
अनुक्रमणिका
- श्रीज्ञानेश्वरी नित्यनेम पारायण क्रमश: नित्यनेम पारायण अध्याय – २. ओवी क्र. १०८ ते १३२
- श्रीएकनाथी भागवत क्रमश: नित्यनेम पारायण अध्याय – २, ओवी क्र. ३४६ ते ३९३
- अर्पणभक्ती (३४६ ते ३५०)
- भक्ती-मानसिक अर्पणभक्ती (३५१ ते ३६१)
- भक्ती-इंद्रियकर्माचे अर्पण (३६२ ते ३९३)
- श्रीतुकाराम महाराजांची गाथाअभंग क्र. २२६ ते २३४
- ग्रंथ
या कुन्देन्दुतुषारहारधवला या शुभ्रवस्त्रावृता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना ।
या ब्रह्माच्युतशङ्करप्रभृतिभिर्देवै: सदा वन्दिता सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापहा ॥
जयांचे केलिया स्मरण । होय सकळ विद्यांचे अधिकरण । तेचि वंदूं श्रीचरण । श्रीगुरूंचे ॥१॥
ते नमस्कारोनि आता ॥
श्रीगणेशाय नमः । श्रीसरस्वत्यै नमः । श्रीविठ्ठलाय नमः ।
श्रीमातापितृभ्यां नमः । श्रीगुरुभ्यो नमः ॥
ॐ नमो भगवते वासुदेवाय ।
रामकृष्णहरि । रामकृष्णहरि । रामकृष्णहरि ॥
श्रीज्ञानेश्वरी नित्यनेम पारायण
क्रमश: नित्यनेम पारायण
अध्याय – २. ओवी क्र. १०८ ते १३२
देहिनोऽस्मिन् यथा देहे कौमारं यौवनं जरा । तथा देहान्तरप्राप्तिर्धीरस्तत्र न मुह्यति ॥१३॥
आइके, शरीर तरी एक । परी वयसा भेद अनेक । हें प्रत्यक्षचि देख । प्रमाण तूं ॥८॥ एथ कौमारत्व दिसे । मग तारुण्यीं तें भ्रंशे । परी देहचि न नाशे । एकेकासवें ॥९॥ तैसी चैतन्याच्या ठायीं । इयें शरीरांतरें होती, जाती, पाहीं । ऐसें जाणे तया नाहीं । व्यामोहदुःख ॥११०॥
मात्रास्पर्शास्तु कौन्तेय शीतोष्णसुखदुःखदाः । आगमापायिनोऽनित्यास्तांस्तितिक्षस्व भारत ॥१४॥
एथ नेणावया हेंचि कारण । जें-इंद्रियां अधीनपण । तिहीं आकळिजे अंतःकरण । म्हणऊनि भ्रमे ॥११॥ इंद्रिये विषय सेविती । तेथ हर्ष शोकु उपजती । ते अंतर आप्लविती । संगें येणें ॥१२॥ ज्यां विषयांच्या ठायीं । एकनिष्ठता कही नाहीं । तेथ दुःख आणि कांहीं । सुखही दिसे ॥१३॥ देखें शब्दाची व्याप्ति । निंदा आणि स्तुति । तेथ द्वेषाद्वेष उपजती । श्रवणद्वारें ॥१४॥ मृदु आणि कठिण । हे स्पर्शाचे दोन्ही गुण । जे वपूचेनि संगें, कारण । संतोष-खेदां ॥१५॥ भ्यासुर आणि सुरेख । हें रूपाचें स्वरूप देख । जें उपजवी सुख-दुःख । नेत्रद्वारें ॥१६॥ सुगंधु आणि दुर्गंधु । हा परिमळाचा भेदु । जो, घ्राणसंगें, विषादु । तोषु देता ॥१७॥ तैसाचि, द्विविध रसु । उपजवी प्रीति-त्रासु । म्हणौनि हा अपभ्रंशू । विषयसंगु ॥१८॥ देखें, इंद्रियां आधीन होईजे । तें शीतोष्णांतें पाविजे । आणि सुखदुःखीं आकळिजे । आपणपें ॥११९॥ या विषयावांचूनि कांहीं । आणीक सर्वथा रम्य नाहीं । ऐसा स्वभावोचि पाहीं । इंद्रियांचा ॥२०॥ हे विषय तरी कैसें? । रोहिणीचें जळ जैसें । कां, स्वप्नींचा आभासे । भद्रजाति ॥२१॥ देखें अनित्य तियापरी! । म्हणौनि तूं अव्हेरी । हा सर्वथा संगु न धरी । धनुर्धरा ॥२२॥
