दिवस – ५३. वारकरी प्रस्थानत्रयी नित्यनेम पारायण

अनुक्रमणिका

॥ श्रीज्ञानेश्वरी ॥
अध्याय सहावा
मग रायातें म्हणे संजयो । “तोचि अभिप्रावो अवधारिजो । कृष्ण सांगती आतां जो । योगरूप ॥१॥
सहजें ब्रह्मरसाचें परगुणें । केलें अर्जुनालागीं नारायणें । कीं, तेचि अवसरीं पाहुणे । पातलों आम्ही ॥२॥
कैसी दैवाची थोरी, नेणिजे । जैसें तान्हेलिया तोय सेविजे । कीं, तेचि चवी करूनि पाहिजे । तंव अमृत आहे ॥३॥
तैसें आम्हां तुम्हां जाहलें । जे, आडमुठीं तत्त्व फावलें’ । तंव धृतराष्ट्रें म्हणितलें । “हें न पुसों तूतें’ ॥४॥
तया संजया येणें बोलें । रायाचें हृदय चोजवलें । जें-“अवसरीं आहे घेतलें । कुमरांचिया’ ॥५॥
हें जाणोनि, मनीं हांसिला । म्हणे म्हातारा मोहें नाशिला । एऱ्हवीं, बोलु तरी भला जाहला । अवसरीं इये ॥६॥
परि ते तैसें कैसेनि होईल? । जात्यंधा कैसें पाहेल? । वोदिंचि ये रुसें घेईल । म्हणौनि बिहे ॥७॥
परि आपण चित्तीं आपुला । निकियापरी संतोषला । जे, तो संवादु फावला । श्रीकृष्णार्जुनांचा ॥८॥
तेणें आनंदाचेनि धालेपणें । साभिप्राय अंतःकरणें । आतां आदरासीं बोलणें । घडेल तया ॥९॥
तो गीतेमाजीं षष्ठींचा । प्रसंगु असे आयणीचा । जैसा क्षीरार्णवीं अमृताचा । निवाडु जाहला ॥१०॥
तैसें गीतार्थाचें सार । जे विवेकसिंधूचें पार । नाना योगविभव-भांडार । उघडलें कां ॥११॥
जें आदिप्रकृतीचें विसवणें । जें शब्दब्रह्मासि न बोलणें । जेथूनि गीतावल्लीचें ठाणें । प्ररोहो पावे ॥१२॥
तो अध्यावो सहावा । वरी साहित्याचिया बरवा- । सांगिजैल म्हणौनि परिसावा । चित्त देउनि ॥१३॥
“माझा मऱ्हाटाचि बोलु कौतुकें । परि अमृतातेही पैजां जिंके’ । ऐसीं अक्षरें रसिकें । मेळवीन ॥१४॥
जिये कोंवळीकेचेनि पाडें । दिसती नादींचें रंग थोडे । वेधें परिमळाचें बीक मोडे । जयाचेनि ॥१५॥
ऐका, रसाळपणाचिया लोभा । कीं श्रवणींचि होती जिभा । बोलें इंद्रियां लागे कळंभा । एकमेकां ॥१६॥
सहजे शब्दु तरी विषयो श्रवणाचा । परि रसना म्हणे “रसु हा आमुचा’ । घ्राणासि भावो जाय परिमळाचा । हा तोचि होईल ॥१७॥
नवल बोलतीये रेखेची वाहणी । देखतां, डोळ्यांही पुरों लागे धणी । ते म्हणती “उघडली खाणी । रूपाची हे’ ॥१८॥
जेथ संपूर्ण पद उभारे । तेथ मनचि धांवे बाहेरें । बोलु भुजाही आविष्करे । आलिंगावया ॥१९॥
ऐसीं इंद्रियें आपुलालिया भावीं । झोंबती, परि तो सरिसेपणेंचि बुझावी । जैसा, एकला जग चेववी । सहस्रकरू ॥२०॥
तैसें शब्दाचें व्यापकपण । देखिजे असाधारण । पाहातयां भावज्ञां फावती गुण । चिंतामणीचे ॥२१॥
