
अनुक्रमणिका
या कुन्देन्दुतुषारहारधवला या शुभ्रवस्त्रावृता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना ।
या ब्रह्माच्युतशङ्करप्रभृतिभिर्देवै: सदा वन्दिता सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापहा ॥
जयांचे केलिया स्मरण । होय सकळ विद्यांचे अधिकरण । तेचि वंदूं श्रीचरण । श्रीगुरूंचे ॥१॥
ते नमस्कारोनि आता ॥
श्रीगणेशाय नमः । श्रीसरस्वत्यै नमः । श्रीविठ्ठलाय नमः ।
श्रीमातापितृभ्यां नमः । श्रीगुरुभ्यो नमः ॥
ॐ नमो भगवते वासुदेवाय ।
रामकृष्णहरि । रामकृष्णहरि । रामकृष्णहरि ॥
श्रीज्ञानेश्वरी नित्यनेम पारायण
क्रमश: नित्यनेम पारायण
अध्याय – ५. ओवी क्र. १ ते २५
अध्याय पाचवा
मागा सकळ कर्मांचा संन्यासु । तुम्हींचि निरोपिला होता बहुवसु । तरी कर्मयोगीं केवी अतिरसु । पोखीतसां पुढती? ॥२॥
ऐसे द्व्यर्थ हे बोलतां । आम्हा नेणतयांच्या चित्ता । आपुलिये चाडें, श्रीअनंता । उमजु नोहे ॥३॥
ऐकें, एक-साराते बोधिजे । तरी एकनिष्ठचि बोलिजे । हे आणिकीं काय सांगिजे । तुम्हांप्रति? ॥४॥
तरी याचिलागी तुमते । म्या राउळासि विनविले होते । जे- “हा परमार्थु ध्वनितें । न बोलावा’ ॥५॥
परी मागील असो, देवा । आतां प्रस्तुती उकलु देखावा । सांगें, दोहीमाजि बरवा । मार्ग कवणु ॥६॥
जो परिणामींचा निर्वाळा । अचुंबितु ये फळा । आणि अनुष्ठितां, प्रांजळा । सावियाचि ॥७॥
जैसे निद्रेचे सुख न मोडे । आणि मार्गू तरी बहुसाल सांडे । तैसे सुखासना सांगडे । सोहपे होय ॥८॥
येणे अर्जुनाचेनि बोले । देवो मनीं रिझले । मग, “होईल; ऐकें’ म्हणितले । संतोषोनियां ॥९॥
देखा, कामधेनु ऐसी माये । सदैवा जया होये । तो चंद्रुही परी लाहे । खेळावया ॥१०॥
पाहे पां, श्रीशंभूची प्रसन्नता । तया उपमन्युचिया आर्ता । काय, क्षीराब्धि दूधभाता । देइजेचिना? ॥११॥
तैसा औदार्याचा कुरुठा । श्रीकृष्णु आपु जाहलिया सुभटा । कां सर्व सुखांचा वसौटा । तोचि नोहावा? ॥१२॥
एथ चमत्कारू कायसा? । गोसावी श्रीलक्ष्मीकांताऐसा । आतां आपुलिया सवेसा । मागावा कीं! ॥१३॥
म्हणौनि अर्जुने म्हणितले । तें हांसोनि येरे दिधले । तेंचि सांगेन; बोलिले । काय, कृष्णे ॥१४॥
तरी जाणानेणां सकळां । हा कर्मयोगु कीर प्रांजळा । जैसी नाव स्त्रियां बाळां । तोयतरणी ॥१६॥
तैसे सारासार पाहिजे । तरी सोहपा हाचि देखिजे । येणे संन्यासफळ लाहिजे । अनायासें ॥१७॥
आतां, याचिलागी सांगेन । तुज, संन्यासियाचे चिन्ह । मग सहजें हे अभिन्न । जाणसी तूं ॥१८॥
आणि “मी-माझे’ ऐसी आठवण । विसरले जयाचे अंतःकरण । पार्था, तो संन्यासी जाण । निरंतर ॥२०॥
जो मने ऐसा जाहला । संगी तोचि सांडिला । म्हणौनि, सुखें सुख पावला । अखंडित ॥२१॥
आतां गृहादिक आघवे । तें कांही नलगे त्याजावे । जे, घेतें जाहले स्वभावें । नि:संगु, म्हणौनि ॥२२॥
