
अनुक्रमणिका
- श्रीज्ञानेश्वरी नित्यनेम पारायण क्रमश: नित्यनेम पारायण अध्याय – ६. ओवी क्र. ६२ ते ८७
- श्रीएकनाथी भागवत क्रमश: नित्यनेम पारायण अध्याय – ५, ओवी क्र. ३०१ ते ३४५
- अभक्तांचे वर्णन (परिणाम) (३०१ ते ३०४)
- युगायुगातील भक्तिविधानाच्या निरूपणाविषयी विदेहाची विनंती (३०५ ते ३१०)
- युगायुगातील भक्तिविधानाच्या निरूपणाचा प्रस्ताव (३११ ते ३१५)
- कृतयुगातील भक्तिविधान (३१६ ते ३२३)
- त्रेतायुगीचे भक्तिविधान (३२४ ते ३३०)
- द्वापरयुगातील भक्तिविधान (३३१ ते ३४१)
- कलियुगातील भक्तिविधान (३४२ ते ४०१)
- श्रीतुकाराम महाराजांची गाथाअभंग क्र. ८७७ ते ८९२
- ग्रंथ
या कुन्देन्दुतुषारहारधवला या शुभ्रवस्त्रावृता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना ।
या ब्रह्माच्युतशङ्करप्रभृतिभिर्देवै: सदा वन्दिता सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापहा ॥
जयांचे केलिया स्मरण । होय सकळ विद्यांचे अधिकरण । तेचि वंदूं श्रीचरण । श्रीगुरूंचे ॥१॥
ते नमस्कारोनि आता ॥
श्रीगणेशाय नमः । श्रीसरस्वत्यै नमः । श्रीविठ्ठलाय नमः ।
श्रीमातापितृभ्यां नमः । श्रीगुरुभ्यो नमः ॥
ॐ नमो भगवते वासुदेवाय ।
रामकृष्णहरि । रामकृष्णहरि । रामकृष्णहरि ॥
श्रीज्ञानेश्वरी नित्यनेम पारायण
क्रमश: नित्यनेम पारायण
अध्याय – ६. ओवी क्र. ६२ ते ८७
जयाचें सुखदुःखाचेनि आंगें । झगटलें मानस, चेवो नेघे । विषय पासीं आलिया, से न रिगे । “हें काय’ म्हणौनि ॥६३॥
इंद्रियें कर्माच्या ठायीं । वाढिनलीं, परि कहीं । फळहेतूची चाड नाहीं । अंतःकरणीं ॥६४॥
असतेनि देहें एतुला । जो चेतुचि; दिसे निदेला । तोचि योगारूढु भला । वळखें तूं ॥६५॥
तेथ अर्जुन म्हणे “अनंता । हें, मज विस्मो बहु, आइकतां । सांगे, तया ऐसी योग्यता । कवणें दीजे?’ ॥६६॥
पैं व्यामोहाचिये शेजे । बळिया अविद्या निद्रितु होइजे । ते वेळीं दुःस्वप्न हा भोगिजे । जन्ममृत्युचा ॥६८॥
पाठीं अवसांत ये चेवो । तैं तें अवघेंचि होय वावो । ऐसा उपजे नित्य सद्भावो । तोहि आपणपांचि ॥६९॥
म्हणौनि आपणचि आपणयां । घातु कीजतु असे, धनंजया । चित्त देऊनि नाथिलिया । देहाभिमाना ॥७०॥
एऱ्हवीं, कोशकीटकाचिया परी । तो आपणया आपण वैरी । जो आत्मबुद्धि शरीरीं । चारुस्थळीं ॥७२॥
कैसे प्राप्तीचिये वेळे । निदैवा आंधळेपणाचे डोहळे । कीं, असतें आपुले डोळे । आपण झांकी ॥७३॥
कां, कवण एकु भ्रमलेपणें । “मी तो नव्हे गा चोरलां’ म्हणे । ऐसा नाथिला छंदु अंतःकरणे । घेऊनि ठाके ॥७४॥
