दिवस – १६. वारकरी प्रस्थानत्रयी नित्यनेम पारायण

अनुक्रमणिका

देहिनोऽस्मिन् यथा देहे कौमारं यौवनं जरा । तथा देहान्तरप्राप्तिर्धीरस्तत्र न मुह्यति ॥१३॥

आइके, शरीर तरी एक । परी वयसा भेद अनेक । हें प्रत्यक्षचि देख । प्रमाण तूं ॥८॥ एथ कौमारत्व दिसे । मग तारुण्यीं तें भ्रंशे । परी देहचि न नाशे । एकेकासवें ॥९॥ तैसी चैतन्याच्या ठायीं । इयें शरीरांतरें होती, जाती, पाहीं । ऐसें जाणे तया नाहीं । व्यामोहदुःख ॥११०॥

मात्रास्पर्शास्तु कौन्तेय शीतोष्णसुखदुःखदाः । आगमापायिनोऽनित्यास्तांस्तितिक्षस्व भारत ॥१४॥

एथ नेणावया हेंचि कारण । जें-इंद्रियां अधीनपण । तिहीं आकळिजे अंतःकरण । म्हणऊनि भ्रमे ॥११॥ इंद्रिये विषय सेविती । तेथ हर्ष शोकु उपजती । ते अंतर आप्लविती । संगें येणें ॥१२॥ ज्यां विषयांच्या ठायीं । एकनिष्ठता कही नाहीं । तेथ दुःख आणि कांहीं । सुखही दिसे ॥१३॥ देखें शब्दाची व्याप्ति । निंदा आणि स्तुति । तेथ द्वेषाद्वेष उपजती । श्रवणद्वारें ॥१४॥ मृदु आणि कठिण । हे स्पर्शाचे दोन्ही गुण । जे वपूचेनि संगें, कारण । संतोष-खेदां ॥१५॥ भ्यासुर आणि सुरेख । हें रूपाचें स्वरूप देख । जें उपजवी सुख-दुःख । नेत्रद्वारें ॥१६॥ सुगंधु आणि दुर्गंधु । हा परिमळाचा भेदु । जो, घ्राणसंगें, विषादु । तोषु देता ॥१७॥ तैसाचि, द्विविध रसु । उपजवी प्रीति-त्रासु । म्हणौनि हा अपभ्रंशू । विषयसंगु ॥१८॥ देखें, इंद्रियां आधीन होईजे । तें शीतोष्णांतें पाविजे । आणि सुखदुःखीं आकळिजे । आपणपें ॥११९॥ या विषयावांचूनि कांहीं । आणीक सर्वथा रम्य नाहीं । ऐसा स्वभावोचि पाहीं । इंद्रियांचा ॥२०॥ हे विषय तरी कैसें? । रोहिणीचें जळ जैसें । कां, स्वप्नींचा आभासे । भद्रजाति ॥२१॥ देखें अनित्य तियापरी! । म्हणौनि तूं अव्हेरी । हा सर्वथा संगु न धरी । धनुर्धरा ॥२२॥

यं हि न व्यथयन्त्येते पुरुषं पुरुषर्षभ । समदुःखसुखं धीरं सोऽमृतत्वाय कल्पते ॥१५॥

हे विषय जयातें नाकळिती । तया सुखदुःखें दोन्ही न पवती । आणि गर्भवाससंगती । नाही तया ॥२३॥ तो नित्यरूप पार्था । वोळखावा सर्वथा । जो या इंद्रियार्था । नागवेचि ॥२४॥

नासतो विद्यते भावो नाभावो विद्यते सतः । उभयोरपि दृष्टोऽन्तस्त्वनयोस्तत्त्वदर्शिभिः ॥१६॥