यं हि न व्यथयन्त्येते पुरुषं पुरुषर्षभ । समदुःखसुखं धीरं सोऽमृतत्वाय कल्पते ॥१५॥
हे विषय जयातें नाकळिती । तया सुखदुःखें दोन्ही न पवती । आणि गर्भवाससंगती । नाही तया ॥२३॥ तो नित्यरूप पार्था । वोळखावा सर्वथा । जो या इंद्रियार्था । नागवेचि ॥२४॥
नासतो विद्यते भावो नाभावो विद्यते सतः । उभयोरपि दृष्टोऽन्तस्त्वनयोस्तत्त्वदर्शिभिः ॥१६॥
आतां, अर्जुना, कांहीं एक । सांगेन मी; आईक । जे, विचारपर लोक । वोळखिती ॥२५॥ या उपाधिमाजी गुप्त । चैतन्य असे; सर्वगत । तें, तत्त्वज्ञ संत । स्वीकारिती ॥२६॥ सलिलीं पय जैसें । एक होउनि मीनलें असे । परी निवडूनि राजहंसें । वेगळें कीजे ॥२७॥ की, अग्निमुखें किडाळ । तोडोनिया; चोखाळ । निवडिती, केवळ । बुद्धिमंत ॥२८॥ नातरी, जाणिवेच्या आयणी । करितां दधिकडसणी । मग नवनीत, निर्वाणीं । दिसे जैसें ॥२९॥ कीं, भूस बीज एकवट । उपणितां, राहे घनवट । तेथ, उडे, तें फलकट! । जाणों आलें ॥१३०॥ तैसें, विचारितां निरसलें । तें प्रपंचु; सहजें सांडवलें । मग, तत्त्वतां तत्त्व उरलें । ज्ञानियांिस ॥३१॥ म्हणौनि अनित्याच्य़ा ठायीं । तयां आस्तिक्यबुद्धि नाहीं । जे, निष्कर्षु दोहींही । देखिला असे ॥३२॥
॥ पुंडलिकवरदा हरी विठ्ठल श्रीज्ञानदेव तुकाराम ॥
श्रीएकनाथी भागवत
क्रमश: नित्यनेम पारायण
अध्याय – २, ओवी क्र. ३४६ ते ३९३
श्रीगणेशाय नमः ॥ श्रीसरस्वत्यै नमः ॥ श्रीगुरुभ्यो नमः ॥ श्रीदत्तात्रेयाय नमः ॥ श्रीरुक्मिणीपाण्डुरङ्गाभ्यां नमः ॥
अर्पणभक्ती (३४६ ते ३५०)
कैसे कैसे भागवतधर्म । केवीं भगवंती अर्पे कर्म । हे अतिगुह्य उत्तमोत्तम । निजभजनवर्म ऐक राया ॥४६॥
कायेन वाचा मनसेन्द्रियैर्वा बुद्ध्यात्मना वाऽनुसृतः स्वभावात् । करोति यद्यत्सकलं परस्मै नारायणायेति समर्पयेत्तत् ॥३६॥
हेतुक अथवा अहेतुक । वैदिक लौकिक स्वाभाविक । भगवंती अर्पे सकळिक । या नांव देख ‘भागवतधर्म’ ॥४७॥ उदकी तरंग अतिचपळ । जिकडे जाय तिकडे जळ । तैसें भक्ताचें कर्म सकळ । अर्पे तत्काळ भगवंतीं ॥४८॥ ये श्लोकींचे व्याख्यान । पहिले मानसिक अर्पण । पाठी इंद्रिये बुद्धि अभिमान । कायिक जाण श्लोकान्वयें ॥४९॥ भागवतधर्माची निजस्थिती । मन बुद्धि चित्त अहंकृती । आदिकरूनि इंद्रियवृत्ती । भगवंती अर्पिती तें ऐक ॥३५०॥
भक्ती-मानसिक अर्पणभक्ती (३५१ ते ३६१)
