अनुक्रमणिका
या कुन्देन्दुतुषारहारधवला या शुभ्रवस्त्रावृता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना ।
या ब्रह्माच्युतशङ्करप्रभृतिभिर्देवै: सदा वन्दिता सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापहा ॥
जयांचे केलिया स्मरण । होय सकळ विद्यांचे अधिकरण । तेचि वंदूं श्रीचरण । श्रीगुरूंचे ॥१॥
ते नमस्कारोनि आता ॥
श्रीगणेशाय नमः । श्रीसरस्वत्यै नमः । श्रीविठ्ठलाय नमः ।
श्रीमातापितृभ्यां नमः । श्रीगुरुभ्यो नमः ॥
ॐ नमो भगवते वासुदेवाय ।
रामकृष्णहरि । रामकृष्णहरि । रामकृष्णहरि ॥
श्रीज्ञानेश्वरी नित्यनेम पारायण
क्रमश: नित्यनेम पारायण
अध्याय – ७. ओवी क्र. १९१ ते शेवट
ऐसें वरचिलीचि बरवा११. बाह्य सौंदर्यानें
। सुख जावों लागलें फावा२२. आनंद वाढू लागला
। तंव रसस्वादाचिया हांवा३३. इच्छा
। लाहो४४. अति त्वरा
केला ॥१९१॥
झडकरी अनुमानाचेनि करतळें । घेऊनि तियें वाक्य फळें । प्रतीतिमुखीं एके वेळे । घालूं पाहे ॥१९२॥
तंव विचाराचिया रसना न दाटती११. दडपत नाहींत
। परी हेतूच्या दशनीं२२. दातांनीं
न फुटती । ऐसें जाणौनि, सुभद्रापती । चुंबिचिना३३. ओंठास लावीना
! ॥१९३॥
मग, चमत्कारला, म्हणे । “इयें जळींचीं मां तारांगणें । कैसा झकविलों११. फसलों
असलगपणें२२. सुगमपणानें
। अक्षरांचेनि ॥१९४॥
इयें पर्दे नव्हती; फुडिया११. खरोखर, स्पष्ट
। गगनाचिया घडिया ! । येथ आमुची मति बुडालिया२२. बुडाली
। थावो३३. अंत, थांग
न निघे ॥१९५॥
वांचूनि, जाणावयाची कें११. कोठें
गोठी?”। ऐसें जीवीं कल्पूनि किरीटी । तिया पुनरपि केली दृष्टी । यादवेंद्रा ॥१९६॥
मग विनविलें सुभटें । “हां हो जी, ये एकवाटे११. एकत्र
। सातही पदें अनुच्छिष्टें२२. एकसारखी कधीही न ऐकलेली
। नवलें आहाती ॥१९७॥
एहवीं, अवधानाचेनि वहिलेपणें११. दूर राहण्याने, अभावाने, लक्ष्य न दिल्याने
। नाना प्रमेयांचें उगाणें२२. अनुभव, हिशेब
। काय श्रवणाचेनि आंगवणें३३. बळानें
। बोलों लाहाती४४. बोलतां येणार नाहींत
? ॥१९८॥
परी तैसें हैं नोहेचि देवा । देखिला अक्षरांचा मेळावा११. जमाव
। आणि विस्मयाचिया जीवा । विस्मयो जाला ॥१९९॥
कानाचेनि गवाक्षद्वारें११. झरोक्यांतून
। बोलाचे रश्मी२२. किरण
अभ्यंतरें -। पाहेना, तंव चमत्कारें । अवधान ठकलें३३. कुंठित झाले, चकित झाले
॥२००॥
तेवींचि अर्थाची चाड मज आहे । तें सांगतांही वेळु न साहे । म्हणौनि, निरूपण लवलाहें । कीजो; देवा!” ॥२०१॥
ऐसा मागील पडताळा११. प्रत्यंतर
घेउनी । पुढां अभिप्राय दृष्टी सूनी२२. शिरवून, घालून