देखें, अग्नि विझोनि जाये । मग जे राखोंडी केवळु होये । तैं ते कापूसें गिवसुं ये । जयापरी ॥२३॥
तैसा, असतेनि उपाधी । नाकळिजे तो कर्मबंधी । जयाचिये बुद्धी । संकल्पु नाहीं ॥२४॥
म्हणौनि कल्पना जै सांडे । तैचि गा संन्यासु घडे । इयें कारणें दोनी सांगडे । संन्यास; योगु ॥२५॥
॥ पुंडलिकवरदा हरी विठ्ठल श्रीज्ञानदेव तुकाराम ॥
श्रीएकनाथी भागवत
क्रमश: नित्यनेम पारायण
अध्याय – ४, ओवी क्र. १४८ ते १९३
श्रीगणेशाय नमः ॥ श्रीसरस्वत्यै नमः ॥ श्रीगुरुभ्यो नमः ॥ श्रीदत्तात्रेयाय नमः ॥ श्रीरुक्मिणीपाण्डुरङ्गाभ्यां नमः ॥
(अर्थ – स्वर्गसुखाचा मोह टाकून सर्वोत्कृष्ट असे तुझे स्थान प्राप्त करून घेण्याचा जे साधक प्रयत्न करतात त्यांच्या मार्गामध्ये देवांकडून अनेक अडथळे आणले जातात परंतु सकाम बुद्धीने यज्ञामध्ये हवन करून जे देवादिकांना त्यांचा भाग अर्पण करतात त्यांना देव त्रास देत नाहीत. तू भक्तरक्षक असल्याने, विघ्नांचे मस्तकावर पाय देऊन तुझ्या उपासकाचे तू रक्षण करतोस. ॥१०॥)
हृदयींचा गुप्त करोनि काम । बाह्य जप-तप-भक्तिसंभ्रम । ऐसे जे का शठ परम । विघ्नांचा आक्रम त्यांवरी चाले ॥४९॥
ते आमची विघ्नस्थिति । न चले तुझिया भक्तांप्रती । तूं रक्षिता भक्तपति । तेथें विघ्नांची गति पराङ्मुख सदा ॥१५०॥
माझिया निजभक्तांसी । विघ्नें कैंची म्हणसी त्यांसी । ऐक त्याही अभिप्रायासी । सांगेन तुजपासीं देवाधिदेवा ॥५१॥
पावावया निजपदातें । लाता हाणून स्वर्गभोगातें । जे नित्य निष्काम भजती तूंतें । नाना विघ्नें त्यांतें सुरवर रचिती ॥५२॥
‘उलंघूनियां आमुतें । हे पावती अच्युतपदातें’ । यालागी सुरवर त्यातें । अतिविघ्नांतें प्रेरिती ॥५३॥
बळी नेदूनि आम्हांसी । हे जाऊ पाहती पूर्णपदासी । येणें क्षोमें इंद्रादिक त्यांपासीं । नाना विघ्नांसी मोकलिती ॥५४॥
या लागी त्यांच्या भजनापासीं । विघ्ने छळू धांवतीं आपैसीं । विघ्नीं अभिभव नव्हे त्यांसी। तूं हृषीकेशी रक्षिता ॥५५॥
सांडूनि सकाम कल्पना । जे रतले तुझ्या चरणा । त्यांस आठही प्रहर जाणा । तूं नारायणा रक्षिसी ॥५६॥
भक्त विघ्नीं होती कासाविसी । धांव धांव म्हणती हृषीकेशी। तेव्हां तूं धांवण्या धावसी । निष्ठुर नव्हसी नारायणा ॥५७॥
विघ्न न येतां भक्तांपासीं । आधीच भक्तसंरक्षणासी । तूं भक्तांचे चौंपासीं । अहर्निशीं संरक्षिता ॥५८॥
विघ्न छळू धांवे सकोप । तंव विघ्नीं प्रगटे तुझें स्वरूप । यालागी भक्तांसी अल्प । विघ्नप्रताप बाधूं न शके ॥५९॥
कामें छळावें हरिभक्तांसी । तंव हरि कामाचा हृदयवासी । तेव्हां विघ्नचि निर्विघ्न त्यांसी । भय भक्तांसी स्वप्नीं नाहीं ॥१६०॥
विघ्न उपजवी विरोधु । तंव विरोधा सबाह्य गोविंदु । मग विरोध तोचि महाबोधु । स्वानंदकंदु निजभक्तां ॥६१॥
ज्यासी तुझ्या चरणीं भावार्थु । त्यासी विघ्नीं प्रगटे परमार्थु । ऐसा भावबळें तूं समर्थु । साह्य सततु निजभक्तां ॥६२॥
