दिवस – ४८. वारकरी प्रस्थानत्रयी नित्यनेम पारायण

अनुक्रमणिका

कायेन मनसा बुद्ध्या केवलैरिन्द्रियैरपि । योगिनः कर्म कुर्वन्ति सङ्गं त्यक्त्वात्मशुद्धये ॥११॥
देखें, बुद्धीची भाष नेणिजे । मनाचा अंकुर नुदैजे । ऐसा व्यापारु तो बोलिजे । शारीरु गा ॥५१॥
हेंच मऱ्हाटें परियेसीं । तरी बाळकाची चेष्टा जैसी । योगिये कर्में करिती तैसीं । केवळा तनु ॥५२॥
मग, पांचभौतिक संचलें । जेव्हां शरीर असे निदेलें । तेथ मनचि राहाटे एकलें । स्वप्नीं जीवीं ॥५३॥
नवल ऐकें, धनुर्धरा । कैसा वासनेचा संसारा । देहा होऊं नेदी उजगरा । परि सुखदुःखें भोगी ॥५४॥
इंद्रियांच्या गांवीं नेणिजे । ऐसा व्यापारु जो निपजे । तो केवळु गा म्हणिजे । मानसाचा ॥५५॥
योगिये तोही करिती । परि कर्में ते न बंधिजती । जे, सांडिली आहे संगती । अहंभावाची ॥५६॥
आतां, जाहलिया भ्रमहत । जैसें पिशाचाचें चित्त । मग, इंद्रियांचें चेष्टित । विकळु दिसे ॥५७॥
स्वरूप तरी देखे । आळविलें आइके । शब्दु बोले मुखें । परि ज्ञान नाहीं ॥५८॥
हें असो, काजेंविण । जें जें कांहीं करणें । तें केवळ कर्म जाण । इंद्रियांचें ॥५९॥
मग, सर्वत्र जें जाणतें । तें बुद्धीचें कर्म, निरुतें । ओळखि; अर्जुनातें । म्हणे श्रीहरी ॥६०॥
ते बुद्धि धुरे करुनी । कर्म करिती चित्त देऊनी । परि ते नैष्कर्म्यापासूनी । मुक्त दिसती ॥६१॥
जें, बुद्धीचिये ठावूनि देहीं । तयां अहंकाराची सेचि नाहीं । म्हणौनि, कर्म करितां, पाहीं । चोखाइले ॥६२॥
अगा, करितेनवीण कर्म । तेंचि तें नैष्कर्म्य । हें जाणती सुवर्म । गुरुगम्य जें ॥६३॥
आतां शांतरसाचें भरितें । सांडीत आहे पात्रातें । जें, बोलणें बोलापरौतें । बोलवलें ॥६४॥
एथ इंद्रियांचा पांगु । जया फिटला आहे चांगु । तयासिचि आथि लागु । परिसावया ॥६५॥
“हा असो अतिप्रसंगु । न सांडीं पां कथा-लागु । होईल श्लोक-संगति-भंगु । म्हणौनियां ॥६६॥
जें मना आकळितां कुवाडें । घाघुसितां बुद्धि नातुडे । तें दैवाचेनि सुरवाडें । सांगवलें तुज ॥६७॥
जें शब्दातीत स्वभावें । तें बोलींचि जरी फावे । तरी आणिकें काय करावें? । कथा सांगें” ॥६८॥
हा आर्तिविशेषु श्रोतयांचा । जाणोनि, दासु निवृत्तीचा । म्हणे “संवादु दोघांचा । परिसोनि परिसा” ॥६९॥
मग श्रीकृष्ण म्हणे पार्थातें । आतां, प्राप्ताचें चिन्ह पुरतें । सांगेन तुज; निरुतें । चित्त देईं ॥७०॥
युक्तः कर्मफलं त्यक्त्वा शान्तिमाप्नोति नैष्ठिकीम् । अयुक्तः कामकारेण फले सक्तो निबध्यते ॥१२॥
तरी आत्मयोगें आथिला । जो कर्मफळासी विटला । तो, घर रिघौनि, वरिला । शांतीं जगीं ॥७१॥
येरु, कर्मबंधें किरीटी । अभिलाषाचिया गांठी । कळासला खुंटी । फळभोगाच्या ॥७२॥

