दिवस – ५६. वारकरी प्रस्थानत्रयी नित्यनेम पारायण

अनुक्रमणिका

ज्ञानविज्ञानतृप्तात्मा कूटस्थो विजितेन्द्रियः । युक्त इत्युच्यते योगी समलोष्टाश्मकाञ्चनः ॥८॥
जो हा विज्ञानात्मकु भावो । तया विवरितां जाहला वावो । मग लागला जंव पाहो । तंव, ज्ञान तें तोचि ॥८८॥
आतां व्यापकु कीं एकदेशी । हे ऊहापोही जे ऐसी । ते करावी ठेली, आपैसी । दुजेनवीण ॥८९॥
ऐसा शरीरीचि; परि, कौतुकें । परब्रह्माचेनि पाडें तुकें । जेणें जिंतलीं एकें । इंद्रियें गा ॥९०॥
तो जितेन्द्रियु सहजें । तोचि योगयुक्तु म्हणिजे । जेणें साने थोर नेणिजे । कवणें काळीं ॥९१॥
देखें सोनियाचें निखळ । मेरुयेसणें ढिसाळ । आणि मातीचें डिखळ । कीं सरिसेंचि मानी ॥९२॥
पाहतां, पृथ्वीचें मोल थोडें । ऐसें अनर्घ्य रत्न चोखडें । देखे दगडाचेनि पाडें! । निचाडु ऐसा ॥९३॥
सुहृन्मित्रार्युदासीनमध्यस्थद्वेष्यबन्धुषु । साधुष्वपि च पापेषु समबुद्धिर्विशिष्यते ॥९॥
तेथ सुहृद आणि शत्रु । कां, उदासु आणि मित्रु । हा भावभेद विचित्रु । कल्पूं कैंचा ॥९४॥
तया बंधु कोण काह्याचा? । द्वेषिया कवणु तयाचा? । “मीचि विश्व” ऐसा जयाचा । बोधु जाहला ॥९५॥
मग, तयाचिये दिठी । अधमोत्तम असे? किरीटी । काय परिसाचिये कसोटी । वानिया कीजे?॥९६॥
ते जैसी निर्वान सुवणुचि करी । तैसी जयाची बुद्धि चराचरीं । होय साम्याची उजरी । निरंतर ॥९७॥
जे ते विश्वालंकाराचे विसुरे । जरी आहाती आनानें आकारें । तरी घडले एकचि भांगारें । परब्रह्में ॥९८॥
ऐसें जाणणें जें बरवें । तें फावलें तया आघवें । म्हणौनि, आहाचवहाच न झकवे । येणें आकारचित्रें ॥९९॥
घापे पटामाजी दृष्टी । दिसे तंतूंची सेंघ सृष्टी । परि तो एकु; वांचूनि, गोठी । दुजी नाहीं ॥१००॥
ऐसेनि प्रतीती हें गवसे । ऐसा अनुभव जयातें असे । तोचि समबुद्धि; हें अनारिसें । नव्हे; जाणें ॥१०१॥
जयाचें नाव तीर्थरावो । दर्शनें प्रशस्तीसि ठावो । जयाचेनि संगे ब्रह्मभावो । भ्रांतासही ॥१०२॥
जयाचेनि बोलें धर्मु जिये । दिठी महासिद्धीतें विये । देखें, स्वर्गसुखादि इयें । खेळु जयाचा ॥१०३॥
विपाायें जरी आठवला चित्ता । तरी दे आपुली योग्यता । हें असो; तयातें प्रशंसितां । लाभु आथि ॥१०४॥
योगी युञ्जीत सततमात्मानं रहसि स्थितः । एकाकी यतचित्तात्मा निराशीरपरिग्रहः ॥१०॥
पुढती अस्तवेना ऐसें । जया पाहलें अद्वैतदिवसें । मग आपणपां आपणु असे । अखंडित ॥१०५॥
ऐसिया दृष्टी जो विवेकी । पार्था, तो एकाकी । सहजें अपरिग्रही; जो, तिहीं लोकीं । तोचि, म्हणौनि ॥१०६॥
ऐसियें असाधारणें । निष्पन्नाचीं लक्षणें । आपुलेनि बहुवसपणें । श्रीकृष्ण बोले ॥१०७॥
जो ज्ञानियांचा बापु । देखणेयांये दिठीचा दीपु । जया दादुलयाचा संकल्पु । विश्व रची ॥१०८॥
प्रणवाचिये पेठे । जाहलें शब्दब्रह्म माजिठे । तें जयाचिया यशा धाकुटें । वेढूं न पुरे! ॥१०९॥
जयाचेनि आंगिकें तेजें । आवो रविशशींचिये वणिजे । म्हणौनि जग हें वेसजे- । वीण असे तया? ॥११०॥

