दिवस – ४५. वारकरी प्रस्थानत्रयी नित्यनेम पारायण

अनुक्रमणिका

श्रद्धावॉंल्लभते ज्ञानं तत्परः संयतेन्द्रियः । ज्ञानं लब्ध्वा परां शान्तिमचिरेणाधिगच्छति ॥३९॥
आत्मसुखाचिया गोडिया । विटे जो कां सकळ विषया । जयाच्या ठायीं इंद्रियां । मानु नाहीं ॥१८७॥
जो मनासी चाड न सांगे । जो प्रकृतीचें केलें नेघे । जो श्रद्धेचेनि संभोगें । सुखिया जाहला ॥१८८॥
तयातेंचि गिवसित । तें ज्ञान पावे निश्चित । जयामाजि अचुंबित । शांति असे ॥१८९॥
तें ज्ञान हृदयीं प्रतिष्ठे । आणि शांतीचा अंकुर फुटे । मग विस्तार बहु प्रगटे । आत्मबोधाचा ॥१९०॥
मग जेउती वास पाहिजे । तेउती शांतीची देखिजे । तेथ आपपर नेणिजे । निर्धारितां ॥१९१॥
ऐसा हा उत्तरोत्तरु । ज्ञानबीजाचा विस्तारु । सांगतां, असे अपारु । परि असो आतां ॥१९२॥
अज्ञश्चाश्रद्दधानश्च संशयात्मा विनश्यति । नायं लोकोऽस्ति न परो न सुखं संशयात्मनः ॥४०॥
ऐकें, जया प्राणियाच्या ठायीं । इया ज्ञानाची आवडी नाहीं । तयाचें जियालें म्हणों काई? । वरी मरण चांग! ॥१९३॥
शून्य जैसें गृह । कां चैतन्येंवीण देह । तैसें जीवित तें संमोह । ज्ञानहीन ॥१९४॥
अथवा ज्ञान कीर आपु नोहे । परि ते चाड एकी जरी वाहे । तरी तेथ जिव्हाळा कांहीं आहे । प्राप्तीचा पें ॥१९५॥
वांचूनि ज्ञानाची गोठी कायसी? । परि ते आस्थाही न धरी मानसीं । तरी तो संशयरूप हुताशीं । पडिला, जाण ॥१९६॥
जें अमृतही, परि नावडे । ऐसें सावियाची अरोचकु जैं पडे । तैं मरण आलें असें फुडें । जाणों ये कीं! ॥१९७॥
तैसा विषयसुखे रंजे । जो ज्ञानेसींचि माजे । तो संशयें अंगिकारिजे । एथ भ्रांति नाहीं! ॥१९८॥
मग संशयीं जरी पडिला । तरी, निभ्रांत जाणे, नासला । तो ऐहिकपरत्रा मुकला । सुखासि गा ॥१९९॥
जया काळज्वरु आंगी बाणे । तो शीतोष्णें जैशीं नेणे । आगी आणि चांदिणें । सरिसेंचि मानी ॥२००॥
तैसें साच आणि लटिकें । विरुद्ध आणि निकें । संशयीं तो नोळखे । हिताहित ॥२०१॥
हा रात्रिदिवसु पाहीं । जैसा जात्यंधा ठाउवा नाहीं । तैसें संशयीं असतां कांहीं । मना नये ॥२०२॥
म्हणौनि संशयाहूनि थोर । आणिक नाहीं पाप घोर । हा विनाशाची वागुर । प्राणियांसी ॥२०३॥
येणें कारणें तुवां त्यजावा । आधीं हाचि एकु जिणावा । जो ज्ञानाचिया अभावा- । माजि असे ॥२०४॥
जैं अज्ञानाचें गडद पडे । तैं हा बहुवस मनीं वाढे । म्हणौनि सर्वथा मार्ग मोडे । विश्वासाचा ॥२०५॥
हृदयीं हाचि न समाये । बुद्धीतें गिवसूनि ठाये । तेथ संशयात्मक होये । लोकत्रय ॥२०६॥
योगसंन्यस्तकर्माणं ज्ञानसंछिन्नसंशयम् । आत्मवन्तं न कर्माणि निबध्नन्ति धनंजय ॥४१॥