हें असोतु; या बोलांची ताटें भलीं । वरी कैवल्यरसें वोगरिलीं । ही प्रतिपत्ति मियां केली । निष्कामासी ॥२२॥
आतां आत्मप्रभा नित्य नवी । तेचि करूनि ठाणदिवी । जो इंद्रियांतें चोरूनि जेवी । तयासिचि फावे ॥२३॥
येथ श्रवणाचेनि पांगें- । वीण श्रोतया होआवें लागे । हे मनाचेनि निजांगें । भोगिजे गा ॥२४॥
आहाच बोलाची वालीफ फेडिजे । आणि ब्रह्माचियाचि अंगा घडिजे । मग, सुखेंसीं सुरवाडिजे । सुखाचि माजी ॥२५॥
ऐसें हळुवारपण जरी येईल । तरीच हें उपेगा जाईल । एऱ्हवीं, आघवी गोठी होईल । मुकिया बहिरयाची ॥२६॥
परि तें असो आतां आघवें । नलगे श्रोतयांतें कडसावें । जे, अधिकारीये एथ स्वभावें । निष्कामकामु ॥२७॥
जिहीं आत्मबोधाचिया आवडी । केली स्वर्गसंसाराची कुरोंडी । तेवांचूनि एथींची गोडी । नेणती आणिक ॥२८॥
जैसा वायसीं चंद्र नोळखिजे । तैसा प्राकृतीं हा ग्रंथु नेणिजे । आणि तो हिमांशुचि जोंवि खाजें । चकोराचें ॥२९॥
तैसा सज्ञानासि तरी हा ठावो । आणि अज्ञानासि आन गांवो । म्हणौनि बोलावया विषय पाहा हो । विशेषु नाहीं ॥३०॥
परि अनुवादलों मी प्रसंगें । तें सज्जनीं उपसाहावें लागे । आतां सांगेन, काय श्रीरंगें । निरुपिलें जें ॥३१॥
तें बुद्धीही आकळितां सांकडें । म्हणौनि बोलीं विपाायें सांपडे । परि श्रीनिवृत्तिकृपादीप उजियेडें । देखेंन मी ॥३२॥
जें दिठीही न पविजे । तें दिठीविणु देखिजे । जरी अतींद्रिय लाहिजे । ज्ञानबळ ॥३३॥
नातरी, जें धातुवादाही न जोडे । तें लोहींचि पंधरें सांपडे । जरी दैवयोगें चढे । परिसु हातां ॥३४॥
तैसी सद्गुरुकृपा होये । तरी, करितां, काय आपु नोहे? । म्हणौनि तें अपार मातें आहे । ज्ञानदेवो म्हणे ॥३५॥
तेणें कारणें मी बोलेन । बोलीं अरूपाचें रूप दावीन । अतींद्रिय; परि भोगवीन । इंद्रियांकरवीं ॥३६॥
आइका, यश श्री औदार्य । ज्ञान वैराग्य ऐश्वर्य । हे साही गुणवर्य । वसती जेथ ॥३७॥
म्हणौनि तो भगवंतु । जो निसंगाचा सांगातु । तो म्हणे “पार्था, दत्तचित्तु । होईं आतां’ ॥३८॥

विषयवासना (२०६ ते २१३)

अस्वल आपुलिया गुणगुणा । नायके वाजतिया निशाणा । तेवीं नायकोनि हरीच्या गुणा । विषयसंभाषणा आदरें वदती ॥२०६॥
यालागीं ते अतिमंद । अविनीत सदा स्तब्ध । विषयांलागी विषयांध । अतिलुब्ध लोलुप्ये ॥२०७॥
लोके व्यवायामिषमद्यसेवा नित्यास्तु जन्तोर्न हि तत्र चोदना ।
व्यवस्थितिस्तेषु विवाहयज्ञसुराग्रहैरासु निवृत्तिरिष्टा ॥११॥
