दिवस – ५८. वारकरी प्रस्थानत्रयी नित्यनेम पारायण

अनुक्रमणिका

जयाचिया आवडीचेनि पांगें । अमूर्तुही मूर्ति आवगें । पूर्णांहि परि लागे । अवस्था जयाची ॥१३१॥
तंव श्रोते म्हणती “दैव । कैसी बोलाची हवव । काय नादातें, हन बरव । जिणोनि आली? ॥१३२॥
हां हो, नवल नोहे देशी! । मऱ्हाटी बोलिजे तरी ऐसी । वाणें उमटताहे आकाशीं । साहित्य रंगाचे ॥१३३॥
कौसें उन्मेषचांदिणें तार । आणि भावार्थु पडे गार । हेचि श्लोकार्थ-कुमुदिनी फार । साविया होती ॥१३४॥
चाडचि निचाडां करी । ऐसी मनोरथें ये थोरी” । तेणें विवळले अंतरीं । तेथ डोलु आला ॥१३५॥
तें निवृत्तिदासें जाणितलें । मग, “अवधान द्या” म्हणितलें । “नवल पांडवकुळीं पाहलें । कृष्णदिवसें ॥१३६॥
देवकीया उदरीं वाहिला । यशोदा सायासें पाळिला । शेखीं उपेगा गेला । पांडवांसी” ॥१३७॥
म्हणौनि, बहुदिवस वोळगावा । कां, अवसरु पाहोनि विनवावा । हाही सोसु तया सदैवा । पडेचिना ॥१३८॥
“हें असो, कथा सांगे वेगीं” । “मग अर्जुन म्हणे सलगीं । “देवा, इयें संतचिन्हें आंगीं । न ठकती माझ्या” ॥१३९॥
एऱ्हवीं, या लक्षणांचिया निजसारा । मी अपाडें, कीर अपुरा । परि तुमचेनि बोलें, अवधारा । थोरावें जरी ॥१४०॥
जी, तुम्हीं चित्त देयाल । तरी ब्रह्म मियां होईजेल । काय जाहालें, अभ्यासिजेल । सांगाल जें ॥१४१॥
हां हो, नेणों, कवणाची कहाणी । आइकोनि, श्लाघिजे असो अंतःकरणीं । ऐसी जाहलेपणाची शिरयाणी । कायसी देवा! ॥१४२॥
हें आंगें म्यां होईजो कां? । येतुलें, गोसावी आपुलपणें कीजो कां?” । तंव हांसोनि श्रीकृष्ण, “हो कां! । करूं; म्हणती” ॥१४३॥
देखा, संतोषु एक न जोडे । तंवचि सुखाचें सेंग सांकडें । मग, जोडिलिया, कवणीकडे । अपुरें असे?॥१४४॥
तैसा, सर्वेश्वरू बळिया सेवकें । म्हणौनि ब्रह्मही होय तो कौतुकें । परि कैसा भारें आतला पिकें । दैवाचेनि ॥१४५॥
जो जन्मसहस्रांचियासाठीं । इंद्रादिकांही महागु भेटी । तो आधीनु केतुला किरीटी । जे, बोलुही न साहे ॥१४६॥
मग, ऐका, जें पांडवें । म्हणितलें, “म्यां ब्रह्म होआवें” । तें अशेषही, देवें । अवधारिलें ॥१४७॥
तेथ ऐसेंचि एक विचारिलें । जे-“या ब्रह्मत्वाचे डोहळे जाहले । परि उदर वैराग्य आहे आलें । बुद्धीचिया ॥१४८॥
एऱ्हवीं, दिवस तरी अपुरे । परि वैराग्य-वसंताचेनि भरें । जें, सोऽहंभाव मचुरें । मोडोनि आला ॥१४९॥
म्हणौनि, प्राप्तिफळीं फळतां । यासि वेळु न लागेल आतां । होय विरक्तु”; ऐसा अनंता । भरंवसा जाहला ॥१५०॥
म्हणे “जें जें हा अधिष्ठील । तें आरंभींच यया फळेल । म्हणौनि, सांगितला न वचेल । अभ्यासु वायां ॥१५१॥
ऐसें विवरोनियां, श्रीहरी । म्हणितलें तिये अवसरीं । “अर्जुना हा अवधारीं । पंथराजू”॥१५२॥
तेथ प्रवृत्तितरूच्या बुडीं । दिसती निवृत्तिफळाचिया कोडी । जिये मार्गीचा कापडी । महेशु आझुनी ॥१५३॥
पैं योगिवृंदें वहिलीं । आडवीं आकाशीं निघालीं । कीं, तेथ अनुभवाच्या पाउलीं । धोरणु पडिला ॥१५४॥
तिहीं आत्मबोधाचेनि उजुकारें । धांव घेतली एकसरें । कीं येर सकळ मार्ग निदसुरे । सांडुनिया ॥१५५॥
पाठीं महर्षी येणें आले । साधकांचे सिद्ध जाहले । आत्मविद थोरावले । येणेंचि पंथें ॥१५६॥
हा मार्गू जें देखिजे । तैं तहान-भूक विसरिजे । रात्र-दिवसु नेणिजे । वाटे इये ॥१५७॥
चालतां, पाउल जेथ पडे । तेथ अपवर्गाचि खाणी उघडे । आव्हांटलिया; तरी जोडे । स्वर्गसुख ॥१५८॥
निगिजे पूर्विलीये मोहरे । कीं येइजे पश्चिमेचिया घरा । निश्चळपणें; धनुर्धरा । चालणें एंथींचें ॥१५९॥
येणें मार्गीं जया ठाया जाइजे । तो ठांवो आपणचि होइजे । हें सांगों काय सहजें । जाणसी तूं ॥१६०॥
तेथ पार्थें म्हणितलें “देवा । तरी तेंचि मग केंव्हां । का आर्तीसमुद्रौनि न काढावा । बुडतु जी, मी?’ ॥१६१॥
तंव श्रीकृष्ण म्हणती ऐसें । “हें उत्शृंखल बोलणें कायसें? । आम्ही सांगतसों आपैसें । वरि पुसिलें तुवां’ ॥१६२॥