ऐसा जरी थोरावे । तरी उपायें एकें आंगवे । जरी हातीं होय बरवें । ज्ञानखड्ग ॥२०७॥
तरी तेणें ज्ञानशस्त्रें तिखटें । निखळु हा निवटे । मग निःशेष खता फिटे । मानसींचा ॥२०८॥
तस्मादज्ञानसंभूतं हृत्स्थं ज्ञानासिनात्मनः । छित्त्वैनं संशयं योगमातिष्ठोत्तिष्ठ भारत ॥४२॥
ॐ तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासूपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे
श्रीकृष्णार्जुनसंवादे ‘ज्ञानकर्मसंन्यासयोगो’ नाम चतुर्थोऽध्यायः ॥४॥
याकारणें पार्था । उठीं वेगीं वरौता । नाशु करोनि हृदयस्था । संशयासी ॥२०९॥
ऐसें सर्वज्ञांचा बापु । जो श्रीकृष्णु ज्ञानदीपु । तो म्हणतसे सकृपु । ऐकें राया ॥२१०॥
तंव या पूर्वापर बोलाचा । विचारूनि कुमरु पंडूचा । कैसा प्रश्नु अवसरींचा । करिता होईल ॥२११॥
ते कथेची संगती । भावाची संपत्ति । रसाची उन्नति । म्हणिपेल पुढान ॥२१२॥
जयाचिया बरवेपणा । कीजे आठा रसांची वोवाळणी । जो सजनाचिये आयणी । विसांवा जगीं ॥२१३॥
तो शांतुचि अभिनवेल । ते परियेसा मऱ्हाटे बोल । जे समुद्राहूनि सखोल । अर्थभरित ॥२१४॥
जैसें बिंब तरी बचकेंचि एवढें । परि प्रकाशासि त्रैलोक्य थोकडें । शब्दाची व्याप्ति तेणें पाडें । अनुभवावी ॥२१५॥
नातरी, कामतयाचिया इच्छा । फळे कल्पवृक्षु जैसा । बोलु व्यापकु होय तैसा । “तरी अवधान द्यावें’ ॥२१६॥
हें असो; काय म्हणावें? । सर्वज्ञ जाणती स्वभावें । तरी निकें चित्त द्यावें । हें विनंती माझी ॥२१७॥
जेथ साहित्य आणि शांति । हे रेखा दिसे बोलती । जैसी लावण्य-गुण-कुळवती । आणि पतिव्रता ॥२१८॥
आधींचि साखर आवडे । तेचि जरी ओखदी जोडे । तरी सेवावी ना कां कोडें । नावानावा? ॥२१९॥
सहजें मळयानिलु मंदु सुगंधु । तया अमृताचा होय स्वादु । आणि तेथेंचि जोडे नादु । जरी दैवगत्या ॥२२०॥
तरी, स्पर्शें सर्वांग निववी । स्वादें जिव्हेंते नाचवी । वोढतीच, कानांकरवीं । म्हणवीं बापु माझा ॥२२१॥
तैसें कथेचें इये ऐकणें । एक श्रवणासी होय पारणें । आणि संसारदुःख मूळवणें । विकृतीविणें ॥२२२॥
जरी मंत्रेंचि वैरी मरे । तरी वायां कां बांधावी कटारें? । रोग जाय दूधसाखरें । तरी निंब कां पियावा? ॥२२३॥
तैसा, मनाचा मारु न करिता । आणि इंद्रियां दुःख न देतां । एथ मोक्षु असे आयता । श्रवणाचिमाजि ॥२२४॥
म्हणौनि आथिलीया आराण्युका । गीतार्थु हा निका । ज्ञानदेवो म्हणे “आइका’ । निवृत्तिदासु ॥२२५॥
इति श्रीज्ञानदेवविरचितायां भावार्थदीपिकायां चतुर्थोऽध्यायः ॥४॥
श्लोक-४२, ओव्या-२२५.