(या भूलोकामध्ये प्राणिमात्रांना मैथुन, मांसाशन आणि मद्यपान ही कर्मे स्वाभाविकच आहेत. त्याकरिता वेदाज्ञारूप प्रेरणेची आवश्यकता नाही. विवाह, यज्ञ व सौत्रामणी विधी यांनी ह्या कर्मांमध्ये सुंदर व्यवस्था लाविली जाते. वैदिक मंत्रांचा हेतू या कर्माविषयी प्रेरणा देणे हा नसून त्यांपासून त्याने क्रमाक्रमाने निवृत्त व्हावे हाच आहे. (स्वैर विषयप्रवृत्ती होऊ नये, तिचे नियमन व्हावे हाच वेदाज्ञेचा खरा अर्थ आहे.)॥११ ॥)
वेदें न करितां प्रेरणा । विषयांवरी सहज वासना । स्वभावें सकळ जनां । सदा जाण सर्वांसी ॥२०८॥
मांससेवना मद्यपाना । मिथुनीभूत मैथुना । ये अर्थी सर्व जनां । तीव्र वासना सर्वदा ॥२०९॥
तेथें सेव्यासेव्यपरवडी । विवंचना कोण निवडी । लागली विषयांची गोडी । ते अनर्थकोडी करितील ॥२१०॥
आगी लागलिया कापुसा । विझवितां न विझे जैसा । तेवीं विषयवंता मानसा । विवेकु सहसा उपजेना ॥२११॥
झाल्या लोलिंगत बडिशा । निजमरण विसरे मासा । कां मुठी चणियांच्या आशा । नळीमाजी आपैसा वानरू अडके ॥२१२॥
दूध मिळालिया मांजर । न म्हणे द्विजअंत्यजघर । तेवीं विषयउन्मत्त नर । न करिती विचार सेव्यासेव्य ॥२१३॥

विषय निवृत्ती ही वेदांची शिकवण (२१४ ते २४०)

कां खवळल्या विषयचाडें । योनिसंकर घडेल पुढे । यालागीं वेदें चोखडे । वर्णाश्रमपाडें विभाग केले ॥२१४॥
जैसें अफाट पृथ्वीचे अंग । तेथें सप्तद्वीपे करूनि विभाग । मग भिन्नाधिकारें चांग । धरा साङ्ग आक्रमिली ॥२१५॥
कां अनावृत मेघजळा । धरणे धरूनि घालिजे तळां । मग नेमेचि ढाळेढाळां । पिकालागी जळा काढिजे पाट ॥२१६॥
आणि पवना नादाकारा । साधूनि कीजे वाजंतरा । मग जेवीं नाना ध्वनी मधुरा । वाजविजे यंत्रा सप्त स्वरें ॥२१७॥
तैसें उच्छृखळां विषयांसी । वेदें नेमिलें नेमेसीं । तेचि वेदाज्ञा ऐशी । ऐक तुजपासी सांगेन ॥२१८ ॥
आवरावया योनिभ्रष्टां । मैथुनी विवाहप्रतिष्ठा । लावूनियां निजनिष्ठा । वर्णवरिष्ठा नेमिले ॥२१९॥
ब्राह्मण जातां रजकीपासीं । ते तंव कडू न लगे त्यासी । रजक जातां ब्राह्मणीपासीं । तिखट त्यासी ते न लगे ॥२२०॥
भलती स्त्री भलता नर । मैथुनी होय वर्णसंकर । तो चुकवावया प्रकार । विवाहनिर्धार नेमिला वेदें ॥२२१॥
धर्मपत्नीपाणिग्रहण । विवाह नेमिला सवर्ण । तेथें सप्तम पंचम त्यजून । स्वगोत्री लग्न करूं नये ॥२२२॥
तीन्ही वेद तीन्ही वर्ण । वेदें सांडूनियां जाण । सवेद आणि सवर्ण । पाणिग्रहण नेमिलें ॥२२३॥
कन्या सवेद सवर्ण । जीसी नाहीं रजोदर्शन । तेही पित्यापासीं याचून । करावें लग्न विधानोक्त ॥२२४ ॥
धर्म-अर्थ-कामाचरण । अन्यत्र न करावें आपण । ऐशी वाहूनियां आण । पाणिग्रहण वेदोक्त ॥२२५॥