नामस्मरण (कलियुगातील भक्तिविधान) (३४६ ते ३६४)

नवल कैसें राजाधिराजा । कीर्तन तेचि महापूजा । ऐशी आवडी अधोक्षजा । कीर्तनें गरुडध्वजा उल्हासु सदा ॥३४६ ॥
कीर्तन पढिये गोविंदा । यालागी सन्मानी नारदा । तो कृष्णकीर्ती पढे सदा । नामानुवादा गर्जतु ॥३४७॥
कीर्तन करितां नामानुवाद । संकटीं रक्षिला प्रल्हाद । कीर्तनें तुष्टे गोविंद । छेदी भवबंध दासांचा ॥३४८॥
गजेंद्रे नामस्मरण । करितां पावला नारायण । त्याचे तोडोनि भवबंधन । निजधामा आपण स्वयें नेला ॥३४९॥
अधमाधम अतिवोखटी । तोंडा रामु आला अवचटीं । ते गणिका की वैकुंठीं । कृष्णे नामासाठी सरती केली ॥३५० ॥
महादोषांचा मरगळा । अतिनष्ट अजामेळा । तोही नामें निर्मळ केला । प्रतापु आगळा नामाचा ॥३५१ ॥
नामें विनटली गोविंदीं । ते संकटी राखिली द्रौपदी । नाम तोडी आधिव्याधी । जाण त्रिशुद्धी दासांची ॥३५२॥
अंतरशुद्धीचे कारण । मुख्यत्वें हरिकीर्तन । नामापरतें साधन । सर्वथा आन असेना ॥३५३॥
कीर्तनी हरीची आवडी कैशी । वत्सालागी धेनु जैशी । कां न विसंबे जेवी माशी । मोहळासी क्षणार्ध ॥३५४॥
तेवीं नाम स्मरतया भक्ता । अतिशय आवडी अच्युता । दासांची अणुमात्र अवस्था । निजांगें सर्वथा निवारी स्वयें ॥३५५॥
यालागी हरिकीर्तनीं गोडी । जयासी लागली धडफुडी । त्यासी नाना साधनांच्या वोढी । सोसावया सांकडी कारण नाहीं ॥३५६॥
ज्यासी कीर्तनी कथाकथनीं । चौगुण आल्हाद उपजे मनीं । तो उद्धरला सर्व साधनीं । पवित्र अवनी त्याचेनी ॥३५७॥
एकचि जरी नाम वाचे । सदा वसे श्रीरामाचें । तरी पर्वत छेदोनि पापाचे । परमानंदाचें निजसुख पावे ॥३५8॥
आवडी करितां हरिकीर्तन । हृदयीं प्रगटे श्रीजनार्दन । त्याहोनि श्रेष्ठ साधन । सर्वथा आन असेना ॥३५९॥
थोर कीर्तनाचे सुख । निष्ठा तुष्टे यदुनायक । कीर्तनें तरले असंख्य । साबडे लोक हरिनामें ॥३६० ॥
यालागीं कीर्तनाहूनि थोर । आन साधन नाहीं सधर । मा कवण हेतू पामर । कीर्तन नर निंदिती ॥३६१ ॥
एवं नामकीर्तनी विमुख । ते स्वप्नींही न देखती सुख । कीर्तनद्वेषें मूर्ख । अतिदुःख भोगिती ॥३६२॥
ज्यांचे हृदयीं द्वेषसंचार । जळो जळो त्याचा आचार । सर्व काळ द्वेषी नर । दुःख दुस्तर भोगिती ॥३६३ ॥
कलियुगी जे बुद्धिमंत । ते नामकीर्तनीं सदा निरत । गौरवूनि नाम स्मरत । हर्षयुक्त सप्रेम ॥३६४ ॥

चरणवंदन (कलियुगातील भक्तिविधान) (३६५ ते ३८२)