। तेवींचि माजीं शिरऊनी । आर्ती आपुली ॥२०२॥
कैसी पुसती पाहें पां, जाणिव । भिडेचि तरी लंघो नेदीं शिंव११. सीमा, मर्यादा
। एहवीं श्रीकृष्ण हृदयासि खेंव२२. आलिंगन देण्यास
। देवों सरला३३. प्रवृत्त झाला
॥२०३॥
अहो श्रीगुरुतें जैं पुसावें । तैं येणें मानें११. याप्रमाणें
सावध होआवें । हैं, एकचि जाणें, आघवें । सव्यसाची ॥२०४॥
आतां तयाचें तें प्रश्न करणें । वरी सर्वज्ञ श्रीहरीचें बोलणें । हें संजयो आवडलेपणें११. प्रेमानें, आवडीनें
। सांगैल कैसें ! ॥२०५॥
तिये अवधान द्यावें गोठी । बोलिजेल नीट महऱ्हाठी । जैसी कानाचे आधीं दिठी । उपेगा जाये ॥२०६॥
बुद्धीचिया जिभा । बोलाचा न चाखतां गाभा११. सार
। अक्षरांचिया भांबा२२. शोभेनें
। इंद्रियें जिती३३. जगतात, नवजीवन मिळते
॥२०७॥
पाहा पां, मालतीचे११. मोगरीचे
कळे । घ्राणासि२२. नाकाला
कीर वाटले परिमळें । परि वरचिया३३. बाहेरच्या
बरवा४४. सुरेखपणानें
काइ डोळे । सुखिये नव्हती ? ॥२०८॥
तैसें देशियेचिया११. मराठी भाषेच्या
हवावा२२. शोभेनें
। इंद्रियें करिती राणिवा३३. राज्य
। मग प्रमेयाचिया गांवा । लेसां४४. अनायासे
जाइजे ॥२०९॥
ऐसेनि नागरपणें११. चांगुलपणानें, रसालंकारात्मक सुंदर रीतीने
। बोलु निमे तें बोलणें२२. जेथें वाचा पोहोचत नाहीं तें शब्दांत ऐकून घ्या
-। ऐका; ज्ञानदेवो म्हणे । निवृत्तीचा ॥२१०॥
इति श्रीज्ञानदेवविरचितायां भावार्थदीपिकायां सप्तमोऽध्यायः ॥७॥
॥ पुंडलिकवरदा हरी विठ्ठल श्रीज्ञानदेव तुकाराम ॥
श्रीएकनाथी भागवत
क्रमश: नित्यनेम पारायण
अध्याय – ८, ओवी क्र. ४१ ते ९७
श्रीगणेशाय नमः ॥ श्रीसरस्वत्यै नमः ॥ श्रीगुरुभ्यो नमः ॥ श्रीदत्तात्रेयाय नमः ॥ श्रीरुक्मिणीपाण्डुरङ्गाभ्यां नमः ॥
समुद्राची गुरुलक्षणे (४१ ते ६८)
मुनिः प्रसन्नगम्भीरो, दुर्विगाह्यो दुरत्ययः ।
अनन्तपारो ह्यक्षोभ्यः स्तिमितोद इवार्णवः ॥५॥
श्लोकार्थ – मुनीने बाहेर शांत असून अंतःकरणात प्रसन्न असावे. त्याचे मनोगत अनाकलनीय असावे. त्याचा अपमान कोणीही करणार नाही अशी तेजस्विता त्याचे ठायी असावी. तरून जाण्यास कठीण अशा समुद्राप्रमाणे अफाट, निर्विकार आणि शांत वृत्ती मुनीने धारण करावी. ॥५॥
‘समुद्र’ जो गुरु करणें । त्याची परिस पां लक्षणें ।
गंभीरत्व पूर्णपणें । निर्मळ असणे इत्यादि ॥४१॥
समुद्र सदा सुप्रसन्न । योगी सदा प्रसन्नवदन ।
केव्हाही धुसमुशिलेपण११. अस्वस्थता
। नव्हे जाण निजबोधे ॥४२॥
मीनल्या सरितांचे समळ जळ । समुद्र डहुळेना अतिनिर्मळ ।
तैसीं नाना कर्में करितां सकळ । सदा अविकळ योगिया ॥४३॥
