
अनुक्रमणिका
- श्रीज्ञानेश्वरी नित्यनेम पारायण क्रमश: नित्यनेम पारायण अध्याय – ५. ओवी क्र. १५१ ते १८०
- श्रीएकनाथी भागवत क्रमश: नित्यनेम पारायण अध्याय – ५, ओवी क्र. १४९ ते २०५
- ज्ञानाभिमान्यांचा धनमद (१४९ ते १७२)
- ज्ञानाभिमानीकृत साधुनिंदा (१७३ ते १९१)
- ईश्वर (१९२ ते २०५)
- श्रीतुकाराम महाराजांची गाथाअभंग क्र. ८२५ ते ८३८
- ग्रंथ
या कुन्देन्दुतुषारहारधवला या शुभ्रवस्त्रावृता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना ।
या ब्रह्माच्युतशङ्करप्रभृतिभिर्देवै: सदा वन्दिता सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापहा ॥
जयांचे केलिया स्मरण । होय सकळ विद्यांचे अधिकरण । तेचि वंदूं श्रीचरण । श्रीगुरूंचे ॥१॥
ते नमस्कारोनि आता ॥
श्रीगणेशाय नमः । श्रीसरस्वत्यै नमः । श्रीविठ्ठलाय नमः ।
श्रीमातापितृभ्यां नमः । श्रीगुरुभ्यो नमः ॥
ॐ नमो भगवते वासुदेवाय ।
रामकृष्णहरि । रामकृष्णहरि । रामकृष्णहरि ॥
श्रीज्ञानेश्वरी नित्यनेम पारायण
क्रमश: नित्यनेम पारायण
अध्याय – ५. ओवी क्र. १५१ ते १८०
सहजें तिहीं संधी-भेटी । जेथ भ्रूपल्लव पडे गांठी । तेथ पाठीमोरी दिठी । पारखोनियां ॥१५२॥
सांडूनि दक्षिण वाम । प्राणापानसम । चित्तोसी व्योम- । गामिये करिती ॥१५३॥
तैसी वासनांतराची विवंचना । मग आपैसी पारुखे, अर्जुना । जे वेळीं, गगनीं लयो मना । पवनें कीजे ॥१५५॥
जेथ हें संसारचित्र उमटे । तो मनोरूप पटु फाटे । जैसें सरोवर आटे । मग प्रतिभा नाहीं ॥१५६॥
तैसें मन एथ मुद्दल जाय । मग अहंभावादिक कैं आहे? । म्हणौनि शरीरेंचि ब्रह्म होये । अनुभवी तो ॥१५७॥
ॐ तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासूपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे
श्रीकृष्णार्जुनसंवादे कर्मसंन्यासयोगो नाम पञ्चमोऽध्यायः ॥५॥
आणि यम-नियमांचे डोंगर । अभ्यासाचे सागर । क्रमोनि हे, पार । पातले ते ॥१५९॥
तिहीं आपणपें करूनि निर्लेप । प्रपंचाचें घेतलें माप । मग साचा शांतीचेंचि रूप । होऊनि ठेले ॥१६०॥
ऐसा योगयुक्तीचा उद्देशु । जेथ बोलिला हृषीकेशु । जेथ अर्जुन, सुदंशु । म्हणौनि, चमत्कारला ॥१६१॥