एऱ्हवीं, होय तें तोचि आहे । परि काय कीजे, बुद्धि तैसी नोहे । देखा, स्वप्नींचेनि घायें । कीं मरे साचें? ॥७५॥
जैसी, ते शुकाचेनि आंगभारें । नळिका भोंविन्नली एरी मोहरें । तरी तेणें उडावें; परि न पुरे । मनशंका ॥७६॥
वायांचि मान पिळी । अटुवें हियें आंदोळी । टिटांतु नळी । धरूनि ठाके ॥७७॥
म्हणे “बांधला मी फुडा’ । ऐसिया भावनेचिया पडे खोडां । कीं मोकळिया पायांचा चवडा । गोंवी अधिकें ॥७८॥
ऐसा काजेंविण आंतुडला । तो, सांग पां, काय आणिकें बांधिला? । मग, न सोडीच, जऱ्ही नेला । तोडूनि अर्धा ॥७९॥
म्हणौनि आपणयां आपणचि रिपु । जेणें वाढविला हा संकल्पु । “येर स्वयंबुद्धि’ म्हणे बापु । “जो नाथिलें नेघे’ ॥८०॥
जैसा किडाळाचा दोषु जाये । तरी पंधरें तेंचि होये । तैसें जीवा ब्रह्मत्व आहे । संकल्पलोपीं ॥८२॥
हा घटाकारु जैसा । निमालिया, तया अवकाशा । नलगे मिळां जाणें आकाशा । आना ठाया ॥८३॥
तैसा, देहाहंकारु नाथिला । हा समूळ जयाचा नाशिला । तोचि परमात्मा संचला । आधींचि आहे ॥८४॥
आतां शीतोष्णाचिया वाहणी । तेथ सुखदुःखाची कडसणी । इयें न समाती कांहीं बोलणीं । मानापमानांचीं ॥८५॥
जे जिये वाटा सूर्यो जाये । तेउतें तेजाचें विश्व होये । तैसें, तया पावे, तें आहे । तोचि म्हणौनि ॥८६॥
देखें, मेघांनि सुटती धारा । तिया न रुपती जैसिया सागरा । तैसीं शुभाशुभें योगीश्वरा । नव्हती आनें ॥८७॥
॥ पुंडलिकवरदा हरी विठ्ठल श्रीज्ञानदेव तुकाराम ॥
श्रीएकनाथी भागवत
क्रमश: नित्यनेम पारायण
अध्याय – ५, ओवी क्र. ३०१ ते ३४५
श्रीगणेशाय नमः ॥ श्रीसरस्वत्यै नमः ॥ श्रीगुरुभ्यो नमः ॥ श्रीदत्तात्रेयाय नमः ॥ श्रीरुक्मिणीपाण्डुरङ्गाभ्यां नमः ॥
अभक्तांचे वर्णन (परिणाम) (३०१ ते ३०४)
राया तुझिया प्रश्नकाजीं । हे दशा बोलणें पडे आजी । येऱ्हवीं अभक्तवादें आम्हांमाजीं । वाचेची पांजी विटाळली नाहीं ॥३०२॥
यावरी आतां नृपनाथा । वक्ता आणि समस्त श्रोतां । राम-स्मरणे तत्त्वतां । वाचेसी प्रायश्चित्ता सवें कीजे ॥३०३॥
ऐकोनि अभक्तांची गती । अतिशयेंसी दुःखप्राप्ती । राजा कंटाळला चित्तीं । यालागी निश्चिती हरिनाम स्मरे ॥३०४॥
युगायुगातील भक्तिविधानाच्या निरूपणाविषयी विदेहाची विनंती (३०५ ते ३१०)
(राजा म्हणाला—तो षड्गुणैश्वर्य भगवान कोणत्या कालात कोणत्या स्वरूपाचा असतो, कोणत्या वर्णाचा असतो, कोणत्या नावाने, कोणत्या विधीने लोकांच्याकडून ह्या लोकात पूजिला जातो ते कृपा करून मला सांगावे. ॥१९ ॥)
