
अनुक्रमणिका
- श्रीज्ञानेश्वरी नित्यनेम पारायण क्रमश: नित्यनेम पारायण अध्याय – ५. ओवी क्र. ९६ ते १२८
- श्रीएकनाथी भागवत क्रमश: नित्यनेम पारायण अध्याय – ५, ओवी क्र. ५२ ते ११०
- अभक्त ज्ञानाभिमानी (५२ ते ६३)
- ज्ञानी अभिमानी आणि अज्ञानी भाविक (६४ ते ८१)
- ज्ञानाभिमानाचा परिणाम (सुखाभिलाषा)-कामक्रोध (८२ ते ९४)
- ज्ञानाभिमान्याच्या कामक्रोधाचे परिणाम (९५ ते ११०)
- श्रीतुकाराम महाराजांची गाथाअभंग क्र. ७९९ ते ८१३
- ग्रंथ
या कुन्देन्दुतुषारहारधवला या शुभ्रवस्त्रावृता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना ।
या ब्रह्माच्युतशङ्करप्रभृतिभिर्देवै: सदा वन्दिता सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापहा ॥
जयांचे केलिया स्मरण । होय सकळ विद्यांचे अधिकरण । तेचि वंदूं श्रीचरण । श्रीगुरूंचे ॥१॥
ते नमस्कारोनि आता ॥
श्रीगणेशाय नमः । श्रीसरस्वत्यै नमः । श्रीविठ्ठलाय नमः ।
श्रीमातापितृभ्यां नमः । श्रीगुरुभ्यो नमः ॥
ॐ नमो भगवते वासुदेवाय ।
रामकृष्णहरि । रामकृष्णहरि । रामकृष्णहरि ॥
श्रीज्ञानेश्वरी नित्यनेम पारायण
क्रमश: नित्यनेम पारायण
अध्याय – ५. ओवी क्र. ९६ ते १२८
जिहीं विषयसंगु न सांडितां । इंद्रियांतें न दंडितां । परी भोगिली निःसंगता । कामनेविण ॥९७॥
जिहीं लोकांचेनि आधारें । लौकिकेंचि व्यापारें । परि सांडिलें निदसुरें । लौकिकु हें ॥९८॥
जैसा जनामाजि खेळरू । असतुचि, जना नोहे गोचरू । तैसा, शरीरीं; परी संसारू । नोळखे तयांतें ॥९९॥
हें असो, पवनाचेनि मेळें । जैसें जळींचि जळ लोळे । तें आणिकें म्हणती “वेगळें । कल्लोळ हे’ ॥१००॥
तैसें, नाम रूप तयाचें । एऱ्हवीं ब्रह्मचि तो साचें । मन साम्या आलें जयाचें । सर्वत्र गा ॥१०१॥
एैसेनि समदृष्टी जो होये । तया पुरुषा लक्षणही आहे । अर्जुना, संक्षेपें सांगेन पाहे । अच्युत म्हणे ॥१०२॥
तोचि तो निरुता । समदृष्टी तत्त्वतां । हरि म्हणे “पांडुसुता । तोचि ब्रह्म’ ॥१०४॥
सहजें स्वसुखाचेनि अपारें । सुरवाडलेनि अंतरें । रचिला; म्हणौनि बाहेरें । पाउल न घाली ॥१०६॥
सांगें, कुमुददळाचेनि ताटें । जो जेविला चंद्रकिरणें चोखटे । तो चकोरू काई वाळुवंटें । चुंबितु असे? ॥१०७॥
तैसें आत्मसुख उपायिलें । जयासि आपणपेंचि फावलें । तया विषयो सहजें सांडवलें । म्हणो काई? ॥१०८॥
एऱ्हवीं तरी, कौतुकें । विचारूनि पाहें पां, निकें । या विषयांचेनि सुखें । झकविती कवण? ॥१०९॥
नातरी, मृगें तृषापीडितें । संभ्रमें विसरोनि जळांतें । मग, तोयबुद्धि बरडीतें । ठाकुनि येती ॥१११॥