तें देखिलियां कृष्णें जाणितलें । मग हांसोनि पार्थातें म्हणितलें । “काई पां चित्त उवाइलें । इये बोलीं तुझें?’ ॥१६२॥
तंव अर्जुन म्हणे “देवो । परचित्तलक्षणांचा रावो । भला जाणितला, जी, भावो । मानसु माझा’ ॥१६३॥
म्यां जें कांहीं विवरोनि पुसावें । तें आधींचि जाणितलें देवें । तरी, बोलिलें तेंचि सांगावें । विवळ करूनि ॥१६४॥
एऱ्हवीं तरी, अवधारा । जो दाविला तुम्हीं अनुसारा । तो पव्हण्याहूनि पायुतारा । सोहपा जैसा ॥१६५॥
तैसा सांख्याहूनि प्रांजळा । आम्हांसारिखियां अबळां । एथ आहाति, परि कांहीं काळा । तो साहो ये वर ॥१६६॥
म्हणौनि, “एक वेळ, देवा । तोचि पडताळा घ्यावा । विस्तरेल तरी सांगावा । साद्यंतुचि’ ॥१६७॥
तंव श्रीकृष्ण म्हणती “हो कां । तुज हा मार्गू गमला निका? । तरी, काय जाहलें, आइकीजो कां । सुखें बोलों ॥१६८॥
अर्जुना, तूं परिससी । परिसोनि अनुष्ठिसी । तरी आम्हांसीचि वानी कायसी । सांगावयाची?’ ॥१६९॥
आधींचि चित्त मायेचें । वरी मिष जाहले पढियंतयाचें । आतां तें अद्भुतपण स्नेहाचें । कवण जाणे! ॥१७०॥
तें म्हणों कारुण्यरसाची वृष्टी । कीं नव्या स्नेहाची सृष्टी । हें असो; नेणिजे, दृष्टी । हरीची वानूं ॥१७१॥
जे अमृताची वोतली । कीं, प्रेमचि पिऊनि मातली । म्हणौनि अर्जुनमोहें गुंतली । निघों नेणे ॥१७२॥
हें बहु जें जें जल्पिजेल । तेथें कथेसि फांकु होईल । परि तें स्नेहरूप न येल । बोलीवरि ॥१७३॥
म्हणौनि विसुरा काय येणें । तो ईश्वरू कवळावा कवणें? । जो आपुलें मान नेणे । आपणचि ॥१७४॥
तरी मागील ध्वनीआंतु । मज गमला सावियाचि मोहितु । जें, बलात्कारें असे म्हणतु । “परिस बापा ॥१७५॥
अर्जुना, जेणें जेणें भेदें । तुझें कां चित्त बोधे । तैसें तैसें विनोदें । निरूपिजेल ॥१७६॥
तो कायसया नाम योगु । तयाचा कवण उपेगु । अथवा अधिकारप्रसंगु । कवणा येथ? ॥१७७॥
ऐसें जें जें कांहीं । उक्त असे इये ठायीं । तें आघवेंचि, पाहीं । सांगेन आतां ॥१७८॥
तूं चित्त देऊनि अवधारीं’ । ऐसें म्हणौनि श्रीहरी । बोलिजेल, ते पुढारी । कथा आहे ॥१७९॥
श्रीकृष्ण अर्जुनेसीं संगु । न सांडोनि सांगेल योगु । तो व्यक्त करूं प्रसंगु । म्हणे निवृत्तिदासु ॥१८०॥
इति श्रीज्ञानदेवविरचितायां भावार्थदीपिकायां पञ्चमोऽध्यायः ॥५॥
श्लोक-२९, ओव्या-१८०.