विज्ञाय शक्रकृतमक्रममादिदेवः प्राह प्रहस्य गतविस्मय एजमानान् । मा भैष्ट भो मदन मारुत देववध्वो गृह्णीत नो बलिमशून्यमिमं कुरुध्वम् ॥८॥
(परमसमर्थ नरनारायणांनी इंद्राचा अपराध जाणला. स्वार्थाकरिता लोभी माणसाची प्रवृत्ती जाणणारे म्हणून त्यांना इंद्रकृत्याबद्दल विस्मय वाटला नाही. प्रभूनी किंचित हास्य केले व शापाच्या भीतीने थरथर कापणाऱ्या मदनादिकांना ते म्हणाले, ‘हे मदन, मारुत, अप्सरांनो, भिऊ नका, आमचे आतिथ्य स्वीकारा. सर्व प्रकारच्या सेवाधर्मांनी गजबजलेला हा आश्रम शून्य (काही सेवा केली नाही असा) होऊ नये. ॥८ ॥)
इंद्रे केला अपराध । तरी नारायणासी न येचि क्रोध । बापु निजशांति अगाध । न मनी विरुद्ध कामादिकांचे ॥९३॥
न येचि कामादिकांवरी कोप । इंद्रासही नेदीच शाप । नारायणाच्या ठायीं अल्प । कदा विकल्प नुपजेचि ॥९४॥
अपकाऱ्यावरी जो कोपला । तो तत्काळ कोपें नागविला । अपकाऱ्या जेणे उपकार केला । तोचि दादुला परमार्थी ॥९५॥
अपकाऱ्या उपकार करिती । त्याचि नांव गा परम शांति । ते शांतीची निजस्थिति । दावी लोकांप्रती आचरोनि ॥९६॥
परमार्थाची मुख्यत्वें स्थिति । पाहिजे गा परम शांति । ते शांतीची उत्कट गति । दावी लोकांप्रती आचरोनि ॥९७॥
भयभीत कामादिक । अप्सरागण साशंक । त्यातें अभयदानें सुख । देऊनियां देख नारायण बोले ॥९८॥
अहो कामवसंतादिक स्वामी । कृपा करूनि आलेति तुम्ही । तुमचेनि पदाभिगमीं । आश्रमभूमी पुनीत झाली ॥९९॥
तुमचें झालिया आगमन । अवश्य करावें आम्हीं पूजन । हेंचि आमुचें अनुष्ठान । कांहीं बलिदान अंगीकारा माझें ॥१००॥
अवो अप्सरा देवकांता । तुम्ही भेवों नका सर्वथा । येथ आलिया समस्तां । पूज्य सर्वथा तुम्ही मज ॥१॥
आश्रमा आलिया अतिथि । जे कोणी पूजा न करिती । त्यांची शून्य पुण्यसंपत्ति । आश्रमस्थिति शून्य होये ॥२॥
तुम्ही नांगीकारितां पूजन । कांहीं न घेतां बळिदान । गेल्या हा आश्रम होईल शून्य । यालागी कृपा करून पूजा घ्यावी ॥३॥
आश्रमा आलिया अतिथी । तो पूज्य सर्वांस सर्वार्थी ।अतिथि आश्रमी जे पूजिती । ते आश्रमकीर्ति शिव वानी ॥४॥
व्याही रुसलिया पायां पडती । तेवीं विमुख जातां अतिथि । जे वंदोनियां सुखी करिती । ते सुख पावती स्वानंदें ॥५॥
व्याही रुसलिया कन्या न धाडी । अतिथि रुसलिया पुण्यकोडी । पूर्वापार जे कां जोडी । तेही रोकडी क्षयो पावे ॥६॥
वैकुंठीं ज्याची निजस्थिति । तो त्या आश्रमा ये नित्य वस्ती । जे आश्रमी अतिथि । पूजिती प्रीती ब्रह्मात्मभावें ॥७॥
ऐसें बोलिला तयांप्रती । परी माझी हे अगाध शांति । हेही नारायणाचे चित्तीं । गर्वस्थिति असेना ॥८॥
ऐक राया अतिअपूर्व । असोनि निजशांति अनुभव । ज्याच्या ठायीं नाहीं गर्व । तोचि देवाधिदेव निश्चयेंसीं ॥९॥
जो नित्य नाचवी सुरनरांसी । ज्या भेणें तप सांडिजे तापसीं । त्या अभय देवोनि कामक्रोधांसी । आपणापासीं राहविलीं ॥११०॥