जळें गंभीर सागर । योगिया स्वानुभवें गंभीर ।
वेळा११. भरतीची मर्यादा, किनारा
नुल्लंघी सागर । नुल्लंघी योगीश्वर गुरुआज्ञा ॥४४॥
समुद्रीं न रिघवे भलत्यासी । तो बुडवी जळकल्लोळेंसीं ।
योगिया बुडवी संसारासी । भावें त्यापासीं गेलिया ॥४५॥
जो रिघणे निघणे११. (पा.भे. रिगती मार्गी)
जाणे जळीं । तो समुद्रीं करी आंघोळी ।
येरांसी लाटांच्या कल्लोळीं । कासाकुळी२२. कासाविस
करीतसे ॥४६॥
तैसीचि योगियासी । सलगी न करवे भलतियासी ।
आपभये भीती आपैसी । तो भाविकांसी सुसेव्य ॥४७॥
जाहल्या धनवंतु वेव्हारा । उपायीं नुल्लंघवे सागरा ।
तैसें नुल्लंघवे योगीश्वरा । नृपां सुरनरां किन्नरां ॥४८॥
मळु न राहे सागरीं । लाटांसरिसा टाकी दुरी ।
तैसाचि मळु योगियाभीतरीं । ध्याने निर्धारी न राहे ॥४९॥
समुद्री मीनली ताम्रपर्णी११. नदीचे नांव
। तेथ जाहली मुक्ताफळांची खाणी ।
योगिया मिनली श्रद्धा येऊनी । तेथ मुक्तखाणी मुमुक्षां ॥५०॥
जो समुद्रामाजी रिघोनि राहे । तो नानापरीची रत्ने लाहे ।
योगियांमाजीं जो सामाये । त्याचे वंदिती पाये चिद्रत्नें ॥५१॥
जैशी समुद्राची मर्यादा । कोणासी न करवे कदा ।
तैशी योगियांची मर्यादा । शास्त्रां वेदां न करवे ॥५२॥
प्रवाहेंवीण जळ । समुद्री जेवीं निश्चळ ।
मृत्युभयेंवीण अचंचळ । असे केवळ योगिया ॥५३॥
समुद्री प्रवाहो नव्हे काहीं । सदा पूर्ण ठायींच्या ठायीं ।
तैसें योगिया जन्ममरण नाहीं । परिपूर्ण पाहीं सर्वदा ॥५४॥
समुद्रलक्षणें साधितां । अधिक दशा आली हातां ।
ते योगियाची योग्यता । परिस तत्त्वतां सांगेन ॥५५॥
समुद्रामाजीं जळ । लाटांखालीं अतिचंचळ ।
योगिया अंतरीं अतिनिश्चळ । नाहीं तळमळ कल्पना ॥५६॥
समुद्र क्षोभे वेळोवेळे । योगिया क्षोभेना कवणें काळे ।
सर्वथा योगी नुचंबळे । योगबळे सावधु ॥५७॥
समुद्री भरतें पर्वसंबंधे । योगिया परिपूर्ण सदानंदें ।
समुद्रीं चढूवोहटू चांदें । योगिया निजबोधे सदा सम ॥५८॥
समुद्र सर्वांप्रति क्षार । तैसा नव्हे योगीश्वर ।
तो सर्वां जीवांसी मधुर । बोधु साचार पैं त्याचा ॥५९॥
जयासी बोधु नाहीं पुरता । अनुभव नेणे निजात्मता ।
त्यासी कैंची मधुरता । जेवीं अपक्कता सेंदेची११. सेंदाडाची
॥६०॥
सागरी वरुषल्या घन । वृथा जाये तें जीवन ।
तैसा योगिया नव्हे जाण । सेविल्या व्यर्थपण येवों नेदी ॥६१॥
अल्पही योगिया होये११. सेवा
घेता । तेणे निवारी भवव्यथा ।
यालागीं मुमुक्षी सर्वथा । भगवद्भक्तां भजावें ॥६२॥
समृद्धकामो हीनो वा, नारायणपरो मुनिः ।
नोत्सर्पेत न शुष्येत, सरिद्भिरिव सागरः ॥६॥