यापरी समर्थ तूं संरक्षिता । ते जिणोनि विघ्नां समस्तां । पाय देऊनि इंद्रपदमाथां । पावती परमार्था तुझिया कृपें ॥६३॥
देवो संरक्षिता ज्यासी । विघ्ने छळू धांवती त्यासी । मा सकामाची गती कायसी । विदेहा म्हणसी तें ऐक ॥६४॥
विषयकाम धरोनि मनीं । इंद्रादि देवां बळिपूजनीं । जे भजले यागयजनीं । देव त्यांलागोनी न करिती विघ्न ॥६५॥
इंद्र याज्ञिकांचा राजा । सकाम याज्ञिक देवांच्या प्रजा । यज्ञभाग अर्पिती वोजा । पावल्या बळिपूजा न करिती विघ्न ॥६६॥
म्हणसी कामादिक विटंबिती । ते निष्काम कदा नातळती । सहज कामा वश असती । सदा कर्मे करिती सकाम ॥६७॥
जे मज कामासी वश होती । ते तप वेंचोनि भोग भोगिती । जे आतुडले क्रोधाच्या हातीं । ते वृथा नागवती तपासी ॥६८ ॥
(अर्थ – कित्येक तपस्वी (तुझे भक्त नसलेले) भूक, तहान, ऊन, पाऊस, थंडी, वारा वगैरे सहन करून जिह्वा व विषयवासनांचा प्रचंड सागर तरून जातात परंतु क्रोधरूपी गायीच्या पावलाच्या ठशात साठलेल्या अल्प पाण्यात बुडून जाऊन, एवढी मोठी केलेली दुर्धर तपश्चर्या फुकट घालवितात. (तुझे एकांतिक भक्त क्रोधाला बळी पडत नाहीत.)॥११॥)
क्षुधे तृषेतें नेमूनी । जिव्हा शिश्न आकळोनी । मज कामातें जिंतिले मानूनी । निष्कामाभिमानी उन्मत्त ॥१७०॥
अल्प अपमानाहातीं । जे क्रोधासी वश होती । ते शाप देऊनि तपसंपत्ती । व्यर्थ नागविती निजनिष्ठा ॥७१॥
सकामाच्या अनुष्ठाना । मज कामसंगें स्रक्चंदना । भोग भोगिती स्वर्गांगना । अमृतपाना प्राशिती ॥७२॥
त्या मज कामातें उपेक्षिती । आणि क्रोधासी वश होती । ते निजतपा नागवती । शापदीप्ति अनुवादें ॥७३॥
जे अपार सागर तरती । ते गोष्पदोदकी बुडती । तेवीं मज कामातें जिणोनि जाती । तेही नागविजेति निजक्रोधे ॥७४॥
मज कामाची अपूर्ण कामवृत्ति । तेचि क्रोधाची दृढ स्थिति । काम क्रोध अभक्तां बाधिती । हरिभक्तांप्रती तें न चले ॥७५॥
तुझ्या भक्तांप्रती जाण । न चले कामक्रोधादि बंधन । तो तूं भक्तपति नारायण । तुज आमुचें कामपण केवीं बाधी ॥७६॥
नेणतां तुझा महिमा । आम्ही करूं आलों निजधर्मा । तुजपासीं नित्य निजक्षमा । पुरुषोत्तमा कृपाळुवा ॥७७॥
(अर्थ – याप्रमाणे मदनादिक बोलत असताना, भगवान नारायणाने आपल्या योगसामर्थ्याने, वस्त्रप्रावरणे व अलंकार यांनी सुशोभित व स्वत: नारायणाच्या सेवेत रममाण असलेल्या अनेक सौंदर्यसंपन्न ललना निर्माण केल्या. ॥१२॥)
सांगोनियां आपुली स्थिती । कामादिक स्तुति करिती । तंव परमाश्चर्य देखती । स्त्रिया अत्यद्भुती अकस्मात ॥७९ ॥
स्वरूप वैभव अळंकार । श्रियेहूनियां सुंदर । सेवेलागी अतितत्पर । सदा सादर सावधानें ॥१८०॥
नवल लाघव नारायणा । कैसें यां दाखविलें विंदाना । त्या स्त्रियांखाली स्वर्गांगना । दिवा खद्योत जाणा तैशा दिसती ॥८१॥