इत्थं ब्रुवत्यभयदे नरदेव देवाः सव्रीडनम्रशिरसः सघृणं तमूचुः । नैतद्विभो त्वयि परेऽविकृते विचित्रं स्वारामधीरनिकरानतपादपद्मे ॥९॥
(राजा, याप्रमाणे अभय देणारा प्रभू नारायण बोलला असता, लज्जेने मस्तक लववून, त्या दयाघनाला मदनादिक म्हणाले, ‘हे विश्वव्यापका, स्वस्वरूपाचे ठिकाणी रमणारे असंख्य ब्रह्मवेत्ते तुझ्या पदकमलांना वंदन करतात विकृतिरहित व मायेचे पलीकडे तुझे स्वरूप असल्याने, तुझ्या ठिकाणी ही शांती आश्चर्यकारक नाही!’॥९॥)
एवं अभय देत नारायण । स्वमुखें बोलिला आपण । तेणें कामादि अप्सरागण । लाजा विरोन अधोमुख झालीं ॥११॥
देखोनि निर्विकार पूर्ण क्षमा । श्रीनारायण हा परमात्मा । कळों सरलें वसंतादि कामा । त्याचाचि महिमा वर्णिती स्वयें ॥१२॥
ऐकें नरदेव चक्रवर्ती । विदेहा सार्वभौमा भूपती । त्या नारायणाची निजस्तुती । कामादि करिती सद्भावेंसीं ॥१३॥
जे सदा सर्वांतें छळिती । त्यांहीं देखिली पूर्ण शांति । तेचि शांतीची स्तुति करिती । नारायणाप्रती कामक्रोध ॥१४॥
जेणें संतोषे श्रीनारायण । त्यासी कृपा उपजे पूर्ण । ऐशिया परीचे स्तवन । मांडिलें संपूर्ण परमार्थबुद्धीं ॥१५॥
जयजय देवाधिदेवा । तुझिया अविकारभावा । पाहतां न देखों जी सर्वा । देवांमानवांमाझारीं ॥१६॥
‘मज कामाचेनि घायें । ब्रह्मा कन्येसी धरूं जाये । पराशरा केलें काये । भोगिली पाहें दिवा दुर्गंधा ॥१७॥
ज्यातें योगी वंदिती मुगुटीं । जो तापसांमाजी धूर्जटी । तो शिवु लागे मोहिनीपाठीं । फिटोनि लंगोटी वीर्य द्रवलें ॥१८॥
विष्णु वृंदेच्या श्मशानीं । धरणें बैसे विषयग्लानीं । अहल्येची काहणी । वेदी पुराणीं वर्णिजे ॥१९॥
नारदु नायके माझी गोष्टी । त्यासी जन्मले पुत्र साठी । माझी साहों शके काठी । ऐसा बळिया सृष्टी असेना ॥१२०॥
जो ब्रह्मचाऱ्यांमाजी राजा । हनुमंतु मिरवी पैजा । तयास्तव मकरध्वजा । संगेंवीण वोजा जन्मविला म्यां ॥२१ ॥
कलंकिया केला चंद्र । भगांकित केला इंद्र । कपाटी घातला षण्मुख वीर । जो लाडका कुमर महेशाचा ॥२२॥
मज मन्मथाचा यावा । न साहवे देवां दानवां । मा तेथ इतरां मानवां । कोण केवा साहावयासी ॥२३॥
मज जाळिलें महेशें । त्यासी म्या अनंगें केलें पिसें । नवल धारिष्ट तुझ्या ऐसें । पाहतां न दिसे तिहीं लोकीं ॥२४॥
त्या मज कामा न सरतें केलें । शांतीचे कल्याण पाहालें । हे तुवांचि एकें यश नेलें । स्वभावा जिंकलें निजशांतियोगें ॥२५॥
तो मी न सरता केला काम । क्रोधा आणिला उपशम । वासनेचा संभ्रम । नित्य निर्भ्रम त्वां केला ॥२६॥
हे नारायणा तुझी निष्ठा । न ये आणिकां तपोनिष्ठां । केला अनुभवाचा चोहटा । शांतीचा मोठा सुकाळु केला ॥२७॥
मागें तपस्वी वाखाणिले । म्हणती कामक्रोधां जिंकिलें । त्यांसीही आम्ही पूर्ण छळिलें । ऐक तें भलें सांगेन ॥२८॥