आतां, अर्जुना, कांहीं एक । सांगेन मी; आईक । जे, विचारपर लोक । वोळखिती ॥२५॥ या उपाधिमाजी गुप्त । चैतन्य असे; सर्वगत । तें, तत्त्वज्ञ संत । स्वीकारिती ॥२६॥ सलिलीं पय जैसें । एक होउनि मीनलें असे । परी निवडूनि राजहंसें । वेगळें कीजे ॥२७॥ की, अग्निमुखें किडाळ । तोडोनिया; चोखाळ । निवडिती, केवळ । बुद्धिमंत ॥२८॥ नातरी, जाणिवेच्या आयणी । करितां दधिकडसणी । मग नवनीत, निर्वाणीं । दिसे जैसें ॥२९॥ कीं, भूस बीज एकवट । उपणितां, राहे घनवट । तेथ, उडे, तें फलकट! । जाणों आलें ॥१३०॥ तैसें, विचारितां निरसलें । तें प्रपंचु; सहजें सांडवलें । मग, तत्त्वतां तत्त्व उरलें । ज्ञानियांिस ॥३१॥ म्हणौनि अनित्याच्य़ा ठायीं । तयां आस्तिक्यबुद्धि नाहीं । जे, निष्कर्षु दोहींही । देखिला असे ॥३२॥


अर्पणभक्ती (३४६ ते ३५०)

कैसे कैसे भागवतधर्म । केवीं भगवंती अर्पे कर्म । हे अतिगुह्य उत्तमोत्तम । निजभजनवर्म ऐक राया ॥४६॥

कायेन वाचा मनसेन्द्रियैर्वा बुद्ध्यात्मना वाऽनुसृतः स्वभावात् । करोति यद्यत्सकलं परस्मै नारायणायेति समर्पयेत्तत् ॥३६॥

हेतुक अथवा अहेतुक । वैदिक लौकिक स्वाभाविक । भगवंती अर्पे सकळिक । या नांव देख ‘भागवतधर्म’ ॥४७॥ उदकी तरंग अतिचपळ । जिकडे जाय तिकडे जळ । तैसें भक्ताचें कर्म सकळ । अर्पे तत्काळ भगवंतीं ॥४८॥ ये श्लोकींचे व्याख्यान । पहिले मानसिक अर्पण । पाठी इंद्रिये बुद्धि अभिमान । कायिक जाण श्लोकान्वयें ॥४९॥ भागवतधर्माची निजस्थिती । मन बुद्धि चित्त अहंकृती । आदिकरूनि इंद्रियवृत्ती । भगवंती अर्पिती तें ऐक ॥३५०॥

भक्ती-मानसिक अर्पणभक्ती (३५१ ते ३६१)

बाधूं न शके स्वधर्मकर्म । ऐक राया त्याचे वर्म । मनी प्रगटला पुरुषोत्तम । अतिनिःसीम निजबोधे ॥५१॥ म्हणोनि संकल्पविकल्प । अवघे जाहले भगवद्रूप । यालागी भक्त नित्य निष्पाप । सत्यसंकल्प हरिदास ॥५२॥ जेवीं बुद्धिबळांचा खेळ । राजा प्रधान गजदळ । अवघे काष्ठचि केवळ । तेवीं संकल्प सकळ भगवद्रूप ॥५३॥ जो जो संकल्प कामी कामु । तो तो होय आत्मारामु । तेथ भजनाचा संभ्रमु । अतिनिःसीमु स्वयें वाढे ॥५४॥ जागृति सुषुप्ती स्वप्न । तिही अवस्था होय भजन । तेथ अखंड अनुसंधान । निजबोधे पूर्ण ठसावलें अंगीं ॥५५॥ मना होतां समाधान । समाधाने अधिक भजन । पूर्ण बाणलें अनुसंधान । ध्येय-ध्याता-ध्यान समरसें भजे ॥५६॥ तुर्या साक्षी उन्मनी । याही लाविल्या भगवद्भजनीं । जंववरी अवस्थापणीं । आपआपणी मुकल्या नाहीं ॥५७॥ ऐसा भावनेवीण उपजे भावो । तो तो तत्काळ होय देवो । मग अर्पणाचा नवलावो । न अर्पितां पहा हो स्वयें होय ॥५८॥ स्वरूपें मिथ्या केलें स्वप्न । जागृती सोलूनि काढिलें ज्ञान । निवडोनि सुषुप्तिसुखसमाधान । तिहींतें पूर्ण एकत्र केलें ॥५९॥ तये स्वरूपीं सगळें मन । स्वयेंचि करी निजात्मार्पण । तेथींचें सुखसमाधान । भक्त सज्ञान जाणती स्वयें ॥३६०॥ यापरी मानसिक जाण । सहज स्वरूपीं होय अर्पण । आतां इंद्रियांचे समर्पण । होय तें लक्षण ऐक राया ॥६१॥

