दिवस – ६२. वारकरी प्रस्थानत्रयी नित्यनेम पारायण

अनुक्रमणिका

जे जे ठाय समांस । तेथ आहाच जोडे घाउस । पाठीं एकदोनी घांस । हियाही भरी ॥२३१॥
मग तळवे तळहात शोधी । ऊर्ध्वूचे खंड भेदी । झाडा घे संधी । प्रत्यंगाचा ॥२३२॥
अधोभाग तरी न संडी । परि नखींचेंही सत्त्व काढी । त्वचा धुवूनि, जडी । पांजरेसीं ॥२३३॥
अस्थींचे नळे निरपे । शिरांचे हीर वोरपे । तंव, बाहेरी विरूढी करपे । रोमबीजांची ॥२३४॥
मग, सप्तधातूंच्या सागरीं । ताहानली, घोंट भरी । आणि सवेंचि उन्हाळा करी । खडखडीत ॥२३५॥
नासापुडौनि वारा । जो जातसे अंगुळें बारा । तो गचिये धरूनि, माघारा । आंतु घाली ॥२३६॥
तेथ अध वरौतें आकुंचे । ऊर्ध्व तळौतें खांचे । तया खेवांमाजि चक्राचे । पदर उरती ॥२३७॥
एऱ्हवीं, तरी दोन्ही तेव्हांचि मिळती । परि, कुंडलिनी नावेक दुश्चित्त होती । ते तयांतें म्हणे “परौति । तुम्हीचि कायसीं एथें?”॥२३८॥
आइकें, पार्थिव धातु आघवी । आरोगितां; कांहीं नुरवी । आणि आपांतें तंव ठेवी । पुसोनियां ॥२३९॥
ऐसी दोनी भूतें खाये । ते वेळीं संपूर्ण धाये । मग सौम्य होऊनि राहे । सुषुम्नेपासीं ॥२४०॥
तेथ तृप्तीचेनि संतोषें । गरळ जें वमी मुखें । तेणें तियेचेनि पीयूषें । प्राणु जिये ॥२४१॥
तो अग्नि, आंतूनि निघे । परि, सबाह्य निववूंचि लागे । ते वेळीं कसु बांधिती आंगें । सांडिला, पुढती ॥२४२॥
मार्ग मोडिती नाडीचे । नवविधपण वायूचें- । जाय; म्हणौनि शरीराचे । धर्मु नाहीं ॥२४३॥
इडा पिंगळा एकवटती । गांठी तिन्ही सुटती । साही पदर फुटती । चक्रांचे हे ॥२४४॥
मग शशी आणि भानु । ऐसा कल्पिजे जो अनुमानु । तो, वातीवरी, पवनु । गिंगसितां; न दिसे ॥२४५॥
बुद्धीची पुळिका विरे । परिमळु घ्राणीं उरे । तोहि शक्तीसवें संचरे । मध्यमेमाजीं ॥२४६॥
तंव वरीलेकडौनि ढाळें । चंद्रामृताचें तळें । कानवडोनि, मिळे । शक्तिमुखीं ॥२४७॥
तेणें नाळकें रस भरे । तो सर्वांगामाजीं संचरे । जेंथींचा तेथ मुरे । प्राण-पवनु ॥२४८॥
तातलिये मुसें । मेण निघोनि जाय जैसें । मग, कोंदली राहे रसें । वोतलेनी ॥२४९॥
तैसें पिंडाचेनि आकारें । ते कळाचि कां अवतरे । वरी त्वचेचेनि पदरें । पांघुरली असे ॥२५०॥

द्वारकावर्णन (५२ ते ५४)

तस्यां विभ्राजमानायां समृद्धायां महर्द्धिभिः । व्यचक्षतावितृप्ताक्षाः कृष्णमद्भुतदर्शनम् ॥५॥
(त्या ऋद्धिसिद्ध्यादी सर्व प्रकारच्या ऐश्वर्यांनी भरलेल्या सुसंपन्न अशा द्वारकानगरीत ज्याला कितीही पाहिले तरी तृप्ती होत नाही अशा अभूतपूर्व सुंदर कृष्णाला ते देवादिक पाहातच राहिले. ॥५॥)
कृष्णें अधिष्ठिली पुरी । कनककळसांचिया हारी । रत्ने जडिली नाना कुसरीं । तेज अंबरी न समाये ॥५२॥
जे द्वारकेभीतरीं । कामधेनु घरोघरीं । कल्पद्रुमांचिया हारी । खेळणी द्वारी चिंतामणींची ॥५३॥
द्वारकाजननिवासियांसी । घरी नवरत्नांचिया राशी । ऋद्धिसिद्धि करूनि दासी । हृषीकेशी नांदतु ॥५४॥

