दिवस – २९. वारकरी प्रस्थानत्रयी नित्यनेम पारायण

अनुक्रमणिका

कर्मेन्द्रियाणि संयम्य य आस्ते मनसा स्मरन् ।
इन्द्रियार्थान्विमूढात्मा मिथ्याचारः स उच्यते ॥६॥

जे-उचित कर्म सांडिती । मग नैष्कर्म्य होऊं पाहती । परी कर्मेंद्रियप्रवृत्ती । निरोधुनी ॥६४॥ तयां कर्मत्यागु न घडे । जें, कर्तव्य मनीं सांपडे । वरि नटती तें फुडें । दरिद्र जाण ॥६५॥ ऐसे ते पार्था । विषयासक्त सर्वथा । ओळखावे; तत्त्वता । भ्रांति नाहीं ॥६६॥ आतां देई अवधान । प्रसंगे तुज सांगेन । या नैराश्याचें चिन्ह । धनुर्धरा ॥६७॥

यस्त्विन्द्रियाणि मनसा नियम्यारभतेऽर्जुन ।
कर्मेन्द्रियैः कर्मयोगमसक्तः स विशिष्यते ॥७॥

जो अंतरी दृढ । परमात्मरूपीं गूढ । बाह्य भागू तरी रूढ । लौकिकु जैसा ॥६८॥ जो इंद्रियां आज्ञा न करी । विषयांचें भय न धरी । प्राप्त कर्म नाव्हेरी । उचित जें जें ॥६९॥ तो, कर्मेंद्रियें कर्मी- । राहाटतां, तरी न नियमी । परी तेथियेनि उर्मी । झाकोळेना ॥७०॥ तो कामनामात्रें न घेपे । मोह मळें न लिंपे । जैसे जळीं जळें न शिंपे । पद्मपत्र ॥७१॥ तैसा, संसर्गामाजी असे । सकळांसारिखा दिसे । जैसें तोयसंगें आभासे । भानुबिंब ॥७२॥ तैसा सामान्यत्वें पाहिजे । तरी साधारणुचि देखिजे । येर्‍हवीं; निर्धारितां, नेणिजे । सोय जयाची ॥७३॥ ऐशा चिन्हीं चिन्हितु- । देखसी, तोचि मुक्तु । आशापाशरहितु । वोळख पां ॥७४॥ अर्जुना, तोचि योगी । विशेषिजे जो जगीं । म्हणौनि, ऐसा होय, यालागीं । म्हणितलें तूतें ॥७५॥ तूं मानसा नियमू करीं । निश्चळु होय अंतरीं । मग, कर्मेंद्रियें व्यापारीं । वर्ततु सुखें ॥७६॥

नियतं कुरु कर्म त्वं कर्म ज्यायो ह्यकर्मणः ।
शरीरयात्रापि च ते न प्रसिद्ध्येदकर्मणः ॥८॥

म्हणौनि, नैष्कर्म्य होआवें । तरी एथ तें न संभवें । आणि निषिद्ध केवीं राहाटावें । विचारी पां!॥७७॥ म्हणौनि, जें जें उचित । आणि अवसरेंकरूनि प्राप्त । तें कर्म, हेतुरहित । आचरें तूं ॥७८॥ पार्था, आणीकही एक । नेणसी तूं हें कवतिक । जें-ऐसें कर्म; मोचक । अपैसें असे ॥७९॥ देखें, अनुक्रमाधारें । स्वधर्मु जो आचरे । तो, मोक्षु, तेणें व्यापारें । निश्चित पावे ॥८०॥

यज्ञार्थात्कर्मणोऽन्यत्र लोकोऽयं कर्मबन्धनः ।
तदर्थं कर्म कौन्तेय मुक्तसङ्गः समाचर ॥९॥