भक्ती-इंद्रियकर्माचे अर्पण (३६२ ते ३९३)

दीपु लाविजे गृहाभीतरीं । तोचि प्रकाशे गवाक्षद्वारीं । तेवीं मनी प्रगटला श्रीहरी । तोचि इंद्रियांतरी भजनानंदु ॥६२॥ तेचि इंद्रियव्यापार । सांगिजती सविस्तर । स्वाभाविक इंद्रियव्यवहार । भजनतत्पर परब्रह्मीं ॥६३॥ जंव दृष्टि देखे दृश्यातें । तंव देवोचि दिसे तेथें । यापरी दृश्यदर्शनातें । अर्पी भजनसत्ते दृष्टीचा विषयो ॥६४॥ दृश्य द्रष्टा आणि दृष्टी । देखतां तिन्ही एकवटी । सहजें ब्रह्मार्पण ते दृष्टी । भक्त जगजेठी यापरी अर्पी ॥६५॥ दृश्य प्रकाशी दृश्यपणें । तेंचि दृष्टीमाजी होय देखणें । ऐसेनि अभिन्नपणें । दर्शनार्पणे भजती भक्त ॥६६॥ हे एकपणी तीनही भाग । तिन्हीमाजी एक अंग । ऐसे जें देखणे चांग । त्याचि अर्पणे साङ्ग सहजें अर्पी ॥६७॥ नाना पदार्थ प्रांजळे । नीच नवे देखती डोळे । परी अर्पणाचे सोहळे । निजात्ममेळे अर्पिती स्वयें ॥६८॥ यापरी दृष्टीचे दर्शन । भक्त करिती ब्रह्मार्पण । आतां श्रवणाचें अर्पण । अर्पी ते लक्षण ऐक राया ॥६९॥ जो बोलातें बोलविता । तोचि श्रवणी झाला श्रोता । तोचि अर्थावबोधु जाणता । तेथें ब्रह्मार्पणता सहजेंचि ॥३७०॥ शब्दु शब्दत्वे जंव उठी । तंव शब्दविता प्रगटे पाठींपोटीं । तेणें अकृत्रिम भजन उठी । ब्रह्मार्पणमिठी श्रवणीं पडे ॥७१॥ शब्दबोलासवें अर्थवाढी । तंव शब्दविता घे शब्दार्थगोडी । तेणें हरिभजनीं आवडी । स्वयें उठी गाढी श्रवणार्पणेसीं ॥७२॥ शब्द जंव कानी पडे । तंव शब्दार्थे भजन वाढे । बोलवित्याच्या अंगा घडे । अर्पण उघडे करितांचि ॥७३॥ बोलासी जो बोलविता । त्यासीं दृढ केली एकात्मता । तें भजन चढे श्रवणाच्या हाता । ब्रह्मार्पणता निजयोगें ॥७४॥ सद्गुरुवचन पडतां कानीं । मनाचे मनपण विरे मनीं । तेंचि श्रवण ब्रह्मार्पणीं । भगवद्भजनीं सार्थकता ॥७५॥ श्रवणेंचि यापरी श्रवण । करितां उठिलें ब्रह्मार्पण । हेतुरहित भगवद्भजन । स्वभावें जाण स्वयें होत ॥७६॥ भजने तुष्टला जगन्निवास । होय वासाचा निजवास । मग घ्राणद्वारा परेश । भोगी सुवास ब्रह्मार्पणेंसीं ॥