करितां वधूवरां पाणिग्रहण । साक्षी द्विज-देव-हुताशन । इतर स्त्रिया मातेसमान । स्वदारागमन नेमिलें वेदें ॥२२६॥
एवं नेमूनियां विवाहासी । वेदरायें दिली आज्ञा ऐशी । सांडूनि सकळ स्त्रियांसी । स्वदारेपाशी मैथुन ॥२२७॥
दिवा मैथुन नाही स्त्रियांसी । रात्री त्यजूनि पूर्वापर प्रहरांसी । मैथुन स्त्रियेपासीं । मध्यरात्रीसी नेमस्त ॥२२८॥
नेमिलें स्वदारामैथुन । तेंही अहोरात्र नाही जाण । प्रजार्थ स्त्रीसेवन । ऋतुकाळी गमन नेमस्त ॥२२९॥
ऋतुकाळी ज्यां स्त्रीगमन । ते पुरुष ब्रह्मचारी पूर्ण । वेद निवृत्तिपर जाण । त्यागरूपें आपण भोगातें नेमी ॥२३०॥
‘आत्मा वै पुत्रनामासि’ । पुत्र झालिया स्त्रियेसी । संग करूं नये स्त्रीपासीं । शनैःशनैः विषयांसी त्यागवी वेद ॥२३१॥
सेवावया आमिषा । वेदें नेमु केला कैसा । न घडावया पशुहिंसा । संकट आयासा स्वयें द्योती ॥ २३२॥
आवडी खावया मांसा । अथवा स्वर्गाचिया आशा । जे करिती पशुहिंसा । तयां पुरुषां अधःपतन ॥२३३॥
निष्काम कर्मी पशुहिंसा । करी तरी तो निष्काम कैसा । तेथ निगमाचा नेमु ऐसा । मुख्य अहिंसा सर्व धर्मी ॥२३४॥
नित्य न करावया मांसभक्षण । यज्ञी पुरोडाशसेवन । तेंही परिमित जाण । स्वेच्छा मांसादन वारिलें वेदें ॥२३५॥
याग करूनि ‘सौत्रामणी’ । प्रवर्तावें सुरापानी । हे वेदाज्ञा जो सत्य मानी । तो स्वधर्माचरणी नागवला ॥२३६॥
जे कर्मी मद्यपान घडे । तो स्वधर्म म्हणतां जीभ झडे । लोलुपते भुलले बापुडे । वेद विषयांकडे वोढिती ॥२३७॥
यागु करितां सौत्रामणी । स्वयें न व्हावें मद्यपानी । तें यज्ञशेष अवघ्राणीं । परी सर्वथा वदनीं घालूं नये ॥२३८॥
हे विषयांचे त्रिविध विंदान । मैथुन-मांसभक्षण-सुरापान । यदर्थी निवृत्तीचि प्रमाण । हे मनोगत पूर्ण वेदाचें ॥२३९॥
विषयांपासूनि निवृत्ती । वेद विभागे हेचि द्योती । परी धरावी विषयासक्ती । हे वेदोक्ति सर्वथा न घडे ॥२४०॥

धनाचा विनियोग (२४१ ते २५७)

वेंचोनियां निजधन । करोनियां विवाह यज्ञ । सेवावें मद्य-मांस-मैथुन । हे वेदवचन कदा न घडे ॥२४१॥
धनं च धर्मैकफलं यतो वै ज्ञानं सविज्ञानमनुप्रशान्ति ।
गृहेषु युञ्जन्ति कलेवरस्य, मृत्युं न पश्यन्ति दुरन्तवीर्यम् ॥१२॥
(संपत्ती मिळवायची व खर्च करावयाची तीसुद्धा धर्माकरिताच असते. धर्माच्या आचरणानेच विज्ञानासहित ज्ञानाची प्राप्ती होते (साक्षात्काराच्या द्वारा आत्मज्ञान प्राप्त होते) व ज्ञान झाल्यानंतर पूर्ण चिरकालिक शांतीचा लाभ होतो. याप्रमाणे संपत्तीची योजना असताना विषयी लोक तिचा उपयोग केवळ आपल्या बायकामुलांकरिता घरात करतात. या पंचभूतात्मक शरीराचा ग्रास घेणारा अमोघ पराक्रमी असा जो मृत्यू त्याच्याकडे कोणीच पाहात नाही. ॥१२ ॥)