स्वधर्मु जो बापा । तोचि नित्ययज्ञु जाण पां । म्हणौनि वर्ततां, तेथ पापा । संचारु नाहीं ॥८१॥ हा निजधर्मु जैं सांडे । आणि कुकर्मी रति घडे । तैंचि बंधु पडे । सांसारिक ॥८२॥ म्हणौनि स्वधर्मानुष्ठान । तें अखंड, यज्ञ याजन । जो करी; तया बंधन । कहींच न घडे ॥८३॥ हा लोकु कर्मों बांधिला । जो परतंत्रा भुलला । तो नित्य यज्ञातें चुकला । म्हणौनिया ॥८४॥ आतां येचि विशी पार्था । तुज सांगेन एक मी कथा । जैं सृष्ट्यादि संस्था । ब्रह्मेनें केली ॥८५॥


मायेचे विंदान (कार्य) (२०१ ते २०९)

जेवीं लेंकुरे खेळता खेळासी । दिवसा म्हणती जाहली निशी । तेवींचि पूर्णस्वरूपापाशीं । देखती मायेसी त्रिविध कल्पना ॥१॥

एषा माया भगवतः सर्गस्थित्यन्तकारिणी । त्रिवर्णा वर्णिताऽस्माभिः किं भूयः श्रोतुमिच्छसि ॥१६॥

याप्रमाणे भगवंताची उत्पत्ती, स्थिती, लय करणारी त्रिगुणात्मिका माया आम्ही तुला वर्णन करून सांगितले आहे. आणखी तुला काय ऐकण्याची इच्छा आहे ?॥१६॥

उत्तम मध्यम अधम जन । तिन्ही अवस्था त्रिभुवन । त्रिविध कर्मे तीन गुण । हे जाण विंदान मायेचें ॥२॥ ध्येय ध्याता आणि ध्यान । पूज्य पूजक पूजन । ज्ञेय ज्ञाता आणि ज्ञान । हेही त्रिपुटी पूर्ण मायेची ॥३॥ दृश्य द्रष्टा आणि दर्शन । कर्म कर्ता क्रियाचरण । भोग्य भोक्ता भोजन । हे त्रिपुटी जाण मायेची ॥४॥ शब्द श्रोता आणि श्रवण । घ्रेय घ्राता आणि घ्राण । रस रसना रसस्वादन । हे त्रिपुटी जाण मायेची ॥५॥कर क्रिया आणि कर्ता । चरण चाल चालता । बोल बोलणे बोलता । हे त्रिविधावस्था मायेची ॥६॥ अहं सोहं जडमूढता । साधक साधन साध्यता । देवी देवो परिवारदेवता । हेही त्रिविधता मायेची ॥७॥ देह देही देहाभिमान । भव भय भवबंधन । मुक्त मुमुक्षु अज्ञान । हेही विंदान मायेचें ॥८॥ सुख दुःख जडत्व पूर्ण । आधी समाधी व्युत्थान । उत्पत्ति स्थिति निधन । इंही लक्षणीं संपूर्ण माया विलसे ॥९॥

मायास्वरूप (२१० ते २१८)

नभी नीळिमा पूर्ण भासे । शेखी नीळिमेचा लेशही नसे । तेवीं स्वरूपी माया आभासे । मिथ्यावेशे मायिक ॥२१०॥ जेवी प्रत्यक्ष दिसे मृगजळ । परी तें निदाघचि केवळ । तेवीं स्वरूपी माया प्रबळ । मुळी निर्मूळ आभासे ॥११॥ हे मिथ्या माया कल्पनावशे । प्रबळ बळे भासली दिसे । नासूं जातां नाशिजे ऐसें । सत्यत्वें नसे निजांग ॥१२॥ नांवरूपाचिया भडसें । ब्रह्मादिक केले पिसे । मिथ्या त्रिपुटीविन्यासें । ज्या बांधिलें दिसे त्रैलोक्य ॥१३॥ जेवीं रूपासवें दिसे छाया । नाशितां नातुडे नाशावया । तेवीं स्वरूपी मिथ्या माया । अतिदुर्जया देवांसी ॥१४॥ जेवी देहासवें मिथ्या छाया । तेवीं ब्रह्मीं मिथ्या माया । कल्पनायोगें वाढली वायां । यालागीं ‘अजया’ वेदशास्त्रे म्हणती ॥१५॥ राया कल्पना वाढे जे ठायीं । तेंचि मायेचें दृढ मूळ पाहीं । जो निर्विकल्प निजदेहीं । त्यासी माया नाही तिहीं लोकीं ॥१६॥ कल्पिती कल्पना जे राया । तेचि जाण मुख्य माया । आणीक रूपकें सांगावया । नातुडे माया निरूपणीं ॥१७॥ तेचि त्रिविध मुख्यलक्षणीं । माया सांगितली विवंचोनी । आतां कोण्या अर्थीचे श्रवणीं । अत्यादरु मनी वर्ते राया ॥१८॥