जो परमात्मा श्रीहरी । तो सृष्ट्यादि युगयुगांतरीं । कोणें नामें रूपें वर्णाकारी । भक्त कैशापरी पूजिती ॥३०७॥
आणि ते काळींच्या प्रजा । कैसेनि यजिती अधोक्षजा । कवणे विधीं करिती पूजा । तें योगिराजा सांगिजे ॥३०८॥
तुमचे मुखींचें कृपावचन । त्यापुढे अमृतही गौण । वचनें परमानंद पूर्ण । जन्ममरण उच्छेदी ॥३०९॥
त्याहीमाजी भगवद्गुण । युगानुवर्ती नारायण । त्याचे भजनपूजनविधान । कृपा करून सांगिजे स्वामी ॥३१०॥
युगायुगातील भक्तिविधानाच्या निरूपणाचा प्रस्ताव (३११ ते ३१५)
(करभाजन ऋषी म्हणाले —कृतयुग, त्रेतायुग, द्वापरयुग आणि कलियुग अशा या चार युगांत समुद्रशायी परमात्मा त्या त्या युगाला साजेल असा वर्ण, नाम आणि आकार घेऊन नाना प्रकारच्या विधीने पूजिला जातो. ॥२०॥)
‘क’कार ब्रह्मा ‘व’कार विष्णु । ‘श’कार स्वयें त्रिनयनु । केशव तो गुणविहीनु । प्रकाश पूर्ण तिहींचा ॥३१३॥
केशव केवळ अर्धमात्रा । न ये व्यक्ताव्यक्त उच्चारा । व्याप्येवीण व्यापकु खरा । सबाह्याभ्यंतरा एकत्वें ॥३१४॥
तोचि युगपरत्वें रूप नाम । भजनविधि क्रियाधर्म । भक्त पूजिती पुरुषोत्तम । तो अनुक्रम अवधारीं ॥३१५॥
कृतयुगातील भक्तिविधान (३१६ ते ३२३)
(कृतयुगामध्ये तो शुभ्रवर्ण, चार हात असलेला, जटाधारी असून झाडाच्या सालाची वस्त्रे परिधान करतो आणि हातात दंड व कमंडलू घेऊन कृष्णमृगचर्म, यज्ञोपवीत आणि रुद्राक्षमाळा धारण करतो. ॥२१॥)
ब्रह्मचर्ये दृढव्रत । ये चिन्हीं चिन्हांकित । परमात्मा मूर्तिमंत । भक्त यापरी यजिती ॥३१७॥
(त्या युगात मनुष्यप्राणी शांत वृत्तीचे आणि कोणाशीही वैर न बाळगणारे, मैत्री आणि सर्वांशी समभाव धरणारे असून मनाचा आणि इंद्रियांचा निग्रह करून ते तपाच्या अवलंबनाने देवाचे यजन करतात. ॥२२॥)
तैं तपें करावें देवयजन । त्या तपाचे मुख्य लक्षण । शम-दम साधूनि संपूर्ण । भगवद्भजन स्वयें करिती ॥३१९॥
तैं देवाचें नामोच्चरण । दशधा नामी नामस्मरण । तेंचि नाम कोण कोण । ऐक सावधान नृपनाथा ॥३२०॥
(या युगामध्ये तो परमात्मा हंस, सुपर्ण, वैकुंठ, धर्म, योगेश्वर, अमल, ईश्वर, पुरुषोत्तम व अव्यक्त या नावांनी गायिला जातो. ॥२३॥)
ते काळींचे भक्त श्रेष्ठ । या नामांचा नामपाठ । गायन करिती घडघडाट । भवसंकट निर्दाळिती ॥३२२॥
हे कृतयुगींचें यजन । तुज सांगितलें संपूर्ण । आतां त्रेतायुगींचें भजन । मूर्तीचे ध्यान तें ऐक ॥३२३॥
त्रेतायुगीचे भक्तिविधान (३२४ ते ३३०)