तैसें, आपणपें नाहीं दिठें । जयांतें स्वसुखाचें सदा खरांटे । तयासिचि विषय हे गोमटे । आवडती ॥११२॥
एऱ्हवीं, विषयीं सुख आहे । हे बोलणेंचि सारिखें नोहे । तरी विद्युत्स्फुरणें कां न पाहे । जगामाजी? ॥११३॥
सांगें, वात वर्ष आतपु धरे । एैसे अभ्रच्छायेचि जरी सरे । तरी त्रिमाळिकें धवळागरें । करावी कां? ॥११४॥
म्हणौनि, विषयसुख जें बोलिजे । तें, नेणतां, गा वायां जल्पिजे । जैसें मधुर कां म्हणिजे । विषकंदांतें ॥११५॥
नातरी भौमा नाम मंगळु । रोहिणीतें म्हणती जळु । तैसा सुखप्रवादु बरळु । वैषयiku हा ॥११६॥
हे असो आघवी बोली । सांग पां सर्पफणीची साउली । ते शीतळ होईल केतुली । मूषकांसी? ॥११७॥
जैसा आमिषकवळु पांडवा । मीनू न सेवी, तंवचि बरवा । तैसा विषयसंगु आघवा । निभ्रांत जाणें ॥११८॥
हे विरक्तांचिये दिठी । जैं न्याहाळीजे, किरीटी । तैं पांडुरोगाचिये पुष्टी- । सारिखें दिसे ॥११९॥
म्हणौनि विषयभोगीं जें सुख । तें साद्यंतचि जाण, दुःख । परि काय कीजे मूर्ख । न सेवितां न सरे ॥१२०॥
तें अंतर नेणती बापुडे । म्हणौनि अगत्य सेवणें घडे । सांगें, पूयपंकींचे किडे । काय चिखलसी घेती? ॥१२१॥
तयां दुखियां दुःखचि जिव्हार । ते विषयकर्दमींचे दर्दुर । ते भोगजळींचे जळचर । सांडिती केवीं? ॥१२२॥
आणि दुःखयोनि जिया आहाती । तिया निरर्थका तरी नव्हती? । जरी विषयांवरि विरक्ति । धरिती जीव ॥१२३॥
नातरी, गर्भवासादि संकट । कां, जन्ममरणींचे कष्ट । हें विसांव्यावीण वाट । वाहावी कवणें? ॥१२४॥
जरी विषयीं विषयो सांडिजेल । तरी महादोषीं कैं वसिजेल? । आणि संसारु हा शब्दु नव्हेल । लटिका जगीं? ॥१२५॥
म्हणौनि, अविद्याजात नाथिलें । तें तिहींचि साच दाविलें । जिहीं सुख-बुद्धि घेतलें । विषयदुःख ॥१२६॥
याकारणें गा सुभटा । हा विचारितां विषय वोखटा । तूं झणीं कहीं या वाटा । विसरोनि जासी ॥१२७॥
पें, यातें विरक्त पुरुष । त्यजिती, कां, जैसें विष । निराशा तयां दुःख । दाविले, नावडे ॥१२८॥
॥ पुंडलिकवरदा हरी विठ्ठल श्रीज्ञानदेव तुकाराम ॥
श्रीएकनाथी भागवत
क्रमश: नित्यनेम पारायण
अध्याय – ५, ओवी क्र. ५२ ते ११०
श्रीगणेशाय नमः ॥ श्रीसरस्वत्यै नमः ॥ श्रीगुरुभ्यो नमः ॥ श्रीदत्तात्रेयाय नमः ॥ श्रीरुक्मिणीपाण्डुरङ्गाभ्यां नमः ॥
अभक्त ज्ञानाभिमानी (५२ ते ६३)
(अर्थ – या (उत्पन्न झालेल्या) वर्णांपैकी जे, आपल्याला जन्म देणारा म्हणजे पिता, सर्वसत्ताधीश, साक्षात महापुरुष जो परमेश्वर त्याचे भजन (उपासना) करीत नाहीत, तर उलट अनादर करतात ते आपापल्या स्थानापासून (वर्ण व आश्रम यांपासून) भ्रष्ट होऊन नरकात पडतात. ॥३॥)