भूमेर्भरावतरणाय यदुष्वजन्मा जातः करिष्यति सुरैरपि दुष्कराणि । वादैर्विमोहयति यज्ञकृतोऽतदर्हान् शूद्रान् कलौ क्षितिभुजो न्यहनिष्यदन्ते ॥२२॥
(जन्मरहित असा प्रभू, पृथ्वीचा भार हरण करण्यासाठी, यादवकुलात जन्म घेऊन, देवादिकांना भी न होणारी अशी कर्मे करील. बुद्धावतारात, यज्ञ करण्यास अपात्र असणाऱ्यांच्या मनात वेदविरुद्ध वादांनी मोह उत्पन्न करील. कलीच्या शेवटी कलंकी अवतार घेऊन शूद्रप्राय झालेल्या राजांना मारील. ॥२२॥)
कृष्णावतार (२५५ ते २७१)
आतां भावी अवतारवार्ता । तुज मी सांगेन नृपनाथा । श्रीकृष्णावतारकथा । परमाद्भुता विचित्र ॥५५॥
जो परेहून परात्परु । जो कां अजन्मा अक्षरु । जो श्रुतिशास्त्रां अगोचरु । तो पूर्णावतार ‘श्रीकृष्ण’ ॥५६॥
जेथें नाममात्र रिघों न लाहे । जेथें रूपाची न लभे सोये । ज्या ब्रह्मत्व अंगी न साहे । तो अवतार पाहें श्रीकृष्ण ॥५७॥
जो वर्णाश्रमांसी नातळे । ज्यासी ईश्वरत्वहीं वोविळें । जो अज अव्यय स्वानंदमेळे । तो अवतारु स्वलीलें श्रीकृष्णनाथु ॥५८॥
ऐसा गुणधर्मकर्मातीतु । तो अवतारु श्रीकृष्णनाथु । प्रगटला यदुवंशाआंतु । स्वयें जगन्नाथु स्वइच्छे ॥५९॥
जैसें खळाळ कल्लोळ चंचळ । भासे परी ते केवळ जळ । काळी भरडी पांढरी चोळ । परी ते केवळ वसुधाचि ॥२६०॥
जे गोडी नाबदरासी । तेचि वेगळी रवेयासी । तैसा अवतार यदुवंशीं । पूर्णांशेसी श्रीकृष्ण ॥६१ ॥
जैसा दीपु लावितां तत्क्षणीं । सवेंचि प्रगटे तेजाची खाणी । तैसा उपजतांचि बाळपणीं । अभिनव करणी स्वयें केली ॥६२॥
जें ब्रह्मादिक देवां नव्हे । तें बाळलीलास्वभावें । करूनि दाविलें आघवें । देवाधिदेवें श्रीकृष्णे ॥६३॥
वणवा गिळिला मुखें । पर्वत उचलिला नखें। पूतनेचे स्तन विखें। प्याला निजमुखें जीवासगट ॥६४॥
जेणें वत्सहरणमिसें । स्रष्ट्यासही लाविलें पिसें । जो वत्सवत्सपवेशे । झाला सावकाशे एकाकी एक ॥६५॥
अघ चिरिला जाभाडा । काळियाच्या कुटिल्या फडा । यमलोकी घेऊनि झाडा । आणिला रोकडा गुरुपुत्र जेणें ॥६६॥
