दिवस – ५४. वारकरी प्रस्थानत्रयी नित्यनेम पारायण

अनुक्रमणिका

श्रीभगवानुवाच
अनाश्रितः कर्मफलं कार्यं कर्म करोति यः । स संन्यासी च योगी च न निरग्निर्न चाक्रियः ॥१॥
आइके, योगी आणि संन्यासी, जनीं । हे एकचि सिनानें झणीं मानीं । एऱ्हवीं विचारिजती जंव दोन्ही । तंव एकचि ते ॥३९॥
सांडिजे दुजया नामाचा आभासु । तरी योगु तोचि संन्यासु । पाहतां ब्रह्मीं नाहीं अवकाशु । दोहींमाजी ॥४०॥
जैसें नामाचेनि अनारिसेपणें । एका पुरुषातें बोलावणें । कां, दोहीं मार्गीं जाणें । एकाचि ठाया ॥४१॥
नातरी, एकचि उदक सहजें । परि सिनाना घटीं भरिजे । तैसें भिन्नत्व जाणिजे । योग-संन्यासांचें ॥४२॥
आइके, सकळ संमतें जगीं । अर्जुना पाहें तोचि योगी । जो कर्में करूनि; रागी । नोहेचि, फळीं ॥४३॥
जैसी मही हे उद्भिजे । जनी, अहंबुद्धीविण सहजें । आणि तेंथींचीं तियें बीजें । अपेक्षीना ॥४४॥
तैसा, आम्नायाचेनि आधारें । जातीचेनि अनुकारें । जें जेणें अवसरें । करणें पावे ॥४५॥
तें तैसेंचि उचित करी । परि साटोपु नोहे शरीरीं । आणि बुद्धीही, करोनि, फळवेरी । जायेचिना ॥४६॥
ऐसा तोचि संन्यासी । पार्था गा, परियेसीं । तोचि भरंवसेनिसीं । योगीश्वरू ॥४७॥
वांचूनि उचित कर्म प्रासंगिक । तयातें म्हणे “हें सांडावें, बद्धक’ । तरी टांकोटांकीं आणिक एक । मांडीचि तो ॥४८॥
जैसा क्षाळुनियां लेपु एकु । सवेंचि लाविजे आणिकु । तैसेनि आग्रहाचा पाइकु । विडंबे वायां ॥४९॥
गृहस्थाश्रमाचें वोजें । कपाळीं आधींचि आहे सहजें । कीं तेंचि संन्याससवा ठेविजे । सरिसें पुढती ॥५०॥
म्हणौनि अग्निसेंवा न सांडितां । कर्माची रेखा नोलंडितां । आहे योगसुख स्वभावतां । आपणपां ॥५१॥
यं संन्यासमिति प्राहुर्योगं तं विद्धि पाण्डव । न ह्यसंन्यस्तसङ्कल्पो योगी भवति कश्चन ॥२॥
ऐकें, संन्यासी तोचि योगी । ऐसी एकवाक्यतेची जगीं । गुढी उभविली अनेगीं । शास्त्रांतरीं ॥५२॥
जेथ संन्यासिला संकल्पु तुटे । तेथचि योगाचें सार भेटे । ऐसें हें अनुभवाचेनि धटें । साचें जया ॥५३॥
आरुरुक्षोर्मुनेर्योगं कर्म कारणमुच्यते । योगारूढस्य तस्यैव शमः कारणमुच्यते ॥३॥
आतां योगाचळाचा निमथा । जरी ठाकावा आथि पार्था । तरी सोपाना या कर्मपथा । चुका झणी ॥५४॥
[Image of the eight limbs of yoga (Ashtanga Yoga) diagram]
येणें यमनियमांचेनि तळवटें । रिगे आसनाचिये पाउलवाटें । येईं प्राणायामाचेनि आडखंठें । वरौता गा ॥५५॥
मग प्रत्याहाराचा अधाडा । जो बुद्धीचियाही पायां निसरडा । जेथ हटिये सांडिती होडा । कडेलग ॥५६॥
तरी अभ्यासाचेनि बळें । प्रत्याहारीं निराळें । नखीं लागेल ढाळें ढाळें । वैराग्याची ॥५७॥
ऐसा पवनाचेनि पठारें । येतां धारणेचेनि पेंसारें । क्रमी ध्यानाचें चवरें । सांडे तंव ॥५८॥
मग तया मार्गाची धांव । पुरेल प्रवृत्तीची हांव । जेथ साध्यसाधना खेव । समरसें होय ॥५९॥
जेथ पुढील पैसु पारुखे । मागील स्मरावें, तें ठाके । ऐसिये सरिसिये भूमिके । समाधि राहे ॥६०॥
येणें उपायें योगारूढु । जो निरवधि जाहला प्रौढु । तयाचिया चिन्हांचा निवाडु । सांगेन; आइके ॥६१॥