नाना अवतार अतिगहन । त्यांत श्रीराम का भगवान् कृष्ण । यांचे चरित्र अतिपावन । त्यांचे चरणवंदन सांगत ॥३६५॥
ध्येयं सदा परिभवघ्नमभीष्टदोहं, तीर्थास्पदं शिवविरिञ्चिनुतं शरण्यम् ।
भृत्यार्तिहन्‌ प्रणतपाल भवाब्धिपोतं, वन्दे महापुरुष ते चरणारविन्दम् ॥३३॥
((कलियुगानुसार भगवत्प्रार्थना करतात-) हे पुरुषोत्तमा, तुझ्या चरणकमलांना मी वंदन करतो. सदासर्वकाळ आधिव्याधींचा नाश करणारे, सर्व इष्ट मनोरथ पूर्ण करणारे, सर्व तीर्थांना आश्रयभूत, शंकर आणि ब्रह्मदेव यांनी स्तविलेले, शरणागतास अभय देणारे, दासांची दुःखे निवारण करणारे, दीन झालेल्यांचे पालन करणारे, भवसागरातील केवळ नौकाच, असे हे तुझे चरणकमल सर्वकाल ध्यानास योग्य असेच आहेत. ॥३३॥)
लये लक्षे ध्यानलक्षणें । देव देवी ध्येय ध्याने । तृणप्राय केली जेणें । हरिचरणस्मरणें तत्काळ ॥३६६॥
यालागीं ध्यानासी तें वरिष्ठ । ध्यातां छेदी कल्पनादि कष्ट । भक्तांचे अतिअभीष्ट । मनोरथ इष्ट सदा पुरवी ॥३६७॥
नित्य ध्यातां हरीचे चरण । करी भक्तदेहरोगदुःखहरण । इतुकेंच राया नव्हे जाण । करी निर्दळण भवरोगा ॥३६८॥
भक्तांचे पुरवी मनोरथ । ते तूं म्हणसी विषययुक्त । परमानंदें नित्य तृप्त । निववी निजभक्त चरणामृतें ॥३६९॥
वाणूं चरणांची पवित्रता । शिवु पायवणी वाहे माथां । जे जन्मभूमी सकळ तीर्थां । पवित्रपण भक्तां चरणध्याने ॥३७०॥
अवचटें लागल्या चरण । पवित्र झाले पाषाण । मा जे जाणोनि करिती ध्यान । त्यांचे पवित्रपण काय वानूं ॥३७१॥
जो सदा शत्रुत्वें वर्ततां । जेणें चोरून नेली निजकांता । त्याच्या बंधू शरणागता । दिधली आत्मता निजभावें ॥३७२॥
कोरडी आत्मतेची थोरी । तैशी नव्हे गा नृपकेसरी । देऊनि सुवर्णाची नगरी । अचळतेवरी स्थापिला ॥३७३॥
यालागीं शरणागतां शरण्य । सत्य जाण हरीचे चरण । यापरतें निर्भय स्थान । नाहीं आन निजभक्तां ॥३७४॥
भक्तांची अणुमात्र व्यथा । क्षण एक न साहवे भगवंता । प्रल्हादाची अतिदुःखता । होय निवारिता निजांगें ॥३७५॥
दावाग्नि गिळूनि अंतरीं । गोपाळ राखिले वनांतरी । पांडव जळतां जोहरी । काढिले बाहेरी विवरद्वारें ॥३७६ ॥
करूनि सर्वांगाचा वोढा । नित्य निवारी भक्तांची पीडा । जो कां भक्तांचिया भिडा । रणरंगी फुडां वागवी रथु ॥३७७॥
ते चरण वंदितां साष्टांगीं । भक्तां प्रतिपाळी उत्संगी । ऐसा प्रणतपाळु कृपावोघीं । दुसरा जगीं असेना ॥३७८॥
तरावया भवाब्धि प्रबळ । चरणांची नाव अडंडळ । अनन्यशरण सकळ । तारी तत्काळ चरणानुरागें ॥३७९॥
ते महापुरुषाचे श्रीचरण । शरणागता निजशरण्य । ज्यांचे सनकादिक ध्यान । करिती अभिवंदन सद्भावें ॥३८०॥
अगाध चरणांचें महिमान । वाणितां वेदां पडिलें मौन । ब्रह्मा सदाशिव आपण । करितां स्तवन तटस्थ ठेले ॥३८१॥
अगम्य अतर्क्य श्रीचरण । जाणोनि ब्रह्मादिक ईशान । साष्टांगें अभिवंदन । करूनियां स्तवन करिती ऐसें ॥३८२॥

सेवाभक्ती (कलियुगातील भक्तिविधान) (३८३ ते ३९१)