(अर्थ – साक्षात लक्ष्मीप्रमाणे दिव्य ललना पाहून त्यांच्या अलौकिक रूपाने मदनादिक देवसेवकांचा मद उतरला व त्यांच्या अंगाच्या सुगंधाने ते मोहूनही गेले. ॥१३ ॥)
भ्रमर विसरले झणत्कार । कोकिळा विसरल्या पंचम स्वर । प्राण विसरला संचार । देवानुचर भुलले ॥८३॥
देखोनि त्यांचिया स्वरूपासी । अप्सरा दिसती जैशा दासी । अत्यंत लज्जा झाली त्यांसी । काळिमेसी उतरल्या ॥८४॥
त्यांचे अंगींचा सुगंध वातु । तेणें भुलला वसंतु । मलयानिल झाला भ्रांतु । त्यांचा अंगवातु लागतां ॥८५॥
नारायणाची विद्या कैसी। जे भुलवू आले आपणासी । भुली पाडिली तयांसी । योगमायेसी दावूनि ॥८६॥
सुंदरत्वें रंभा तिलोत्तमा । जिया मंदरमथनी जिंतिलिया रमा । रमेहूनियां उत्तमा । उत्तमोत्तमा अतिरूपें ॥८७॥
(अर्थ – देवदेवाधिपती भगवान नारायण किंचित हसल्यासारखे करून म्हणाले, ‘हे देवसेवकहो! तुम्हांला अनुरूप वाटेल व स्वर्गाला भूषण ठरेल अशी एक ललना घेऊन जा.’ ॥१४॥)
आम्हीं अवश्य पूजावें तुम्हांसी । कांहीं अर्पावें बलिदानासी । संतोषावया इंद्रासी । यांतील एकादी दासी अंगीकारा तुम्ही ॥८९॥
यांचे सौंदर्य अतिथोर । म्हणाल होईल अपमानकर । तुम्हांसमान जे सुंदर । तिचा अंगीकार करावा तुम्हीं ॥१९० ॥
म्हणाल यांत नाही हीन । अवघ्या सौंदर्ये संपूर्ण । कोणी न दिसे आम्हांसमान । केवी आपण अंगीकारावी ॥९१॥
जरी नाहीं तुम्हांसमान । सकळ सौंदर्ये अतिसंपन्न । तरी एकीचे करावें वरण । होईल भूषण स्वर्गासी ॥९२॥
ऐसें नारायणाचे वचन । ऐकोनि हरिखली संपूर्ण । करूनियां साष्टांग नमन । मस्तकी वचन वंदिलें ॥९३॥
॥ पुंडलिकवरदा हरी विठ्ठल श्रीज्ञानदेव तुकाराम ॥
श्रीतुकाराम महाराजांची गाथा
अभंग क्र.७३४ ते ७५२
झाले आम्हांसी जीवन । धणीवरी हे सेवन ॥ध्रु॥
सोपे आणि गोड । किती अमृताही वाढ ॥३॥
तुका म्हणे अच्युता! । आमुचा कल्पतरु दाता ॥४॥
ऐसियाचा हो कां संग । जिवलग संतांचा ॥ध्रु॥
मिष्टा-न्नाचा योग भुके । म्हणतां चुके ‘पुरेसें’ ॥३॥
तुका म्हणे माते बाळा । कळवळा भेटीचा ॥४॥
असो-नियां नसे कथे । मूर्ख अभागी तें तेथें ॥ध्रु॥
निरर्थक कारणीं । कान डोळे वेंची वाणी ॥३॥
पापाचे सांगाती । तोंडी ओढाळांचे माती ॥४॥
हिताचिया नांवें । वोस पडिले देहभावें ॥५॥
फजीत करूनि सोडी । तुका करी बोडाबोडी ॥६॥
येतो हिताचा कळवळा। पडती हातीं म्हणूनि काळा ॥ध्रु॥
नाहीं कोणी सखा । आम्हां निपराध पारिखा ॥३॥
उपक्रमें वदें । तुका वर्मासी तें भेदे ॥४॥
समाधीचे सुख सांडा ओवाळूनि। ऐसा या कीर्तनी ब्रह्मरस॥ध्रु॥
पुढती घडे चढतें सेवन आगळे। भक्तिभाग्य बळें निर्भरता॥३॥
उपजोंचि नये संदेह चित्तासी । मुक्ति चारी दासी हरिदासांच्या ॥४॥
तुका म्हणे मन पावोनि विश्रांती । त्रिविध नासती ताप क्षणें॥५॥
अल्प महदा नव्हे सरी । विटाळ तो भेद धरी ॥ध्रु॥
काय खंडिली भूमिका । वर्णा पायरीकां लोकां ॥३॥
तुका म्हणे आगीविण । बीज वेगळे तों भिन्न ॥४॥
तहान भुके आठवण । घडे तें बरें चिंतन ॥ध्रु॥
