
अनुक्रमणिका
- श्रीज्ञानेश्वरी नित्यनेम पारायण क्रमश: नित्यनेम पारायण अध्याय – ६. ओवी क्र. २११ ते २३०
- श्रीएकनाथी भागवत क्रमश: नित्यनेम पारायण अध्याय – ६, ओवी क्र. १ ते ५१
- जनार्दन नमन (१ ते १९)
- पाचव्या अध्यायाचे सिंहावलोकन (२० ते २३)
- कृष्णदर्शनास देव द्वारकेस येतात (२४ ते ४५)
- कृष्णमहिमा (४६ ते ५१)
- श्रीतुकाराम महाराजांची गाथाअभंग क्र. ९७३ ते ९८९
- ग्रंथ
या कुन्देन्दुतुषारहारधवला या शुभ्रवस्त्रावृता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना ।
या ब्रह्माच्युतशङ्करप्रभृतिभिर्देवै: सदा वन्दिता सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापहा ॥
जयांचे केलिया स्मरण । होय सकळ विद्यांचे अधिकरण । तेचि वंदूं श्रीचरण । श्रीगुरूंचे ॥१॥
ते नमस्कारोनि आता ॥
श्रीगणेशाय नमः । श्रीसरस्वत्यै नमः । श्रीविठ्ठलाय नमः ।
श्रीमातापितृभ्यां नमः । श्रीगुरुभ्यो नमः ॥
ॐ नमो भगवते वासुदेवाय ।
रामकृष्णहरि । रामकृष्णहरि । रामकृष्णहरि ॥
श्रीज्ञानेश्वरी नित्यनेम पारायण
क्रमश: नित्यनेम पारायण
अध्याय – ६. ओवी क्र. २११ ते २३०
कल्पना निमे । प्रवृत्ती शमे । आंग मन विरमे । सावियाचि ॥२१२॥
क्षुधा काय जाहली? । निद्रा केउती गेली? । हे आठवणहि हारपली । न दिसे वेगां ॥२१३॥
जो मूळबंधें कोंडला । अपानु माघौता मुरडला । तो, सवेंचि, वरी, सांकडला । धरी फुगूं ॥२१४॥
क्षोभलेपणें माजे । उवाइला, ठायीं गाजे । मणिपूरेंसीं झुंजे । राहोनीयां ॥२१५॥
मग, थावलिये वाहुटुळी । सेंग घेऊनि घर ढहुळी । बाळपणींची “कुहीटुळी” । बाहेर घाली ॥२१६॥
भीतरी वळी न धरे । कोठ्यामाजीं संचरे । कफपित्तांचे थारे । उरों नेदी ॥२१७॥
धातूंचे समुद्र उलंडी । मेदाचे पर्वत फोडी । आंतली मज्जा काढी । अस्थिगत ॥२१८॥
नाडीतें सोडवी । गात्रांतें विघडवी । साधकांतें भेडसावी । परि बिहावें ना ॥२१९॥
व्याधीतें दावी । सवेंचि हरवी । आप पृथ्वी कालवी । एकवाट ॥२२०॥
तंव, येरीकडे, धनुर्धरा । आसनाचा उबारा । शक्ती करी उजगरा । कुंडलिनी ते ॥२२१॥
नागिणीचें पिलें । कुंकुमें नाहलें । वळण घेऊनि आलें । शेजे जैसें ॥२२२॥
तैसी ती कुंडलिनी । मोटकी औट वळणी । अधोमुख सर्पिणी । निदेलि असे ॥२२३॥
विद्युल्लतेची विडी । वह्निज्वाळांची घडी । पंधरेयाची चोखडी । घोंटीव जैसी ॥२२४॥