(त्रेतायुगात हा परमेश्वर तांबड्या वर्णाचा, चार हात असलेला, तीन रज्जूंचा (तीन गुणांचा) कंबरपट्टा धारण करणारा, पिंगट केसांचा असून तो तीनही वेदांचा आत्मा आणि स्रुक्सृवादी यज्ञपात्रे धारण करणारा असतो. ॥२४॥)
तया यज्ञपुरुषा निर्मळा । त्रिगुणांची त्रिमेखळा । वेदत्रयीचा पूर्णमेळा । मूर्तीचा सोहळा तदात्मकचि ॥३२५॥
स्रुक-स्रुवा-पाणिग्रहण । हेचि तयाचें उपलक्षण । त्रेतायुगी नारायण । येणें रूपें जाण निजभक्त ध्याती ॥३२६॥
(ह्यावेळी सर्व देवतांमध्ये व्यापून असलेल्या परमात्मा हरीला, वेदधर्मानुरूप चालणारे, ब्रह्मज्ञानी पुरुष तीनही वेदविद्यांनी आराधन करतात. ॥२५॥)
त्रेतायुगी सर्वही नर । वेदोक्ती नित्य सादर । सर्वही भजनतत्पर । धर्मिष्ठ समग्र अतिधार्मिक ॥३२८॥
ते धर्मिष्ठ धार्मिक जन । अष्टधा नामीं नामस्मरण । गजरें करिती सदा पठण । तें नामाभिधान ऐक राया ॥३२९॥
(विष्णू, यज्ञ, पृश्निगर्भ, सर्वदेव (परमेश्वर), उरुक्रम (महापराक्रमी), वृषाकपी, जयंत व उरुगाय या नावांनी तो त्रेतायुगात गायिला जातो. ॥२६॥)
द्वापरयुगातील भक्तिविधान (३३१ ते ३४१)
(द्वापरयुगात भगवान काळसर वर्णाचा, पीतवस्त्र परिधान करणारा, शंख, चक्र, गदा व पद्म ही आयुधे धारण करणारा श्रीवत्सप्रभृती हस्तपादांवरील चिन्हांनी व कौस्तुभादी अलंकारांनी सुशोभित असा ओळखिला (पूजिला) जातो. ॥२७॥)
शंख-चक्र-पद्म-गदा । चारी भुजा सायुधा । इही लक्षणीं गोविंदा । लक्षिती सदा निजभक्त ॥३३३॥
(हे राजा, ह्या द्वापरयुगात छत्रचामरादी सार्वभौम राजाची चिन्हे धारण करणाऱ्या त्या पुरुषोत्तमाला परमात्मतत्त्व जाणण्याची इच्छा करणारे पुरुष आगमनिगमांच्या साहाय्याने आराधन करतात. ॥२८ ॥)
शीघ्र पावावया परात्पर । वैदिक तांत्रिक पूजा मिश्र । तत्त्वजिज्ञासु करिती नर । भजनतत्पर या रीतीं ॥३३५॥
ते काळीचे नामस्मरण । जेणे होई कलिमलदहन । त्या नामांचें अभिधान । ऐक सांगेन नृपनाथा ॥३३६॥
(हे वासुदेवा, तुला नमस्कार असो. संकर्षणाला, प्रद्युम्नाला, अनिरुद्धाला नमस्कार असो. भगवंता, तुला नमस्कार असो.॥२९॥)
(नारायण, ऋषीश्वर, पुरुष, महात्मा, विश्वेश्वर, विश्व ही नावे असलेल्या सर्व भूतांचे ठायी वास करणाऱ्या परमात्म्याला नमस्कार असो. ॥३० ॥)
‘सर्व भूतीं तूं भूतात्मा’ । तुज नमो पुरुषोत्तमा । द्वापरी ऐशिया नामां । नृपोत्तमा सदा स्मरती ॥३३९ ॥
त्या नामांच्या पाठा । तेणें देवासी संतोष मोठा । वेगीं सांडोनि वैकुंठा । धावे अवचटा कीर्तनामाजीं ॥३४०॥