ऐसे नश्वर भोग जगीं । ते भोगावया रिघावें स्वर्गी । तदर्थ प्रवर्तती यागीं । लागवेगी भोगेच्छा ॥२५८ ॥
सुख भोगावया वेगीं । पतंगु जेवीं उडी घाली आगीं । तेवीं इहामुत्रभोगीं । पतनालागी पावती ॥२५९॥
स्त्री-आमिष-मद्यपान । हे वेदोक्त भोग जाण । तेथ केवीं घडे पतन । तें वेदविधान नेणती मूर्ख ॥२६०॥
यद् घ्राणभक्षो विहितः सुरायास्तथा पशोरालभनं न हिंसा ।
एवं व्यवायः प्रजया न रत्या इमं विशुद्धं न विदुः स्वधर्मम् ॥१३ ॥
(सौत्रामणी वगैरे यागांमध्ये सुरेचे प्रत्यक्ष पान न करिता तिचा नुसता वास घ्यावा असे सांगितले आहे. त्याचप्रमाणे पशुहिंसा सांगितली नसून फक्त पशुस्पर्शन करावे असे श्रुती सांगते. (स्वधर्मरक्षणार्थ) पुत्रोत्पत्तीकरिता स्त्रीसंभोग विहित आहे, केवळ रतिसुखाकरिता शास्त्रकारांनी संभोग सांगितला नाही. असे हे वेदरहस्य, म्हणजे विशुद्ध असा हा स्वधर्म, विषयी लोकांना समजत नाही.॥१३ ॥)
वेदविहित कर्माचरण । तेथ सर्वथा नव्हे पतन । जेथ चुके वेदविधान । तेथें पावे पतन सज्ञान ॥२६१॥
वेदींच्या अर्थवादासरिसा । मनीं बांधोनि भोगाशा । यज्ञमिषे पशुहिंसा । भोगलिप्सा करूं धांवती ॥२६२॥
वेदें बोलिलें ‘आलभन’ । त्या नांव म्हणती पशुहनन । हे सकाम मानिती विधान । निष्कामा हनन कदा न घडे ॥२६३॥
निष्कामासी यागयजन । स्वधर्मार्थ करावे यज्ञ । तेथ पशूचें आलभन । सर्वथा हनन करूं नये ॥२६४॥
पशूचे करूं नये हनन । देवतोद्देशे अंगस्पर्शन । या नांव बोलिजे ‘आलभन’ । हे यज्ञाचरण निष्काम ॥२६५॥
हरिश्चंद्राच्या यागीं । शुनःशेप-पशुप्रसंगी । तेणें घावो लागों नेदितां अंगीं । वेदोक्त प्रयोगी यज्ञसिद्धी केली ॥२६६॥
वेदोक्तमंत्रभागार्थ । देव सुखी करोनि समस्त । आपण झाला निर्मुक्त । हा ऋग्वेदार्थ ब्राह्मणीं ॥२६७॥
यापरी पशुघात । यज्ञी न लगे निश्चित । तो हरिश्चंद्र यागार्थ । पशुघात निवारी ॥२६८॥
तेथ मीमांसकांचे मत । देवतोद्देशे जो पशुघात । या नांव ‘आलभन’ म्हणत । स्वर्गफलार्थ आवश्यक ॥२६९॥
केवळ मांसभक्षणार्थ । जे करिती पशुधात । हिंसादोष तेथें प्राप्त । ऐसें बोलत मीमांसक ॥२७० ॥
देवतोद्देशे पशूचा घात । तेणें स्वर्गभोग होय प्राप्त । तोही भोगक्षयें क्षया जात । तेणें हिंसा प्राप्त याज्ञिकां ॥२७१॥
याग करितां ‘सौत्रामणी’ । पुरोडाश घ्यावा अवघ्राणीं । परी प्रवर्तावें सुरापानीं । हे वेदविधानी असेना ॥२७२॥
एवं जेथें पशुहनन । तें कर्म सदोष पूर्ण । यालागी तेथ अधःपतन । बोलिलें जाण याज्ञिकांसी ॥२७३॥
वेदें विहिले पाणिग्रहण । तें प्रजार्थ स्वदारागमन । परी रत्यर्थ नित्य मैथुन । हे वेदाज्ञा जाण असेना ॥२७४॥
मद्य-मांस-मैथुनप्रसंग । स्वइच्छा न करावया भोग । वेदें द्योतिला विवाह याग । भोगत्यागनियमार्थ ॥२७५॥
नेणोनि ऐसिया शुद्ध धर्मा । यागमिषें अधर्मा । प्रवर्तोनि काम्यकर्मा । भोग संभ्रमा भोगिती मूर्ख ॥२७६॥
ये त्वनेवंविदोऽसन्तः स्तब्धाः सदभिमानिनः । पशून्द्रुह्यन्ति विस्रब्धाः प्रेत्य खादन्ति ते च तान् ॥१४ ॥
(परंतु हा शुद्धधर्म न जाणणारे जे दुराचारी, तामसी, आपण म्हणतो तेच खरे असा दुरभिमान बाळगणारे, निःशंक पशुंचा द्रोह करून वध करतात, ते पुढे मेल्यानंतर त्यांनी मारलेले पशू परलोकी या पशुधात्यांना मारून त्यांचे मांस खातात. (तात्पर्य : हेच त्यांना यज्ञाचे फल मिळते.)॥१४॥)
नेणोनि शुद्ध वेदविधानातें । अतिगर्वाचेनि उद्धतें । आपणियां मानूनि ज्ञाते । अविधी पशूतें घातु करिती ॥२७७॥
केवळ अभिचारमतें । पावोनि सकळ भोगातें । ऐसिया मानोनि विश्वासातें । स्वेच्छा पशूतें घात करिती ॥२७८॥
अविधी पशूतें वधिती । त्या याज्ञिकांचे देहांतीं । मारिले पशू मारूं येती । झळकत काती घेऊनियां ॥२७९ ॥
एवं निमालिया याज्ञिकांसी । भक्षिले पशु भक्षिती त्यांसी । जैसे सेविलें विष प्राणियांसी । ग्रासी प्राणांसी समूळ ॥२८०॥