॥ पुंडलिकवरदा हरी विठ्ठल श्रीज्ञानदेव तुकाराम ॥
श्रीएकनाथी भागवत
क्रमश: नित्यनेम पारायण
अध्याय – ५, ओवी क्र. १४९ ते २०५
श्रीगणेशाय नमः ॥ श्रीसरस्वत्यै नमः ॥ श्रीगुरुभ्यो नमः ॥ श्रीदत्तात्रेयाय नमः ॥ श्रीरुक्मिणीपाण्डुरङ्गाभ्यां नमः ॥
ज्ञानाभिमान्यांचा धनमद (१४९ ते १७२)
जातस्मयेनान्धधियः सहेश्वरान्, सतोऽवमन्यन्ति हरिप्रियान् खलाः ॥९॥
((पुनः तेच विस्ताराने सांगतात-) संपत्ती, ऐश्वर्य, कुलाचा अभिमान, पांडित्य, प्रतिष्ठेसाठी केलेला दानधर्मादी त्याग, रूप, त्याचप्रमाणे सामर्थ्य, दांभिक आचार या सर्वांमुळे अतिशय गर्विष्ठ होऊन ज्यांची बुद्धी (मीच सर्वांत मोठा या दुरभिमानाने) आंधळी म्हणजे भ्रष्ट झालेली आहे असे दुरात्मे ईश्वराची (अवतारकृत्यांकडे दोषैकदृष्टीने पाहून) त्याचप्रमाणे ईशभक्तांची (त्यांची उपासना दांभिक आहे असे म्हणून) त्यांचे खरे स्वरूप न जाणता सर्वकाळ निंदा व नालस्ती करीत राहतात. ॥९॥)
कां लेंडिये आला लोंढा । वाहवी वाळलिया लेंडा । कां मर्कटाचिया तोंडा । मदिरेचा भांडा सांपडे जैसा ॥१५०॥
तैसा मी एकु ज्ञाता फुडा । म्हणौनि नाचे तडतडां । सज्ञान आम्हांपुढां । कवण बापुडा आन आहे ॥१५१॥
ऐशियाहीवरी अदृष्टता । रत्ने मोतिलगा वस्तुजाता । गजवाजिनृयानप्राप्तता । तेणें गर्वे इंद्रमाथां मोचे फेडी ॥१५२॥
यज्ञी यागस्वाहाकारीं । इंद्र आमुची आशा करी । त्याची आम्हांहूनि थोरी । कैशापरी मानावी ॥१५३॥
मग शिष्य-सुहृत्-सज्जनीं । परिवारिल्या सेवकजनीं । मजसमान त्रिभुवनीं । समर्थ कोणी असेना ॥१५४॥
जैशी का कांटीभोंवतीं हरळी । तैशी शिष्यांची मांदियाळी । ते महिमेच्या गर्वमेळीं । मानी पायांतळी ध्रुवमंडळ ॥१५५॥
जैसें विंचुवा विष थोडें । परी प्रबळ वेदनेसी चढे । तेवीं विद्या थोडी परी गाढें । गर्वाचे फुडें अतिभरितें ॥१५६॥
तो अज्ञानांमाजी सर्वज्ञता । मिरवी आपुली योग्यता । जेवीं अंधारी खद्योता । सतेजता झगमगी ॥१५७॥
अल्पज्ञाता विद्येसाठीं । वाचस्पती नाणी दृष्टीं । जेवीं मुंगी पांखासाठीं । गरुडाचे पृष्ठीं पाय देवों पाहे ॥१५८॥
निखळ तांबियाचे नाणें । देवों रिघे दामोक्यायेसणें । तेणें आपुलेनि दातेपणें । मानी ठेंगणे बळीतें ॥१५९॥
कर्ण दातृत्वें मानिजे फुडा । तोही न मांडे आम्हांपुढां । प्रत्यहीं भारसुवर्णहुडा । उपजे, तेणें गाढा दाता कर्णु ॥१६०॥
आम्ही निजार्जितें वित्तें । दान देवों सत्पात्रातें । मा दातृत्वें कर्णातें । विशेषु येथें तो कायी ॥१६१॥