श्लोकार्थ – पावसाळ्यात नद्यांनी विपुल पाणी आणले अगर उन्हाळ्यात अल्प पाणी आणले तरी समुद्रात वाढ अगर घट दिसत नाही. त्याप्रमाणेच नारायणाचा एकनिष्ठ भक्त जो मुनी त्यानेही आपल्या इच्छा पूर्ण झाल्या म्हणून आनंदित होऊ नये अगर त्या शेवटास गेल्या नाहीत म्हणून खिन्न होऊ नये. ॥६॥
वर्षाकाळी सरिता सकळ । घेऊनि आल्या अमूप जळ ।
तेणें हरुषेजेना प्रबळ । न चढे जळ जळाब्धीं ॥६३॥
ग्रीष्मकाळाचिये प्राप्ती । सरितांचे यावे११. प्रवाह
राहती ।
ते मानूनियां खंती । अपांपती वोहटेना ॥६४॥
तैसेंचि योगियांच्या ठायीं । नाना समृद्धि आलिया पाहीं ।
अहंता न धरी देहीं । गर्व कांहीं चढेना ॥६५॥
समृद्धि वेंचिलिया पाठीं । खंती नाहीं योगिया पोटीं ।
तो नारायणपर-दृष्टीं । सुखसंतुष्टी वर्ततु ॥६६॥
संपत्तीमाजी असतां । मी संपन्नु हे नाठवे चित्ता ।
दरिद्र आलिया दरिद्रता । नेणे सर्वथा योगिया ॥६७॥
दरिद्र आणि संपन्नता । दोन्ही समान त्याचिया चित्ता ।
नाहीं प्रपंचाची आसक्तता । नारायणपर तत्त्वतां निजबोधे ॥६८॥
पतंगाची गुरुलक्षणे (६९ ते ९०)
या प्रपंचाचा कठिण लागु११. संबंध
। नाशासी मूळ स्त्रीसंगु ।
येचिविषयीं गुरु पतंगु । केला चांगु परियेसीं ॥६९॥
दृष्ट्वा स्त्रियं देवमायां, तद्भावैरजितेन्द्रियः ।
प्रलोभितः पतत्यन्धे, तमस्यग्नौ पतङ्गवत् ॥७॥
श्लोकार्थ – ईश्वराची मूर्तिमंत मायाच असणाऱ्या स्त्रियेला पाहून आणि तिच्या शृंगारिक हावभावाने मोह पावून, इंद्रियाधीन पुरुष अग्नीच्या ज्वालांनी आकर्षिलेल्या पतंगाप्रमाणे फसतो. ॥७॥
दैवी११. देवाची
गुणमयी२२. त्रिगुणात्मक
जे माया । तिचे सगुणस्वरूप त्या स्त्रिया ।
तेथ प्रलोभ उपजला प्राणियां । भोग भोगावया स्त्रीसुखें ॥७०॥
हावभावविलासगुणीं । व्यंकट११. वाकड्या
कटाक्षांच्या बाणीं ।
पुरुषधैर्य कवच भेदोनी । हृदयभुवनीं संचरती ॥७१॥
दारुण११. कठोर
कटाक्षांच्या घायीं । पुरुषधैर्य पाडिलें ठायीं ।
योषिताबंदीं२२. स्त्रीपाशांनी
पाडिले पाहीं । भोग-कारागृहीं घातले ॥७२॥
स्त्रीभोगाचें जें सुख । तें जाण पां केवळ दुःख ।
तोंडी घालितां मधुर विख । परिपाकी११. परिणामी
देख प्राणांतु ॥७३॥
दीपाचिया अंगसंगा । कोण सुख आहे पतंगा? ।
बळें आलिंगू जातां पैं गा । मरणमार्गा लागले ॥७४॥
पुढिला पतंग निमाला११. मेलेला
देखती । तरी मागिल्यां दीपी अतिआसक्ती ।
तेवीं स्त्रीकामें एक ठकती२२. फसतात
। एकां अतिप्रीती पतंगन्यायें३३. पतंग दृष्टांताप्रमाणे
॥७५॥
तेवीं विवेकहीन मूर्खा । लोलुप्य११. अभिलाषा (पा.भे. लालुप्य)
उपजे स्त्रीसुखा ।
तत्संसर्गे मरण लोकां । न चुके देखा सर्वथा ॥७६॥