माया-तरणोपाय-निरूपणाची विदेहाची विनंती (२१९ ते २२७)

माया दुस्तर दारुण । ऐकूनि ऋत्विज ब्राह्मण । थरारले सभाजन । राजाही पूर्ण विस्मित जाहला ॥१९ ॥ नवल मायेचें रूपक । नाशू न शकतीच ज्ञाते लोक । जिया गोंविले ब्रह्मादिक । इतरांचा देख पाडु कोण ॥२२०॥ माया आक्रमूनि शिवासी । तोही आणिला जीवत्वासी । ते माया तरवे दीनासी । तो उपावो यासी पुसों पां ॥२१॥ सुखोपायें दीन जन । दुस्तर माया तरती पूर्ण । तदर्थी राजा आपण । अत्यादरें प्रश्न श्रद्धेनें पुसे ॥२२॥

राजोवाच – यथैतामैश्वरीं मायां दुस्तरामकृतात्मभिः । तरन्त्यञ्जः स्थूलधियो महर्ष इदमुच्यताम् ॥१७॥

राजा म्हणाला–हे महामुनी, मन-इंद्रिये स्वाधीन नसणाऱ्या माणसांना तरून जाण्यास कठीण अशी ही परपुरुषाची माया जड बुद्धीचे (शरीरावर अहंबुद्धी असणारे) लोक कोणत्या उपायाने सहज तरून जातील ते आम्हांला सांगा.॥१७॥

अतिदुस्तर हरीची माया । आइकोनि हांसें आलें राया । लटकीच परी देहाभिमानियां । बाधावया दृढ जाहली ॥२३॥ माया दुस्तर शास्त्रप्रसिद्धी । तेथ बाळेभोळे स्थूळबुद्धी । सुखें तरती कोणे विधीं । तो सांग त्रिशुद्धी उपावो ॥२४॥ ज्यासी वश्य नाहीं निजमन । आणि भवाब्धि तरावया भाव पूर्ण । ऐसे भोळे भाविक जन! त्यांसी मायातरण सुगम सांगा ॥२५॥ मागां कवी बोलिला संकलितीं । ‘तन्माययाऽतो बुध आभजेति’ । गुरु-ब्रह्म अभेदस्थिती । करितां भक्ती माया तरिजे ॥२६॥ तें भक्तीचे स्पष्ट लक्षण । विशद होआवया श्रवण । पुढती मायेचें तरण । पुसावया कारण मुख्य हेंचि ॥२७॥

वैराग्याने मायातरण (२२८ ते २३२)

तो मायातरणोपायविधी । सुगम सांगावया त्रिशुद्धी । अंतरिक्षा धाकुटा सुबुद्धी । ‘प्रबुद्ध’ प्रज्ञानिधी बोलता जाहला ॥२८॥

प्रबुद्ध उवाच
कर्माण्यारभमाणानां दुःखहत्यै सुखाय च । पश्येत्पाकविपर्यासं मिथुनीचारिणां नृणाम् ॥१८॥

प्रबुद्ध ऋषी म्हणाले -दुःखाचा नाश व्हावा व सुखाची प्राप्ती व्हावीयाकरिता कर्माचा आरंभ करणाऱ्या दांपन्यांना (संसारी लोकांना) त्यांच्या अपेक्षेच्या उलट फलप्राप्ती होते हे पाहावे.॥१८॥