जे प्रजा पीडूनि कर घेती । जयां नावडे धर्मनीती । ऐसे राजे भारभूत क्षितीं । नेणों किती निर्दाळिले ॥६७॥
एकां सैन्ये एका स्वांगें । एकां वधवी आन प्रयोगें । एकां गोत्रकलहप्रसंगें । अग्रपूजायोगें एकांसी ॥६८॥
अधर्मा लावील सीक । धर्माचे वाढवील बिक । हे अवतारकौतुक । राया तूं आवश्यक देखशील पुढां ॥६९॥
जैं जैं लोटेल अहोरात्र । तैं तैं करील नवें चरित्र । तया कृष्णसुखासी पात्र । भक्त पवित्र होतील ॥२७०॥
साधूंसी स्वानंदसोहळा । नित्य नवा होईल आगळा । ते श्रीकृष्णाची लीला । देखसी डोळां नृपनाथा ॥७१॥
बौद्धावतार (२७२ ते २७७)
तोचि बौद्धरूपें जाण । पुढां धरील दृढ मौन । तेव्हां कर्माकर्मविवंचन । सर्वथा जाण कळेना ॥७२॥
तो तटस्थपणे सदा । प्रवर्तवील महावादा । तेणें वादमिसें सदा । वाढवील मदा महामोहातें ॥७३॥
मोह उपजवील दुर्घट । एक कर्मी करील कर्मठ । एक होतील कर्मभ्रष्ट । न कळे चोखट निजात्महित ॥७४॥
कैसे माजवील मत । वेद मिथ्या मानित । वेदविहिता नातळत । तो जाण निश्चित महामोहो ॥७५॥
मोहे केला सर्वांसी छळ । एका ज्ञानाभिमान प्रबळ । ते कर्म निंदिती सकळ । त्यागिती केवळ जाड्य म्हणौनी ॥७६ ॥
ऐशिये वर्ततां मोहस्थिती । पूर्ण कळीची होय प्रवृत्ती । तेव्हां नीच ते राजे होती । प्रजा नागविती चोरप्राय ॥७७॥
कलियुगातील राजे (२७८ ते २८०)
शूद्राहूनि अतिकनिष्ठ । राजे होती परम श्रेष्ठ । वर्णावर्ण करिती भ्रष्ट । अतिपापिष्ठ अधर्मी ॥७८॥
अपराधेवीण वितंड । भले त्यांसी करिती दंड । मार्गस्थांचा करिती कोंड । करिती उदंड सर्वापहरण ॥७९॥
अबळांचें निजबळ राजा । तो राजाचि स्वयें नागवी प्रजा । ऐसा अधर्म उपजे क्षितिभुजां । तें गरुडध्वजा न साहवे ॥२८०॥
कल्की-अवतार (२८१ ते २८३)
जेव्हां स्वधर्माचे जिणें । अधर्मे निलाग गांजणें । यालागीं श्रीनारायणे । अवतार धरणें ‘कल्की’ नामा ॥८१॥
तो शस्त्रधारा प्रबळ । नष्ट राजे निर्दाळील सकळ । महामोहाचें मूळ । स्वयें समूळ उच्छेदील ॥८२॥
तेव्हां धर्माची पाहांट फुटे । सत्यासी सत्त्व चौपटे । तेव्हां वेदोक्त विधान प्रगटे । स्वधर्मराहाटें राहटती सर्व ॥८३॥