द्रविड देश व भक्ती (४५१ ते ४५८)

क्वचित् क्वचिन्महाराज, द्रविडेषु च भूरिशः । ताम्रपर्णी नदी यत्र, कृतमाला पयस्विनी ॥३९॥
कावेरी च महापुण्या, प्रतीची च महानदी । ये पिबन्ति जलं तासां, मनुजा मनुजेश्वर । प्रायो भक्ता भगवति वासुदेवेऽमलाशयाः ॥४०॥
(हे महाराजा, कोठे कोठे, विशेषत: द्रविड देशामध्ये, असे लोक पुष्कळ होतील. तेथे ताम्रपर्णी, कृतमाला, पयस्विनी, अत्यंत पवित्र आणि पुण्यप्रद कावेरी आणि महानदी प्रतीची या नद्या आहेत. त्यांचे जल जे प्राशन करतात त्यांचे अंतःकरण शुद्ध होऊन, हे राजा, ते बहुधा भगवान वासुदेवाचे अनन्य भक्त होतात. ॥३९-४०॥)
विशेषें द्रविड देशाचे ठायीं । अतिशयें भक्ति वाढेल पाहीं । तेथेही तीर्थविशेष भुयी । ते ते ठायीं अतिउत्कट ॥४५१॥
ताम्रपर्णीच्या तीरीं । हरिभक्तीची अगाध थोरी । कृतमालेच्या परिसरी । उत्साहेकरी हरिभक्ति नांदे ॥४५२॥
निर्मळजळा पयस्विनी । जीचिये पयःप्राशनीं । वृत्ति वाढे हरिचरणीं । भगवद्भजनी दृढ बुद्धी ॥४५३॥
देखतां कावेरीची थडी । पळती पापांचिया कोडी । जेथ श्रीरंगु वसे आवडीं । तेथें भक्ति दुथडी उद्भट नांदे ॥४५४॥
प्रतीचीमाजीं देतां बुडी । चित्तशुद्धि जोडे रोकडी । भजन वाढे चढोवढी । भक्तीची गुढी वैकुंठी उभारे ॥४५५॥
ऐकें नरवरचूडामणी । या पंचनदींचिया तीर्थस्नानीं । अथवा पयःप्राशनीं । भगवद्भजनी दृढ बुद्धी ॥४५६॥
या तीर्थांचे केल्या दर्शन । होय कलिमलक्षालन । केल्या स्नान पयःप्राशन । भगवद्भजन उल्हासे ॥४५७॥
दर्शन स्पर्शन स्नान । या तीर्थींचें करितां जाण । वासुदेवी निर्मळ भजन । नित्य नूतन दृढ वाढे ॥४५८॥