तैसी सुबद्ध, आटली । पुटीं होती दाटली । तें वज्रासनें चिमुटली । सावधु होय ॥२२५॥
तेथ, नक्षत्र जैसें उलंडलें । कीं, सूर्याचें आसन मोडलें । तेजाचें बीज विरूढलें । अंकुरेंसीं ॥२२६॥
तैसी, वेढियातें सोडीती । कवतिकें आंग मोडीती । कंदावरी शक्ती । उठिली दिसे ॥२२७॥
सहजें बहुता दिवसांची भूक । वरी चेवविली, तें होय मिष । मग आवेशें पसरी मुख । ऊर्ध्व उजू ॥२२८॥
तेथ हृदयकोशातळवटीं । जो पवनु भरे, किरीटी । तया सगळियाचि मिठी । देऊनि घाली ॥२२९॥
मुखींच्या ज्वाळीं । तळीं, वरी, कवळी । मांसाची वडवाळी । आरोगूं लागे ॥२३०॥
॥ पुंडलिकवरदा हरी विठ्ठल श्रीज्ञानदेव तुकाराम ॥
श्रीएकनाथी भागवत
क्रमश: नित्यनेम पारायण
अध्याय – ६, ओवी क्र. १ ते ५१
श्रीगणेशाय नमः ॥ श्रीसरस्वत्यै नमः ॥ श्रीगुरुभ्यो नमः ॥ श्रीदत्तात्रेयाय नमः ॥ श्रीरुक्मिणीपाण्डुरङ्गाभ्यां नमः ॥
॥ ॐ तत्सत्-श्रीकृष्ण प्रसन्न ॥
श्रीएकनाथी भागवत
अध्याय सहावा
श्रीगणेशाय नमः ॥ श्रीकृष्णाय नमः ॥
जनार्दन नमन (१ ते १९)
लिंगदेहाचे मर्दन । तेंचि जनाचें अर्दन । यालागी नामें जनार्दन । प्रगट जाण प्रसिद्धी ॥२॥
तुझी ऐशीच करणी । कर्म कर्ता नुरवूनि । सुखें नांदविसी जनीं । समाधानी जनार्दना ॥३॥
सुखेंचि तुझें नाम घेतां । घातु करिसी जीविता । जीव घेऊनि तत्त्वतां । होसी सर्वथा कृपाळू ॥४॥
तुझे नामाचे प्रबळ बळ । माथा नुधविती कळिकाळ । चारी मुक्ति केवळ । होती निश्चळ निजदासी ॥५॥
नामें एवढे ढसाळ देणें । त्या तुझें स्वरूप कवण जाणे । सांडूनि जाणणे नेणणे । निवांत राहाणे तत्त्वतां ॥६॥
तुझा स्तुतिवादु करणें । तंव परतलीं श्रुति पुराणें । तेथ माझें आरुष बोलणें । कोठे कोणे सारावें? ॥७॥
तुझा स्तुतिवादु तें मौन । तुझा कळवळा तें कीर्तन । कांहीं न करणें तें अनुसंधान । साचार जाण श्रीकृष्णा ॥८॥
ऐशियाही तुझे ठायीं । अचाट हांव उठिली पाहीं । तेचि अर्थी चित्त देईं । कृपानिर्वाही गुरुराया ॥९॥
खद्योत प्रकाशुं पाहे चांदा । मशक गरुडासी घे खांदां । तैसा मी एकादशस्कंधा । मूर्ख नुसधा टीकार्थी ॥१०॥
येचि विषयीं गुरुनाथा । कृपा करावी सर्वथा । ग्रंथरचना ग्रंथार्था । सार्थकता करावी ॥११॥
ऐशी विनवणी ऐकतां । कृपापद्मकरु ठेविला माथां । तंव उद्योत्कार जाहला ग्रंथा । यथार्थता निजदीपें ॥१२॥
नवल कृपेची करणी । अर्थचिंतामणीची खाणी । उघडली तत्क्षणीं । पदार्थश्रेणी कविमुद्रा ॥१३॥