अवतारवर्णन-उपसंहार (२८४ ते २९२)

एवंविधानि कर्माणि जन्मानि च जगत्पतेः । भूरीणि भूरियशसो वर्णितानि महाभुज ॥२३॥
(अर्थ – हे महाबाहो, महाकीर्तिमान अशा जगत्पतीची अनेक जन्म व कर्मे अनेक प्रकारांनी वर्णन केलेली आहेत (तुला दिग्दर्शन मात्र केले). ॥२३ ॥)
जयाची गा अनंत नामें । अनंत अवतार अनंत जन्में । अनंत चरित्रे अनंत कर्मे । अनंतोत्तमें हरिकीर्ती ॥८४॥
अगाध भगवंताचा महिमा । त्याच्या पार नाहीं जन्मकर्मा । त्याचा अनुष्टुप् हा महिमा । तुज म्यां नरोत्तमा निरूपिला येथें ॥८५॥
ऐशी अवतारचरित्रनामें । परिसतां विचित्र कर्मे । राजा अत्यंत सप्रेमें । मनोधर्मे निवाला ॥८६॥
जे जे अवतारी देवो सगुण । जाहला परी निर्गुणाचे गुण । प्रकट करीतचि आपण । कर्माचरण स्वयें दावी ॥८७॥
धन्य धन्य ते हरिगण । जे वर्णिती भगवद्गुण । ज्यांचेनि वचनें संपूर्ण । निवे अंतःकरण श्रोत्यांचें ॥८८॥
श्रोत्यांचे अवधान निवे । तेथ वक्ता स्वानंदसुख पावे । ग्रंथ वोसंडे स्वभावें । साहित्यगौरवें रसाळ ॥८९ ॥
जेवीं चंद्रकरें साचा । मुखबंध सुटे चकोरांचा । तेवीं एका जनार्दनाचा । संतकृपा वाचा फुटली त्यासी ॥२९०॥
जेवीं सूर्यकिरणस्पर्शे । कमळकळी स्वयें विकासे ।तेवीं संतकृपासौरसें । ग्रंथु विकासे अर्थावबोधे ॥९१॥
तेचि कृपेनें तत्त्वतां । अर्थिले श्रीभागवता । आतां पंचमाध्यायी कथा । सावध श्रोतां अवधारिंजे ॥९२॥

पाचव्या अध्यायाचा प्रस्ताव (२९३ ते २९६)

राजा प्रश्न करील गोड । जो परिसतां पुरेल कोड । साधकांची उपशमेल चाड । होय निवाड धर्माधर्माचा ॥९३॥
जेथ भजना भजनहातवटी । प्रश्नोत्तरें कथा गोमटी । अतिशयें रसाळ गोठी । जेणे सुटे गांठी अधर्माची ॥९४॥
तें उत्तमोत्तम निरूपण । भरीत संतांचे श्रवण । जनार्दनकृपा पूर्ण । एका जनार्दन सांगेल ॥९५॥
अंगीं वारियाचेन संचरणें । घुमारा घुमों लागे तेणें । तेवीं एकाजनार्दनें । कविता करणे निजांगें ॥२९६॥
इति श्रीमद्भागवते महापुराणे एकादशस्कन्धे चतुर्थोऽध्यायः ॥
इति श्रीमद्भागवत महापुराणे एकादशस्कंधे परमहंससंहितायां एकाकारटीकायां चतुर्थोऽध्यायः॥४॥
श्रीकृष्णार्पणमस्तु ।
चौथा अध्याय समाप्त (श्लोक २३; ओव्या २९६)