पूर्वोत्तरमीमांसा दोनी । नानाशास्त्रार्थकडसणी । स्वरूप बोलती निर्वचूनी । एवं शब्दज्ञानी अतिचतुर ॥५३॥
यापरी जे पंडित । ज्ञानाभिमानें अतिउन्मत्त । तेणें अभिमानेंचि येथ । भजनी निश्चित विमुख केले ॥५४॥
एक अज्ञानी सर्वथा । स्वप्नी नेणती परमार्था । ते नेणपणेंचि तत्त्वतां । श्रीजगन्नाथा न भजती ॥५५॥
शेळी उंसाची चवी गाढी । नेणोनि पाचोळा करांडी । तेवीं नेणोनि हरिभक्तीची गोडी । अज्ञानें बापुडी विषयलुब्ध ॥५६॥
आलोडूनि वेदशास्त्रार्थ । ज्ञातेपणे जें पंडित । गर्वे हेळसिती भक्तिपंथ । अतिउन्मत्त ज्ञातृत्वें ॥५७॥
जेवीं ज्वरिताचे मुख । दूध मानी कडू विख । तेवीं ज्ञानगर्वें पंडित देख । ठेले विमुख हरिभजनीं ॥५८॥
यापरी ज्ञानाभिमानी । विमुख झाले हरिभजनीं । ते जरी वर्णांमाजी अग्रगणी । तरी अधःपतनी पडतील ॥५९॥
हो कां वर्णांमाजी अग्रगणी । जो विमुख हरिचरणीं । त्याहूनि श्वपच श्रेष्ठ मानीं । जो भगवद्भजनीं प्रेमळु ॥६०॥
आम्ही मुक्त हे मानुनी । जे विमुख भगवद्भजनीं । ते पचिजती अधःपतनीं । तिर्यग्योनी जन्ममरणें ॥६१॥
मनुष्यदेहीं जे भजननष्ट । ते होती गा स्थानभ्रष्ट । अधःपातें भोगिती कष्ट । अतिउद्भट यातना ॥६२॥
ज्ञानाभिमाने जे न भजती । ते प्रौढपतनी पचिजती । अज्ञानांही तेचि गती । सर्वथा नृपती म्हणों नये ॥६३॥
ज्ञानी अभिमानी आणि अज्ञानी भाविक (६४ ते ८१)
(अर्थ – त्यांतील कित्येकांस श्रुत्यादींच्या अर्थविचाराचा अधिकार नसल्यामुळे हरिकथा ऐकावयास मिळणे कठीण पडते व त्यामुळे अच्युताच्या नामसंकीर्तनालाही ते पारखे होतात ; असे स्त्रीशूद्रादिक आपल्यासारख्या पुण्यपुरुषांच्या दयेला पात्र होतात. (ते भाविक असल्याने संत त्यांना भगवंताच्या गुणानुवादाचे, नामस्मरणाचे महत्त्व सांगतात व नुसत्या नामसंकीर्तनाने ते उद्धरून जातात.)॥४॥)
बाळक पित्याचे माथां चढे । जरी लाता हाणे तयाकडे । तरी त्यासी दोषु न घडे । दोषांचें सांकडे सज्ञानासी ॥६५॥
ज्ञात्यांपासोनि भजन ठाके । ते कवळिजती महादोखें । अज्ञाने तरती भाविकें । साधुकृपामुखें अनुगृहीतां ॥६६॥
अज्ञाना नाही विशेष बाधु । तो साधुविश्वासें होय शुद्धु । ज्ञानाभिमानियां भाव विरुद्धु । यालागीं सुबुद्धु दोष बाधी ॥६७॥
अज्ञानी विश्वासें साधु वंदी । ज्ञानाभिमानी दोहोंतें निंदी । यालागी त्याते त्रिशुद्धी । अवश्य बाधी अतिदोष ॥६८॥
साधुविश्वासें अज्ञान फिटे । ज्ञानाभिमानियां विकल्प मोठे । त्यांसी विश्वास कदा न घटे । अभिमानहटें अधःपात ॥६९॥
एवं विचारितां नेटेपाटें । अहंतेचे बंधन मोठे । अभिमानाऐसें नाहीं खोटें । दुजें वोखटें त्रिलोकीं ॥७०॥