लेतां सिद्ध अलंकारा । कवण सांकडे लेणारा? । ताल राखतां खांबसूत्रा । लेपाच्या करा प्रयास काय? ॥१४॥
बापाची पक्वान्ने घेउनी । बाळ घाली बापाचे वदनीं । तेणें साचचि तो संतोषोनी । होय मनीं सुखाचा ॥१५॥
तैशीच हेही कथा । तूंचि ग्रंथु तूंचि कविता । तेथे कोणी घ्यावी अहंता? । ‘मी कर्ता’ म्हणौनी ॥१६॥
गुरूने सांडविली ‘अहंता’ । शेखीं राहों नेदीच ‘सोहंता’ । तेथ मी एकु कवि-कर्ता । हेही सर्वथा न सरे पैं ॥१७ ॥
सूचितां अहंकाराचा झाडा । सूचनाचि होय त्याचा जोडा । जो आपणियातें म्हणवी वेडा । तोचि गाढा अतिचतुर ॥१८॥
तैशीच हेही होईल वार्ता । यालागीं श्रीगुरुनाथा । चरणी ठेविला माथा । कर्ता करविता तूंचि तूं ॥१९॥
पाचव्या अध्यायाचे सिंहावलोकन (२० ते २३)
हा परमात्मा श्रीहरी । लीलाविग्रहें देहधारी । अवतरला तुमचे घरीं । भाग्य, करी नटनाट्य ॥२१॥
हा ईशाचाही निजईशु । वैकुंठींचा निजवासु । परमात्मा परेशु । जगदीशु श्रीकृष्णु ॥२२॥
तेंचि नारदवचनप्रमाण । प्रार्थावया श्रीकृष्ण । मिळवोनियां देवगण । द्वारकेसी जाण स्वयें आले ॥२३॥
कृष्णदर्शनास देव द्वारकेस येतात (२४ ते ४५)
((या अध्यायाने मूळ कथेचे अनुसंधान सुरू करतात.) श्रीशुक म्हणाले-भगवद्दर्शनाकरिता सनकादिक मानसपुत्र, प्रजापती, देव यांसह ब्रह्मदेव, त्याचप्रमाणे भूतगणांसह भूत व भविष्य यांचा स्वामी शंकर, (द्वारकेला) आले.॥१॥)
श्रीकृष्णमूर्तीचे कवतिक । पहावया देव सकळिक । चतुर्मुख पंचमुख । वेगें षण्मुख पातले ॥२५॥
करावयास प्रजाउत्पत्ती । पूर्वी नेमिला प्रजापती । तोही आला द्वारकेप्रती । कृष्णमूर्ती पहावया ॥२६॥
सनकादिक आत्माराम । अवाप्तसकळकाम । तेही होऊनि आले सकाम । मेघश्याम पहावया ॥२७॥
भूतनायक रुद्रगण । आले अकराही जण । पहावया श्रीकृष्ण । भूतगणसमवेत ॥२८॥
पहावया श्रीकृष्णरावो । घेऊनि गणांचा समुदावो । द्वारके आला महादेवो । भूतभविष्यांचा पहा हो त्रिकाळज्ञाता ॥२९॥
श्रीकृष्णदर्शनाची उत्कंठा । थोर लागली नीलकंठा । धांवतां मोकळ्या सुटल्या जटा । कृष्णवरिष्ठा पहावया ॥३०॥
गन्धर्वाप्सरसो नागाः, सिद्धचारणगुह्यकाः । ऋषयः पितरश्चैव, सविद्याधरकिन्नराः ।
द्वारकामुपसंजग्मुः, सर्वे कृष्णदिदृक्षवः ॥३॥