मुख्य मायेचें तरण । प्रबुद्धचि जाणे पूर्ण । प्रबुद्ध जाहलिया आपण । मायेचें विंदान न तरतां तरती ॥२९॥ मनी विषयाचा छंदु । तो केवळ महाबाधु । विषयत्यागी तो प्रबुद्धु । तोचि विशदु भावो आइका ॥२३०॥ विषयी लोभलें अत्यंत मन । तेथ नव्हतां वैराग्य पूर्ण । कदा नव्हे मायेचें तरण । वैराग्यार्थ जाण विषय निंदी ॥३१॥ केवळ नश्वर विषय देख । तेंचि मानिती परम सुख । तें सुखचि दुःखदायक । स्त्रीकामें मुख्य माया बाधे ॥३२ ॥

स्त्रीकामाने मायाबाध (२३३ ते २४४)

वेंचूनि धनाचिया गांठी । सुखार्थी स्त्री बैसविली पाटीं । तेचि भोगवी दुःखकोटी । जगीं माया लाठी स्त्रीकामें ॥३३॥ स्त्रीकामें प्रपंचु सबळ । स्त्रीकामें दुःख प्रबळ । स्त्रीकामें मायेसी बळ । स्त्रीकामें सकळ मोहिलें जग ॥३४॥ आवडी स्त्री बैसवितां पाटीं । ते प्रपंचाच्या वाढवी कोटी । महामोहाच्या पाडूनि गांठी । दुःखसागरी लोटी स्त्रीकामु ॥३५॥ जे नवमास वाहे उदरांत । ते माता करूनि अनाप्त । स्त्रियेसी मानिती अतिआप्त । ऐशी माया समर्थ स्त्रीकामें ॥३६॥ जे तोंडींचे पोटींचे खाववित । जे सदा सोशी नरकमूत । ते मातेहूनि स्त्री आप्त । जाहली जगांत मायामोहें ॥३७॥ स्त्रिया मेळवितां असंख्य मिळती । परी माता न मिळे त्रिजगतीं । ऐसें जे सज्ञान जाणती । तेही आप्त मानिती स्त्रियेतें ॥३८॥ मातेतें भजतां भुक्तिमुक्ती । स्त्रियेतें भजतां नरकप्राप्ती । ऐसें जे शास्त्रज्ञ जाणती । तेही माता उपेक्षिती स्त्रीकामें ॥३९॥ एवं स्त्रीकामाचिया व्याप्ती । माया व्यापिली त्रिजगतीं । सज्ञानही पाडले भ्रांतीं । स्त्रीकामासक्ती महामाया ॥२४०॥ मानूनि विषयांचे सुख । काम्य कर्म करितां देख । तेणें अतिदुःखी होती लोक । दुःखदायक काम्य कर्म ॥४१॥ कामिनीकामें गृहासक्ती । प्राणी प्राणांतें स्वयें शिणविती । त्या श्रमाची निदानस्थिती । सांगेन तुजप्रती राजाधिराजा ॥४२॥ निर्मळ जळें भिंती धुतां । जळाचीच नासे निर्मळता । हात माखती धुतले म्हणतां । भिंतीही तत्त्वतां निदळ केली ॥४३॥ तेवीं विषयांचेनि सुखें सुख । न पावतीच ब्रह्मादिक । विषयाचा जे मानिती हरिख । ते परममूर्ख पशुदेही ॥४४॥

धनलोभाने मायाबाध (२४५ ते २५७)

नित्यार्तिदेन वित्तेन दुर्लभेनात्ममृत्युना । गृहापत्याप्तपशुभिः का प्रीतिः साधितैश्चलैः ॥१९॥

निरंतर दुःख देणाऱ्या, मिळण्यास कठीण परंतु आपल्या मृत्यूलाच कारणीभूत होणाऱ्या द्रव्याने, त्याचप्रमाणे गृह, मुले, बाळे, आप्त, पशु या मिळविलेल्या नाशिवंत व चंचल वस्तूंनी काय सुख मिळणार? ॥१९॥