७७॥ जो सुमना सुमनपण जोडी । तो घ्राणाचेही घ्राण होय आवडी । मग नाना सुवासपरवडी । ब्रह्मार्पणप्रौढी निजभोग अर्पी ॥७८॥ वासाचा अवकाश होय आपण । घ्राणी ग्राहकपणे जाण । तो भोगुचि स्वयें संपूर्ण । कृष्णार्पण सहज होतु ॥७९॥ रसना रस सेवू जाये । तंव रसस्वादु देवचि होये । मग रसनेमाजीं येऊनि राहे । ब्रह्मार्पणे पाहे रसभोगवृत्ती ॥३८०॥ जे जे रसना सेवी गोडी । ते ते हरिरूपें धडफुडी । स्वादा येऊनि रोकडी । ब्रह्मार्पणपरवडी निजभोग अर्पी ॥८१॥ रस-रसना-रसस्वादु । त्रिविधभेदें निजअभेदु । रससेवनी परमानंदु । स्वानंदकंदु वोसंडे ॥८२॥ कटु मधुर नाना रस । रसना सेवी सावकाश । परी तो अवघा ब्रह्मरस । स्वादी सुरस परमानंदु ॥८३॥ यापरी रसीं रसना । भोगें रतली कृष्णार्पणा । आतां स्पर्शविषयरचना । अर्पे ब्रह्मार्पणा तें ऐक राया ॥८४॥ स्पर्श घेइजे निजदेहीं । तंव देहींच प्रगटे विदेही । मग स्पर्शी जें जें कांहीं । तो तो भोगु पाहीं ब्रह्मार्पणे उठी ॥८५॥ स्पर्शास्पर्शे जें स्पर्शिजे । तंव स्पर्शावया नाडळे दुजें । तेणें एकपणाचेनि व्याजें । कृष्णार्पणवोजें भजन प्रगटे ॥८६॥ तेथ जो जो घेईजे पदार्थु । तो तो पदार्थु होय समर्थु । तेणेंचि भजनें परमार्थु । निजस्वार्थ निजभक्तां ॥८७॥ द्यावया कांहीं देवा जाये । तंव देतां भजन कैसे होये । देते घेतें दान स्वयें । देवोचि होये निजांगें ॥८८॥ जेउतें जेउतें चालवी पाये । तो तो मार्गु देवोचि होये । मग पाउलापाउलीं पाहे । निजभजन होये ब्रह्मार्पणेंशीं ॥८९॥ चरणा चरणा निजगती । तोचि निजांगें क्षितीची क्षिती । चालतां तैशिया युक्ती । सहज ब्रह्मस्थिति निजकर्मे अर्पी ॥३९०॥ बोल बोलवितिया वदनीं भेटी । बोलणे लाजे त्याचिया दृष्टी । ते लाज गिळून बोलणें उठी । निजभजनपुष्टी ब्रह्मार्पणेसीं ॥९१॥ शब्द मावळे निःशब्दीं । निःशब्दचि बोलिजे शब्दीं । तोचि अर्पणाचा विधी । जाण त्रिशुद्धी समर्पितेनिशीं ॥९२॥ बोलु बोलविता बोलाआंतु । तो बोलु अर्पणेसींच येतु । ऐसा शब्देचि भजनार्थु । प्रकटे परमाथु ब्रह्मार्पणेंसीं ॥९३॥