नायकोनि भगवत्कथा । ज्ञानाभिमानी नाडले तत्त्वतां । धनें परमार्थ यावा हाता । तोही स्वधर्मता न लाविती धर्मी ॥२४२॥
विषयांचिया कामना । सर्वस्वें वेचिती धना । तेंचि धर्मार्थ वेंचितां जाणा । सांडिती प्राणा कवडीसाठीं ॥२४३॥
जया धनाचेनि पांगें । हा धर्मचि आलासे निजांगें । जेवीं पायाळाचेनि योगें । महानिधि वेगें आतुडे हातीं ॥२४४॥
बीज तेथें सद्रुम फळ । चंदन तेथें परिमळ । जळाचे ठायीं केवळ । नांदती सकळ रसस्वाद ॥२४५ ॥
देह तेथ असे कर्म । रूप तेथ वसे नाम । धन तेथ उत्तमोत्तम । सकळ धर्म सदा वसती ॥२४६॥
जेवीं एकादशीव्रतयोगें । जागरी गीतनृत्यपांगें । तुष्टला देवो लागवेगें । आतुडे धनयोगें निजभक्तां करीं ॥२४७॥
तेवीं धनाचिया पाठोवाठीं । परम धर्मेसी पडे गांठी । धर्म तेथ उठाउठी । ज्ञानाची भेटी विज्ञानेंसीं ॥२४८॥
चंद्रास्तव वाढती कळा । जीवनास्तव जिव्हाळा । तेवीं धनास्तव सोज्ज्वळा । धर्माचा सोहळा धार्मिकां घरीं ॥२४९ ॥
धर्म तेथ शुद्ध ज्ञान । ज्ञान तेथ विज्ञान । विज्ञान तेथ समाधान । शांति संपूर्ण नांदे तेथ ॥२५०॥
एवढे फळ ज्या धनापासीं । तें मूर्ख वेंचिती विषयांसी । देहलोभे भुलली पिसीं । अंगींच्या मृत्यूसी विसरले ॥२५१॥
जळते घरी ठेवा ठेवणें । मरत्या देहा सुरवाड करणें । तो नागवला वेदु म्हणे । तें वेदाचे बोलणें नायके कोणी ॥२५२॥
उपजलेनि दिवसदिवसें । देहाते काळु ग्रासीतसे । हे नित्य नवें मरण कैसें । देहलोभवशे विसरले ॥२५३॥
ज्याचे त्या देखतां कैसा । काळु गिळी बाळवयसा । मग तारुण्याची दशा । मुरडूनि घसा ग्रासी काळ ॥२५४ ॥
गिळोनियां तारुण्यपण । आणी वार्धक्य कंपायमान । ऐसें काळाचें विंदान । दुर्धर पूर्ण ब्रह्मादिकां ॥२५५ ॥
जयाचेनि चपेटघातें । मरण आणी अमरांतें । मा मूर्ख तेथें जीवितातें । अक्षय चित्तें दृढ मानिती ॥२५६॥
मूळी देहचि तंव अनित्य । मा तेथींचे भोग काय शाश्वत । परी धन वेंचूनि विषयार्थ । भुलले जाणा भ्रांत स्त्रीलोभे ॥२५७ ॥

८३९.तुजशी संबंध खोटा । परता परता रे तूं थोटा ॥१॥
देवा तुझें काय घ्यावें । आप आपणां ठकावें ॥ध्रु॥
जेथे मुद्दल न ये हातां । व्याजें मरावें लेखितां ॥३॥
तुका म्हणे ऐसा । त्रिभुवनीं तुझा ठसा ॥४॥
८४०.याचि हाका तुझे द्वारीं । सदा देखों ऋणकरी॥१॥
सदा करिसी खंड दंड । देवा बहु गा तूं लंड ॥ध्रु॥
सुखें गोविसी भोजना । लपवूनियां आपणां ॥३॥
एकें एक बुझाविसी। तुका म्हणे ठक होसी ॥४॥
८४१.आम्ही जाणों तुझा भाव । दृढ धरियेले पाव ॥१॥