द्वेष (२८१, २८२)

द्विषन्तः परकायेषु स्वात्मानं हरिमीश्वरम् । मृतके सानुबन्धेऽस्मिन्बद्ध स्नेहाः पतन्त्यधः ॥१५॥
(आपल्याप्रमाणेच) दुसऱ्यांच्या शरीरामध्येही असणारा, सर्वसामर्थ्यवान, पाप हरण करणारा, केवळ आत्मरूपच अशा परमात्म्याचा जे द्वेष करतात व आपले स्त्रीपुत्रादी आप्तेष्ट व हे मर्त्य शरीर ह्यांच्यावर मोहाने आसक्त होऊन प्रेम करतात ते घोर नरकात पडतात. ॥१५॥)
परमात्मा जो श्रीहरी । तो अंतर्यामी सर्व शरीरीं । तेथ पराचा जो द्वेषु करी । तेणें द्वेषिला हरि निजात्मा ॥२८१॥
परासी जो करी अपघातु । तेणें केला निजात्मघातु । त्यासी सकुटुंब अधःपातु । रौरवांतु ते बुडती ॥२८२ ॥

अज्ञानी व सज्ञानी (२८३)

ये कैवल्यमसम्प्राप्ता ये चातीताश्च मूढताम् । त्रैवर्णिका ह्यक्षणिका आत्मानं घातयन्ति ते ॥१६॥
(ज्यांना आत्मस्वरूपाची प्राप्ती झालेली नाही, व जे मूढ अवस्थेच्याही पलीकडे गेलेले आहेत, म्हणजे केवळ अज्ञानी नाहीत तर अर्धवट ज्ञानसंपन्न आहेत, असे त्रैवर्णिक धर्म-अर्थ-काम हे पुरुषार्थच नित्य आहेत असे मानून आपला घात करून घेतात. ॥१६॥।)
सज्ञानी स्वतां तरती । अज्ञानी सज्ञानां शरण येती । तेणें त्यांसी कैवल्यप्राप्ती । त्यांच्या वचनोक्तिविश्वासें ॥२८३॥

विषयी ज्ञानाभिमानी (२८४)

जे अज्ञान ना सज्ञान । ज्यांसी केवळ ज्ञानाभिमान । ज्यांचे विषयी लोलुप मन । ते पुरुष जाण आत्मघाती ॥२८४ ॥