सदा अपकारुचि जोडे । त्यासीही अल्प उपकार घडे । इतुकियासाठी न उकल पडे । सर्वस्व रोकडे बुडवी सदा ॥१६२॥
एवं अल्प दानासाठीं । दातृत्वाचे त्रिकुटीं । मेघाच्यापरी अतिउद्भटीं । स्वमुखें उठी गर्जतु ॥१६३ ॥
बरवेपणाचेनि पांगें । मदनासी विटावों लागे । सौंदर्य माझेनि अंगें । दुजें मजजोगें असेना ॥१६४॥
की कावळा बरवेपणासाठीं । राजहंसा नाणी दिठीं । कां आस्वली मानी पोटीं । मीही गोमटी सीतेपरीस ॥१६५॥
तेवीं बरवेपणाचा जाण । थोर चढे देहाभिमान । जेवीं देखोनि हिरवें रान । म्हैसा संपूर्ण उन्मादे ॥१६६॥
यावरी काही एक पराक्रम । केलिया न मानी तीनही राम । जेवीं गोग्रहणी संग्राम । शौर्यधर्म उत्तराचा ॥१६७॥
का अंगींचेनि माजें । रानसोरु न मानी दुजें । तैसा बळाचेनि फुजें । स्वयें गर्जे मुसमुसितु ॥१६८ ॥
ते आधींच म्हणविती सज्ञान । त्याहीवरी ‘याज्ञिक’ हे महिमान । तें याज्ञिक कर्माचरण । दाविती आपण लोकांप्रती ॥१६९॥
आलिया धनिक जनांप्रती । आपुली स्तविती कर्मस्थिती । मग कर्ममुद्रा नानायुक्ती । स्वयें दाविती लौकिका ॥१७०॥
ऐशियाही कर्माचारा । ज्ञातृत्वाचा गर्व पुरा । जेवीं दिवाभीतु अंधारा । निघे बाहेरा घुंघातु ॥१७१॥
अजांचें लेंडोरें पेटे । तेथ ज्योतिज्वाळा कदा नुमटे । परी धुरकटलें धुपधुपी मोठे । धुवें थिकटे दिग्मंडळ ॥१७२ ॥
ज्ञानाभिमानीकृत साधुनिंदा (१७३ ते १९१)
जेवी दाटलेनि काविळे । दृष्टीते करी पिवळे । मग देखों लागे सकळे । आचूडमूळे पीतवर्ण ॥१७४॥
तेवीं निंदोपाधी अतिगर्वी । मंद जाहली प्रज्ञाछवी । मग निर्दुष्टी दोष लावी । शुद्धातें भावी अतिमलिन ॥१७५॥
जो योगियांच्या मुगुटीं । ज्यातें म्हणती धूर्जटी । त्याची पाहतां राहाटी । दिसे शेवटीं अतिमंद ॥१७६॥
रागें उमा घेतली आगी । यालागी याज्ञिकाचे शिर भंगी । सकामु तरी मोहिनीलागीं । नग्न लागवेगी पाठी लागे ॥१७७॥
विष्णु सदाचा कपटी । कांहीं न देखों शुद्ध दृष्टीं । वृंदा पतिव्रता गोमटी । तेणें केली शेवटीं व्यभिचारिणी ॥१७८ ॥
जेथ विष्णु व्यभिचारवासी । ते वृंदेच्या वृंदावनापाशीं । जट्याळ गांठ्याळ मिळती राशी । केवीं साधुत्व त्यांसी मानूं आम्ही ॥१७९॥
साधु मानूं सनत्कुमार । त्यांसीही वैकुंठी क्रोध थोर । शब्दासाठी हरिकिंकर । जयविजय वीर शापिले ॥१८० ॥
श्रेष्ठ मानूं चतुरानन । तोही निलागचि हीन । उमा नोवरी देखोन । म्हणतां ‘सावधान’ वीर्य द्रवलें ॥१८१ ॥
नारद ब्रह्मचारी निजांगें । तोही कृष्णदारा स्वयें मागे । तो कृष्णे ठकविला तत्प्रसंगें । साठी पुत्र वेगें स्नानी व्याला ॥१८२॥