रातिदिवसु निजनिकटें । मरणेसी घेतां झटें । कवडीची प्राप्ती न भेटे । प्राणांतकष्टें द्रव्य जोडे ॥४५॥ एवं कष्टें जोडलें धन । तें महादुःखाचे जन्मस्थान । अर्थ अनर्थाचे अधिष्ठान । निजात्ममरण निजमूळ ॥४६॥ द्रव्य नसतां उपायें शिणवी । जाहलिया संरक्षणी आधी लावी । रात्रिदिवस हृद्रोग जीवीं । अविश्वासें नांदवी धनलोभु ॥४७॥ मायबापांशी चोरी करवी । स्त्रीपुत्रांसी कलहो लावी । सुहृदांतें दूरी दुरावी । हे द्रव्याची पदवी स्वाभाविक ॥४८॥ द्रव्यापाशी आधिव्याधी । द्रव्यापाशी दुष्ट बुद्धी । द्रव्यापाशी सलोभ क्रोधी । असत्य निरवधी द्रव्यापाशीं ॥४९॥ द्रव्यापाशी अतिविकल्प । द्रव्यापाशी वसे पाप । द्रव्यापाशी अतिसंताप । पूर्ण दुःखरूप ते द्रव्य ॥२५०॥ हे दानें त्यागितां फळ गोमटें । लोभियां नरका ने हटेंतटें । द्रव्याऐसें गा वोखटे । आन न भेटे तिहीं लोकीं ॥५१॥ नळिया चणियांचे आशा । वानरें मुठी धरणें तोचि फांसा । तेवीं द्रव्यदाराभिलाषा । नरदेहदशा अधःपातीं ॥५२॥ द्रव्य सहसा न मिळे पाहीं । मिळे तरी अनीति अपायीं । यालागीं द्रव्याच्या ठायीं । सुख नाहीं त्रिशुद्धी ॥५३॥ धन वेंचोनि फाडोवाडें । घर करिती वाडेंकोडें । तें अध्रुवत्वे सवेंचि पडे । थितें द्रव्य बुडे आयुष्येसीं ॥५४॥ करूनि आयुष्याचा मातेरा । मुद्दलसिंचनें जोडिलें पुत्रा । त्या पुत्राच्या मरणद्वारा । दुःखदुर्धरामाजीं बुडती ॥५५॥ प्रपंचींचे सुहृद समस्त । जंव स्वार्थ तंव होती आप्त । स्वार्थविरोधे ते अनाप्त । होऊनि घात सुहृदां करिती ॥५६॥ करोनियां अतिहव्यासु । मेळविती नाना पशु । त्यांचा सवेंचि होय नाशु । तेणें दुःखें त्रासु गृहस्थांसी ॥५७॥