काम्यकर्मकर्ते अभक्त (२८५ ते ३००)

साधावया अर्थ काम । जे करिती अभिचारधर्म । हे त्रैवर्णिक घोर कर्म । आत्मघाती परम ज्याचे त्यासी ॥२८५॥
देहाचिया गोमटिया । जे करिती अभिचारक्रिया । तेणें कर्मे आपआपणियां । सृजिला राया निजघातु ॥२८६॥
जो स्वयें बैसली खांदी तोडी । तो खांदीसहित पडे बुडीं । तेवीं काम्यकर्माच्या वोढी । क्रियेसी रोकडी अधःपात ॥२८७॥
एत आत्महनोऽशान्ता अज्ञाने ज्ञानमानिनः । सीदन्त्यकृतकृत्या वै कालध्वस्तमनोरथाः ॥१७ ॥
(असे हे आत्मघातकी, क्रूर कर्मामुळे उच्छृंखल झालेले, अज्ञानातच वावरत असून स्वतःला ज्ञानी समजणारे, कर्तव्यकर्मे न केल्यामुळे अस्वस्थ राहिलेले लोक इच्छिलेले सर्व मनोरथ कालौघात उद्ध्वस्त झाल्यामुळे निराशेने शेवटी खरोखर नाश पावतात. ॥१७॥)
काम क्रोधी अतिअद्भुत । क्रूरकर्मी जे अशांत । तिहीं आपआपणिया अनहित । निजात्मघात जोडिला ॥२८८॥
स्वयें कर्म करिती अविधी । तेचि म्हणती शुद्ध विधी । अज्ञान तेंचि प्रतिपादी । ज्ञान त्रिशुद्धी म्हणोनियां ॥२८९॥
ते काम्यकर्मी छळिले । कां महामोहें आकळिले । गर्वदंभादि भेदें खिळिले । काळसर्पे गिळिले सद्‌बुद्धीसीं ॥२९०॥
गर्वादिज्वरितमुखें । गोडपणी कडू ठाके । विषप्राय विषयसुखें । अतिहरिखें सेविती ॥२९१॥
ऐशा विषयांलागी पहाहो । आप्त मानूनि निजदेहो । रचूनि नाना उपावो । अर्थसंग्रहो स्वयें करिती ॥२९२ ॥
हित्वाऽत्यायासरचिता, गृहापत्यसुहृच्छ्रियः । तमो विशन्त्यनिच्छन्तो, वासुदेवपराङ्मुखाः ॥१८॥
((तेच विवरण करून सांगतात—) गृह, अपत्य, नातेवाईक आणि संपत्ती ही अत्यंत परिश्रमाने जमविलेली सुखाची साधने सोडून जावे लागल्यानंतर भगवंताला विसरलेले हे जीव आपली इच्छा नसताना नरकात प्रविष्ट होऊन दुःखे भोगत राहतात. ॥१८॥)
मरणेसी झटें घेत । श्री मेळविती श्रीमंत । गृह दारा पुत्र वित्त । नाना वस्तुजातसंग्रहो ॥२९३॥
ऐसे भोग आयासयुक्त । सांडूनि ज्ञानगर्वी समस्त । ज्ञानाभिमानें नेइजेत । अंधतमांत अतिगर्वे ॥२९४॥
जेथ अंधाराचे डोळे । होऊनि ठाकती आंधळे । तेथ मोहरात्रीचे काळें । अंधतममेळे अधिक कांटे ॥२९५॥
जया अंधारातें प्रकाशू येतां । निखिळ काळा होय सविता । जेथ गाढ मूढ अवस्था । अतिमौढ्यता स्वयें पावे ॥२९६॥
जेथ सुषुप्तीसी झोंप लागे । आळसु आळसिजे सर्वांगें । तेथ घर बांधोनि निजांगें । निंदा क्रोध दोघे सदा वसती ॥२९७ ॥
तेथ भजनविमुख नरां । अधःपतन अभिमानद्वारा । जेवीं अथावी पडिला चिरा । तेवीं बाहेरा निघों न शके ॥२९८॥
जे वासुदेवीं सदा विमुख । ज्यांसी हरिभजनीं नाहीं हरिख । त्यांची दशा हे अधोमुख । अतिदुःखें दुःख भोगिती ॥२९९ ॥
ऐशी अभक्तांची गति । सांगितली आहाच स्थिति । वांचूनि त्यांची दुर्गति । वाग्देवता भीती स्पष्ट वदतां ॥३०० ॥