(मरुद्गणांसह ऐश्वर्यसंपन्न इंद्र, बारा आदित्य, अष्टवसू, अश्विनीकुमार, ऋभू, अंगिरस, अकरा रुद्र, विश्वेदेव आणि साध्यादी देवता, त्याचप्रमाणे- ॥२॥ गंधर्व, अप्सरा, नाग, सिद्ध, चारण, गुह्यक, विद्याधर, किन्नर, ऋषी व पितर हे सर्व भगवान कृष्णाला पाहण्याच्या उत्कंठेने द्वारकेला आले. ॥३॥)
सांडोनियां रविमंडळा । बारा आदित्यांचा मेळा । पहावया कृष्णसोहळा । तृषित डोळां होऊनि आले ॥३२ ॥
सूर्य अधिष्ठिला डोळां । देखे पदार्थां सकळां । कृष्ण न देखतां आंधळा । सूर्यो पावला अंधत्व ॥३३॥
पाहतां श्रीकृष्णाचे मुखकमळ । फिटलें सूर्याचे पटळ । मग देखणा झाला केवळ । सर्वांगें सकळ स्वयें रवि ॥३४॥
तिन्ही अग्नी तेजाळे । परी ते धूमें झांकोळले । कृष्ण देखतांच उजळले । निर्धूम जाहले निजतेजें ॥३५॥
आठां वसूंचा मेळा । पाहों आला कृष्णलीला । म्हणे मदनाचा पुतळा । तंव तो खेळे लीला कृष्णांकीं ॥३६॥
अश्विनीकुमार धन्वंतरी । तेही भवरोगें पीडिले भारी । कृष्णदर्शनामृतकरीं । निरुज क्षणावरी ते जाहले ॥३७॥
ऋषभदेव अंगिरस । रुद्र मीनले असमसाहस । विश्वे-साध्यदेव बहुवस । देवीं आकाश दाटलें ॥३८॥
आमुची गायनकळा मोठी । होतें गंधर्वांच्या पोटीं । ते कृष्णवेणुगीतासाठीं । जाहली शेवटीं न सरती ॥३९॥
यालागीं दर्शनाची आस । क्षणक्षणां पाहती वास । त्यांसी गायनकळा सावकाश । दिधली सुरस कृपामात्रें ॥४०॥
अप्सरा म्हणती आम्ही नाचणी । तंव काळियाच्या फणारंगणीं । एकेचि ताले लाजवूनी । तत्क्षणी सांडिल्या ॥४१॥
त्या दीनवदना कामिनी । आल्या दर्शनालागोनी । नाचों शिकविल्या, नाचणी । रासरंगणीं भृकुटिमात्रे ॥४२॥
पहावया श्रीरंग । आले पाताळींचे पन्नग । सिद्ध चारण अनेग । विद्याधर साङ्ग समुदायें ॥४३॥
कश्यपादि ऋषीश्वर । अर्यमादि पितर । गुह्यक आणि किन्नर । आले अपार स्वगणेसीं ॥४४॥
एवं विमानांचिया पंक्तीं । दाटलिया द्वारकेप्रती । पहावया कृष्णमूर्ती । आले सुरपती स्वानंदें ॥४५॥
कृष्णमहिमा (४६ ते ५१)
(ज्या भगवंताने लोकांच्या मनाला अत्यंत आल्हादकारक असे सुंदर शरीर धारण करून प्राणिमात्रांचे त्रिविध ताप व पाप नाहीसे करणारी आपली विमल कीर्ती त्रैलोक्यात विस्तारली ॥४॥)
ऐकतां श्रीकृष्णकीर्ती । चतुर्विध प्रायश्चित्तांची गती । खुंटली जी निश्चितीं । श्रवणार्थी सादर जाहलिया ॥४७॥
भावे घेतलिया श्रीकृष्णनाम । सकळ पातका करी भस्म । देवी देखिला पुरुषोत्तम । विश्रामधाम जगाचें ॥४८॥