कपिलाऐसा तेजोराशी । क्रोधे तत्काळ छळिलें त्यासी । शापु देतांचि सगरासी । तोही क्रोधासी वश्य झाला ॥२९॥
कोपु आला नारदासी । वृक्ष केलें नलकूबरांसी । गौतमें अहल्येसी । कोपें वनवासी शिळा केली ॥१३०॥
जो सर्वदा विघ्नातें आकळी । त्या विघ्नेशातें क्रोध छळी । तेणें अतिकोपें कोपानळीं । चंद्रासी तत्काळी दिधला शाप ॥३१॥
कोपु आला दुर्वासासी । शाप दिधला अंबरीषासी । देवो आणिला गर्भवासासी। क्रोधे महाऋषी छळिले ऐसे ॥३२॥
जे दुजी सृष्टी करूं शकती । तेही कामक्रोधे झडपिजेती । सागरीं पडे इंद्रसंपत्ती । हे क्रोधाची ख्याति पुराणप्रसिद्ध ॥३३॥
इतरांची गोठी कायसी । क्रोधे छळिलें ईश्वरासी । तेणें दीक्षिता द्विजदक्षासी । शिरच्छेदासी करविता झाला ॥३४॥
जेथ मी कामु स्वयें वसें । तेथ क्रोध वसे सावकाशें । काम क्रोध असतचि नसे । नारायणा ऐसें तुवां केलें ॥३५॥
हे परमाद्भुत तुझें वीर्य । आणिकां एवढें नाहीं धैर्य । यालागीं तुझें परिचर्य । सदा मुनिवर्य सेविती चरण ॥३६॥
शांतीच्या चाडे देवाधिदेवा । जे नित्य करिती तुझी सेवा । ते कामक्रोधादिस्वभावा । स्मरतां तंव नांवा जिंकिती सुखें ॥३७॥
जेथ सन्माने काम पुरत । तेथ आदरें अनुग्रहो करित । काम सन्माने जेथें अतृप्त । तेथें शाप देत अतिक्रोधे ॥३८॥
यालागीं शापानुग्रहसमर्थ । ते सर्वदा कामक्रोधयुक्त । परी नवल तुझें सत्त्वोचित । केले अंकित कामक्रोध ॥३९॥
मज गर्व नाहीं सर्वथा । हेही तुज नाहीं अहंता । छळवाद्यां द्यावी लघुता । अथवा उपेक्षता न करिसी ॥१४०॥
पृथ्वी दुःखी करिती नांगरी । ते पिकोनि त्यांतें सुखी करी । तेवीं अपकाऱ्यां जो उपकारी । तो मोक्षाच्या शिरीं मुगुटु ॥४१॥
तुजमाजी निर्विकार शांति । हे नवल नव्हे कृपामूर्ति । तुझ्या स्वरूपाची स्थिति । आजि निश्चिती कळली आम्हां ॥४२॥
तूं निर्गुण निरुपम । मायातीत पूर्ण ब्रह्म । तुझें स्वभावें स्मरतां नाम । सकामाही काम स्पर्शों न शके ॥४३॥
जो नित्य स्मरे तुझें नाम । त्यासी मी कामचि करीं निष्काम । क्रोधचि करी क्रोधा शम । मोहो तो परम प्रबोध होय ॥४४॥
जे धीर वीर निजशांतीं । ज्यांसी परमानंदें नित्य तृप्ति । ऐशियांचिया अमित पंक्ति । पायां लागती तुझिया ॥४५॥
तुज करावया नमस्कारु । पुढे सरसे महासिद्धांचा संभारु । त्यांसही न लभे अवसरु । तूं परात्परु परमात्मा ॥४६॥
तुझिया सेवकांकडे । विघ्न रिघतां होय बापुडें । तें रिघावया तुजपुढे । कोण्या परिपाडें रिघेल ॥४७॥

७१४.जन तरी देखें गुंतलें प्रपंचें । स्मरण ते त्यांचे त्यांसी नाहीं ॥१॥
म्हणऊनि मागे परतलें मन । घालणीचे रान देखोनिया ॥ध्रु॥
इंद्रियांचा गाजे गोंधळ ये ठायीं । फोडीतसे डोई अहंकार ॥३॥
तुका म्हणे देवा वासनेच्या आटे । केली तळपटें बहुतांची ॥४॥
