार । कामिनीगायन कामाकार । हावभाव कटाक्षविकार । कामसंचार चेतविती ॥८२॥
नव्हेचि कामिनीकामबाधा । पराक्रम न चलेचि क्रोधा । तोही सांडोनियां बिरुदा । परतला नुसधा म्लानवदनें ॥८३॥
मग मदने मांडूनियां ठाण । विंधी कामिनीकटाक्षबाण । तेणें घायें नारायण । अणुप्रमाण न डंडळेचि ॥८४॥
शस्त्रे तोडितां आकाशासी । आकाश स्वयें सावकाशी । तेवीं कामें छळितां नारायणासी । तो निजसंतोषी निर्द्वंद्व ॥८५॥
आग्या निजतेजसत्ता । अग्नितेज प्राशुं जातां । तोंड जळे चवी चाखितां । तेवीं कामिनीकामता नारायणदृष्टीं ॥८६॥
नेणतां नारायणमहिमे । धांवोनि घाला घातला कामें । तेव्हां अवघींच पराक्रमें । स्वनिंद्य धर्मे लाजलीं ॥८७॥
तेथ अवघीं झाली पराङ्मुखें । पाठमोरी निघाली अधोमुखें । तेव्हां त्यांची गति निःशेखें । नारायण देखे खंुटिली॥८८॥
इंद्रियनियंता नारायण । नेणोनि छळू गेली आपण । त्यापुढोनि पुनरागमन । सर्वथा जाण करवेना ॥८९॥
मागें न निघवे निश्चितें । ऐसें जाणोनि समस्तें । थोर गजबजिलीं तेथें । भयचकितें व्याकुळे ॥९०॥
जाणोनि नारायणप्रताप । आतां कोपून देईल शाप । येणें धाकें म्लानरूप । अतिसकंप भयभीतें ॥९१॥
ऐशी देखोनि त्यांची स्थिति । कृपेनें तुष्टला कृपामूर्ति । अणुमात्र कोपु नये चित्तीं । अभिनव शांति नारायणाची ॥९२॥