ठाणठकारें अतिउत्तम । सुरनरांमाजी मनोरम । डोळ्यां जाहला विश्राम । मेघश्याम देखोनी ॥४९॥
मुकुटकुंडलें मेखला । कांसे कसिला सोनसळा । कंठी रुळे वनमाळा । घनसांवळा शोभतु ॥५०॥
लावण्यगुणनिधान । अवतारमाळे मुख्य रत्न । देवी देखिला श्रीकृष्ण । निवासस्थान द्वारका ॥५१॥
॥ पुंडलिकवरदा हरी विठ्ठल श्रीज्ञानदेव तुकाराम ॥
श्रीतुकाराम महाराजांची गाथा
अभंग क्र. ९७३ ते ९८९
बहुतांच्या भाग्ये लागलें जहाज । येथे आतां काज लवलाहो ॥ध्रु॥
अलभ्य तें आलें दारावरी फुका । येथे आतां चुका न पाहिजे ॥३॥
तुका म्हणे जिव्हा श्रवणाच्या द्वारें । माप भरा बरें शिगेवरी ॥४॥
कवतुक डोळां पाहिलें सकळ । नाचवितो काळ जीवांसी तो ॥ध्रु॥
स्वर्गाचिया भोगें सरतां नरक । मागे पुढे एक एक दोन्ही ॥३॥
तुका म्हणे भय उपजलें मना । घेईं नारायणा कडिये मज ॥४॥
केला असतां अंगीकार । न मनी भार समर्थ ॥ध्रु॥
संसाराचा नाहीं पांग । देवें सांग सकळ ॥३॥
तुका म्हणे कीर्ति वाणूं । मध्ये नाणूं संकल्प ॥४॥
ब्रह्म पूर्ण करा ब्रह्म पूर्ण करा । अखंड स्मरा ‘रामराम’ ॥ध्रु॥
मधुर वाणीच्या नका पडों भरी । जाल यमपुरी भोगावया ॥३॥
तुका म्हणे करीं ब्रह्मांड ठेंगणे । हात पसरी जिणे धिग त्याचें ॥४॥
तैसें जाणा ब्रह्मज्ञान । बापुडें तें भक्तीविण ॥ध्रु॥
रुची नेदी अन्न । ज्यांत नसतां लवण॥३॥
अंधळ्याचे श्रम । शिकविल्याचेंचि नाम ॥४॥
तुका म्हणे तारा । नांव तंबुऱ्याच्या सारा ॥५॥
हेचि शूरत्वाचे अंग। हारी आणिला श्रीरंग ॥ध्रु॥
अवघा झाला पण। लवण सकळां कारण ॥३॥
तुका म्हणे पाणी । पातळपणे तळा आणी ॥४॥
तैसें न मनी माझे आतां । गुणदोष पंढरीनाथा! ॥ध्रु॥
गांवामागील वोहोळ । गंगा न मनी अमंगळ ॥३॥
तुका म्हणे माती । केली कस्तुरीने सरती ॥४॥
ऐशी ज्ञानाची डोंबडे । आशा विटंबिली मूढें ॥ध्रु॥
उपदेश तो जगा । आपण सोंवळा इतका मांगा ॥३॥
रसना शिश्नाचेअंकित । तुका म्हणे वरदळ स्फीत ॥४॥
वानप्रस्थ तरी संयोंगी वियोग । संन्यास तो त्याग संकल्पाचा॥२॥
परमहंस तरी जाणे सहज वर्म । तेथें याति धर्म कुळ नाहीं ॥३॥
बोले वर्म जो चाले याविरहित । तो जाणा ‘पतित’ श्रुति बोले ॥४॥
तुका म्हणे कांहीं नाहीं नेमाविण । मोकळा तो शीण दु:ख पावे ॥५॥
आले अयाचित अंगा । सहज ते आम्हां भागा। दाता पांडुरंगा । ऐसा, करितां निश्चिती ॥ध्रु॥
दंड धरिला दंडायमान। मुळी मुंडिलें मुंडण । बंदी बंदाची कौपीन। बहिर-वास औटडें ॥३॥