भक्तीने ऋणत्रयमुक्तता (४५९ ते ४७०)

यापरी जे भगवद्भक्त । ते ऋणत्रयासी निर्मुक्त । सुरनरपितरां पंगिस्त । हरिभक्त कदा नव्हती ॥४५९॥
देवर्षिभूताप्तनृणां पितृणां, न किङ्करो नायमृणी च राजन् ।
सर्वात्मना यः शरणं शरण्यं, गतो मुकुन्दं परिहृत्य कर्तम् ॥४१॥
(हे राजा, इतर सर्व प्रकारची कर्मे सोडून सर्वांचा आश्रय जो मुकुंद त्याला अंतःकरणपूर्वक जो शरण जातो तो देव, ऋषी, भूते, आप्त व इतर लोक यांचा त्याचप्रमाणे पितरांचाही ऋणी असत नाही व दासही राहात नाही (कारण तो सर्वभूतात्मरूप झालेला असतो). ॥४१॥)
शरणागता निजशरण्य । मुकुंदाचे श्रीचरण । सद्भावें रिघाल्या शरण । जन्ममरण बाधीना ॥४६०॥
जेथ बाधीना जन्ममरण । तेथे देव-ऋषि-आचार्य-पितृगण । यांच्या ऋणांचा पाड कोण । ते झाले उत्तीर्ण भगवद्भजने ॥४६१॥
जो विनटला हरिचरणीं । तो कोणाचा नव्हे ऋणी । जेवीं परिसाचिये मिळणीं । लोह काळेपणी निर्मुक्त ॥४६२॥
सकळ पापांपासूनी । सुटिजे जेवीं गंगास्नानीं । तेवीं विनटल्या हरिचरणीं । निर्मुक्त त्रैऋणी भगवद्भक्त ॥४६३॥
भावें करितां भगवद्भक्ती । सकळ पितर उद्धरती । ऋषीश्वरां नित्य तृप्ती । भगवद्भक्ति-स्वानंदें ॥४६४॥
स्वानंदें भगवद्भक्ती । तेणें सर्व भूतें सुखी होती । पुत्रें केल्या भगवद्भक्ती । आप्त उद्धरती मातापितरें ॥४६५॥
सकळ देवांचा नियंता । अतिउल्हासें त्यातें भजतां । देवऋणाची वार्ता । भगवद्भक्तां बाधीना ॥४६६॥
ज्यांसी अनन्य भगवद्भजन । ते कदा नव्हती कर्माधीन । कर्म ज्याचे आज्ञाधीन । त्या हरीसी शरण जो झाला ॥४६७॥
तो नव्हे कर्माचा सेवक । नव्हे देवांचा पाइक । नव्हे प्राकृताचा रंक । अनन्य भाविक हरिभक्त ॥४६८॥
जो हरीचा शरणागत । तो कोणाचा नव्हे अंकित । कर्माकर्मी तो अलिप्त । नित्यमुक्त ऋणत्रयासी ॥४६९॥
वासुदेव सर्वां भूतीं । हे दृढ ठसावे प्रतीती । यालागीं अलिप्त कर्मगती । सकळ ऋणनिर्मुक्ती भगवद्भक्तां ॥४७०॥