अभिमानु ईश्वरा बाधी । तोही शबळ कीजे सोपाधी । अभिमानें देहबुद्धी । बाधक त्रिशुद्धी सुरनरांसी ॥७१॥
यालागी जे अज्ञान जन । ज्यांसी नाहीं ज्ञानाभिमान । तेही विश्वासल्या संपूर्ण । साधु सज्जन अनुग्रहो करिती ॥७२॥
ज्यासी म्हणती नीच वर्ण । स्त्रीशूद्रादि हीन जन । ज्यासी कां दूरी शास्त्रश्रवण । ज्यासी दूरी श्रवण वेदोक्त ॥७३॥
त्यांसी जाहलिया सद्भाव संपूर्ण । ते होतु का हीन जन । परी संतकृपेसी आयतन । विश्वासें पूर्ण अधिकार झाला ॥७४॥
ऐसे पूर्ण भावार्थी । त्यांसी तुम्हांऐशा साधुसंतीं । अनुग्रहोनि तारिती । कृपामूर्ती कृपाळु ॥७५॥
अज्ञानी यापरी तरती । परी ज्ञानाभिमान ज्यांच्या मतीं । ते ब्रह्मादिकां न तरती । त्यांचीही स्थिति मुनि सांगे ॥७६॥
((हरिभक्ती नसेल तर नुसता श्रुतिविचार मोक्षप्राप्तीस निरुपयोगी म्हणून सांगतात -) परंतु ब्राह्मण, क्षत्रिय व वैश्य की ज्यांना श्रुत्युक्त उपनयनादी संस्कारांनी द्विजत्व प्राप्त झाल्यामुळे भगवंताच्या पदकमलांजवळ जाण्याचा अधिकार प्राप्त झाला आहे, ते नुसत्या वेदवादामध्येच रत होऊन भगवत्स्वरूप न जाणता मोह पावतात.॥५॥)
येर द्विजन्मे जे कां तिन्ही । स्वभावें प्राप्त हरिचरणीं । आम्ही अधिकारी वेदज्ञानी । जन्माभिमानी अतिगर्वी ॥७८ ॥
जन्माभिमान कर्माभिमान । अग्रपूज्यत्वें पूज्याभिमान । अल्पमात्र वेदींचें ज्ञान । तो वेदाभिमान वाढविती ॥७९॥
ज्यासी प्राप्त उपनयन । ज्यासी प्राप्त गायत्री पूर्ण । ज्यासी हरीचे आवडे भजन । त्याचे धरितां चरण हरि भेटे ॥८०॥
ऐसे उत्तम जे ब्राह्मण । त्यांसी वेदवादें ज्ञानाभिमान । तेणें गर्वें पडे मोहन । तेंचि निरूपण विशद सांगे ॥८१॥
ज्ञानाभिमानाचा परिणाम (सुखाभिलाषा)-कामक्रोध (८२ ते ९४)
(अर्थ – वेदांमध्ये सांगितलेल्या कर्माचे रहस्य न समजणारे, जड, मूर्ख, आपण मोठे शहाणे आहोत असे मानणारे लोक वेदांच्या (स्वर्गभोग, नाना प्रकारचीसुखे मिळतील अशा) वरवर मधुर आणि मोहक वाणीने हुरळून जातात, मूढ बनतात, आणि वेदांचा आधार घेऊन तीच ती मोहक वाक्ये बोलत राहतात. ॥६॥)
गारोडियासी विद्या थोडी । परी सर्वांगी बिरुदें गाढीं । कां जाणी जाणपणे जोडी । कडोविकडी आसनपूजा ॥८३॥
देऊनि पतंगाचे ढाळ । स्फटिकाअंगी माणिक कीळ । तैसे मूर्खही केवळ । मिरविती प्रबळ ज्ञानाभिमानें ॥८४॥
आपण विधान नेणती । शेखी सज्ञानाही न पुसती । कर्म आपमती करिती । लौकिकी स्फिती वाढवावया ॥८५ ॥
मिथ्या मधुर शब्दें चाटुक । जे भोगी अणुमात्र नाहीं सुख । तरी इहामुत्र भजविती लोक । अप्सरादिक भोगलिप्सा ॥८६॥