४३७.कथा करोनियां दावी प्रेमकळा । अंतरीं जिव्हाळा कुकर्माचा ॥१॥
तुळसी खोवी कानीं, दर्भ खोवी शेंडीं । लटिकी धरी बोंडी नासिकाची ॥२॥
टिळे टोपी माळा देवाचें गबाळें । वागवी ओंगळ पोटासाठीं ॥३॥
गोसाव्याच्या रूपें हेरी परनारी । तयाचें अंतरी काम लोभ ॥४॥
कीर्तनाचे वेळी रडे पडे लोळे । प्रेमेविण डोळे गळताती ॥५॥
तुका म्हणे ऐसे मावेचे मइंद । त्यापाशीं गोविंद नाहीं नाहीं ॥६॥
४३८.पाखांड्यांनी पाठी पुरविला दुमाला । तेथें मी विठ्ठला काय बोलों? ॥ध्रु॥
कांद्याचा खाणार चोजवी कस्तुरी? । आपण भिकारी अर्थ नेणे ॥२॥
न कळे, तें मज पुसती छळुनी । लागतां चरणीं न सोडिती ॥३॥
तुझ्या पायांविण दुजें नेणें कांहीं । तूंचि सर्वांठायीं एक मज ॥४॥
तुका म्हणे खीळ पडो त्याच्या तोंडा । किती बोलों भांडा वादकासी ॥५॥
४३९.कलियुगीं कवित्व करिती पाषांड । कुशळ हे भांड बहु झाले ॥१॥
द्रव्य दारा चित्तीं प्रजांची आवडी । मुखें बडबडी कोरडेंचि ॥ध्रु॥
दंभ करी सोंग मानावया जग । मुखें बोले त्याग मनीं नाहीं ॥३॥
वेदाज्ञे करोनि न करिती स्वहित । न होती अलिप्त देहाहुनी ॥४॥
तुका म्हणे दंड साहिल यमाचे । न करी जो वाचे बोले तैसें ॥५॥
४४०.विषयाचें सुख येथें वाटे गोड । पुढें अवघड यम-दंड ॥१॥
मारिती तोडिती झोडिती निष्ठुर । यमाचे किंकर बहुसाल॥ध्रु॥
असिपत्र तरुवर खैराचे इंगळ। निघ-तील ज्वाळ तैलपाकीं॥३॥
तप्तभूमीवरी चालविती पायीं । अग्निस्तंभ बाही कवटाळविती ॥४॥
म्हणऊनि तुका येतो काकुलती । पुरे यातायाती गर्भवास ॥५॥
४४१.अल्प माझी मति । म्हणोनि येतों काकुलती ॥१॥
आतां दाखवा दाखवा । तुमची पाउले केशवा! ॥ध्रु॥
धीर माझ्या मना । नाहीं नाहीं नारायणा! ॥३॥
तुका म्हणे दया । मज करा अभागिया ॥४॥
४४२.वाटुली पाहतां शिणले डोळुले । दाविसी पाउलें कैं वो डोळां? ॥१॥
तूं माय माउली कृपेची साउली । विठ्ठले पाहिली वास तुझी ॥ध्रु॥
कां बा मोकलिलें कोणा निर-विलें । कठिण कैसे झाले हृदय तुझें? ॥३॥
तुका म्हणे माझ्या आसावल्या बाह्या । तुज क्षेम द्याया पांडुरंगा! ॥४॥
४४३.देह हा सादर पाहावा निश्चित । सर्व सुख येथें नाम आहे ॥१॥
ब्रह्म जें देखणे द्वैत जेव्हां गेलें । शरीर तें झालें ब्रह्मरूप ॥ध्रु॥
यजन याजन तप व्रतें करिती । विकल्पें नाग-विती शुद्ध पुण्या ॥३॥
तुका म्हणे सर्व सुख येथे आहे । भ्रांति दूर पाहें टाकूनियां ॥४॥
४४४.तुझे वर्णंू गुण ऐसी नाही मति । राहिल्या त्या श्रुति मौनपणे ॥१॥
मौनपणे वाचा थोंटावल्या चारी । ऐसें तुझें हरी रूप आहे ॥ध्रु॥
रूप तुझें ऐसें डोळां न देखवें । जेथे हे झकवे ब्रह्मादिक ॥३॥
ब्रह्मादिक देवा कर्माची कचाटी । म्हणोनि आटाटी फार त्यांसी ॥४॥
तुका म्हणे तुझे गुण नाम रूप । आहेसी अमुप वाणूं काई? ॥५॥
४४५.मनवाचातीत तुझें हे स्वरूप । म्हणोनियां माप भक्ति केलें ॥१॥