७६७.याति शूद्र वैश्य केला वेवसाव । आधीं तो हा देव कुळ पूज्य ॥१॥
नये बोलों परि पाळिलें वचन । केलियाचा प्रश्न तुम्ही संतीं ॥ध्रु॥
संवसारे झालों अतिदु:खें दु:खी । मायबापें सेखीं क्रमिलिया ॥३॥
दुष्काळें आटिले द्रव्य नेला मान । स्त्री एकी अन्न अन्न करितां मेली ॥४॥
लज्जा वाटें जीवा त्रासलों या दु:खें । वेवसाय देखें तुटी येतां ॥५॥
देवाचे देऊळ होतें जें भंगलें । चित्तासी तें आलें करावेंसें ॥६॥
आरंभी कीर्तन करीं एकादशीं । नव्हतें अभ्यासीं चित्त आधीं ॥७॥
कांहीं पाठ केलीं संतांची उत्तरें । विश्वास आदरें करोनियां ॥८॥
गाती पुढे त्यांचे धरावें ध्रुपद । भावें चित्त शुद्ध करोनियां ॥७॥
संतांचे सेविलें तीर्थ पायवणी । लाज नाहीं मनीं येऊ दिली ॥१०॥
ठाकला तो कांहीं केला परउपकार । केलें हे शरीर कष्टवूनि ॥११॥
वचने मानिलीं नाहीं सुहृदांची । समूळ प्रपंची वीट आला ॥१२॥
सत्यअसत्यासी मन केलें ग्वाही । मानियेलें नाहीं बहुमतां ॥१३॥
मानियेला स्वप्नीं गुरूचा उपदेश । धरिला विश्वास दृढ नामीं ॥१४॥
यावरी या झाली कवित्वाची स्फूर्ति । पाय धरिले चित्तीं विठोबाचे ॥१५॥
निषेधाचा कांहीं पडिला आघात। तेणें मध्ये चित्त दुखवलें ॥१६॥
बुडविल्या वह्या बैसलों धरणें । केलें नारायणे समाधान ॥१७॥
विस्तारी सांगतां बहुत प्रकार । होईल उशीर आतां पुरे ॥१८॥
आतां आहे तैसा दिसतो, विचार । पुढील प्रकार देव जाणे ॥१९॥
भक्तां नारायण नुपेक्षी सर्वथा । कृपावंत ऐसा कळों आलें॥२०॥
तुका म्हणे माझे सर्व भांडवल । बोलविले बोल पांडुरंगें ॥२१॥
७६८.ऐका वचन हे संत । मी तो आगळा पतित । काय काजें प्रीत । करितसा आदरें? ॥१॥
माझें चित्त मज ग्वाही । सत्य तरलों मी नाहीं । एकाचिये वाहीं । एक देखीं मानिती॥ध्रु॥
बहु पीडिलों संसारें । मोडी पिसें पिटीं ढोरें । न पडतां पुरें । या विचारें राहिलों ॥३॥
सहज सरलें होतें कांहीं । द्रव्य थोडें बहु तेंही । त्याग केला नाहीं । दिले द्विजां याचकां ॥४॥
प्रिया पुत्र बंधु । यांचा तोडिला संबंधु । सहज झालों मंदु। भाग्यहीन करंटा ॥५॥
तोंड न दाखवावें जना । शिरें सांदी, भरें राना । एकांत तो जाणा । तयासाठी लागला ॥६॥
पोटें पिटिलें काहारें। दया नाहीं या विचारें । बोलावितां बरें । सहज म्हणे यासाठी ॥७॥
सहज वडिलां होती सेवा । म्हणोनि पूजितों या देवा । तुका म्हणे भावा-। साठी, झणी घ्या कोणी ॥८॥
७६९.बरें झालें देवा निघाले दिवाळे। बरी या दुष्काळें पीडा केली ॥१॥
अनुतापें तुझें राहिलें चिंतन । झाला हा वमन संवसार ॥ध्रु॥
बरे झालें देवा बाईल कर्कशा । बरी हे दुर्दशा जनामध्ये ॥३॥
बरें झालें जगीं पावलों अपमान । बरें गेलें धन ढोरें गुरें ॥४॥
बरे झालें नाहीं धरिली लोकलाज । बरा आलों तुज शरण देवा ॥५॥
बरे झालें तुझें केलें देवाईल। लेकरें बाईल उपेक्षिलीं ॥६॥
तुका म्हणे बरें व्रत एकादशी । केलें उपवासी जागरण ॥७॥
७७०.बोलावा ‘विठ्ठल’ पाहावा विठ्ठल । करावा विठ्ठल जीवभाव ॥१॥
येणे सोसें मन झाले हावभरी । परती माघारी घेत नाहीं ॥ध्रु॥