२२६.ध्याईन तुझें रूप गाईन तुझें नाम । आन न करी काम जिव्हा मुखें ॥१॥ पाहीन तुझे पाय ठेवीन मी डोई । पृथक तें कांहीं न करी आन ॥ध्रु॥ तुझेचि गुणवाद आइकेन कानीं । आणिकांची वाणी पुरे आतां ॥३॥ करीन सेवा करें चालेन मी पायीं । आणीक न वजे ठायी तुजविण ॥४॥ तुका म्हणे जीव ठेवीन मी पायीं । आणिक ते कांहीं देऊं कवणा? ॥५॥
२२७.माझें चित्त तुझे पायीं । राहे, ऐसें करीं कांहीं । धरोनियां बाहीं । भव हा तारी दातारा ॥१॥ चतुरा तूं शिरोमणि। गुणलावण्याची खाणी। मुकुट सकळां मणि । धन्य तूंचि विठोबा ॥ध्रु॥ करी तिमिरांचा नाश । उदयो होऊनि प्रकाश। तोडी आशापाश । करीं वास हृदयीं ॥३॥ पाहे गुंतलों नेणतां । माझी असो तुम्हा चिंता । तुका ठेवी माथा । पायीं आतां राखावें ॥४॥
२२८.आमुचें उचित हेचि उपकार । आपुलाचि भार घालूं तुज ॥१॥ भूक लागलिया भोजनाची आळी । पांघुरण काळी शीताचिये ॥ध्रु॥ जेणें काळी उठी मनाची आवडी । तेचि मागों घडी आवडे तें ॥३॥ दु:ख येवो नेदी आमुचिया घरा । चक्र करी फेरा भोंवताला ॥४॥ तुका म्हणे नाहीं मुक्तीसवें चाड । हेचि आम्हां गोड जन्म घेतां ॥५॥
२२९.मी दास तयाचा, जया चाड नाहीं । सुख दुःख दोहीं विरहित जो ॥१॥ राहिलासे उभा भीवरेचे तीरीं । कट दोहीं करीं धरोनियां ॥ध्रु॥ नवल काय तरी पाचारितां पावे । न स्वरित धांवे भक्तिकाजें ॥३॥ सर्व भार माझा त्यासी आहे चिंता । तोचि माझा दाता स्वहिताचा ॥४॥ तुका म्हणे त्यास गाईन मी गीतीं । आणीक तें चित्तीं न धरी काहीं ॥५॥
२३०.यासी कोणी म्हणे ‘निंदेची उत्तरें’। नागवला खरें तोचि एक ॥१॥ आडवाट जातां लावी नीट सोई । धर्म-नीति तेही ऐसी आहे ॥ध्रु॥ नाइकतां सुखें करावें ताडण। पाप नाहीं, पुण्य असे फार ॥३॥ जन्म व्याधि फार चुकतील दु:खें । खंडावा हा सुखें मान त्याचा ॥४॥ तुका म्हणे निंब दिधल्यावांचून । अंतरींचा शीण कैसा जाय? ॥५॥
२३१.निवडे, जेवण शेवटींच्या घांसें । होय त्याच्या ऐसें सकळही ॥१॥ न पाहिजे झाला बुद्धीचा पालट । केली खटपट जाय वायां ॥ध्रु॥ संपादिले व्हावें धरिलें तें सोंग । विटंबणा व्यंग पडिलिया ॥३॥ तुका म्हणे वर्म नेणतां जो रांधी । पाववी ते बुद्धि अवकळा ॥४॥
२३२.दिली हाक मनें नव्हतें जतन । वेगळाले गुण धांव घेती ॥१॥ काम क्रोध मद मत्सर अहंकार । निंदा हिंसा फार माया तृष्णा ॥ध्रु॥ इंद्रियांचे भार फिरतील चोर । खाणे घ्यावया घर फोडूं पाहे ॥३॥ माझा येथे कांहीं न चले पराक्रम । आहे त्याचे वर्म तुझे हातीं ॥४॥ तुका म्हणे आतां करितों उपाय । जेणें तुझे पाय आतुडती ॥५॥
२३३.कृष्ण माझी माता कृष्ण माझा पिता । बहिणी बंधु चुलता कृष्ण माझा ॥१॥ कृष्ण माझा गुरु कृष्ण माझा तारूं । उतरीं पैलतीरू भवनदीचा ॥ध्रु॥ कृष्ण माझें मन कृष्ण माझें जन । सोइरा सज्जन कृष्ण माझा ॥३॥ तुका म्हणे माझा श्रीकृष्ण विसांवा । वाटे न करावा परता जीवा ॥४॥
२३४.जातो वाराणसी । निरवी गाई घोडे म्हैसी ॥१॥ गेलों येतों नाहीं ऐसा । सत्य माना रे भरंवसा ॥ध्रु॥ नका काढूं माझी पेवें । तुम्ही वरळा भूस खावें ॥३॥ भिकारियाचे पाठीं । तुम्ही घेऊनि लागा काठी ॥४॥ सांगाल जेवाया ब्राह्मण । तरी कापाल माझी मान ॥५॥ वोक-लिया वोका। म्यां खर्चिला नाहीं रुका॥६॥ तुम्हीं खावें ताकपाणी । जतन करा माझें लोणी ॥७॥ नाहीं माझें मनीं । पोरें रांडा नागवणी॥८॥ तुका म्हणे नष्ट। होतें तैसें बोले स्पष्ट ॥९॥

संपूर्ण वारकरी प्रस्थानत्रयी नित्यनेम पारायण अनुक्रमणिका


ग्रंथ

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Page Reader Press Enter to Read Page Content Out LoudPress Enter to Pause or Restart Reading Page Content Out LoudPress Enter to Stop Reading Page Content Out LoudScreen Reader Support
error: Content is protected !!
Scroll to Top