कृष्णदर्शनाचे औत्सुक्य (५५ ते ६२)

कृष्णरूपाचिया लालसे । डोळ्यां तेणें लाविलें पिसें । आवडी जाहले मोरपिसें । अतिडोळसें हरिअंगीं ॥५५॥
कैसी बरवेपणाची शोभा । पाहतां नयनीं निघती जिभा । रसाळपणे तो वालभा । उपनिषद्‌गाभा साकारला ॥५६॥
कृष्ण पहावया आवडी । होताहे देवांसी वरपडी । डोळ्यां थोर लागली गोडी । अर्ध घडी न विसंबती ॥५७॥
कृष्णरूपाचे कवतुक । पाहतां नयनां लागली भूक । अंतरी निबिड दाटलें सुख । तरी अधिकाधिक भुकेले ॥५८॥
अवलोकितां श्रीकृष्णासी । दृष्टीसी दाटणी होतसे कैशी । मुंडपघसणी न्याहारासी । हृषीकेशी पहावया ॥५९॥
मागे पुढे श्रीकृष्णासी । देखणेनि वेढिलें चौपाशीं । भाग्य उपजलें डोळ्यांसी । पूर्णपुरुषासी देखती ॥६०॥
श्रीकृष्ण घनमेघ सांवळा । निजात्मभावे पाहतां डोळां । सहजें श्यामता आली बुबुळा । कृष्णकळा ठसावली ॥६१॥
जो न कळेचि वेदविवंचना । योगियांच्या न ये ध्याना । त्या प्रत्यक्ष देखोनि कृष्णा । भाग्यगणना अपूर्व ॥६२॥

कृष्णावर देव पुष्पवृष्टी करतात (६३ ते ६५)

ऐसा देखोनियां श्रीहरी । देव सुमनांच्या शतधारीं । बहु वरुषले पैं अंबरीं । राहोनि वरी विमानीं ॥६३॥
स्वर्गोद्यानोपगैर्माल्यैश्छादयन्तो यदूत्तमम् । गीर्भिश्चित्रपदार्थाभिस्तुष्टुवुर्जगदीश्वरम् ॥६॥
(स्वर्गातल्या पुष्पवाटिकेमध्ये मिळणाऱ्या दिव्य पुष्पांनी यदुनायकाला त्यांनी जणू माखून टाकले, आणि कर्णमधुर व गुणवर्णन करणाऱ्या स्तोत्रांनी त्या त्रिभुवनेश्वराला संतोषित केले. ॥६॥)
मांदार पारिजात संतान । कल्पद्रुम हरिचंदन । ऐशिया वृक्षांची सुमनें जाण । कृष्णावरी संपूर्ण वरुषले ॥६४॥
श्रीकृष्णासी चहूंकडां । दिव्य सुमनांचा जाहला सडा । समस्त देवी सन्मुख पुढां । केला पैं गाढा जयजयकारु ॥६५॥

मुमुक्षूंची चरणचिंतनभक्ती (६६ ते ७०)