ज्यातें म्हणती सत्य ‘धर्म’ । तोही केवळ अधर्म । गोत्रवधाचा संभ्रम । हा पूर्ण अधर्म धर्मासी ॥१८३ ॥
व्यास तरी तो जारपुत्र । तेणेंचि कर्मे पराशर । द्वेषिया वसिष्ठ-विश्वामित्र । अतिमत्सर परस्परें ॥१८४ ॥
साधु म्हणों दुर्वास ऋषी । तो छळू गेला अंबरीषासी । पितृद्रोह प्रल्हादासी । साधुत्व त्यासी केवीं मानूं ॥१८५॥
एवं वाखाणिले पुराणीं । तेही साचे न मानती मनीं । मा आतांचे वर्तमानीं । साधु कोणी असेना ॥१८६॥
ऐकोनियां अचाट गोष्टी । येरें धांवती येरांपाठीं । एक करिती तोंडपिटी । अतिचावटी उदरार्थ ॥१८७॥
एक मुद्रावंत आसनीं । एक बसती बकध्यानी । परी सत्य माने मनीं । ऐसा साधु कोणी असेना ॥१८८॥
ऐशी आपुलियाचि युक्तीं । साक्षेपें साधूंतें निंदिती । साधु असती हे वस्ती । अणुमात्र चित्ती असेना ॥१८९ ॥
जे जे हरीचे पढियंते । ते ते नावडती तयांतें । जेवीं दाखवितां दर्पणातें । क्षोभे निजचित्तें निर्नासिक ॥१९०॥
ज्या ईश्वराचेनि वर्तिजती । तो ईश्वर आहे हे न मनिती । तो ईश्वर आहे कोणे स्थिती । ऐक तुजप्रती सांगेन राया ॥१९१॥
ईश्वर (१९२ ते २०५)
वेदोपगीतं च न श्रृण्वतेऽबुधा, मनोरथानां प्रवदन्ति वार्तया ॥१०॥
(आकाश ज्याप्रमाणे सर्व ठिकाणी व्यापून आहे त्याचप्रमाणे नित्य, जीवमात्राला कल्याणकारी असे आत्मतत्त्व सर्वोत्कर्षत्वाने सर्व चराचर सृष्टीमध्ये भरून राहिले आहे असे कंठरवाने वेद ईश्वरी स्वरूपाचे सर्वकाळ गान करतात परंतु हे मूर्ख कर्मठ लोक वेदाचे हे गान ऐकतच नाहीत, ईशस्वरूप वेदांत वर्णिलेले आहे असे मानीतच नाहीत, वेद हे कामसंकल्पाचे वर्णन करणारे, त्याचाच महिमा गाऊन त्याची पूर्तता शिकविणारे असे समजून त्याप्रमाणे आचार व बडबड करीत राहतात.॥१०॥)
जो सर्वामाजी असे सर्वदा । परी सर्वपणा नातळे कदा । जेवीं पद्मपत्र जलस्पंदा । अलिप्त बुद्बुदा असोनि संगें ॥१९३ ॥
तेवीं असोनि सकळ जनीं । घसवटेना जनघसणीं । नभ जैसें अलिप्तपणीं । नरचूडामणी सबाह्य ॥१९४ ॥
तैसें अलिप्तपण न मोडे । परी रची अनंत ब्रह्मांडें । तें ब्रह्मांड अंडे प्रचंडें । वागवी उदंडे अकर्तात्मयोगें ॥१९५ ॥
यालागीं तो ‘अंतर्यामी’ । अभिधान बोलिजे नित्य निगमीं । जो सर्वांच्या हृदयग्रामी । चेतनानुक्रमी लक्षिजे ॥१९६ ॥
त्या ईश्वरातें नित्य ध्यातां । कां आवडी नाम मुखीं गातां । तरी अभीष्ट मनोरथां । होय वर्षता अखंडधारीं ॥१९७॥