दीप-रूपाचेनि कोडें११. आसक्तीने
। पतंग जळोनि स्नेही बुडे ।
तेवीं स्त्रीसंगें अवश्य घडे । पतन रोकडे अंधतमीं२२. अंधतमनामक नरक
॥७७॥
योषिद्धिरण्याभरणाम्बरादिद्रव्येषु मायारचितेषु मूढः ।
प्रलोभितात्मा ह्युपभोगबुद्ध्या पतङ्गवन्नश्यति नष्टदृष्टिः ॥८॥
श्लोकार्थ – भगवंताच्या इच्छेने निर्माण केलेल्या स्त्री, सोन्याचे दागिने, सुंदर वस्त्रे इत्यादी पदार्थांचे ठिकाणी उपभोगाची लालसा वाढल्यामुळे लोभाने जो वेडा झाला आहे तो विवेकशून्य होऊन पतंगाप्रमाणे नाश पावतो. (म्हणून सुंदरतेला भुलू नये.)॥८॥
पहा पां कांता आणि सोनें । वस्त्रे आभरणे११. अलंकार
रत्ने ।
मायेनें रचिली पडणें२२. विकार, प्रकार, पदार्थ
। पतनाकारणें जनांच्या ॥७८॥
एकली योषिता नरकी घाली । सुवर्णलोभे नरकु बळी ।
रत्ने भूषणें तत्काळीं । नरकमेळी घालिती ॥७९॥
ते अवघेचि अनर्थकारी । मीनले योषिताशरीरीं ।
ते देखतांचि पुरंध्री११. सुंदर स्त्री
। जनांसी उरी मग कैंचेनि ?॥८०॥
अंगी वेताळसंचारा११. भूताचा प्रवेश
। त्यावरी पाजिलिया मदिरा ।
मग डुल्लत नाचतां त्या नरा । वोढावारा२२. आवर, धरबंध
पैं नाहीं ॥८१॥
कां भांडाचे११. भांडखोर, बडबडून भिकेवर निर्वाह करणारा
तोंडी भंडपुराण२२. बडबड, विसंगत बोलणे
। त्यावरी आला शिमग्याचा सण ।
मग करितां वाग्विटंबन । आवरी कोण तयासी?॥८२॥
हो कां मोहक मदिरा सर्वांसी । त्यांतु घातले उन्मादद्रव्यासी ।
सेवन करितां त्या रसासी । पारु११. मर्यादा
भ्रमासी पैं नाहीं ॥८३॥
तैसें सोलीव११. निव्वळ
मोहाचे रूप । तें जाण योषितास्वरूप ।
त्याहीवरी खटाटोप । वस्त्रे पडप२२. प्रावरणे
भूषणें ॥८४॥
काजळ कुंकू अलंकार । लेऊनि विचित्र पाटांबर११. उंची वस्त्रे, शालू-पैठणी इ.
।
वनिता शोभत सुंदर । मायेचे विकार विकारले२२. साकारले
॥८५॥
माया अजितेंद्रिया बाधी । दासांसंमुख नव्हे त्रिशुद्धी११. कालत्रयीही
।
ज्याची अतिप्रीती गोविंदीं । त्यासी कृपानिधि रक्षिता ॥८६॥
कैसा११. (पा.भे. कैशा)
रीतीं रक्षी भक्त । मूळी आत्मा आत्मी नाही तेथ ।
स्त्रीरूपें भासे भगवंत । भक्त रक्षित निजबोधे ॥८७॥
वनिता देखोनि गोमटी । विवेकाची होय नष्ट दृष्टी ।
प्रलोभे उपभोगा देती मिठी । ते दुःखकोटी भोगिती ॥८८॥
देखोनि दीपरूपीं झगमगी । उपभोगबुद्धि पतंगीं ।
उडी घालितां वेगीं । जळोनि आगीं नासती ॥८९॥
एवं योषितारूपें माया । उपभोगबुद्धी११. इच्छेने
भुलवी प्राणियां ।
जे विमुख हरीच्या पायां । त्यांसीच माया भुलवितु ॥९०॥
मधुमक्षिकेची गुरुलक्षणे (९१ ते ११७)