सार्थ पदबंधरचना । नाना गद्यपद्यविवंचना । स्तवूं आदरिलें यदुनंदना । अमरसेना मिळोनी ॥६६ ॥
देवा ऊचुः- नताः स्म ते नाथ पदारविन्दं बुद्धीन्द्रियप्राणमनोवचोभिः ।
यश्चिन्त्यतेऽन्तर्हृदि भावयुक्तैर्मुमुक्षुभिः कर्ममयोरुपाशात् ॥७॥
(देव म्हणाले -हे प्रभो, कर्माच्या बळकट पाशांपासून सुटका करून घेण्याची इच्छा करणारे तुझे भक्त आपल्या अंत:करणांत ज्या तुझ्या पदकमलाचे ध्यान करितात, त्या तुझ्या पदकमलाला बुद्धी, इंद्रिय, प्राण, मन, वाणी इत्यादी सर्व अंगोपांगांसह आम्ही वंदन करीत आहोत. ॥७॥)
विवेकयुक्त प्राणधारणा । मनसा वाचा कर्मणा । नमस्कारु तुझिया चरणां । सच्चिद्घना श्रीकृष्णा ॥६७॥
इंद्रियउपरमालागीं जाणा । सांडूनि विषयवासना । दश इंद्रियीं लागलों चरणां । नमन श्रीकृष्णा निजभावें ॥६८॥
विषयीं होऊनियां उदास । सांडोनि संसाराची आस । चरण चिंतिती तापस । कर्मपाश छेदावया ॥६९॥
ऐसे मुक्तीचिया वासना । मुमुक्षु चिंतिती चरणां । त्यांसी अर्ध क्षण न येसी ध्याना । दृढ भावना करिताही ॥७० ॥

देवांनी केलेली श्रीकृष्णस्तुती (७१ ते ८४)

ते प्रत्यक्ष तुझे चरण । आम्हांसी झालें जी दरुषण । देव आपुल्या भाग्या आपण । अतिस्तवन करिताति ॥७१॥
देखूनि सगुण स्वरूपासी । एवढी श्लाघ्यता कां म्हणसी । जें आलें आकारासी । तें निश्चयेंसी मायिक ॥७२ ॥
जैसे तुम्ही शरीरधारी । तैसाच मीही एकु शरीरी । त्या माझेनि दर्शनेकरीं । तुम्ही कैशापरी तराल ॥७३॥
ऐसें न म्हणा जी अनंता । तूं मायेचा नियंता । हेही कळलें असे तत्त्वतां । समूळ कथा परियेसीं ॥७४ ॥
त्वं मायया त्रिगुणयाऽऽत्मनि दुर्विभाव्यं व्यक्तं सृजस्यवसि लुम्पसि तद्‌गुणस्थः ।
नैतैर्भवानजित कर्मभिरज्यते वै यत्स्वे सुखेऽव्यवहितेऽभिरतोऽनवद्यः ॥८॥
((तुझ्या पदकमलाचेच ध्यान का? ते सांगतात.) तू त्रिगुणात्मक (सत्त्व-रज-तमादी) मायेने आपल्या स्वरूपामध्ये सामावलेले परंतु बुद्धीला आकलन न झाल्यामुळे अव्यक्त असणारे विश्व दृश्यरूपात (स्पष्टपणे) उत्पन्न करतोस (आपल्या ठिकाणी सामावून घेतोस), संरक्षितोस व संहारितोस. हे अजिंक्य प्रभो, त्रिगुणांमध्ये राहूनही तुला त्रिगुणांपासून उत्पन्न झालेल्या जन्मादी कर्मांचा लेप होत नाही. (तू नियामकत्वाने राहतोस.) खरोखर तू अजिंक्य आहेस. स्वतः प्रकाशरूप असून स्वतःच्या स्वरूपसुखामध्ये तू रमलेला असतोस, म्हणून कोणत्याही प्रकारचे दुःख उत्पन्न करणारे दोष तुझ्या ठिकाणी संभवत नाहीत. ॥८॥)
झोप लागल्या झोप न दिसे पाहीं । जागें जाहल्या दिसतचि नाहीं । तैसी माया अतर्क्य देहीं । न पडे ठायीं सुरनरां ॥७५॥
मूळीच तुझी अतर्क्य माया । तिसी गुणक्षोभु जाहला साह्या । ते ब्रह्मादिकां न येचि आया । देवराया श्रीकृष्णा ॥७६॥
तूं धरोनि दैवीमायेसी । ब्रह्मादिकांते सृजिसी । प्रतिपाळोनि संहारिसी । तूं त्या कर्मासी अलिप्त ॥७७॥
स्वप्नीं स्वयें सृष्टि सृजिली । प्रतिपाळूनि संहारिली । ते क्रिया कर्त्यासी नाही लागली । तेवी सृष्टि केली त्वां अलिप्तत्त्वे ॥७८॥
मृगजळाची भरणी । सूर्य करी निजकिरणीं । शोषूनि ने अस्तमानीं । अलिप्तपणीं तैसा तूं ॥७९ ॥
समूळ धर्माची वाढी मोडे । अधर्माची शीग चढे । तैं तुज अवतार धरणे घडे । आमुचे सांकडे फेडावया ॥८० ॥
करोनि अधर्माचा घातु । धर्म वाढविशी यथास्थितु । देवांसी निजपदीं स्थापितु । कर्मातीतु तूं श्रीकृष्णु ॥८१ ॥
तुज अखंडदंडायमान । आत्मसुखाचें अनुसंधान । तें आम्हांसी नाहीं अर्ध क्षण । दीनवदन यालागीं ॥८२ ॥
ज्यासी आत्मसुख निरंतर । तो देहधारी परी अवतार । त्याचे चरण पवित्रकर । गंगासागर आदि तीर्थासी ॥८३॥
तो जरी वर्ते गुणांआंतु । तरी तो जाणावा गुणातीतु । त्याचा चरणरेणु करी घातु । त्रैलोक्यांतु महापापां ॥८४ ॥