कर्मबंध भक्तांना नाही (४७१ ते ४८५)

स्वपादमूलं भजतः प्रियस्य, त्यक्तान्यभावस्य हरिः परेशः ।
विकर्म यच्चोत्पतितं कथञ्चिद्, धुनोति सर्वं हृदि सन्निविष्टः ॥४२ ॥
(सर्व इतर भावना टाकून देऊन आपल्या पदकमलाची आराधना करणाऱ्या प्रिय भक्ताच्या हातून कसेही का होईना जे काही निषिद्ध कर्म घडले असेलते त्याच्या हृदयात वास करणारा परमात्मा धुवून नाहीसे करतो (कारण तो भक्तिप्रिय आहे). ॥४२॥)
सांडूनि देहाच्या अभिमाना । त्यजूनि देवतांतरभजना । जे अनन्य शरण हरिचरणां । ते कर्मबंधना नातळती ॥४७१॥
यापरी जे अनन्य शरण । तेचि हरीसी पढियंते पूर्ण । हरिप्रियां कर्मबंधन । स्वप्नीही जाण स्पर्शों न शके ॥४७२॥
राया म्हणसी ‘भगवद्भक्त । विहितकर्मी नित्यनिर्मुक्त’ । ते जरी विकर्म आचरत । तरी प्रायश्चित्त न बाधी त्यांसी ॥४७३॥
जेवीं पंचाननाचें पिलें । न वचे मदगजांचेनि वेढिलें । तेवीं हरिप्रियीं विकर्म केलें । त्यांसी न वचे बांधिलें यमाचेनि ॥४७४ ॥
स्मरतां एक हरीचें नाम । महापातक्यां वंदी यम । मा हरीचे पढियंते परम । तयां विकर्मे यम केवी दंडी ॥४७५॥
आशंका ॥ वेदाज्ञा विष्णूची परम । वेदें विहिले धर्माधर्म । भक्त आचरतां विकर्म । केवीं वेदाज्ञानेम न बाधी त्यांसी’ ॥४७६ ॥
जेवीं रायाचा सेवक आप्त । तो द्वारपाळां नव्हे अंकित । तेथ रायाचा पढियंता सुत । त्यांचा पंगिस्त तो केवीं होय ॥४७७॥
हरिनामाचें ज्यासी स्मरण । वेद त्याचे वंदी चरण । मा जो हरीचा पढियंता पूर्ण । त्यासी वेदविधान कदा न बाधी ॥४७८ ॥
भक्तापासूनि विकर्मस्थिती । कदा न घडे गा कल्पांतीं । अवचटें घडल्या दैवगतीं । त्या कर्मा निर्मुक्ति अच्युतस्मरणें ॥४७९॥
बाधूं न शके कर्माकर्म । ऐसा कोण भागवतधर्म । ते भक्तीचें निजवर्म । उत्तमोत्तम अवधारीं ॥४८० ॥
त्यजूनि देहाभिमानवोढी । सर्वा भूतीं हरिभक्ति गाढी । तो कर्माकर्मे पायीं रगडी । मुक्ति पाय झाडी निजकेशीं ॥४८१॥
तो ज्याकडे कृपादृष्टी पाहे । त्याचे निर्दळे भवभये । तो जेथ म्हणे राहें । तेथें लाहे मुक्तिसुख ॥४८२ ॥
त्याचेनि अनुग्रहकरीं । देव प्रगटे दीनाच्या अंतरीं । त्याच्या कर्माकर्माची बोहरी । स्वयें श्रीहरी करूं लागे ॥४८३॥
जेवीं प्रगटल्या दिनमणी । अंधार जाय पळोनी । राम प्रगटल्या हृदयभुवनीं । कर्माकर्मधुणी सहजचि ॥४८४॥
भगवंताची नामकीर्ति । याचि नामें परम भक्ति । भक्तीपाशीं चारी मुक्ति । दासीत्वें वसती नृपनाथा ॥४८५॥