७१५.धांवे त्यासी फावे। दुजे उगवूनि गोवे॥१॥
घ्यावें भरूनियां घर। मग नाहीं येरझार ॥ध्रु॥
धणी उभे केलें । पुंडलिकें या उगलें ॥३॥
तुका म्हणे ठसा। गेला पडोनियां ऐसा ॥४॥
७१६.लहानपण दे गा देवा! । मुंगी साखरेचा रवा ॥१॥
ऐरावत रत्न थोर । त्यासी अंकुशाचा मार ॥ध्रु॥
ज्याचे अंगी मोठेपण । तया यातना कठीण ॥३॥
तुका म्हणे जाण । व्हावें लहानाहुनि लहान ॥४॥
७१७.नीचपण बरवें देवा । न चले कोणाचाही दावा ॥ध्रु॥
महापुरें झाडें जाती । तेथे लव्हाळे राहती ॥२॥
येतां सिंधूच्या लहरी । नम्र होतां जाती वरी ॥३॥
तुका म्हणे कळ । पाय धरिल्या न चले बळ ॥४॥
७१८.उष्ट्या पत्रावळी करूनियां गोळा । दाखविती कळा कवित्वाची ॥१॥
ऐसे जे पातकी ते नरकी पचती। जोवरी भ्रमती चंद्रसूर्य ॥२॥
तुका म्हणे एका नारायणा ध्याईं । वरकडा वाही शोक असे ॥३॥
७१९.आवडीच्या मते करिती भोजना । भोग नारा-यणा म्हणती केला ॥१॥
अवघा देव म्हणे वेगळें तें काई । अर्थासाठी डोई फोडूं पाहे ॥ध्रु॥
लाजे कमंडलु धरितां भोपळा । आणीक थीगळा प्रावरणासी ॥३॥
शाला गडवे धातु द्रव्य इच्छा चित्तीं । नैश्वर्य बोलती अवघे मुखें ॥४॥
तुका म्हणे त्यास देवा नाहीं भेटी । ऐसे कल्पकोटी जन्म घेतां ॥५॥
७२०.म्हणवितां हरिदास कां रे नाहीं लाज । दीनासी ‘महाराज’ म्हणसी हीना ॥१॥
काय ऐसे पोट न भरेसें झालें? । हालविसी कुले सभेमाजीं ॥२॥
तुका म्हणे पोंटें केली विटंबना । दीन झाला जना कीव भाकी ॥३॥
७२१.रिद्धिसिद्धि दासी कामधेनु घरीं । परि नाहीं भाकरी भक्षावया ॥१॥
लोडें बालिस्ते पलंग सुपत्ति । परि नाहीं लंगोटी नेसावया ॥२॥
पुसाल तरि आम्हां वैकुंठींचा वास । परि नाही राह्यास ठाव कोठे ॥३॥
तुका म्हणे आम्ही राजे त्रैलोक्याचे । परि नाहीं कोणाचें उणे पुरें ॥४॥
७२२.घरोघरी अवघे झालें ब्रह्मज्ञान । परि मेळवण बहु माजीं॥१॥
निरें कोणापाशी होय एक रज। तरि द्या रे मज दुर्बळासी ॥ध्रु॥
आशा तृष्णा माया कालवूनि दोन्हीं । दंभ तो दुरोनि दिसतसे ॥३॥
काम क्रोध लोभ शिणवी बहुत । मेळवूनि आंत काळकूट ॥३॥
निंदा अहंकार द्वेष बहु फार । माजी वरी धूर सारीयेला ॥५॥
तुका म्हणे तेथे काही हातां न ये । आयुष्य मोलें जाय वायांविण ॥६॥
७२३.अवघ्या भूतांचें केलें संतर्पण। अवघीच दान दिली भूमि ॥१॥
अवघाचि काळ दिनरात्रशुद्धि । साधियेला विधि पर्वकाळ ॥ध्रु॥
अवघींच तीर्थें व्रतें केले याग । अवघेचि सांग झाले कर्म ॥३॥
अवघेचि फळ आले आम्हां हातां । अवघेचि अनंता समर्पिलें ॥४॥
तुका म्हणे आतां बोलों अबोलणें । कायावाचामनें उरलों नाहीं ॥५॥
७२४.महुरा ऐसी फळें नाहीं । आली कांहीं गळती ॥१॥
पक्वदशे येती थोडी । नास आढी वेंचें तों ॥२॥
विरळा पावें विरळा पावें । अवघड गोवे शेवटीचे ॥ध्रु॥
उंच नीच परिवार देवी । धन्या ठावी चाकरी ॥४॥
झळके, तेथे पावे आणी । ऐसे क्षणी बहु थोडे ॥५॥