त्या ईश्वराच्या गातां गोष्टी । सर्व अनिष्टां होय तुटी । जो देखतांचि दृष्टीं । स्वानंदसृष्टि तुष्टला वर्षे ॥१९८ ॥
एवं सुखदाता तोचि शास्ता । जो कां अंतकाचा नियंता । अकाळे काळही सत्ता । ज्या भेणें सर्वथा करुं न शके ॥१९९॥
श्वासोच्छ्वासांचिया परिचारा । ज्या भेणें नेमस्त वाजे वारा । ज्याचेनि धाकें धरा । न विरवे सागरा जळी असतां ॥२००॥
ज्याचे आज्ञेवरी जाण । सूर्य चालवी दिनमान । ज्याचे पुरातन आज्ञेभेण । समुद्र आपण रेखा नुलंघी ॥२०१ ॥
ज्यातें सदा गायिजे वेदीं । जो वाखाणिजे उपनिषदीं । ज्याची पवित्र कीर्ति दुर्बुद्धी । स्वयें त्रिशुद्धी नायकती कदा ॥२०२॥
ज्याचें नाम स्मरतां जाण । सकळ दोषां निर्दळण । त्याचे कृतांत वंदी चरण । जन्ममरण विभांडी ॥२०३॥
ज्याची कथा कर्णपुटीं । पडतां विकल्पांचिया कोटी । निर्दळूनि उठाउठी । पाडी मिठी परब्रह्मीं ॥२०४॥
यापरी जो पवित्र मूर्ती । ज्यालागीं वेद सदा वर्णिती । अभाग्य नायकती त्याची कीर्ती । वार्ता करिती मनोरथांच्या ॥२०५॥
॥ पुंडलिकवरदा हरी विठ्ठल श्रीज्ञानदेव तुकाराम ॥
श्रीतुकाराम महाराजांची गाथा
अभंग क्र. ८२५ ते ८३८
म्हणोनि गोड सर्वभावें । आंघोळी न लगे तोंड धुवावें । आर्तचाड जीवें। नलगे भ्यावें संसारा ॥ध्रु॥
कर्म तंव न पुरे संसारिक। धर्म तंव फळदायक । नाम विठ्ठलाचे एक । नाशी दु:ख भवाचें ॥३॥
न लगे सांडणे मांडणें । आगमनिगमाचे देखणें । अवघे तुका म्हणे । विठ्ठलनामें आटलें ॥४॥
देहाचा निग्रही त्याचा तो सांभाळी । मग नये कळि अंगावरी ॥ध्रु॥
आपलिया इच्छा माता सेवा करी । न बाधी ते थोरी येणे क्षोभे ॥३॥
तुका म्हणे सांडा देखीचा दिमाख । मोडसीचे दु:ख गांड फाडी ॥४॥
ध्यावें देवाचे ते पाय । धीर सकळ उपाय ॥ध्रु॥
करावीच चिंता । नाहीं लागत तत्त्वतां ॥३॥
तुका म्हणे भावें । होतें सकळ बरवें ॥४॥
पचीं पडे मद्यपान । भांग भुर्का हे साधन ॥ध्रु॥
अभेदाचें पाठांतर । अति विषयी पडिभर ॥३॥
चेल्यांचा सुकाळ । पिंडदंड भगपाळ ॥४॥
सेवा मानधन । बरे इच्छेनें संपन्न ॥५॥
सोंगाच्या नरकाडी । तुका बोडोनियां सोडी ॥६॥
कोणाचा कोणाशीं न धरे संबंध । आहे शुद्धबुद्ध ठायींचे ठायी ॥ध्रु॥
काढा जी आपुलें मोह बुंथी जाळे । नका लावूं बळे वेड आम्हां ॥३॥
जीव शिव काही ठेवियेली नांवें । सत्य तुम्हां ठावें असोनियां ॥४॥
सेवेच्या अभिळासें न धराचि विचार । आम्हां दारोदार हिंडविलें ॥५॥
आहे तैसें आतां कळलियावरी । परतें सांडा दुरी दुजेपण॥६॥
तुका म्हणे काय छायेच्या अभिळासें? । हंस पावे नाश तारांगणीं ॥७॥