येथ भोग भोगावे चोखडे । आणि पुढे स्वर्गभोग जोडे । येणे वचनें बापुडे । यागाकडे धांवती ॥८७॥
कर्ता सर्वस्वें नागवो । परि आचार्यत्व आम्हां येवो । ऐशी यांची बुद्धि पहा हो । यागप्ररोहो आरंभिती ॥८८॥
पावावया अतिप्रतिष्ठा । नाना कर्माच्या कर्मचेष्टा । करूनि दाविती खटपटा । कर्मारंभु मोठा आरंभुनी ॥८९॥
ना तरी जैसा मद्यपानी । मद्यरसा अमृत मानी । या वचनगोडिया मद्यपानी । प्रवर्तिजे जनीं स्वादलिप्सा ॥९०॥
तें सेविलिया काय जोडे । थिती सावधानता बुडे । मग दुर्भगत्व रोकडें । पिशाचत्व गाढे अंगीं वाजे ॥९१॥
तैसें केवळ पतनात्मक । त्या नांव म्हणती स्वर्गसुख । जाणोनि प्रवर्तती ते मूर्ख । फळकामुक अभिलाषी ॥९२ ॥
उंडणी लंघू न शके भिंतीसी । तरी चढों रिघते सायासीं । चढतां पडे आपैसी । तेवीं स्वर्गसुखासी दृढ पतन ॥९३ ॥
कर्माभिनिवेशपडिपाडें । कामलोभ दृढ वाढे । तेणें दांभिक करणे घडे । क्रोधाचे चढे महाभरितें ॥९४ ॥
ज्ञानाभिमान्याच्या कामक्रोधाचे परिणाम (९५ ते ११०)
(त्यांच्या राजसी वृत्तीमुळे परपीडक असा जारणमारणादी घोर संकल्प करणारे, विषयी, सर्पाप्रमाणे दीर्घकाल रागीट, ढोंगी, अभिमानी असे पापी लोक भगवंताला प्रिय असणाऱ्या भक्तांचे नाना प्रकारचे दोष काढून निंदा करीत बसतात.॥७॥)
तेव्हां उर्वशीच्या अतिआवडी । स्वर्गभोगाची अतिगोडी । यालागीं यागपरवडी । पुण्याची जोडी जोडूं धांवे ॥९६॥
तेथ मंत्रतंत्रद्रव्यशुद्धी । नाहीं यागयजनविधी । तेणें स्वर्ग नव्हेचि त्रिशुद्धी । ठकले दुर्बुद्धी अविहिताचारें ॥९७॥
तया अलब्धकामासाठीं । सर्वांगी क्रोधु उठी । जेवीं परिपाकापाठीं । धरी कडुवटी आंबिलकांजी ॥९८॥
जंव जंव पिकिजे कोरिफडें । तंव तंव कडूपण गाढे । तैसा कामनाशापुढें । क्रोध वाढे अत्युग्र ॥९९॥
क्रोध काळिया नाग खरा । देतु द्वेषाचा फुंफारा । घाली पूज्यतेच्या आकारा । धुधुःकारा साधुनिंदेचा ॥१०० ॥
ऐसा क्रोधाचा वसौटा । होय तमाचा चोहटा । मग दंभाचे नाणवठां । हीनकसाचा खोटा विकरा मांडी ॥१॥
मग जो जो भेटे प्राणिया । त्यासी अभिचारयोगक्रिया । लावूनि बाहेर मुद्रिया । पापाचारें पापिया प्रवृत्ति मांडी ॥२॥
स्वधर्माचा फाडोवाडें । प्रतिपदीं पाडा पढे । अधर्माची खाणी उघडे । समूळ कुडें कर्माचरण ॥३॥
तेणें पापाचार पिके । गगनचुंबित जाहली टेंके । मग अधमोत्तम एकें तुकें । घालिती यथासुखें अधर्मघालणी ॥४॥
तेथ ठाणे देऊनि अभिमाना । वाढविती ज्ञानाभिमाना । मग निंदिती साधुजना । विपुळाती सज्जना उपहासयुक्त ॥५॥
जगी सर्वत्र पाहती दोष । तथापि देखिल्याही निर्दोष । तरी करूनियां उपहास । करिती सावकाश असदारोपणें ॥६॥