पावेल तो पैल थडी । म्हणों गडी आपुला ॥६॥
तुका म्हणे उभाऱ्याने । खरे कोण मानितसे ॥७॥
७२५.अवघ्या उपचारा । एक मनचि दातारा! ॥१॥
घ्यावी घ्यावी माझी सेवा । दीन दुर्बळाची देवा! ॥ध्रु॥
अवघियाचा ठाव । पायांवरी जीवभाव ॥३॥
चित्ताचे आसन । तुका करितों कीर्तन ॥४॥
७२६.आळी सलगी पायांपाशीं । होईल तैसी करीन ॥१॥
आणीक आम्ही कोठे जावें? । येथे जीवें वेंचलों ॥ध्रु॥
अवघ्या निरोपणा भाव । हाचि ठाव उरलासे ॥३॥
तुका म्हणे पाळी लळे । कृपाळुवे विठ्ठले! ॥४॥
७२७.देह आणि देहसंबंधे निंदावीं । इतरें वंदावीं श्वान-शूकरें ॥१॥
येणें नांवें झाला मी माझ्याचा झाडा । मोह नांवें खोडा गर्भवास ॥ध्रु॥
गृह आणि वित्त स्वदेहा विटावें । इतरा भेटावें श्वापदा झाडां ॥३॥
तुका म्हणे ‘मी’ हे ‘माझें’ न यो वाचे । येणें नांवें साचे साधुजन ॥४॥
७२८.देवाचिये माथां घालूनियां भार । सांडी कलेवर ओंवाळूनि ॥१॥
नाथिला हा छंद अभिमान अंगीं । निमित्याचे वेगीं सारी ओझें ॥ध्रु॥
करुणावचनीं लाहो एकसरें । नेदावे दुसरें आड येऊ ॥३॥
तुका म्हणे सांडी लटिक्याचा संग । आनंद तो मग प्रगटेल ॥४॥
७२९.देह नव्हे ‘मी’ हे सरे । उरला उरे विठ्ठल ॥१॥
म्हणऊनि लाहो करा । काळ सारा चिंतनें ॥ध्रु॥
पाळणाची नाही चिंता । ठाव रिता देवाचा ॥३॥
तुका म्हणे जीवासाटीं । देव पोटीं पडेल ॥४॥
७३०.पृथक मी सांगों किती । धर्म नीती सकळां ॥१॥
अवघियांचा एक ठाव । शुद्ध भाव विठ्ठलीं ॥ध्रु॥
क्षरा अक्षराचा भाग । करा लाग पंढरीये ॥३॥
तुका म्हणे आगमींचें । मथिले साचे नवनीत ॥४॥
७३१.पुण्यविकरा तें मातेचे गमन । भाडी ऐसे धन विटाळ तो ॥१॥
आत्महत्यारा हा विषयांचा लोभी । म्हणावें तें नाभी, करवी दंड ॥ध्रु॥
नागवला अल्प लोभाचिये साठीं । घेऊनि कांचवटी परिस दिला ॥३॥
तुका म्हणे हात झाडिलें परत्रीं । श्रम तोचि श्रोत्रीं ठेवी केली ॥४॥
७३२.अंतरींचें ध्यान । मुख्य या नांवें ‘पूजन’ ॥१॥
उपाधि ते अवघे ‘पाप’ । गोड निरसतां संकल्प ॥ध्रु॥
आज्ञा पाळावी हा ‘धर्म’ । जाणते हो जाणा वर्म ॥३॥
तुका म्हणे वृत्ति । अविट हे सहज स्थिति ॥४॥
७३३.मूळ कारण सत्ता। नाहीं मिळत उचिता ॥१॥
घडे कासयाने सेवा । सांग ब्रह्मांडाच्या जीवा! ॥ध्रु॥
सागर सागरीं । सामावेसी कैंची थोरी? ॥३॥
तुका म्हणे भावें । ‘शरण’ म्हणवितां बरवें ॥४॥

संपूर्ण वारकरी प्रस्थानत्रयी नित्यनेम पारायण अनुक्रमणिका


ग्रंथ

2 thoughts on “दिवस – ४५. वारकरी प्रस्थानत्रयी नित्यनेम पारायण”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Page Reader Press Enter to Read Page Content Out LoudPress Enter to Pause or Restart Reading Page Content Out LoudPress Enter to Stop Reading Page Content Out LoudScreen Reader Support
error: Content is protected !!
Scroll to Top