बाधूं न शके स्वधर्मकर्म । ऐक राया त्याचे वर्म । मनी प्रगटला पुरुषोत्तम । अतिनिःसीम निजबोधे ॥५१॥ म्हणोनि संकल्पविकल्प । अवघे जाहले भगवद्रूप । यालागी भक्त नित्य निष्पाप । सत्यसंकल्प हरिदास ॥५२॥ जेवीं बुद्धिबळांचा खेळ । राजा प्रधान गजदळ । अवघे काष्ठचि केवळ । तेवीं संकल्प सकळ भगवद्रूप ॥५३॥ जो जो संकल्प कामी कामु । तो तो होय आत्मारामु । तेथ भजनाचा संभ्रमु । अतिनिःसीमु स्वयें वाढे ॥५४॥ जागृति सुषुप्ती स्वप्न । तिही अवस्था होय भजन । तेथ अखंड अनुसंधान । निजबोधे पूर्ण ठसावलें अंगीं ॥५५॥ मना होतां समाधान । समाधाने अधिक भजन । पूर्ण बाणलें अनुसंधान । ध्येय-ध्याता-ध्यान समरसें भजे ॥५६॥ तुर्या साक्षी उन्मनी । याही लाविल्या भगवद्भजनीं । जंववरी अवस्थापणीं । आपआपणी मुकल्या नाहीं ॥५७॥ ऐसा भावनेवीण उपजे भावो । तो तो तत्काळ होय देवो । मग अर्पणाचा नवलावो । न अर्पितां पहा हो स्वयें होय ॥५८॥ स्वरूपें मिथ्या केलें स्वप्न । जागृती सोलूनि काढिलें ज्ञान । निवडोनि सुषुप्तिसुखसमाधान । तिहींतें पूर्ण एकत्र केलें ॥५९॥ तये स्वरूपीं सगळें मन । स्वयेंचि करी निजात्मार्पण । तेथींचें सुखसमाधान । भक्त सज्ञान जाणती स्वयें ॥३६०॥ यापरी मानसिक जाण । सहज स्वरूपीं होय अर्पण । आतां इंद्रियांचे समर्पण । होय तें लक्षण ऐक राया ॥६१॥
भक्ती-इंद्रियकर्माचे अर्पण (३६२ ते ३९३)
दीपु लाविजे गृहाभीतरीं । तोचि प्रकाशे गवाक्षद्वारीं । तेवीं मनी प्रगटला श्रीहरी । तोचि इंद्रियांतरी भजनानंदु ॥६२॥ तेचि इंद्रियव्यापार । सांगिजती सविस्तर । स्वाभाविक इंद्रियव्यवहार । भजनतत्पर परब्रह्मीं ॥६३॥ जंव दृष्टि देखे दृश्यातें । तंव देवोचि दिसे तेथें । यापरी दृश्यदर्शनातें । अर्पी भजनसत्ते दृष्टीचा विषयो ॥६४॥ दृश्य द्रष्टा आणि दृष्टी । देखतां तिन्ही एकवटी । सहजें ब्रह्मार्पण ते दृष्टी । भक्त जगजेठी यापरी अर्पी ॥६५॥ दृश्य प्रकाशी दृश्यपणें । तेंचि दृष्टीमाजी होय देखणें । ऐसेनि अभिन्नपणें । दर्शनार्पणे भजती भक्त ॥६६॥ हे एकपणी तीनही भाग । तिन्हीमाजी एक अंग । ऐसे जें देखणे चांग । त्याचि अर्पणे साङ्ग सहजें अर्पी ॥६७॥ नाना पदार्थ प्रांजळे । नीच नवे देखती डोळे । परी अर्पणाचे सोहळे । निजात्ममेळे अर्पिती स्वयें ॥६८॥ यापरी दृष्टीचे दर्शन । भक्त करिती ब्रह्मार्पण । आतां श्रवणाचें अर्पण । अर्पी ते लक्षण ऐक राया ॥६९॥ जो बोलातें बोलविता । तोचि श्रवणी झाला श्रोता । तोचि अर्थावबोधु जाणता । तेथें ब्रह्मार्पणता सहजेंचि ॥३७०॥ शब्दु शब्दत्वे जंव उठी । तंव शब्दविता प्रगटे पाठींपोटीं । तेणें अकृत्रिम भजन उठी । ब्रह्मार्पणमिठी श्रवणीं पडे ॥७१॥ शब्दबोलासवें अर्थवाढी । तंव शब्दविता घे शब्दार्थगोडी । तेणें हरिभजनीं आवडी । स्वयें उठी गाढी श्रवणार्पणेसीं ॥७२॥ शब्द जंव कानी पडे । तंव शब्दार्थे भजन वाढे । बोलवित्याच्या अंगा घडे । अर्पण उघडे करितांचि ॥७३॥ बोलासी जो बोलविता । त्यासीं दृढ केली एकात्मता । तें भजन चढे श्रवणाच्या हाता । ब्रह्मार्पणता निजयोगें ॥७४॥ सद्गुरुवचन पडतां कानीं । मनाचे मनपण विरे मनीं । तेंचि श्रवण ब्रह्मार्पणीं । भगवद्भजनीं सार्थकता ॥७५॥ श्रवणेंचि यापरी श्रवण । करितां उठिलें ब्रह्मार्पण । हेतुरहित भगवद्भजन । स्वभावें जाण स्वयें होत ॥७६॥ भजने तुष्टला जगन्निवास । होय वासाचा निजवास । मग घ्राणद्वारा परेश । भोगी सुवास ब्रह्मार्पणेंसीं ॥७७॥ जो सुमना सुमनपण जोडी । तो घ्राणाचेही घ्राण होय आवडी । मग नाना सुवासपरवडी । ब्रह्मार्पणप्रौढी निजभोग अर्पी ॥७८॥ वासाचा अवकाश होय आपण । घ्राणी ग्राहकपणे जाण । तो भोगुचि स्वयें संपूर्ण । कृष्णार्पण सहज होतु ॥७९॥ रसना रस सेवू जाये । तंव रसस्वादु देवचि होये । मग रसनेमाजीं येऊनि राहे । ब्रह्मार्पणे पाहे रसभोगवृत्ती ॥३८०॥ जे जे रसना सेवी गोडी । ते ते हरिरूपें धडफुडी । स्वादा येऊनि रोकडी । ब्रह्मार्पणपरवडी निजभोग अर्पी ॥८१॥ रस-रसना-रसस्वादु । त्रिविधभेदें निजअभेदु । रससेवनी परमानंदु । स्वानंदकंदु वोसंडे ॥८२॥ कटु मधुर नाना रस । रसना सेवी सावकाश । परी तो अवघा ब्रह्मरस । स्वादी सुरस परमानंदु ॥८३॥ यापरी रसीं रसना । भोगें रतली कृष्णार्पणा । आतां स्पर्शविषयरचना । अर्पे ब्रह्मार्पणा तें ऐक राया ॥८४॥ स्पर्श घेइजे निजदेहीं । तंव देहींच प्रगटे विदेही । मग स्पर्शी जें जें कांहीं । तो तो भोगु पाहीं ब्रह्मार्पणे उठी ॥८५॥ स्पर्शास्पर्शे जें स्पर्शिजे । तंव स्पर्शावया नाडळे दुजें । तेणें एकपणाचेनि व्याजें । कृष्णार्पणवोजें भजन प्रगटे ॥८६॥ तेथ जो जो घेईजे पदार्थु । तो तो पदार्थु होय समर्थु । तेणेंचि भजनें परमार्थु । निजस्वार्थ निजभक्तां ॥८७॥ द्यावया कांहीं देवा जाये । तंव देतां भजन कैसे होये । देते घेतें दान स्वयें । देवोचि होये निजांगें ॥८८॥ जेउतें जेउतें चालवी पाये । तो तो मार्गु देवोचि होये । मग पाउलापाउलीं पाहे । निजभजन होये ब्रह्मार्पणेंशीं ॥८९॥ चरणा चरणा निजगती । तोचि निजांगें क्षितीची क्षिती । चालतां तैशिया युक्ती । सहज ब्रह्मस्थिति निजकर्मे अर्पी ॥३९०॥ बोल बोलवितिया वदनीं भेटी । बोलणे लाजे त्याचिया दृष्टी । ते लाज गिळून बोलणें उठी । निजभजनपुष्टी ब्रह्मार्पणेसीं ॥९१॥ शब्द मावळे निःशब्दीं । निःशब्दचि बोलिजे शब्दीं । तोचि अर्पणाचा विधी । जाण त्रिशुद्धी समर्पितेनिशीं ॥९२॥ बोलु बोलविता बोलाआंतु । तो बोलु अर्पणेसींच येतु । ऐसा शब्देचि भजनार्थु । प्रकटे परमाथु ब्रह्मार्पणेंसीं ॥९३॥
॥ पुंडलिकवरदा हरी विठ्ठल श्रीज्ञानदेव तुकाराम ॥
श्रीतुकाराम महाराजांची गाथा
अभंग क्र. २२६ ते २३४
॥ पुंडलिकवरदा हरी विठ्ठल श्रीज्ञानदेव तुकाराम ॥
संपूर्ण वारकरी प्रस्थानत्रयी नित्यनेम पारायण अनुक्रमणिका
ज्यांना प्रत्यक्षात ग्रंथावरून पारायण करायचे आहे त्यांनी खालील लिंकवरून ग्रंथ मागवावे.