भक्तीचा महिमा-श्रवणभक्ती (८५ ते १०९)

ऐशी तुझ्या दासांची कथा । त्या तुझे चरण वंदूं माथा । असो चरणांची हे कथा । कीर्ति ऐकतां निजलाभु ॥८५॥
चरण देखती ते भाग्याचे । त्यांचे महिमान न वर्णवे वाचे । पवित्रपण तुझिये कीर्तीचें । परिस साचें स्वामिया ॥८६॥
अग्निशिखा समसमानीं । इंधन घालितां वाढे अग्नी । आशा वाढे देहाभिमानीं । श्रवणकीर्तनी ते त्यागवी ॥८७॥
शुद्धिर्नृणां न तु तथेड्य दुराशयानां विद्याश्रुताध्ययनदानतपःक्रियाभिः ।
सत्त्वात्मनामृषभ ते यशसि प्रवृद्धसच्छ्रद्धया श्रवणसंभृतया यथा स्यात् ॥९॥
(हे सर्व लोकांना पूज्य अशा श्रेष्ठ पुरुषोत्तमा, वारंवार तुझ्या लीलांचे श्रवण व चिंतन करून तुझ्या ठिकाणीच केलेल्या सत्त्वप्रधान भक्तीच्या योगाने सात्त्विक भक्तांना जसे समाधान व आंतरिक शांती प्राप्त होते. तसे समाधान व मानसिक शुद्धी पदार्थांच्या वासनेने ज्यांची अंत:करणे दूषित झाली आहेत अशांना वेदांतज्ञान, ग्रंथश्रवण, अध्ययन, द्रव्यादिकांचे दान, शारीरिक तप, मानसिक तप इत्यादी कर्मांनी होत नाही. (तात्पर्य – तुझे गुणच अधिक फलदायी आहेत.) ॥९॥)
कृष्णस्तवनें स्तविता तरे । श्रवणद्वारे ऐकतां उद्धरे । यालागीं स्तव्य तूंचि निधारें । स्तवनद्वारें तारकु ॥८८॥
एवं तुझे कीतीचे श्रवण । तेंचि परम शुद्धीसी कारण । यावेगळे जे साधन । तें केवळ जाण प्रयास ॥८९ ॥
ऐकें गा सुरवरिष्ठा । तुझिया श्रवणाची उत्कंठा । अंतरीं पापाचा मळकटा । धुवोनि चोखटा करी वृत्ती ॥९०॥