बंधनापासूनि उकलली गांठी । देता आली मिठी सावकाश॥३॥
तुका म्हणे देह भरिला विठ्ठलें । कामक्रोधें केलें घर रितें ॥४॥
७७१.‘जग अवघे देव’ । मुख्य उपदेशाची ठेव ॥१॥
आधी आपणयां नासी । तरि उतरे ये कसीं ॥ध्रु॥
ब्रह्मज्ञानाचे कोठार । तें या निश्चयें उत्तर ॥३॥
तुका म्हणे ते ‘उन्मनी’। नाश कारया कारणीं ॥४॥
७७२.मीचि मज व्यालों। पोटा आपुलिया आलों ॥१॥
आतां पुरले नवस। निरसोनी गेली आस ॥ध्रु॥
झालों बाराबळी। गेलों मरोनि ते काळीं ॥३।।
दोहींकडे पाहें । तुका आहे तैसा आहे ॥४॥
७७३.साधनाच्या कळा आकार आकृति। कारण नवनीती मथनाचें ॥१॥
पक्षियासी नाहीं मारगी आडताळा। अंतरिक्षी फळासीचि पावे ॥ध्रु॥
भक्तीची जोडी ते उख-त्याचि साठीं । उणे पुरे तुटी तेथें नाहीं ॥३॥
तुका म्हणे आलें सांचत सांचणी। आजी झालीं धणी एकसरें ॥४॥
७७४.नाहीं येथें वाणी। सकळा वर्णीं घ्यावी धणी ॥१॥
जालें दर्पणाचे अंग। ज्याचा त्यासी दावी रंग ॥ध्रु॥
एका भावाचा एकांत । पीक पिकला अनंत ॥३॥
तुका खळे दाणीं । करी बैसोनि वांटणी ॥४॥
७७५.ठेविलें जतन । करूनियां निज धन ॥१॥
जयापासाव उत्पत्ति । तें हे बीज धरिलें हातीं ॥ध्रु॥
निवडिलें वरळा भूस । सार आइन जिन्नस ॥३॥
तुका म्हणे नारायण । भाग संचिताचा गुण ॥४॥
७७६.भ्रमणा पाउले वेचिताती वाव। प्रवेशाचा ठाव एका द्वारें ॥१॥
सार ती पाउले विठोबाची जीवीं । कोणी न विसंबावी क्षणभरी ॥ध्रु॥
सुलभ हे केलें सकळां जीवन। फुंकावेचि कान न लगे कांहीं ॥३॥
तुका म्हणे येथे सकळही कोड । पुरे मूळ खोड विस्ताराचें?॥४॥
७७७.कांहीं जाणों नये पांडुरंगाविण । पाविजेल शीण संदेहानें ॥१॥
भलतियां नांवें आळविला पिता । तरी तो जाणता कळवळा ॥ध्रु॥
अहंकार जातो, गौरवितां वाणी । सर्व गात्रां धणी हरिकथा ॥३॥
तुका म्हणे उपजे विल्हाळ आवडी । करावा तो घडीघडी लाहो ॥४॥
७७८.बीजापोटी पाहे फळ । विध न करितां सकळ ॥१॥
तया मूर्ख म्हणावें वेडें । कैसे तुटेल सांकडें? ॥ध्रु॥
दावितिया वाट । वेठी धरूं पाहे चाट ॥३॥
पुढिल्या उपाया । तुका म्हणे राखें काया ॥४॥
७७९.मातेची जो थाने फाडी । तया जोडी कोण ते? ॥१॥
वेदां निंदी तो चांडाळ । भ्रष्ट सुतकीया खळ ॥ध्रु॥
आगी लावी घरा । मग वसती कोठे थारा? ॥३॥
तुका जाणे वर्म । येरा नाचवितो भ्रम ॥४॥
७८०.वेश वंदाया पुरते । कोण ब्राह्मण निरुते ॥१॥
ऐसें सांगा मजपाशीं । संतां निरवितों येविशीं ॥ध्रु॥
असां जी प्रवीण । ग्रंथीं कळे शुद्ध हीन ॥३॥
तुका म्हणे लोपें । सत्याचिया घडती पापें ॥४॥

संपूर्ण वारकरी प्रस्थानत्रयी नित्यनेम पारायण अनुक्रमणिका


ग्रंथ

1 thought on “दिवस – ४८. वारकरी प्रस्थानत्रयी नित्यनेम पारायण”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Page Reader Press Enter to Read Page Content Out LoudPress Enter to Pause or Restart Reading Page Content Out LoudPress Enter to Stop Reading Page Content Out LoudScreen Reader Support
error: Content is protected !!
Scroll to Top