नवार्षभांचे भक्तिनिरूपणाने विदेहास परमानंद व नवार्षभांस सत्कारपूर्वक निरोप (४८६ ते ४९५)

ऐकोनि भक्तीची पूर्ण स्थिती । रोमांचित झाला नृपती । आनंदाश्रु नयनीं येती । सुखावलिया वृत्ती डुलतु ॥४८६॥
सांगतां वैदेहाची स्थिती । नारदु सुखावे निजचित्तीं । तो उल्हासें वसुदेवाप्रती । सांगे समाप्ति इतिहासाची ॥४८७॥
नारद उवाच – धर्मान्भागवतानित्थं, श्रुत्वाऽथ मिथिलेश्वरः ।
जायन्तेयान् मुनीन् प्रीतः, सोपाध्यायो ह्यपूजयत् ॥४३॥
(नारद म्हणाले. याप्रमाणे भागवतधर्माचे श्रवण केल्यानंतर अत्यंत प्रसन्न होऊन त्या नऊ जयंतीपुत्र महामुनींची नारद उवाच राजा जनकाने आणि त्याच्या उपाध्यायाने मोठ्या भक्तीने पूजा केली. ॥४३॥)
नारद इतिहास सांगतु । तेवींच आनंदें डुल्लतु । तेणें आनंदें बोलतु । भक्तीचें मथितु वसुदेवाप्रती ॥४८८॥
यापरी जयंतीसुतीं । भगवंताची उद्भट भक्ती । सांगितली परम प्रीतीं । मिथिलेशाप्रती निजबोधे ॥४८९ ॥
ऐकोनि त्यांचिया वचना । सुख जाहलें विदेहाचिया मना । मग अतिप्रीती पूजना । जयंतीनंदनां पूजिता झाला ॥४९०॥
श्रवणें जाहली अतिविश्रांती । तेणें पूजेलागी अतिप्रीती । विदेहा उल्हासु चित्तीं । स्वानंदस्थितीं पूजिता झाला ॥४९१॥
पूजेचा परम आदरु । जयंतीनंदना केला थोरु । उपाध्याय जो अहल्याकुमरु । तेणेही अत्यादरु पूजेसी केला ॥४९२॥
ततोऽन्तर्दधिरे सिद्धाः, सर्वलोकस्य पश्यतः । राजा धर्मानुपातिष्ठन्नवाप परमां गतिम् ॥४४॥
(नंतर सर्व लोक पाहात असतानाच ते सिद्ध मुनी अंतर्धान पावले. त्यांनी सांगितलेल्या धर्मांचे पालन करून राजाने श्रेष्ठ प्रकारची मोक्षगती मिळविली. ॥४४॥)
यापरी ते भागवतश्रेष्ठ । नवही जण अतिवरिष्ठ । समस्तां देखतांचि स्पष्ट । झाले अदृष्ट ऊर्ध्वगमनें ॥४९३॥
ते भागवतधर्मस्थितीं । अनुष्ठुनि भगवद्भक्ती । राजा पावला परम गती । पूर्णप्राप्ती निजबोधे ॥४९४॥
भावें करितां भगवद्भक्ती । देहीं प्रगटे विदेहस्थिती । ते पावोनि नृपती । परम विश्रांती पावला ॥४९५॥