(हे पृथ्वीपते, याप्रमाणे द्वापरामध्ये जगदीश्वराचे स्तवन करतात. आता कलियुगामध्ये ज्या निरनिराळ्या तंत्रविधानांनी आराधना करतात, ते श्रवण कर. ॥३१ ॥)
कलियुगातील भक्तिविधान (३४२ ते ४०१)
सगुण मूर्तिपूजा (३४२ ते ३४५)
(काळ्या वर्णाचा परंतु तेजाने शुभ्र असणारा, अंगे, उपांगे, अस्त्रे व पार्षदगण यांसह (प्रधान व गौण शस्त्रास्त्रे) असणारा जो परमेश त्याचे शुद्धबुद्धीचे लोक नामसंकीर्तनरूप यज्ञांनीच यजन करतात. (प्रायः भगवान कृष्णाचेच हे वर्णन आहे.) ॥३२॥)
मूर्ति सर्वावयवी साङ्ग । वेणुविषाणादि उपांग । चारी भुजा पराक्रमी चांग । आयुधे अव्यंग शंखचक्रादिक ॥३४३॥
पृष्ठभागी निजपार्षद । नंदसुनंदादि सायुध । कलियुगी प्रज्ञाप्रबुद्ध । यापरी गोविंद चिंतिती सदा ॥३४४ ॥
मधुपर्कादिक विधान । साङ्ग केलें जें पूजन । तेंही मानोनियां गौण । आवडे कीर्तन कलियुगीं कृष्णा ॥३४५ ॥
॥ पुंडलिकवरदा हरी विठ्ठल श्रीज्ञानदेव तुकाराम ॥
श्रीतुकाराम महाराजांची गाथा
अभंग क्र. ८७७ ते ८९२
आतां हाचि वसो जीवीं। माझे अंतरी गोसावी। होऊं येती ठावीं। काय वर्मे त्याच्याने ॥ध्रु॥
सवें असतां धनी । आड येऊ न शके कोणी । न लगे विनवणी । पृथकाची करावी ॥३॥
जन्माचिया गति। येणे अवघ्या खुंटती । कारण ते प्रीती । तुका म्हणे जवळी ॥४॥
उदार हा जग-दानी । पांडुरंग अभिमानी । तुळसीदळ पाणी । चिंतनाचा भुकेला ॥ध्रु॥
न लगे पुसावी चाकरी । कोणी वकील ये घरीं । त्याचा तोचि करी । पारपत्य सकळां ॥३॥
नाहीं आडकाठी। तुका म्हणे जातां भेटी । न बोलतां मिठी । उगीच पायीं घालावी ॥४॥
लाभावरी घ्यावें सांपडलें काम । आपला तो श्रम न विचारी ॥ध्रु॥
जीवा ऐसे देखे आणिकां जिवांसी । निखळचि रासि गुणांचीच ॥३॥
तुका म्हणे देव तयाचा पांगिला । न भंगें संचला धीर सदा ॥४॥
ऐसी वर्में मज दावी नारायणा! । अंतरीच्या खुणा प्रकटोनि ॥ध्रु॥
बहु अवघड असे संतभेटी । तरी जगजेठी करुणा केली ॥३॥
तुका म्हणे मग नये वृत्तीवरी । सुखाचे शेजारी पहुडईन ॥४॥
न घडावी पायीं तुटी । मनें मिठी घातली ॥ध्रु॥
विचार तो वचना आधीं । धरूनि शुद्धि ठेविली ॥३॥
तुका म्हणे मागें भ्यालों । तरी झालो जागृत ॥४॥
यासी अनुसरल्या काय । घडे ऐसे वायां जाय । देखिले ते पाय । सम, जीवीं राहती ॥ध्रु॥
तो देखावा हा विध । चिंतनेंचि कार्य सिद्ध । आणिकां संबंध । नाहीं पर्वकाळासी ॥३॥
तुका म्हणे खळ । होती क्षणेचि निर्मळ । जाऊनियां मळ । वाळवंटी नाचती ॥४॥
वंदू येती देव पदें । त्या आनंदें उत्साहे ॥ध्रु॥