काळें साधियेला काळ । मन करूनि निश्चळ। लौकिकी विटाळ । धरूनि असों एकांत ॥४॥
कार्यकारणाची चाली। वाचावाच्यत्वें नेमिली । एका नेमें केली । स्वरूपींच वोळखी ॥५॥
नव्हें वेषधारी । तुका आहाच वरिवरि । आहे तैसीं बरी । खंडें निवडी वेदांची ॥६॥
कोठेही चित्तासी नसावें बंधन । हृदयीं नारायण सांठवावा ॥ध्रु॥
नये बोलों फार बैसों जना-मधीं । सावधान बुद्धि इंद्रियदमीं ॥३॥
तुका म्हणे घडी घडीने साधावी। त्रिगुणांची गोवी उगवूनि ॥४॥
मना अंगीं पुण्य पाप । शुभ उत्तम संकल्प ॥ध्रु॥
बीजाऐसी फळे । उत्तम कां अमंगळे ॥३॥
तुका म्हणे चित्त । शुद्ध करावें हें हित ॥४॥
धन्य तो जगीं धन्य तो जगीं । ब्रह्म तया अंगीं वसतसे ॥ध्रु॥
न धोवी तोंड न करी अंघोळी । जपे सदाकाळी ‘राम राम’ ॥३॥
जप तप ध्यान नेणे योग युक्ती । कृपाळु जो भूती दयावंत ॥४॥
तुका म्हणे होय जाणोनि नेणता । आवडे अनंता जीवाहूनि ॥५॥
खोबरियाची वाटी झाले असे मुख । गळतसे नाक श्लेष्मपुरी ॥२॥
बोलों जातां शब्द नयेचि हा नीट । गडगडी कंठ कफ भारी ॥३॥
शेजारी म्हणती ‘मरेना का मेला । आणिला कांटाळा येणे आम्हां’ ॥४॥
तुका म्हणे आतां सांडूनि सर्व काम । स्मरा ‘राम राम’ क्षणक्षणा ॥५॥
विटी दांडू, चेंडू, लगोऱ्या, वाघोडीं, । चंपे, पेंडघडी, एकीबेकी, ॥२॥
हमामा, हुंबरी, पकव्याच्या बारे, । खेळे जंगी भोंवरे, चुंबाचुंबी ॥३॥
सेलडेरा आणि निसर भोवंडी । उचली बाळे धोंडी अंगबळें ॥४॥
तुका म्हणे ऐसे बाळपण गेलें । मग तारुण्य आलें गर्वमूळ ॥५॥
अठोनि वेठोनि बांधला मुंडासा । फिरतसे म्हैसा जनामधीं ॥२॥
हातीं दीडपान वरती करी मान । नाहीं तो सन्मान भलियांसी ॥३॥
श्वानाचिया परी हिंडे दारोदारी । पाहे परनारी पापदृष्टी ॥४॥
तुका म्हणे ऐसी थोर हानी झाली । करितां टवाळी जन्म गेला ॥५॥
काय मज लोक नेतील परलोका । जातां कोणी एक निवारील? ॥ध्रु॥
न म्हणे कोणासी उत्तम वाईट । सुखें माझी कूट खावो मागे ॥३॥
सर्व माझा भार असे पांडुरंगा । काय माझें जगासवें काज ॥४॥
तुका म्हणे माझें सर्वही साधन । नामसंकीर्तन विठोबाचें ॥५॥
॥ पुंडलिकवरदा हरी विठ्ठल श्रीज्ञानदेव तुकाराम ॥
संपूर्ण वारकरी प्रस्थानत्रयी नित्यनेम पारायण अनुक्रमणिका
ज्यांना प्रत्यक्षात ग्रंथावरून पारायण करायचे आहे त्यांनी खालील लिंकवरून ग्रंथ मागवावे.








रामकृष्णहरी माऊली 🙏