मधुकरीचेनि विंदाणे११. कौशल्याने, चातुर्याने
। ‘मधुकर’ म्यां गुरु करणे ।
दुःख नेदितां कार्य साधणे । तीहि लक्षणे परिस पां ॥९१॥
स्तोकं स्तोकं ग्रसेद्ग्रासं, देहो वर्तेत यावता ।
गृहानहिंसन्नातिष्ठेद्वृत्तिं माधुकरीं मुनिः ॥९॥
श्लोकार्थ – जोपर्यंत देह आहे तोपर्यंत कोणत्याही गृहाला (गृहस्थाला) पीडा न करता, मधुकरी (भ्रमराची) वृत्ती स्वीकारून थोडे थोडे अन्न ग्रहण करून मुनीने उपजीविका चालवावी. ॥९॥
भ्रमरु रिघोनि पुष्पामधीं । फूल तरी कुचुंबों नेदी ।
आपुली करी अर्थसिद्धी११. पराग सेवनाचे कार्य
। चोखट२२. चांगली
बुद्धि भ्रमराची ॥९२॥
तैसीच योगियाची परी । ग्रासमात्र घरोघरीं ।
भिक्षा करूनि उदर भरी । पीडा न करी गृहस्थां ॥९३॥
प्राणधारणेपुरतें११. जगण्यापुरती
। योगी मागे भिक्षेतें ।
समर्थ२२. श्रीमंत
दुर्बळ३३. गरीब
विभागातें । न मनूनि चित्तें सर्वथा ॥९४॥
रिघोनि कमळिणीपाशीं । भ्रमरु लोभला आमोदासीं११. सुगंधाला
।
पद्म संकोचे अस्तासी । तेंचि भ्रमरासी बंधन ॥९५॥
जो कोरडे काष्ठ भेदोनि जाये । तो कमळदळी गुंतला ठाये ।
प्रिया११. (कमलिनी)
दुखवेल म्हणौनि राहे । निर्गमु२२. बाहेर जाणे
न पाहे आपुला ॥९६॥
तैसाचि जाण संन्यासी । एके ठायीं राहिल्या११. (पा.भे. राहे)
लोलुप्येसीं ।
तेंचि बंधन होये त्यासी । विषयलोभासी गुंतला ॥९७॥
॥ पुंडलिकवरदा हरी विठ्ठल श्रीज्ञानदेव तुकाराम ॥
श्रीतुकाराम महाराजांची गाथा
अभंग क्र. १३१७ ते १३३१
१३१७.
चित्ता ऐसी नको देऊ आठवण । जेणे देवाचे चरण अंतरे११. दुरावणे
ते ॥१॥ आलिया वचन रामनाम ध्वनि । ऐकावी कानीं ऐसी गोडी ॥ध्रु॥ मत्सराचा२२. असूया, दोष, हेवा
ठाव३३. थांगपत्ता, मागमूस, भाव
शरीरी नसावा । लाभेविण जीवा दु:ख देतो ॥३॥ तुका म्हणे राहे अंतरीं४४. अंतःकरणात
शीतळ । शांतीचें तें बळ क्षमा अंगीं ॥४॥
१३१८.
कोण पुण्य कोणा गांठी११. पदरी
। ज्यासी ऐसियांची भेटी ॥१॥ जिहीं हरी धरिला मनीं । दिले संसारासी पाणी२२. निवृत्ती
॥ध्रु॥ कोण हा भाग्याचा । ऐसियासी बोले वाचा ॥३॥ तुका म्हणे त्याचे भेटी । होय संसारासी तुटी३३. निवृत्ती
॥४॥
१३१९.
तरीच हा जीव संसारी उदास११. अनासक्त
। धरीला विश्वास तुम्हां सोई२२. संबंधाने
॥१॥ एके जातीविण३३. समान जाती, स्वभावावाचून
नाही कळवळा४४. सहानुभूती, माया
। ओढिली गोपाळा सूत्रदोरी५५. प्रेमदोरी
॥ध्रु॥ फुटतसे प्राण६६. (वा.) अतिशय उत्कंठा, व्याकुळता असणे; मरणप्राय वेदना होणे
क्षणाच्या विसरें । हे तों परस्परें सारिखेंचि ॥३॥ तुका म्हणे चित्तीं राखिला अनुभव । तेणे हा संदेह निवारला ॥४॥
१३२०.