फांकू नेदूं चुकवितां । नेघों थोडें बहु देतां ॥ध्रु॥
बहुतां दिसांचे लिगाड । आलें होत होत जड ॥३॥
तुका म्हणे आतां । नेघों सर्वस्वही देतां ॥४॥
८४२.ऋण वैर हत्या। हें तो न सुटे नेदितां ॥१॥
हे कां नेणां पांडुरंगा! । तुम्ही सांगतसां जगा ॥ध्रु॥
माझा संबंध तो किती? । चुकवा लोकांची फजिती ॥३॥
तुका म्हणे याचिसाठीं । मज घेतां नये तुटी ॥४॥
८४३.नाही मागितला । तुम्हां मान म्यां विठ्ठला! ॥१॥
जे हे करविली फजिती । माझी एवढी जनाहातीं ॥ध्रु॥
नाहीं केला पोट । पुढे घालूनि बोभाट ॥३॥
तुका म्हणे धरूनि हात । नाहीं नेले दिवाणांत ॥४॥
८४४.तूं पांढरा स्फटिक मणी । करिसी आणिकां त्यांहूनि ॥१॥
म्हणोनि तुझ्या दारा । न येती, ठकती दातारा! ॥ध्रु॥
तुझे ठाई नांदणूक । अवघा बुडविला लौकिक ॥३॥
तुका म्हणे ज्याचें घेसी । त्यासी हेंचि दाखविसी ॥४॥
८४५.बोलतों निकुरें । नव्हती सलगीची उत्तरें ॥१॥
माझें संतापलें मन । परपीडा ऐकोन ॥ध्रु॥
अंगावरि आलें । तोंवरि जाईल सोसिलें ॥३॥
तुज भक्ताची आण देवा । जरि तुका येथे ठेवा ॥४॥
८४६.बुद्धिचा जनिता लक्ष्मीचा पति । आठवितां चित्तीं काय नव्हे ॥१॥
आणिका उपाया कोण वांटी मन । सुखाचें निधान पांडुरंग ॥ध्रु॥
गीतीं गावों नाचों छंदे वाहों टाळी । वैष्णवांचे मेळी सुखरूप ॥३॥
अनंत ब्रह्मांडे एके रोमावळी। आम्ही केला भोळीं भावें उभा ॥४॥
लटिका हा केला संसारसिंधु । मोक्ष करी बंधु नाहीं पुढें ॥५॥
तुका म्हणे ज्याच्या नामाचे अंकित । राहिलों निश्चिंत त्याच्या बळें ॥६॥
८४७.न लगे मायेसी बाळ निरवावें । आपल्या स्वभावें ओढे त्यासी ॥१॥
मज कां लागला करणे विचार? । ज्याचा जार भार त्याचे माथां ॥ध्रु॥
गोड धड त्यासी ठेवी न मागतां । समाधान खातां नेदी मना ॥३॥
खेळतां गुंतलें उमगूनि आणी । बैसोनियां स्तनी लावी बळें ॥४॥
त्याच्या दु:खें पडे आपण खापरी । लाही तळी वरी होय जैसी ॥५॥
तुका म्हणे देह विसरे आपुला । आघात तो त्याला लागों नेदी ॥६॥
८४८.ब्राह्मण तो नव्हे ऐसी ज्याची बुद्धि । पाहा श्रुतीमधीं विचारूनि ॥१॥
जयासी नावडे हरिनाम कीर्तन । आणीक नर्तन वैष्णवांचें ॥ध्रु॥
सत्य त्याचे वेळे घडला व्यभिचार । मातेसी वेव्हार अंत्यजाचा ॥३॥
तुका म्हणे येथे मानी आनसारिखें । तात्काळ तो मुखें कुष्ठ होय ॥४॥
८४९.ब्राह्मण तो, याती अंत्यज असतां । मानावा तत्त्वतां निश्चयेसी ॥१॥
रामकृष्णनामें उच्चारी सरळे । आठवी सांवळे रूप मनीं ॥ध्रु॥
शांति क्षमा दया अळंकार अंगी । अभंग प्रसंगी धैर्यवंत ॥३॥
तुका म्हणे गेल्या षडऊर्मी अंग । सांडूनियां मग ब्राह्मण तो ॥४॥