नृत्यछंदें उडती रज । जे सहज चालतां ॥३॥
तुका म्हणे गरुडटके । वैष्णव निके संभ्रम ॥४॥
मन रंगले रंगलें । तुझ्या चरणी स्थिरावलें । केलिया विठ्ठलें । ऐसी कृपा जाणावी ॥ध्रु॥
झालें भोजनसें दिसे । चिरा पडोनि ठेला इच्छे । धालियाच्या ऐसे । अंगा येती उद्गार॥३॥
सुख भेटों आलें सुखा । निध सांपडला मुखा । तुका म्हणे लेखा । आतां नाहीं आनंदा ॥४॥
काळ जाऊं नेदूं वायां । चिंतूं विठोबाच्या पायां ॥ध्रु॥
करूं भजन भोजन । धणी घेऊ नारायण ॥३॥
तुका म्हणे जीव धाला । होय, तुझ्यानें विठ्ठला ॥४॥
‘विठ्ठल’ हे मंगळ वाणी । घेऊ धणी पंगतीसी ॥ध्रु॥
वेंचतसे पळे पळ। केले बळ पाहिजे॥३॥
तुका म्हणे दुश्चित्त नका । राहों फुका नाड हा ॥४॥
दैवत ये भूमंडळीं । उद्धार कली पाववितें ॥ध्रु॥
कोठे कांहीं कोठे काहीं । शोध ठायीं स्थळासी ॥३॥
अन्यत्रीचे तीर्थीं नासे । तीर्थी वसे वज्रलेप ॥४॥
पांडुरंगींचे पांडुरंगीं । पाप अंगीं राहेना ॥५॥
ऐसें हरें गिरिजेप्रती । गुह्य स्थिती सांगितली ॥६॥
तुका म्हणे तीर्थ क्षेत्र । सर्वत्र हे दैवत ॥७॥
नव्हती हे आहाच बोल । मोकळे फोल कवित्त्व ॥ध्रु॥
भावे घ्या रे भावे घ्या रे । एकदा जा रे पंढरीये ॥३॥
भाग्ये आलेति मनुष्यदेहा । तो हा पाहा विठ्ठल ॥४॥
पापपुण्या करिल झाडा । जाईल पीडा जन्माची ॥५॥
घ्यावी हाती टाळदिंडी । गावे तोंडी गुणवाद ॥६॥
तुका म्हणे घटापटा । न लगे वाटा शोधाव्या ॥७॥
भलत्या काळी नामावळी । सुलभ भोळी भाविका ॥ध्रु॥
प्रायश्चित्तें पडती पायां । गाती तयां वैष्णवां ॥३॥
तुका म्हणे नुपजे दोष । करा घोष आनंदें ॥४॥
पाचारिल्या सरिसें पावे । ऐसी सवे बराडी ॥ध्रु॥
शुष्क काष्ठी ‘गुरगुरी’ । लाज हरि न धरितां ॥३॥
तुका म्हणे अर्धनारी । ऐसी धरी रूपडी हा ॥४॥
एकाचे अंगी हे ठेवावें लावून । नये भिन्नाभिन्न चांचपडों ॥ध्रु॥
कोण होईल तो ब्रह्मांडचाळक । आपणचि हाक देईल हाके ॥३॥
तुका म्हणे दिली चेतवूनि सुनीं । कौतुकावांचूनि नाहीं छळ ॥४॥
दुजियासी तंव अकळ हा भाव। करावा तो जीव साक्षी येथे ॥ध्रु॥
एकी अनेकत्व अनेकीं एकत्व । प्रकृतिस्वभावत्व प्रमाणेंचि॥३॥
तुका म्हणे करूं उगवूं जाणसी । कुशळ येविशीं तुम्ही देवा! ॥४॥
॥ पुंडलिकवरदा हरी विठ्ठल श्रीज्ञानदेव तुकाराम ॥
संपूर्ण वारकरी प्रस्थानत्रयी नित्यनेम पारायण अनुक्रमणिका
ज्यांना प्रत्यक्षात ग्रंथावरून पारायण करायचे आहे त्यांनी खालील लिंकवरून ग्रंथ मागवावे.








रामकृष्णहरी माऊली 🙏