८५७.बहुतां जन्मां अंतीं । जोडी लागली हे हातीं ॥१॥
मनुष्यदेहा ऐसा ठाव। धरी पांडुरंगीं भाव ॥ध्रु॥
बहु केला फेरा। येथे सांपडला थारा॥३॥
तुका म्हणे जाणे। ऐसे दुर्लभ ते शाहाणे ॥४॥
८५८.लेंकराची आळी न पुरवी कैसी । काय तयापाशी उणें झालें? ॥१॥
आम्हां लडिवाळां नाहीं तें प्रमाण। कांहीं ब्रह्मज्ञान आत्मस्थिति ॥ध्रु॥
वचनाचा घेईन अनुभव पदरीं । जे हे जनाचारी मिरवलें॥३॥
तुका म्हणे माझी भोळिवेची आटी। दावीन शेवटी कौतुक हें ॥४॥
८५९.रूप नांव माया बोलावया ठाव । भागा आले भाव तयापरी ॥१॥
शींव वाटे परि न खंडें पृथिवी । शाहाणे ते जीवीं समजती ॥ध्रु॥
पोटा आले तिच्या लोळे मांडिवरी । पारखी न करी खंती चित्तीं ॥३॥
तुका म्हणे भक्तिसाठी हरिहर । अरूपीचे क्षर विभाग हे ॥४॥
८६०.आर्तभूतांप्रति। उत्तम योजाव्या त्या शक्ति ॥१॥
फळ आणि समाधान । तेथें उत्तम कारण ॥ध्रु॥
अल्प तो संतोषी । स्थळी सांपडे उद्देशीं ॥३॥
सहज संगम । तुका म्हणे तो उत्तम ॥४॥
८६१.मुळाचिया मुळे । दु:खे वाढती सकळे ॥१॥
ऐसा योगियांचा धर्म । नव्हे वाढवावा श्रम ॥ध्रु॥
न कळे आवडी । कोण आहे कैसी घडी ॥३॥
तुका म्हणे थीतें । दु:ख पाववावें चित्तें ॥४॥
८६२.भाग्यवंतां हेंचि काम । मापी नाम वैखरी॥१॥
आनंदाची पुष्टि अंगीं । श्रोते संगी उद्धरती ॥ध्रु॥
पिकलें तया खाणे किती । पंगतीस सुकाळ ॥३॥
तुका करी प्रणिपात । दंडवत आचारियां ॥४॥
८६३.लटिकें तें रुचे। साच कोणाही न पचे ॥१॥
ऐसा माजल्याचा गुण । भोगें कळों येईल शीण ॥ध्रु॥
वाढवी ममता । नाहीं वरपडला तो दूतां ॥३॥
न मनी माकड । कांहीं उपदेश हेकड ॥४॥
८६४.कौतुकाची सृष्टी । कौतुकेंचि केले कष्टी ॥१॥
मोडे तरी भले खेळ । फांके फांकिल्या कोल्हाळ॥ध्रु॥
जाणणियासाठीं । भय सामावले पोटीं ॥३॥
तुका म्हणे चेता। होणें तें तूंच आयता ॥४॥
८६५.भोवंडीसरिसें। अवघे भोंवतचि दिसे ॥१॥
ठायीं राहिल्या निश्चळ। आहे अचळी अचळ ॥ध्रु॥
एके हाकेच्या कपाटीं । तेथें आणीक नाद उठी ॥३॥
अभ्रे धांवे शशी । तुका म्हणे दुसरे भासी ॥४॥
८६६.नव्हों आम्ही आजिकाळीची । कांची कुची चाळवणी ॥१॥
एके ठायीं मूळडाळ । ठावा सकळ आहेसी ॥ध्रु॥
तुमचे आमचेंसें कांहीं । भिन्न नाहीं वांटलें ॥३॥
तुका म्हणे जेथें असें । तेथें दिसें तुमचासा ॥४॥
८६७.योग्याची संपदा त्याग आणि शांति । उभयलोकी कीर्ति सोहळा मान ॥१॥
येरयेरांवरी जायांचें उसणें । भाग्य-स्थळी देणे झाडा वेसी ॥ध्रु॥
केलीया फावला ठायींचा तो लाहो । तृष्णेचा तो काहो काहवितो ॥३॥
तुका म्हणे लाभ अकर्तव्या नांवें । शिवपद जीवें भोगिजेल ॥४॥
८६८.मरणा हाती सुटली काया। विचारें या निश्चयें ॥१॥
नासोनियां गेली खंती। सहज स्थिती भोगाचे ॥ध्रु॥
न देखेंसें झाले श्रम। आले वर्म हाता हें ॥३॥