९९०.काळाचिये सत्ता ते नाहीं घटिका । पंढरीनायका आठवितां ॥१॥
सदा काळ गणना करी आयुष्याची । कथेचे वेळेची आज्ञा नाहीं ॥ध्रु॥
याकारणे माझ्या विठोबाची कीर्ति । आहे हे त्रिजगतीं थोर वाड ॥३॥
तुका म्हणे जन्मा आलियाचे फळ । स्मरावा गोपाळ तेंचि खरें ॥४॥
९९१.घरोघरीं झालें कवि । नेणे प्रसादाची चवी ॥१॥
लंडा भूषणांची चाड । पुढें न विचारी नाड ॥ध्रु॥
काढावे आइतें । तेंचि जोडावें स्वहितें ॥३॥
तुका म्हणे कळे । अहाच झांकतील डोळे ॥४॥
९९२.नये पाहों मुख मात्रागमन्याचें । तैसें अभक्ताचें गुरुपुत्रा ॥१॥
म्हणऊनि बरें धरितां एकांत । तेणे नव्हें घात भजनासी ॥ध्रु॥
नये होऊं कदा निंदकाची भेटी । जया द्वैत पोटीं चांडाळाच्या ॥३॥
तुका म्हणे नका बोलों त्यासी गोष्टी । जयाचिया दृष्टी पाप वाढे ॥४॥
९९३.जैसी तैसीं तरी । शरणागते तुझीं हरी! ॥१॥
आतां न पाहिजे केलें । ब्रीद लटिकें आपुलें ॥ध्रु॥
शुद्ध नाही चित्त । परि म्हणवितों भक्त ॥३॥
मज कोण पुसे रंका । नाम सांगे तुझें तुका ॥४॥
९९४.नाशिवंत देह नासेल हा जाणा । कां रे उच्चाराना वाचे नाम? ॥१॥
नामेंचि तारिले कोट्यान हे कोटी । नामें हे वैकुंठीं बैसविले ॥ध्रु॥
नामापरतें सार नाहीं त्रिभुवनीं । तें कां तुम्हीं मनीं आठवाना? ॥३॥
तुका म्हणे नाम वेदांसी आगळे । तें दिलें गोपाळें फुकासाठीं ॥४॥
९९५.आळविती बाळें । माते तें सुख आगळे ॥१॥
द्यावें आवडी भातुकें। पाहे निवे कवतुकें ॥ध्रु॥
लेववूनि अळंकार । दृष्टी करावी सादर ॥३॥
आपुलिये पदीं । बैसवूनि, कोडें वंदी ॥४॥
नेदी लागों दिठी। उचलोनि लावी कंठीं ॥५॥
तुका म्हणे लाभा-। वरी घ्या वो पद्मनाभा ॥६॥
९९६.तप तीर्थ दान व्रत आचरण । गातां हरिगुण वारूं नये ॥१॥
कोटि कुळे त्याची वाटुली पाहाती । त्या तया घडती ब्रह्महत्या ॥ध्रु॥
आपुलिया पापें न सुटे सायासें । कोणा काळे ऐसे निस्तरेल? ॥३॥
व्हावें साह्य तया न घालावें भय । फुकासाठी पाहें लाभ, घात ॥४॥
तुका म्हणे हित माना या वचना । सुख दु:ख जाणा साधे फुका ॥५॥
९९७.देवासाठी जाणा तयासीच आटी । असेल ज्या गांठी पुण्यराशी ॥ध्रु॥
निर्बळा पाठवी बळें वाराणसी । मेला, आला त्यासी अर्धपुण्य ॥२॥
कथे निद्राभंग करावा भोजनीं । तया सुखा धणी पार नाहीं ॥३॥
यागी ऋण घ्यावे द्यावें सुख लाहीं । बुडतां चिंता नाहीं उभयतां ॥४॥
तुका म्हणे वर्म जाणोनि करावें । एक न घालावें एकावरी ॥५॥
९९८.अग्नीमाजीं पडे धातु । लीन होऊनि राहे आंतु । होय शुद्ध, न पावे घातु । पटतंतुप्रमाणे ॥१॥
बाह्यरंगाचे कारण । मिथ्या अवघेचि भूषण । गर्व ताठा हे अज्ञान । मरण सवें वाहातसे ॥ध्रु॥
पुरे मातलिया नदी । लव्हाळा नांदे जीवनसंधी । वृक्ष उन्मळोनि भेदी। परि तो कधीं भंगेना ॥३॥
हस्ती परदळ जो भंगी। तया पायीं न मरे मुंगी । कोण जाय संगीं । पाणोवाणी तयाच्या ॥४॥