त्यक्त्वा सुदुस्त्यजसुरेप्सितराज्यलक्ष्मीं, धर्मिष्ठ आर्यवचसा यदगादरण्यम् ।
मायामृगं दयितयेप्सितमन्वधावद्वन्दे महापुरुष ते चरणारविन्दम् ॥३४॥
(हे धर्मपालक प्रभो, देवादिकांनाही हवेसे वाटणारे आणि त्याग करण्यास अत्यंत कठीण असे राज्यवैभव सोडून पित्याचे (दशरथाचे) आज्ञेने आपण अरण्याला गेला आणि आपल्या प्राणप्रिय सीतेला हवा असलेल्या कपटी मृगाचे मागे धावला. हे पुरुषोत्तमा, अशा या आपल्या चरणकमलांना मी वंदन करतो. ॥३४॥)
जे राज्यश्रियेकारणे । अमर लोलंगत मनें । तें राज्य श्रीरामें त्यागणे । वचनाकारणें पित्याच्या ॥३८३॥
श्रीराम धर्मिष्ठ चोख । पितृवचनप्रतिपाळक । उद्भट राज्य सांडोनि देख । निघे एकाएक वनवासा ॥३८४॥
वनवासा चरणीं जातां । सवें घेतली प्रिया सीता । येणे बोलें स्त्रीकामता । श्रोतीं सर्वथा न मानावी ॥३८५ ॥
तरी केवळ स्त्री नव्हे सीता । ते निजभक्त जाण तत्त्वतां । सांडूनि राजभोगा समस्तां । सेवेच्या निजस्वार्था वना आली ॥३८६॥
राज्यीं असतां रघुवीरें । दास्य दासां वांटलें अधिकारें । ते मी एकली एकसरें । सेवा वनांतरी अवघीचि करीन ॥३८७॥
ते सेवा यावया हाता । सकळ सेवेच्या निजस्वार्था । चरणचाली चालोनि सीता । आली तत्त्वतां वनवासासी ॥३८८॥
कैसें श्रीरामसेवेचे सुख । चरणी चालतां नाठवे दुःख । विसरली मायामाहेरपक्ष । अत्यंत हरिख सेवेचा ॥३८९॥
ऐशिया मनोगत-सद्भावा । वना आली करावया सेवा । श्रीराम जाणे भक्तभावा । येरां देवां दानवां कळेना ॥३९०॥
निजभक्तांचे मनोगत । जाणता एक रघुनाथ । कां श्रीरामसेवेचा स्वार्थ । जाणती निजभक्त भजनानंदें ॥३९१॥

भाव (कलियुगातील भक्तिविधान) (३९२ ते ४०१)

भगवद्भजनाचे सुख । भक्त जाणती भाविक । भावेंवीण भजनसुख । अनोळख अभाविकां ॥३९२॥
पूर्ण भाविक भक्त सीता । हे कळलेंसे रघुनाथा । यालागीं तिचिया वचनार्था । होय धांवता मृगामागें ॥३९३॥
मायिक मृगाचे सुवर्णभान । जरी जाणे रघुनंदन । तरी भक्तलळे पाळण । करी धावन मृगामागें ॥३९४ ॥
बाळकाचेनि छंदें जाण । जेवीं माउली नाचे आपण । तेवीं मायामृगापाठी धावन । करी रघुनंदन निजभक्तवाक्ये ॥३९५॥
जो राम वानरांच्या गोष्टी । ऐकतां विकल्प न धरी पोटीं । तो सीतेच्या वचनासाठीं । धांवे मृगापाठी नवल कायी ॥३९६॥
भलतैसें भक्तवचन । मिथ्या न म्हणे रघुनंदन । यालागी निजचरणी धावन । करी आपण मृगामागें ॥३९७॥
एवं भक्तवाक्ये उठाउठी । जो पायीं धांवे मृगापाठीं । ज्याचे चरणरेणु अणुकुटी । वंदिती मुकुटीं शिवादि सर्व ॥३९८॥
तो मृगामागे धांवतां जाण । पावन केले पाषाण । त्याच्या चरणां अनन्य शरण । अभिवंदन सद्भावें ॥३९९ ॥
एवं महापुरुषाचे चरण । अभिवंदने करिती स्तवन । कलियुगी कीर्तनें जन । परम पावन नित्यमुक्त ॥४००॥
एवं युगानुरूपाभ्यां, भगवान् युगवर्तिभिः । मनुजैरिज्यते राजन् श्रेयसामीश्वरो हरिः ॥३५॥
(याप्रमाणे, हे राजा, त्या त्या युगात राहणाऱ्या स्त्रीपुरुषांकडून शाश्वत कल्याण करण्यास समर्थ असा प्रभू त्या त्या युगात असणाऱ्या पूजासाहित्याने पूजिला जातो ॥३५॥)
एवं कृतादि-कलियुगवरी । इहीं नामी रूपी अवतारी । सद्भावें तैंच्या नरीं । भजिजे श्रीहरी श्रेयार्थ ॥४०१॥