तेथे काय ‘मी’ तें ‘माझें’? । कोण वागवी तें ओझें । देहा केवीं रिझे? । हे काळाचे भातुकें ॥ध्रु॥
जीव न देखे मरण । धरी नवी, सांडी जीर्ण । संचित प्रमाण । भोग शुभा अशुभासी ॥३॥
इच्छा वाढविते वेल । खुंटावा तो खरा बोल । तुका म्हणे मोल । झांकलें तें पावेल ॥४॥
देव कृपा करील मज । काय लाज राखील? ॥ध्रु॥
अव-घियांचा विसर झाला । हा राहिला उद्योग ॥३॥
तुका म्हणे चिंता वाटे । कोण भेटे सांगेसा ॥४॥
खादले पचे तरीच तें हित । ओक-लिया थीत पिंड पीडी॥२॥
तरि भले भोगे जोडिलें तें धन । पडिलिया खाण जीवनासी॥३॥
तुका म्हणे मज तारीं गा विठ्ठला! । नेणताचि भला दास तुझा ॥४॥
केला त्या विठ्ठले माझा अंगीकार । ऐसा हा विचार जाणोनियां ॥ध्रु॥
जे काही करितों तें माझें स्वहित । आली हे प्रचित कळों चित्ता ॥३॥
झाले सुख जीवा आनंद अपार । परमानंदें भार घेतला माझा ॥४॥
तुका म्हणे यासी नामाचा अभिमान । म्हणोनि शरण तारी बळें ॥५॥
तुझ्या पायीं मज झालासे विश्वास । म्हणोनियां आस मोकलिली॥ध्रु॥
ऋषि मुनि सिद्ध साधक अपार । कळला विचार त्यांसी तुझा ॥३॥
नाहीं नाश तें सुख दिले तयांस । झाले जे उदास सर्वभावें ॥४॥
तुका म्हणे सुख न मायें मानसीं । धरिलें जीवेंसी पाय तुझे ॥५॥
काढूनि बाहेरि ठेविलों निराळा । कवतुक डोळां दाखविलें ॥ध्रु॥
नाचे उडे माया करी कवतुक । नाशवंत सुखें साच केलीं ॥३॥
रडे फुंदे दु:खें कुटितील माथा । एकासी रडतां, तेंही मरे ॥४॥
तुका म्हणे मज वाटतें नवल । ‘मी’ हे ‘माझे’ बोल ऐकोनियां ॥५॥
आमुच्या हिताचा जाणोनि उपाव । तोचि पुढे देव करीतसे ॥ध्रु॥
म्हणऊनि नाहीं सुखदु:ख मनीं । ऐकिलिया कानीं वचनाचें ॥३॥
झालो मी नि:संग निवांत एकला । भार त्या विठ्ठला घालूनियां ॥४॥
तुका म्हणे झालों जयाचे अंकित । तोचि माझें हित सर्व जाणे ॥५॥
नामेंचि सिद्धि नामेंचि सिद्धि । व्यभिचारबुद्धि न पवतां ॥ध्रु॥
चालिला पंथ तो पाववील ठाया । जरि आड तया नये कांहीं ॥३॥
तुका म्हणे मध्ये पडती आघात । तेणे होय घात हानि लाभ॥४॥
म्हणऊनि जीवा न साहे संगति । बैसतां एकांती गोड वाटे ॥ध्रु॥
देहाची भावना वासनेचा संग । नावडे, उबग आला यांचा ॥३॥
तुका म्हणे देव अंतरे यामुळे । आशा- मोहजाळे दु:ख वाढे ॥४॥
॥ पुंडलिकवरदा हरी विठ्ठल श्रीज्ञानदेव तुकाराम ॥
संपूर्ण वारकरी प्रस्थानत्रयी नित्यनेम पारायण अनुक्रमणिका
ज्यांना प्रत्यक्षात ग्रंथावरून पारायण करायचे आहे त्यांनी खालील लिंकवरून ग्रंथ मागवावे.








रामकृष्णहरी माऊली 🙏