यापरी अभिमानविदां । पापबुद्धीची दृढ बाधा । सहजानुवादें सदा । साधुनिंदा अनुवादती ॥७॥
जे कां हरीतें आवडती । जे सदा करिती हरिभक्ती । त्यांतें सदा उपहासिती । अनुवादती गुणदोष ॥८॥
द्विज स्मरती हरिनाम । त्या नांव म्हणती अधर्म । ऐकोनि हरिकीर्तनसंभ्रम । म्हणती हे परम महापाप ॥९॥
ऐसा जो हरिनामातें निंदी । हरिकीर्तनीं दुर्बुद्धी । तो खळ जाणावा त्रिशुद्धी । भजनापवादी दुर्जन ॥११० ॥
॥ पुंडलिकवरदा हरी विठ्ठल श्रीज्ञानदेव तुकाराम ॥
श्रीतुकाराम महाराजांची गाथा
अभंग क्र. ७९९ ते ८१३
मज आतां ऐसें नको करूं देवा! । तुझा दास जावा वायांविण ॥ध्रु॥
होईल थोरपणे जाणीवेचा भार । दुरावेन दूर तुझ्या पायीं ॥३॥
अंतरीचा भाव काय कळे लोकां? । एक मानी एका देखोवेखीं ॥४॥
तुका म्हणे तुझे पाय आतुडती । त्या मज विपत्ति गोड देवा ॥५॥
तुझ्या पायांसाठी केली आराणूक । आतां कांहीं एक नको दुजें ॥ध्रु॥
करूनियां कृपा करीं अंगीकार । न लावी उशीर आतां देवा! ॥३॥
नव्हें साच काही कळों आलें मना । म्हणोनि वासना आवरिली ॥४॥
तुका म्हणे आतां मनोरथ सिद्धि । माझे कृपानिधी पाववावे ॥५॥
सर्वभावे नाम गाईन आवडी । सर्व माझी जोडी पाय तुझे ॥ध्रु॥
लोटांगण तुझ्या घालीन अंगणीं । पाहेन भरोनि डोळे मुख ॥३॥
निर्लज्ज होऊनि नाचेन रंगणीं । येऊं नेदीं मनीं शंका कांहीं ॥४॥
अंकित अंकिला दास तुझा देवा! । संकल्प हा जीवा तुका म्हणे ॥५॥
जन्म जरा मरण कवण भोगी भोग । व्याधि नाना रोग सुखदु:खें ॥२॥
पापपुण्ये शुद्धाशुद्ध आचरणे । ही कोणाकारणे कवणे केली? ॥३॥
आम्हां मरण नाश, तूं तंव अविनाश । कैसा हा विश्वास साच मानूं? ॥४॥
तुका म्हणे तूंचि निवडी हे गुढार । दाखवीं साचार तेंचि मज ॥५॥
चोरा धरितां, सांगे कुठोऱ्याचे नांव । दोघांचेही पाव हात जाती ॥२॥
तुका म्हणे असे पुराणी निवाड । माझी हे बडबड नव्हे कांहीं ॥३॥
सुखें करावें कीर्तन । हर्षे गावे हरीचे गुण । वारी सुदर्शन । आपणचि कळिकाळां ॥ध्रु॥
जीव वेंची माता । बाळा जडभारी होतां । तो तो नव्हे दाता । प्राकृतां यांसारिखा ॥३॥
हे तो माझ्या अनुभवें । अनुभवा आलें जीवें । तुका म्हणे सत्य व्हावें । आहाच नये कारणा ॥४॥
सर्वथाही फिरों नये । ऐसी सोय लागलिया ॥ध्रु॥
पांडुरंगा ऐसी नाव । तारूं, भाव असतां ॥३॥
तुका म्हणे चुकती बापा! । पुन्हां खेपा सकळा ॥४॥
हेचि वर्म आम्हां भाविकांचे हातीं । म्हणऊनि चित्तीं धरिला राम ॥ध्रु॥
लोह कफ गारा अग्नीचिया काजें । येऱ्हवीं तें ओझें कोण वाहे? ॥३॥