८९३.अस्त नाहीं आतां एकचि मोहोरा । पासूनि अंधारा दुरी झालों ॥१॥
साक्षत्वे या झालों गुणाचा देखणा। करी नारायणा तरी खरें ॥ध्रु॥
आठवूं विसरु पडि-येला मागें । आले तेचि भागे यत्न केले ॥३॥
तुका म्हणे माझा विनोद देवासी । आम्ही तुम्हां ऐसी दोन्ही नव्हों ॥४॥
८९४.क्षर अक्षर हे तुमचे विभाग। कासयाने जग दुरी धरा? ॥१॥
तैसें आम्ही नेणों पालटोंच कांहीं । त्यागि-ल्याची नाही मागे चाड॥ध्रु॥
प्रतिपादिता तूं समविष-माचा । प्रसाद तो याचा पापपुण्य ॥३॥
तुका म्हणे तुम्हां नाना अवगणीं । लागे संपादणी लटिक्याची ॥४॥
८९५.सर्वरसी मीनले चित्त । अखंडित आनंदु ॥१॥
गोत पति विश्वंभरी । झाला हरि सोयरा ॥ध्रु॥
वोळखी ते एका नांवें । इतर वाव खंडणा ॥३॥
तुका म्हणे नांवें रूपें । दुसरी पापें हारपलीं ॥४॥
८९६.मी हे ऐसें काय जाती। अवघड किती पाहातां ॥१॥
नाहीं होत उल्लंघन। नसतां भिन्न दुसरें ॥ध्रु॥
अंधाराने तेज नेलें । दृष्टीखालें अंतर ॥३॥
तुका म्हणे सवें देव । घेतां, ठाव दावील ॥४॥
८९७.कवीश्वरांचा तो आम्हांसी विटाळ । प्रसाद वोंगळ चिवडिती ॥१॥
दंभाची आवडी बहिरट अंधळे । शेवटासि काळे होईल तोंड ॥ध्रु॥
सोन्याशेजारी तो लाखेची जतन । सतत ते गुण जैसे तैसे ॥३॥
सेव्य सेवकता न पडतां ठावीं । तुका म्हणे गोवी पावती हीं ॥४॥
८९८.वाढलिया मान न मनावी निश्चिंती । भूतांचिये प्रीति भूतपण ॥१॥
म्हणऊनि मना लावावी कांचणी । इंद्रियांचे झणी ओढी भरे ॥ध्रु॥
एका एकपणे एकाचिया अंगीं । लागे रंग रंगी मिळालिया ॥३॥
तुका म्हणे देव निष्काम निराळा । जीवदशे चाळा चळणाचा ॥४॥
८९९.माया साक्षी आम्ही नेणों भीड भार। आप आणि पर नाहीं दोन्ही ॥१॥
सत्याचियेसाठी अवघाचि भर। नावडे व्यापार तुटीचा तो ॥ध्रु॥
पोभाळितां चरे अंतरींचें दु:ख । लासें फांसे मुख उघडावें ॥३॥
तुका म्हणे नव्हें स्फीतीचा हा ठाव । निवाड्यासी देव साक्षी केला ॥४॥
९००.संता आवडे तो काळाचाही काळ । समर्थाचे बाळ जेवीं समर्थ ॥१॥
परि सत्ता तेथें नाहीं एकेविणे । मोहें न पवे शीण ऐसे राखे ॥ध्रु॥
केले अन्याय ते सांडवी उपचारें। न देखें दुसरे नाशा मूळ ॥३॥
तुका म्हणे मुख्य कल्पतरु छाया । काय नाहीं दया तये ठायीं? ॥४॥
९०१.संतांच्या धिक्कारें अमंगळ जिणें । विश्वशत्रु तेणें सांडी परी ॥१॥
कुळ आणि रूप वायां संवसार । गेला, भरतार मोकलितां ॥ध्रु॥
मूळ राखे तया फळा काय उणें? । चतुर लक्षणे राखों जाणे ॥३॥
तुका म्हणे सायास तो एके ठायीं । दीप हातीं तईं अवघे बरें॥४॥
९०२.ओले मूळ भेदी खडकाचे अंग । अभ्यासासी सांग कार्यसिद्धी ॥१॥
नव्हें ऐसें कांहीं नाहीं अवघड । नाहीं कईवाड तोंच वरी ॥ध्रु॥