पिटितां घणे वरि सैरा । तया पोटीं राहे हिरा । तैशा काय तगती गारा । तया थोरा होऊनि ॥५॥
लीन दीन हेंचि सार । भव उतरावया पार । बुडे माथां भार । तुका म्हणे वाहोनि ॥६॥
९९९.आम्ही वीर झुंजार । करूं जमदाढे मार । थापटिले भार । मोड झाला दोषांचा ॥१॥
झाला हाहाकार । आले अंकित झुंझार । शंख चक्राचे शृंगार । कंठी हार तुळसीचे ॥ध्रु॥
रामनामांकित बाण । गोपी लाविला चंदन । झळकती निशाण । गरुडटके पताका ॥३॥
तुका म्हणे काळ । झालों जिंकोनि निश्चळ । पावला सकळ । भोग आम्हां आमुचा ॥४॥
१०००.आशाबद्ध तो जगाचा दास । पूज्य तो उदास सर्वजना ॥१॥
आहे ते अधीन आपुलें हातीं । आणिकां ठेविती काय बोल? ॥ध्रु॥
जाणतिया पाठी लागला उपाध । नेणता तो सिद्ध भोजनासी ॥३॥
तुका म्हणे भय बांधलें गांठीं । चोर लागे पाठी दुम तया ॥४॥
१००१.आणिकांसी तारी ऐसा नाहीं कोणी । धड ते नासोनि भलता टाकी ॥ध्रु॥
सोने शुद्ध होतें अविट तें घरीं । नासिलें सोनारी अळंकारी॥२॥
ओल, शुद्ध काळी, काळे जिरें बीज। कैंचें लागे निज हाता तेथें? ॥३॥
एक गहू करिती अनेक प्रकार । सांजा दिवशी क्षीर घुगरिया ॥४॥
तुका म्हणे विषा रुचि एका हातीं । पाधानी नासिती नवनीत ॥५॥
१००२.वाटे या जनाचे थोर बा आश्चर्य । न करिती विचार कां हिताचा? ॥१॥
कोण दम ऐसा आहे यांचे पोटीं । येईल शेवटी कोण कामा? ॥ध्रु॥
काय मानुनियां राहिले निश्चिंती । काय जाब देती यमदूतां ॥३॥
कां ही विसरलीं मरण बापुडीं । काय यांसी गोडी लागलीसे? ॥४॥
काय हातीं नाहीं करील तयासी । काय झाले यांसी काय जाणों ॥५॥
कां ही नाठविती देवकीनंदना । सुटाया बंधनापासूनियां ॥६॥
काय मोल यासी लागे धन वित्त? । का हे यांचे चित्त घेत नाहीं ॥७॥
तुका म्हणे का ही भोगितील खाणी । कां त्या चक्रपाणि विसरलीं? ॥८॥
१००३.काय एकां झालें, तें कां नाही ठावें ? । काय हे सांगावे काय म्हूण॥१॥
देखतील डोळां आइकतील कानीं । बोलिलें पुराणी तेंही ठावें ॥ध्रु॥
‘काय हे शरीर साच की जाणार’ । सकळ विचार जाणती हा ॥३॥
कां हे कळों नये आपले आपणा । बाळत्व तारुण्य वृद्धदशा ॥४॥
कां हे आवडलें प्रिया पुत्र धन? । काय कामा कोण कोणा आले? ॥५॥
का हे जन्म वायां घातले उत्तम? । कां हे ‘राम राम’ न म्हणती? ॥६॥
काय भुली यांसी पडली जाणतां । देखती मरतां आणिकांसी ॥७॥
काय करिती हे बांधलिया काळें। तुका म्हणे बळे वज्रपाशीं ॥८॥

संपूर्ण वारकरी प्रस्थानत्रयी नित्यनेम पारायण अनुक्रमणिका


ग्रंथ

1 thought on “दिवस – ६२. वारकरी प्रस्थानत्रयी नित्यनेम पारायण”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Page Reader Press Enter to Read Page Content Out LoudPress Enter to Pause or Restart Reading Page Content Out LoudPress Enter to Stop Reading Page Content Out LoudScreen Reader Support
error: Content is protected !!
Scroll to Top