भक्तीचिया मापें मोजितों अनंता । इतरानें तत्त्वता न मोजवें ॥ध्रु॥
योग याग तपें देहाचिया योगें । ज्ञानाचिया लागें न सांपडसी ॥३॥
तुका म्हणे आम्ही भोळ्या भावे सेवा । घ्यावी जी केशवा, करितों ऐसी ॥४॥
४४६.जववरी नाहीं देखिली पंढरी । वर्णिसील थोरी वैकुं-ठींची ॥१॥
मोक्षसिद्धि तेथें हिंडे दारोदारी । होऊनि कामारी दीनरूप ॥ध्रु॥
वृंदावन सडे चौक रंगमाळा । अभिनव सोहळा घरोघरीं ॥३॥
नामघोष कथा पुराण कीर्तनीं । ओविया कांडणी पांडुरंग ॥४॥
सर्व सुख तेथे असे सर्वकाळ । ब्रह्म ते केवळ नांदतसे ॥५॥
तुका म्हणे जे न साधे सायासें। प्रत्यक्ष तें दिसे विटेवरी ॥६॥
४४७.दु:ख वाटे ऐसी ऐकोनिया गोष्टी। जेणे घडे तुटी तुझ्या पायीं ॥१॥
येतो कळवळा देखोनियां घात । करितों फजित, नाइकती ॥ध्रु॥
काय करूं देवा, ऐसी नाहीं शक्ति । दंडूनि पुढती वाटे लावूं॥३॥
तुका म्हणे मज दावूं नको ऐसे । दृष्टीपुढे पिसें पांडुरंगा! ॥४॥
४४८.सूकरासी विष्ठा माने सावकाश । मिष्टान्नाची त्यास काय गोडी? ॥१॥
तेवीं अभक्तासी आवडे पाखांड। न लगे त्या गोड परमार्थ ॥ध्रु॥
श्वानासी भोजन दिले पंचा-मृत । तरी त्याचे चित्त हाडावरी ॥३॥
तुका म्हणे सर्पा पाजिलीया क्षीर । वमितां विखार विष झालें ॥४॥
४४९.रासभ धुतला महातीर्थामाजीं । नव्हे जैसा तेजी शामकर्ण ॥१॥
तेवीं खळा काय केल्या उपदेश? । नव्हेचि मानस शुद्ध त्याचे ॥ध्रु॥
सर्पासी पाजिलें शर्करा-पीयूष । अंतरींचे विष जाऊं नेणे ॥३॥
तुका म्हणे श्वाना क्षिरीचे भोजन । सवेंचि वमन जेवीं तया ॥४॥
४५०.जेवीं नवज्वरें तापले शरीर । लागें तया क्षीर विषतुल्य ॥१॥
तेवीं परमार्थ जीही दुराविला । तयालागी झाला सन्निपात ॥ध्रु॥
कामीन जयाच्या जाहाली नेत्रासी । देखे तो चंद्रासी पीतवर्ण ॥३॥
तुका म्हणे मद्यपानाची आवडी । न रुचे त्या गोडी नवनीताची॥४॥
४५१.आतां असो मना अभक्ताची कथा । न होईं दुश्चिता हरिनामी ॥१॥
नये त्याची कदा गोष्टी करूं मात । जिव्हे प्रायश्चित्त त्याच्या नांवें ॥ध्रु॥
प्रभातें न घ्यावें नांव माकडाचें । तैसें अभक्ताचें सर्वकाळ ॥३॥
तुका म्हणे आतां आठवूं मंगळ । जेणे सर्वकाळ सुखरूप ॥४॥
४५२.नाम आठवितां सद्गदित कंठी । प्रेम वाढें पोटीं ऐसें करीं ॥१॥
रोमांच जीवन आनंदाश्रू नेत्रीं । अष्टांग ही गात्री प्रेम तुझें ॥ध्रु॥
सर्वही शरीर वेंचों या कीर्तनीं । गाऊं निशिदिनीं नाम तुझें ॥३॥
तुका म्हणे दुजें न करी कल्पांतीं । सर्वदा विश्रांति संतांपायीं ॥४॥

संपूर्ण वारकरी प्रस्थानत्रयी नित्यनेम पारायण अनुक्रमणिका


ग्रंथ

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Page Reader Press Enter to Read Page Content Out LoudPress Enter to Pause or Restart Reading Page Content Out LoudPress Enter to Stop Reading Page Content Out LoudScreen Reader Support
error: Content is protected !!
Scroll to Top