दोरे चिरा कापे पडिला कांचणी । अभ्यासे सेवनी विष पडे ॥३॥
तुका म्हणे कैंचा बैसण्यासी ठाव? । जठरी बाळा वाव एकाएकी॥४॥
९०३.अमर आहां अमर आहां । खरें की पहा खोटें हें ॥१॥
न म्हणा ‘देह माझा’ ऐसा । मग भरंवसा कळेल ॥ध्रु॥
कैंचा धाक कैंचा धाक? । ‘सकळिक हे आपुलें’॥३॥
‘देवचि’ बरे ‘देवचि’ बरे । तुका म्हणे खरे तुम्ही ॥४॥
९०४.काम नाहीं काम नाहीं । झालों पाहीं रिकामा ॥१॥
फावल्या त्या करूं चेष्टा। निश्चळ द्रष्टा बैसोनि ॥ध्रु॥
नसत्या छंदें नसत्या छंदें । जग विनोदें विव्हळतसे॥३॥
एकाएकी एकाएकी । तुका लोकी निराळा ॥४॥
९०५.हाती घेऊनियां काठी । तुका लागला कलेवरा-पाठी ॥१॥
नेऊनि निजविलें स्मशानीं । माणसें जाळी तें ठिकाणीं ॥ध्रु॥
काढीलें तें ओढें। मागील उपचाराचे, पुढें ॥३॥
नाहीं वाटों आला भेव। सुख दु:ख भोगिता देव ॥४॥
याजसाठी हें निर्वाण। केलें कसियेलें मन ॥५॥
तुका म्हणे अनुभव बरा। नाहीं तरी हस्त पाय चोरा ॥६॥
९०६.कीर्तन चांग कीर्तन चांग । होय अंग हरिरूप ॥१॥
प्रेमें छंदें नाचे डोले । हारपले देहभाव॥ध्रु॥
एक-देशी जीवकळा । हा सकळां सोयरा ॥३॥
तुका म्हणे उरला देव । गेला भेव त्या काळें ॥४॥
९०७.न बोलसी करा वाचा। उपाधीचा संबंध ॥१॥
एका तुमच्या नामाविण । अवघा शीण कळतसे ॥ध्रु॥
संक-ल्पाचे ओढी मन । पापपुण्य सवेंचि ॥३॥
तुका म्हणे नारायणीं । पावो वाणी विसांवा ॥४॥
९०८.प्रारब्धा हातीं जन । सुख शीण पावतसे ॥१॥
करितां घायाळाचा संग । अंगे अंग माखावें ॥ध्रु॥
आविसा अंगीं पीडा वसे। त्यागें असे बहु सुख ॥३॥
तुका म्हणे जीव भ्याला । अवघ्या आला बाहेरी ॥४॥
९०९.आशा ते करविते बुद्धीचा तो लोप । संदेह तें पाप कैसे नव्हें? ॥१॥
आपुला आपण करावा विचार । प्रसन्न तें सार मन ग्वाही ॥ध्रु॥
नांवें रूपें अंगीं लाविला विटाळ । होतें तें निर्मळ शुद्ध बुद्ध ॥३॥
अंधळ्यासी नये देखण्याची चाली । चाले ऐसी बोली तुका बोलें ॥४॥

संपूर्ण वारकरी प्रस्थानत्रयी नित्यनेम पारायण अनुक्रमणिका


ग्रंथ

2 thoughts on “दिवस – ५६. वारकरी प्रस्थानत्रयी नित्यनेम पारायण”

  1. गंगासागर गजानन बांगर हिंगोली

    खूप सुंदर आहे तुमचा प्रयत्न तुमच्या मुळे आच तिन्ही ग्रंथ वाचायला मिळाले धन्यवाद

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Page Reader Press Enter to Read Page Content Out LoudPress Enter to Pause or Restart Reading Page Content Out LoudPress Enter to Stop Reading Page Content Out LoudScreen Reader Support
error: Content is protected !!
Scroll to Top