८५०.एक करिती ‘गुरु गुरु’ । भोवता भारु शिष्यांचा ॥१॥
पुंस नाही पाय चारी । मनुष्य परि कुतरी ती ॥ध्रु॥
परस्त्री मद्यपान । पेंडखाण माजविलें ॥३॥
तुका म्हणे निर्भर चित्तीं । अधोगती जावया ॥४॥
८५१.एका पुरुषा दोघी नारी । पाप वसे त्याचे घरीं ॥१॥
पाप नलगे धुंडावें । लागेल तेणे तेथे जावें ॥ध्रु॥
कांहीं दुसरा विचार । न लगे करावाचि फार ॥३॥
असत्य जे वाणी । तेथे पापाचीच खाणी ॥४॥
सत्य बोलें मुखें । तेथें उचंबळती सुखें ॥५॥
तुका म्हणे दोन्ही । जवळीच लाभ हानी ॥६॥
८५२.जळतें संचित । ऐसी आहे धर्मनीत ॥१॥
माझ्या विठो-बाचे पाय । वेळोवेळां मनीं ध्याय ॥ध्रु॥
नेदी कर्म घडों । कोठे आडराने पडों ॥३॥
तुका म्हणे मळ। राहों नेदी तापजाळ॥४॥
८५३.संतापाशी बहु असावें मर्यादा । फलकटाचा धंदा उरफोडी ॥१॥
बासर तो भुंकें गाढवाचे परी । उडे पाठीवरी यमदंड ॥ध्रु॥
समयो नेणें तें वेडें चाहाटळ । अवगुणाचा ओंगळ मान पावे ॥३॥
तुका म्हणे काय वायां चाळवणी । पिट पिट घाणी हागवणीची ॥४॥
८५४.पोटापुरतें काम । परि अगत्य तो राम ॥१॥
कारण ते हेंचि करीं । चित्तीं पांडुरंग धरीं ॥ध्रु॥
प्रारब्धीं हेवा । जोडी देवाची ते सेवा ॥३॥
तुका म्हणे बळ । बुद्धि वेंचूनि सकळ ॥४॥
८५५.घेसी तरी घेईं संतांची हे भेटी । आणीक ते गोष्टी नको मना ॥१॥
सर्वभावे त्यांचे देव भांडवल । आणीक ते बोल न बोलती ॥ध्रु॥
करिसील तो करी संतांचा सांगात । आणीक ते मात नको मना ॥३॥
बैससील तरी बैस संतांमधीं । आणीक ते बुद्धि नको मना ॥४॥
जासी तरी जाईं संतांचिया गांवा । होईल विसांवा तेथें मना ॥५॥
तुका म्हणे संत सुखाचे सागर । मना निरंतर धणी घेईं ॥६॥
८५६.संतांचिये गांवीं प्रेमाचा सुकाळ । नाहीं तळमळ दु:ख लेश ॥१॥
तेथे मी राहीन होऊनि याचक। घालितील भीक तेचि मज ॥ध्रु॥
संतांचिये गांवीं वरो भांडवल । अवघा विठ्ठल धन वित्त ॥३॥
संतांचें भोजन अमृताचे पान । करिती कीर्तन सर्वकाळ ॥४॥
संतांचा उदीम उपदेशाची पेंठ । प्रेम सुख साटी घेती देती ॥५॥
तुका म्हणे तेथे आणीक नाहीं परी । म्हणोनि भिकारी झालों त्यांचा ॥६॥

संपूर्ण वारकरी प्रस्थानत्रयी नित्यनेम पारायण अनुक्रमणिका


ग्रंथ

1 thought on “दिवस – ५३. वारकरी प्रस्थानत्रयी नित्यनेम पारायण”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Page Reader Press Enter to Read Page Content Out LoudPress Enter to Pause or Restart Reading Page Content Out LoudPress Enter to Stop Reading Page Content Out LoudScreen Reader Support
error: Content is protected !!
Scroll to Top