९२७.भरला दिसे हाट। अवघी वाढली खटपट। संचि-ताची वाट । वाटा होऊनि फांकती ॥१॥
भोगा ऐसे ठायाठाव। कर्मा त्रिविधाचे भाव । द्रष्टा येथे देव । विरहीत संकल्पा ॥ध्रु॥
दिला पाडूनियां धडा। पापपुण्याचा निवाडा। आचरती गोडा । आचरणे आपुलाल्या ॥३॥
तुका म्हणे पराधीनें । झाली, ओढलीया ऋणें । तुटती बंधनें । जरि देवा आळविती॥४॥
९२८.आला भागासी तो करीं वेवसाव । परि राहों भाव तुझ्या पायीं ॥१॥
काय चाले तुम्हीं बांधले दातारा! । वाहि-लिया भारा उसंतितों ॥ध्रु॥
शरीर तें करी शरीराचे धर्म । नको देऊं वर्म चुकों मना ॥३॥
चळण फिरवी ठाव बहुवस । न घडो आळस चिंतनाचा ॥४॥
इंद्रियें करोत आपुले व्यापार । आवडीसी थार देईं पायीं ॥५॥
तुका म्हणे नको देऊ काळा हातीं । येतो काकुळती म्हणऊनि ॥६॥
९२९.आम्हां अवघे भांडवल । एक विठ्ठल एकला ॥१॥
कायावाचामनोभावें । येथे जीवें वेंचलों ॥ध्रु॥
परतें कांहीं नेणें दुजें । तत्त्वबीज पाऊलें ॥३॥
तुका म्हणे संतसंगें । येणे रंगे रंगलों ॥४॥
९३०.साहोनिया टोले उरवावें सार । मग अंगीकार खऱ्या मोलें ॥१॥
भोगाचे सांभाळी द्यावें कलेवर। संचिताची थार मोडूनियां ॥ध्रु॥
महत्त्वाचे ठायीं भोगावी अप्रतिष्ठा । विटवावें नष्टां पंचभूतां ॥३॥
तुका म्हणे मग कैंचा संवसार? । जयाचा आदर तेंचि व्हावें ॥४॥
९३१.‘निर्वैर’ होणे साधनाचे मूळ । येर ते विल्हाळ सांडी मांडीं ॥१॥
नाहीं चालों येत सोंग संपादणी । निवडे अवसानी शुद्धाशुद्ध ॥ध्रु॥
‘त्याग’ नांव तरी निर्विषय वासना । कार्यकारणापुरता विधि ॥३॥
तुका म्हणे राहे चिंतनी आवडी । येणे नांवे जोडी सत्यत्वेंसी ॥४॥
९३२.पशु ऐसे होती ज्ञानी । चर्वणी विषयांचे ॥१॥
ठेवूनियां लोभीं लोभ। झाला क्षोभ आत्मत्वीं ॥ध्रु॥
केला आणिकां वाढी पाक। खाणे ताक मूर्खासी ॥३॥
तुका म्हणे मोठा घात। वाताहात हा देह ॥४॥
९३३.कां जी धरिलें नाम । तुम्ही असोनि निष्काम ॥१॥
कोणा सांगतसां ज्ञान । ठकाठकीचे लक्षण ॥ध्रु॥
आवडीनें नाचें । आहे तरी पुढे साचें ॥३॥
तुका म्हणे प्रेम । नाहीं भंगायाचे काम ॥४॥
९३४.खरे बोले तरी । फुकासाठी जोडे हरि ॥१॥
ऐसे फुकाचे उपाय । सांडोनियां, वायां जाय ॥ध्रु॥
पर उपकार । एका वचनाचा फार ॥३॥
तुका म्हणे मळ । मनें सांडितां शीतळ ॥४॥
(मासिक पारायण सहावा विसांवा)
९३५.दया क्षमा शांती । तेथें देवाची वसति ॥१॥
पावें धांवो-नियां घरा । राहे धरोनियां थारा ॥ध्रु॥
कीर्तनाचे वाटे । बराडिया ऐसा लोटे ॥३॥
तुका म्हणे घडे । पूजा नामें देव जोडे ॥४॥