तुका म्हणे कैंची कीव । कोठें जीव निराळा? ॥४॥
८६९.नव्हे ब्रह्मचर्य बाइलेच्या त्यागें । वैराग्य वाउगें देशत्यागें ॥१॥
काम वाढे भय वासनेच्या द्वारें । सांडावें तें धीरें आचावाचा॥ध्रु॥
कांपवूनि टिरी शूरत्वाची मात । केलें वाताहात उचित काळे ॥३॥
तुका म्हणे करी जिव्हेसी विटाळ । लटिक्याची मूळ स्तुति होतां ॥४॥
८७०.नको सांडूं अन्न नको सेवूं वन । चिंती नारायण सर्व भोगी ॥१॥
मातेचिये खांदी बाळ नेणे शीण । भावना त्या भिन्न मुंडाविया ॥ध्रु॥
नको गुंफों भोगी, नको पडों त्यागीं । लावूनि सरे अंगी देवाचिया ॥३॥
तुका म्हणे नको पुसों वेळोवेळां । उपदेश वेगळा उरला नाहीं ॥४॥
८७१.अवघी मिथ्या आटी । ‘राम’ नाहीं जंव कंठीं ॥१॥
सावधान सावधान । उगवीं संकल्पी हें मन ॥ध्रु॥
सांडिले ते मांडे । आग्रह उरल्या, काळ दंडे ॥३॥
तुका म्हणे आलें भागा । देऊनि चिंती पांडुरंगा ॥४॥
८७२.न सांगावें वर्म । जनीं असों द्यावा भ्रम ॥१॥
उगीच लागतील पाठीं । होती रितींच हिंपुटीं ॥ध्रु॥
शिक-विल्या गोष्टी । शिकोन न धरिती पोटीं ॥३॥
तुका म्हणे शीण । होईल, अनुभवाविण ॥४॥
८७३.जातिविजातीची व्हावयासि भेटी । संकल्प तो पोटीं वाहों नये ॥१॥
होणार तें घडो होणाराच्या गुणें। होईल नारायणें निर्मिले तें ॥ध्रु॥
व्याघ्राचिये भुके वधावी ते गाय । याचें नांव काय पुण्य असे? ॥३॥
तुका म्हणे न करी विचार पुरता । गरज्याची मातापिता खर ॥४॥
८७४.शाहाणियां पुरे एकचि वचन । विशारती खूण तेचि त्यासी ॥१॥
उपदेश असे बहुतां कारणे । घेतला तो मने पाहिजे हा ॥ध्रु॥
फांसावेना तरि दु:ख घेतें वाव। मग होतो जीव कासावीस ॥३॥
तुका म्हणे नको राग धरूं झोंडा! । नुघडितां पीडा होईल डोळे ॥४॥
८७५.अभिनव सुख तरि या विचारें । विचारावें बरें संतजनीं ॥१॥
रूपाच्या आठवें दोन्हीही आपण । वियोग तो क्षण होत नाहीं ॥ध्रु॥
पूजा तरि चित्तें कल्पावें ब्रह्मांड । अहाच तो खंड एकदेशी ॥३॥
तुका म्हणे माझा अनुभव यापरी । डोई पायांवरी ठेवीतसें ॥४॥
८७६.नटनाट्य तुम्हीं केलें याचसाठीं । कवतुकें दृष्टी निववावी॥१॥
नाहीं तरि काय कळलेंचि आहे । वाघ आणि गाय लांकडाची ॥ध्रु॥
अभेदचि असे, मांडियेलें खेळा । केल्या दीपकळा बहु एकी ॥३॥
तुका म्हणे रूप नाहीं दर्पणांत । संतोषाची मात दुसरीं ती ॥४॥

संपूर्ण वारकरी प्रस्थानत्रयी नित्यनेम पारायण अनुक्रमणिका


ग्रंथ

1 thought on “दिवस – ५४. वारकरी प्रस्थानत्रयी नित्यनेम पारायण”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Page Reader Press Enter to Read Page Content Out LoudPress Enter to Pause or Restart Reading Page Content Out LoudPress Enter to Stop Reading Page Content Out LoudScreen Reader Support
error: Content is protected !!
Scroll to Top