६९५.गांठोळीस धन, भाकावी करुणा । दावूनि सज्जना कींव पीडी॥१॥
नाठेळाची भक्ती कुचराचे बळ । कोरडें वोंगळ मार खाय ॥२॥
सांडोव्यासी घाली देवाची करंडी। विल्हाळ त्या धोंडी पूजा दावी॥३॥
तुका म्हणे ऐसे माकडाचे छंद । अवघे धिंदधिंद शिंदळीचे ॥४॥
६९६.ऐसे कुळीं पुत्र होती । बुडविती पूर्वजां ॥१॥
चाहाडी चोरी भांडवला । वांटा आला भागासी ॥ध्रु॥
त्यांचियाने दु:खी मही । भार तेही न साहे ॥३॥
तुका म्हणे ग्रामपशु । केला नाशु आयुष्या ॥४॥
६९७.आतां जागा रे भाई जागा रे! । चोर निजल्या नाडूनि भागा रे! ॥ध्रु॥
कैसें असोनि ठाउके नेणां? । दु:ख पावाल पुढिलें पेणा॥२॥
आतां नका रे भाई नका रे! । आहे गांठीं तें लुटवूं लोकां रे! ॥३॥
तुका म्हणे एकाच्या घायें । कां रे जाणोनि न धरा भय? ॥४॥
६९८.मुद्दल जतन झालें । मग लाभाचे काय आलें? ॥१॥
घरी देऊनि अंतर गांठी । राखा पारख्यां न सुटे मिठी ॥ध्रु॥
घाला पडे थोडेंच वाटे । काम मैंदाचे चपेटे ॥३॥
तुका म्हणे वरदळ खोटें । फांसे अंतरिच्या कपटें ॥४॥
६९९.मज अंगाच्या अनुभवें । कांहीं वाईट बरें ठावें ॥१॥
झालों देहींचा देखणा । न ये मागे पुढेही मना ॥ध्रु॥
वोस वसती ठावी । परि हे चाली दु:ख पावी ॥३॥
तुका म्हणे घेऊं देवा । सवें करूनि बोळावा ॥४॥
७००.पाववावें ठाया । ऐसी सवें बोलों तया ॥१॥
भावा ऐसी क्रिया राखे । खोट्या खोटेपणे वाखे ॥ध्रु॥
न ठेवूं अंतर । कांहीं भेदाचा पदर ॥३॥
तुका म्हणे जीवें भावें । सत्या मानविजे देवें ॥४॥
७०१.माझा पहा अनुभव । केला देव आपुला ॥१॥
बोलविलें तेंचि द्यावें । उत्तर व्हावें ते काळीं ॥ध्रु॥
सोडिलिया जगनिंद । मग गोविंद म्हणियारा ॥३॥
तुका म्हणे धीर केला । तेणें याला गोविलें ॥४॥
७०२.मोल देऊनियां सांठवावे दोष । नटाचे ते वेष पाहोनियां ॥१॥
हरिदासां मुखें हरिकथा कीर्तन । तेथें पुण्यापुण्य विशेषता ॥ध्रु॥
हरितील वस्त्रे गोपिकांच्या वेषें । पाप त्या सरिसे मात्रागमन ॥३॥
तुका म्हणे पाहा ऐसे झाले जन । सेवाभक्तिहीन रसीं गोडी ॥४॥
७०३.विठोबा विसांविया विसांविया। पडों देईं पायां ॥१॥
बहु खेद क्षीण । आलों सोसूनियां वन ॥ध्रु॥
बहुतां काकुलती । आलों सोसिली फजिती ॥३॥
केली तुजसाठीं । तुका म्हणे येवढी आटी ॥४॥
७०४.कां गा धर्म केला? । असोन सत्तेचा आपुला ॥१॥
उभाउभी पाय जोडीं । आतां फांकों नेदीं घडी ॥ध्रु॥
नको सांडूं ठाव । आतां घेऊ नेदीं वाव ॥३॥
तुका म्हणे इच्छा । तैसा करीन सरसा ॥४॥
७०५.तुमची तो भेटी नव्हे ऐसी झाली । कोरडीच बोली ब्रह्मज्ञान ॥१॥
आतां न बोलावें ऐसें वाटे देवा! । संग न करावा कोणासवें ॥ध्रु॥
तुम्हां निमित्यासी सांपडले अंग । नेदावा हा संग विचारिलें ॥३॥
तुका म्हणे माझी राहिली वासना । आवडी दर्शनाचीच होती ॥४॥
७०६.आहे तेंचि आम्ही मागों तुजपाशीं । नव्हों तुज ऐसी क्रियानष्ट ॥१॥
न बोलावें तेंचि वर्म बरे दिसे । प्रकट ते कैसे गुण करूं? ॥ध्रु॥
एका ऐसा एका द्यावयाचा मोळा । कां तुम्हा गोपाळा नाहीं ऐसा? ॥३॥
तुका म्हणे लोकां नाहीं कळों आलें । करावें आपुलें जतन तों ॥४॥
७०७.आम्ही याची केली सांडी । कोठे तोंडी लागावें ॥१॥
आहे तैसें असो आतां । चिंतें चिंता वाढते ॥ध्रु॥
बोलिल्याचा मानी शीण । भिन्न भिन्न राहावें ॥३॥
तुका म्हणे आम्हांपाशीं । धीरा ऐसी जतन ॥४॥
७०८.आम्हांपाशी याचे बळ । कोण काळवरी तो ॥१॥
धरूनि ठेलों जीवेंसाठीं । होय भेटी तोंवरि ॥ध्रु॥
लागलों ते न फिरें पाठीं । पडिल्या गांठी वांचूनि ॥३॥
तुका म्हणे अवकाशें । तुमच्या ऐसे व्हावया ॥४॥
७०९.बोलिलेंचि बोलें पडपडताळूनि । उपजत मनीं नाहीं शंका ॥१॥
बहुतांची माय बहुत कृपाळ । साहोनि कोल्हाळ बुझाविसी ॥ध्रु॥
बहुतांच्या भावें वाटिसी भातुकें । बहु कवतुकें खेळविसी ॥३॥
तुका म्हणे ऐसें जाणतसों वर्म । करणे तों श्रम न वजे वायां ॥४॥
७१०.कोठे भोग उरला आतां । आठवितां तुज, मज ॥१॥
आड कांहीं नये दुजें । फळ बीजे आणिलें ॥ध्रु॥
उद्वेग तो वायांविण । कैंचा शीण चिंतनें? ॥३॥
तुका म्हणे गेला भ्रम । तुमच्या धर्म पायाचा ॥४॥
७११.संसार तो कोण लेखे । आम्हां सखे हरिजन ॥१॥
काळ ब्रह्मानंदें सरे । आवडी उरे संचली ॥ध्रु॥
स्वप्नी तेही नाहीं चिंता । रात्री जातां दिवस ॥३॥
तुका म्हणे ब्रह्मरसें । होय सरिसे भोजन ॥४॥
७१२.येईं गा विठ्ठला येईं गा विठ्ठला । प्राण हा फुटला आळवितां॥१॥
पडियेलों वनी थोर चिंतवनीं । उशीर कां अझूनि लावियेला? ॥ध्रु॥
काय तुज नाहीं लौकिकाची शंका? । आपुल्या बाळका मोकलितां ॥३॥
तुका म्हणे बहु खंती वाटे जीवा । धरियेलें देवा दुरी दिसे ॥४॥
७१३.आपुलें गांवींचे न देखेसें झालें । परदेशी एकलें किती कंठूं ॥१॥
म्हणऊनि पाहे मूळ येतां वाटे । जीवलग भेटे कोणी तरी ॥ध्रु॥
पाहतां अवघ्या दिसतील दिशा । सकळही वोसा दृष्टीपुढें ॥३॥
तुका म्हणे कोणी न सांगे वारता । तुझी, वाटे चिंता पांडुरंगा! ॥४॥

संपूर्ण वारकरी प्रस्थानत्रयी नित्यनेम पारायण अनुक्रमणिका


ग्रंथ

1 thought on “दिवस – ४४. वारकरी प्रस्थानत्रयी नित्यनेम पारायण”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Page Reader Press Enter to Read Page Content Out LoudPress Enter to Pause or Restart Reading Page Content Out LoudPress Enter to Stop Reading Page Content Out LoudScreen Reader Support
error: Content is protected !!
Scroll to Top