किती विवंचना११. काळजी, विचार
करीतसे जीवीं२२. मनात
। मन धावंडवी३३. धावायला लावणे, हिंडविणे
दाही दिशा ॥१॥ कोणा एका भावें४४. निमित्ताने
तुम्ही अंगीकार । करावा, विचार याचसाठी ॥ध्रु॥ इतर ते आतां लाभ तुच्छ झाले । अनुभवा आले गुणागुण५५. गुणदोष, केवळ दोषरूपत्व
॥३॥ तुका म्हणे लागो अखंड समाधि । जावें प्रेमबोधी६६. प्रेमात व ज्ञानात
बुडोनियां ॥४॥
१३२१.
दिकचि११. मर्यादा
या नाहीं संसारसंबंधा । तुटेना या बाधा२२. त्रास, दुःख
भवरोगाची३३. जन्ममरणरूप रोगाची
॥१॥ तांतडी४४. घाई
ते करी म्हणऊनि तांतडी । साधिली५५. संपादन केली
ते घडी६६. घटका
सोनियाची७७. (ल) उत्तम
॥ध्रु॥ संकल्पाच्या बीजें इंद्रियांची चाली८८. प्रवृत्ती
। प्रारब्ध तें घाली गर्भवासी ॥३॥ तुका म्हणे बीजें जाळुनी सकळ । करावें गोपाळें आपुले भाट९९. स्तुतिपाठक
॥४॥
१३२२.
आतां होईन धरणेकरी११. हट्ट धरून बसणारा
। भीतरीच कोंडीन ॥१॥ नाहीं केली जीवेंसाटीं२२. जीव अर्पण करणे
। तो३३. तर
कां गोष्टी रुचे४४. आवडणे, गोड लागणे
ते? ॥ध्रु॥ आधी निर्धार५५. निश्चय
तो सार६६. मुख्य
। मग भार सोसेना ॥३॥ तुका म्हणे खाऊं जेऊं । नेदूं होऊं वेगळा ॥४॥
१३२३.
होईल तरी पुसापुसी११. विचारपुस
। उत्तर२२. प्रतिउत्तर
त्यासी योजावें३३. व्यवस्था करणे
॥१॥ तोंवरी मी पुढे कांहीं । आपुलें नाहीं घालीत ॥ध्रु॥ जाणोनियां अंतर४४. मन
देव । जेव्हां, भेव५५. भीती
फेडिल ॥३॥ तुका म्हणे धरिल हातीं । करील खंती६६. (वा.) सांभाळ करील
वेगळें ॥४॥
१३२४.
हा तो नव्हे काही निराशेचा११. आशाभंग होणे, हताश
ठाव२२. ठिकाण
। भलें पोटीं३३. मनात
वाव४४. अवकाश, धीर
राखिलिया ॥१॥ विश्वंभरें विश्व सामाविलें५५. अंतर्भूत होणे, एकीभूत होणे
पोटीं । तेथेंचि शेवटी आम्ही असों ॥ध्रु॥ नेणतां चिंतन करितों अंतरीं । तेथें अभ्यंतरी६६. देवाच्या
उमटेल७७. अंतःकरणात
॥३॥ तुका म्हणे माझा स्वामी अबोलणा८८. अबोलका
। पुरवूं खुणे खुणा जाणतसों ॥४॥
१३२५.
निष्ठुर११. कठोर
तो दिसे निराकारपणें । कोवळा२२. कोमल, दयाळू
सगुणें प्रतिपाळी३३. पालन, संगोपन करतो
॥१॥ केलाच करावा केला कइवाड४४. निश्चय, एका पक्षाचे समर्थन (सगुण अथवा निर्गुण)
। होईल तें गोड५५. गोड
, न परतें६६. परतणे
॥ध्रु॥ मथिलिया लागे नवनीत हातां । नासे वितुळतां७७. वितळणे
आहाच८८. वरवरचे
तें ॥३॥ तुका म्हणे आतां मनाशी विचार । करावा तो सार एकचित्तें९९. एकाग्र मनाने
॥४॥
१३२६.