तुका म्हणे खोरी पाहारा जतन । जोवरी हे धन हाती लागे ॥४॥
करिती घोष जयजयकार । जळती दोषांचे डोंगर ॥ध्रु॥
क्षमा दया शांति । बाण अभंग हे हातीं ॥३॥
तुका म्हणे बळी । तेचि एक भूमंडळीं ॥४॥
मग कैंचें रे बंधन । वाचे गातां नारायण । भवसिंधु तो जाण । येचि तीरीं सरेल ॥ध्रु॥
दास्य करिल कळिकाळ । बंध तुटेल मायाजाळ । होतील सकळ । रिद्धिसिद्धी म्हणियाऱ्या ॥३॥
सकळशास्त्रांचें सार । हे वेदांचे गव्हर । पाहातां विचार । हाचि करिती पुराणें ॥४॥
ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र । चांडाळांही अधिकार । बाळे नारी नर । आदि-करोनि वेश्याही ॥५॥
तुका म्हणे अनुभवें । आम्ही पाडियले ठावें। आणीकही दैवें । सुख घेती भाविकें ॥६॥
अविनाश सुख देईल निर्वाणीं । चुकतील खाणी चौऱ्यांशीच्या ॥ध्रु॥
आणिकिया जीवा होईल उद्धार । तेही उपकार घडती कोटि ॥३॥
आहिक्य परत्री होसील सरता । वाचे उच्चारितां ‘राम राम’ ॥४॥
तुका म्हणे सांडी संसाराचा छंद । मग परमानंद पावसील ॥५॥
मिष्टान्नाची गोडी जिव्हेच्या अगरी। मसक भरल्यावरी स्वाद नेणें ॥ध्रु॥
आणीकही भोग आणिका इंद्रियांचे । नाहीं ऐसे साचें जवळी कांहीं ॥३॥
रूप दृष्टि धाय पाहातां पाहातां । न घडे सर्वथा आणि तृष्णा॥४॥
तुका म्हणे कां रे नाशिवंतासाठीं । देवासवें तुटी करितोसी? ॥५॥
काय आम्हां करणे अधिक सांचूनि । देव झाला ऋणी पुरविता ॥ध्रु॥
दयाळ मायाळ जाणे कळवळा। शरणागतां लळा राखों जाणे ॥३॥
नलगे सांगणे मागणे तयासी । जाणे इच्छा तैसी पुरवी त्याची ॥४॥
तुका म्हणे लेई अळंकार अंगीं । विठ्ठल हा जगीं तूंचि होसी ॥५॥
काय करावें प्रमाण? । तुम्ही सांगा संतजन ॥ध्रु॥
मृत्तिकेचा घट । माजी अमृताचा सांठ ॥३॥
तुका म्हणे हित । तें मज सांगावें त्वरित ॥४॥
नाहीं वेठी जेवा सारा । जाहाती नाही म्हणियारा । सरिक नाहीं दुसरा । धनी सारा तुझा तूं ॥ध्रु॥
जपतप नांगरणी । न लगे आटी दुनवणी ॥३॥
कर्म कुळवणी। न लगे धर्म पाळी दोन्ही ॥४॥
ज्ञान पाभारी तीफणी । न लगे करावी पेरणी ॥५॥
बीज न लगे संचिताचें । पीक पिकलें ठायींचें ॥६॥
नाहीं यमाचें चोरटें । विठ्ठल पागोऱ्याच्या नेटें ॥७॥
पीक न वजे हा भरंवसा । करी उद्वेग तो पिसा ॥८॥
सराई सर्वकाळ । वायां न वजे घटिकापळ ॥९॥
प्रेम पिकलें अपार । नाहीं सांठवावया थार ॥१०॥
ऐसिये जोडी जो चुकला । तुका म्हणे धिग त्याला ॥११॥
॥ पुंडलिकवरदा हरी विठ्ठल श्रीज्ञानदेव तुकाराम ॥
संपूर्ण वारकरी प्रस्थानत्रयी नित्यनेम पारायण अनुक्रमणिका
ज्यांना प्रत्यक्षात ग्रंथावरून पारायण करायचे आहे त्यांनी खालील लिंकवरून ग्रंथ मागवावे.