देखावी निश्चिंती । तेचि अंतर श्रीपती ॥३॥
वैभव सकळ । तुका मानितों विटाळ ॥४॥
झालों उदासीन देहीं । एकाविण चाड नाहीं ॥ध्रु॥
अर्थ अनर्था-सारिखा । करूनि, ठेविला पारिखा ॥३॥
उपाधि वेगळा । तुका राहिला सोंवळा ॥४॥
केलें हरिकथेनें वांज। अंतरोनि जातें निज॥ध्रु॥
काम संसार । अंतरीं हे करकर ॥३॥
तुका म्हणे हेंड। ऐसे मानिती ते लंड॥४॥
नलगे कांहीं चाचपावें। जातों भावें पेरीत ॥ध्रु॥
भांडार त्या दातियाचें। मी कैंचें ये ठायीं ॥३॥
सादावीत जातों तुका । येथे एकाएकी तो ॥४॥
जेणे पाविजे उद्धार । तेथें राखावें अंतर ॥ध्रु॥
गुंफोनि चावटी । तेथे कोण लाभ भेटी? ॥३॥
तुका म्हणे काळ । देवाविण अमंगळ ॥४॥
व्यभिचारीचा टाकमटिका। उपहास होती लोकां ॥ध्रु॥
शूरत्वाची वाणी। रूप मिरवे मंडणीं ॥३॥
तुका म्हणे जिणें । शर्तीविण लाजिरवाणे ॥४॥
जा रे चाळवीं बापुडीं । कोण धरितील ती गोडी ॥ध्रु॥
रिद्धि-सिद्धि देसी । आम्ही चुंभळी नव्हों तैसीं ॥३॥
तुका म्हणे ठका । ऐसें नागविले लोकां ॥४॥
वरी ठेवूं दे मस्तक । ठेलों जोडोनि हस्तक ॥ध्रु॥
बरवें करीं सम । नकों भंगों देऊ प्रेम ॥३॥
तुका म्हणे चला । पुढती सामोरे विठ्ठला ॥४॥
विषय तो त्यांचा झाला नारायण । नावडे जन धन माता पिता ॥ध्रु॥
निर्वाणी गोविंद असे मागें पुढें । कांहींच सांकडे पडों नेदी ॥३॥
तुका म्हणे सत्य कर्मा व्हावें साह्य । घातलिया भय नरका जाणे ॥४॥
नारायण विश्वंभर विश्वपिता । प्रमाण तो होतां सकळ मिथ्या ॥ध्रु॥
रवि नुगवे तो दीपिकांचें काज । प्रकाशें तें तेज सहज लोपे ॥३॥
तुका म्हणे देहसंबंधे संचितें । कारण निरुते नारायणीं ॥४॥
एक परि पडिलें भागीं । फळ बीजाचिये अंगीं । धन्य तोचि जगीं । आदि अंत सांभाळी ॥ध्रु॥
अावश्यक तो शेवट । येर अवघी खटपट । चालों जाणे वाट । ऐसा विरळा एखादा ॥३॥
तुका होवोनि निराळा । क्षरा अक्षरा वेगळा । पाहें निगमकळा । बोलें विठ्ठलप्रसादें ॥४॥
तुझी वर्मे तूंचि दावूनि अनंता । होतोसी नेणता, कोण्या गुणें? ॥ध्रु॥
यज्ञाचा भोक्ता, तरि कां नव्हे सांग? । उणें पडतां अंग, क्षोभ घडे ॥३॥
वससील तूं या भूतांचे अंतरीं । तरि का भेद हरी दावियेला? ॥४॥
तप तीर्थाटणे तुझी मूर्तिदान । तरि का अभिमान आड येतो? ॥५॥
आतां क्षमा कीजे विनवितो तुका । देऊनियां हाका उभा द्वारीं ॥६॥
पेटली सकळ कांति रोमावळी । नावरे हे होळी दहन झाले ॥ध्रु॥
फुटोनियां दोन्ही भाग होऊ पाहे । पाहातोसी काय हृदय माझें? ॥३॥
घेऊनि जीवन धांवें लवलाहीं । कवणाचें कांहीं न चले येथें ॥४॥
तुका म्हणे माझी तूं होसी जननी । आणिक निर्वाणी कोण राखे? ॥५॥
॥ पुंडलिकवरदा हरी विठ्ठल श्रीज्ञानदेव तुकाराम ॥
संपूर्ण वारकरी प्रस्थानत्रयी नित्यनेम पारायण अनुक्रमणिका
ज्यांना प्रत्यक्षात ग्रंथावरून पारायण करायचे आहे त्यांनी खालील लिंकवरून ग्रंथ मागवावे.