बहु देवा बरे झालें । नसतें गेलें सोंवळें११. सोंवळे
॥१॥ धोवटाशी२२. धोतराची
पडली गांठी । जगजेठी३३. जगाचा राजा
प्रसादें ॥ध्रु॥ गादल्याचा४४. गढूळ पाण्याचा
झाला झाडा५५. निवाडा
। गेली पीडा विकल्प६६. संशय
॥३॥ तुका म्हणे वरावरी७७. तात्काळ
। निर्मळ करी निर्मळा ॥४॥
१३२७.
स्वामित्वाचीं११. मालकपणाचे
वर्में२२. मर्म
असोनि जवळी । वाहों जावें मोळी३३. मोळी
गुणासवें४४. गुणांसह
॥१॥ काबाडापासूनि५५. कष्टापासून
सोडवा दातारा! । कांहीं नका भारा पात्र६६. पात्र
करूं ॥ध्रु॥ धनवंत्र्या-चिये७७. धन्वंतरीच्या
अंगीं सत्ताबळ । व्याधी८८. रोग
ते सकळ तोडावया ॥३॥ तुका म्हणे आले मोड्यासी९९. मोडकळीला
कोंपट१०१०. झोपडी
। सांडोव्याची११११. त्यागाची
वाट विसरावी ॥४॥
१३२८.
ऋणाच्या परिहारा११. निराकरणासाठी
झालों वोळगणा२२. सेवक
। द्यावी नारायणा वासलाती३३. हिशोब
॥१॥ झालों उतरायी शरीरसंकल्पें४४. शरीराच्या संकल्पाने
। चुकों५५. चुकणे
द्यावीं पापें सकळही ॥ध्रु॥ आजिवरी होतों धरूनि जीवासी । व्याजें६६. व्याजाने
कासाविसी७७. व्याकुळ
बहु केलें ॥३॥ तुका म्हणे मना आणिला म्यां भाव८८. भाव
। तुमचा तेथे ठाव९९. ठिकाण
आहे देवा ॥४॥
१३२९.
येणें पांगें११. पांग
पायांपाशीं । निश्चयेंसी राहेन ॥१॥ सांगितली करीन सेवा । सकळ देवा दासत्व ॥ध्रु॥ बंधनाची तुटली बेडी । हेचि जोडी२२. प्राप्ती
मग आम्हां ॥३॥ तुका म्हणे नव्हे क्षण । पायांविण वेगळा ॥४॥
१३३०.
आपुल्या आपण उगवा११. सुटणे
लिगाड२२. गुंता
। काय माझें जड३३. जड
करून घ्याल? ॥१॥ उद्धारासी काय उधाराचे४४. उधाराचे
काम? । वाढवूचि श्रम नये देवा! ॥ध्रु॥ करा आतां मजसाठी वाड५५. मोठे
पोट६६. पोट
। ठावें७७. माहित
नाहीं? तंट८८. तंटा
झालें लोकी ॥३॥ तुका म्हणे बाकी झडलियावरी९९. झडल्यावर
। न पडे व्यवहारी संचिताचे ॥४॥
१३३१.
सर्वसंगी११. सर्व संगाचा
वीट२२. कंटाळा
आला । तूं एकला आवडसी ॥१॥ दिली आतां पायीं मिठी । जगजेठी न सोडीं ॥ध्रु॥ बहु झालों खेदक्षीण३३. दुःखाने क्षीण
। येणे शीण तो नासे ॥३॥ तुका म्हणे गंगें वास४४. प्रतीक्षा
। बहु त्या आस५५. इच्छा
स्थळाची ॥४॥ ॥ पुंडलिकवरदा हरी विठ्ठल श्रीज्ञानदेव तुकाराम ॥
संपूर्ण वारकरी प्रस्थानत्रयी नित्यनेम पारायण अनुक्रमणिका
ज्यांना प्रत्यक्षात ग्रंथावरून पारायण करायचे आहे त्यांनी खालील लिंकवरून ग्रंथ मागवावे.
ग्रंथ
रामकृष्णहरी माऊली 🙏