९३६.शिष्याची जो नेघे सेवा । मानी देवासारिखें ॥१॥
त्याचा फळे उपदेश । आणिकां दोष उफराटे ॥ध्रु॥
त्याचें खरें ब्रह्मज्ञान । उदासीन देहभावीं ॥३॥
तुका म्हणे सत्य सांगें । येवोत रागें येतील ते ॥४॥
९३७.माझी मेली बहुवरी । तूं कां जैसा तैसा हरी! ॥१॥
विठो, कैसा वांचलासी? । आतां सांग मजपाशीं ॥ध्रु॥
तुज देखतांचि माझा । बाप गेला आजा पणजा ॥३॥
आम्हां लागलिसे पाठी । बालत्व तारुण्य काठी ॥४॥
तुज फावलें तें मागें । कोणी नसतां वादि लागे ॥५॥
तुका म्हणे तुझ्या अंगीं । मज देखतां लागली अवघीं ॥६॥
९३८.आणीक कोणाचा न करी मी संग । जेणे होय भंग माझ्या चित्ता ॥१॥
विठ्ठलावांचूनि आणीक जे वाणी । नाइकें मी कानी आपुलियां ॥ध्रु॥
समाधानासाठी बोलावी हे मात । परि माझें चित्त नाहीं कोठें ॥३॥
जिवाहूनि मज तेचि आवडती । आवडे ज्या चित्तीं पांडुरंग ॥४॥
तुका म्हणे माझें तोचि जाणे हित । आणिकांच्या चित्त नेदीं बोला ॥५॥
९३९.आशा हे समूळ खणोनि काढावी । तेव्हांचि गोसावी व्हावें तेणें ॥१॥
नाहीं तरि सुखें असावें संसारीं । फजिती दुसरी करूं नये ॥ध्रु॥
आशा मारूनियां जयवंत व्हावें । तेव्हांचि निघावें सर्वांतूनि ॥३॥
तुका म्हणे जरि योगाची तांतडी । आशेची बीबुडी करी आधीं ॥४॥
९४०.निष्ठावंत भाव भक्तांचा स्वधर्म । निर्धार हे वर्म चुकों नये ॥१॥
निष्काम निश्चळ विठ्ठलीं विश्वास । पाहों नये वास आणिकांची ॥ध्रु॥
तुका म्हणे ऐसा कोण उपेक्षिला । नाहीं ऐकिला ऐसा कोणी ॥३॥
९४१.नामाचे चिंतन प्रगट पसारा। असाल ते करा जेथें तेथें ॥१॥
सोडवील माझा स्वामी निश्चयेसीं । प्रतिज्ञा हे दासीं केली आम्हीं ॥ध्रु॥
गुण दोष नाही पाहात कीर्तनीं । प्रेमें चक्रपाणि वश होय ॥३॥
तुका म्हणे कडू वाटतो प्रपंच । रोकडे रोमांच कंठ दाटे ॥४॥
९४२.किती या काळाचा सोसावा वळसा। लागला सरिसा पाठोवाटीं ॥१॥
लक्ष चौऱ्यांशीची करा सोडवण । रिघा या शरण पांडुरंगा ॥ध्रु॥
उपजल्या पिंडा मरण सांगातें । मरतें उपजतें सवेंचि तें ॥३॥
तुका म्हणे माळ गुंतली राहाटीं-। गाडग्याची सुटी फुटलिया ॥४॥

संपूर्ण वारकरी प्रस्थानत्रयी नित्यनेम पारायण अनुक्रमणिका


ग्रंथ

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Page Reader Press Enter to Read Page Content Out LoudPress Enter to Pause or Restart Reading Page Content Out LoudPress Enter to Stop Reading Page Content Out LoudScreen Reader Support
error: Content is protected !!
Scroll to Top