
अनुक्रमणिका
- श्रीज्ञानेश्वरी नित्यनेम पारायण क्रमश: नित्यनेम पारायण अध्याय – ६. ओवी क्र. २७१ ते २९२
- श्रीएकनाथी भागवत क्रमश: नित्यनेम पारायण अध्याय – ६, ओवी क्र. १५० ते १९७
- चरणपूजा (१५० ते १६५)
- कृष्णाचे सर्वनियंतृत्व (१६६ ते १७३)
- जगाचा उत्पत्ति-स्थिति-संहारकर्ता कृष्ण (१७४ ते १९७)
- श्रीतुकाराम महाराजांची गाथाअभंग क्र. १०२२ ते १०३८
- ग्रंथ
या कुन्देन्दुतुषारहारधवला या शुभ्रवस्त्रावृता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना ।
या ब्रह्माच्युतशङ्करप्रभृतिभिर्देवै: सदा वन्दिता सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापहा ॥
जयांचे केलिया स्मरण । होय सकळ विद्यांचे अधिकरण । तेचि वंदूं श्रीचरण । श्रीगुरूंचे ॥१॥
ते नमस्कारोनि आता ॥
श्रीगणेशाय नमः । श्रीसरस्वत्यै नमः । श्रीविठ्ठलाय नमः ।
श्रीमातापितृभ्यां नमः । श्रीगुरुभ्यो नमः ॥
ॐ नमो भगवते वासुदेवाय ।
रामकृष्णहरि । रामकृष्णहरि । रामकृष्णहरि ॥
श्रीज्ञानेश्वरी नित्यनेम पारायण
क्रमश: नित्यनेम पारायण
अध्याय – ६. ओवी क्र. २७१ ते २९२
आइके, प्राणाचा हातु धरूनी । गगनाची पाउटी करूनी । मध्यमेचेनि दादराहुनि । हृदया आली ॥२७१॥
ते कुंडलिनी जगदंबा । जे चैतन्य-चक्रवर्तीची शोभा । जया विश्वबीजाचिया कोंभा । साउली केली ॥२७२॥
जे शून्यलिंगाची पिंडी । जे परमात्मया शिवाची करंडी । जे प्रणवाची उघडी । जन्मभूमी ॥२७३॥
हें असो, ते कुंडलिनी बाळी । हृदयाआंतु आली । तंव अनुहताची बोली । चावळे ते ॥२७४॥
शक्तीचिया आंगा लागलें । बुद्धीचें चैतन्य होतें जाहलें । तें तेणें ऐकिलें । आळुमाळु ॥२७५॥
घोषाच्या कुंडीं । नादचित्रांचीं रूपडीं । प्रणवाचिया मोडी । रेखिलीं ऐसीं ॥२७६॥
हेंचि कल्पावें तरी जाणिजे । परि कल्पितें कैंचें आणिजे । तरी नेणों काय गाजे । तिये ठायीं ॥२७७॥
विसरोनि गेलों, अर्जुना । जंव नाशु नाहीं पवना । तंव वाचा आथी गगना । म्हणौनि घुमे ॥२७८॥
तया अनाहताचेनि मेघें। आकाश दुमदुमों लागे । तंव ब्रह्मस्थानींचें बेगें । सहज फिटे ॥२७९॥
[Image of Anahata Chakra symbol]
आइके, कमळगर्भाकारें । जें महदाकाश दुसरें । जेथ चैतन्यें आधातुरे । होऊनि असिजे ॥२८०॥
तया हृदयाच्या परिद्वरी । कुंडलिनिया परमेश्वरी । तेजाची शिदोरी । विनियोजिली ॥२८१॥
बुद्धीचेनि शाकें। हातबोणें निकें । द्वैत तेथ न देखे । तैसें केलें ॥२८२॥
निजकांती हारविली । मग प्राणुचि केवळ जाहली । ते वेळीं कैसी गमली? । म्हणावीं पां?॥२८३॥
हो कां, जे पवनाची पुतळी । पांघुरली होती सोनसळी । ते फेडूनियां वेगळी । ठेविली तिया ॥२८४॥
नातरी, वायुचेनि आंगें झगटली । दीपाची दिठी निवटली । कां, लखलखोनि हारपली । वीजू गगनीं ॥२८५॥
तैसी हृदयकमळवेऱ्ही । दिसे जैसी सोनियाची सरी । नातरी, प्रकाशजळाची झरी । वाहत आली ॥२८६॥
मग ते हृदयभूमी पोकळे । जिराली कां एके वेळे । तैसें शक्तीचें रूप मावळे । शक्तीचिमाजीं ॥२८७॥
तेव्हां तरी, शक्तीचि म्हणिजे । एऱ्हवीं, तो प्राणु केवळ जाणिजे । आतां, नाद बिंदु नेणिजे । कळा ज्योती ॥२८८॥
मनाचा हन मारु । कां, पवनाचा आधारु । ध्यानाचा आदरु । नाहीं परि ॥२८९॥
हे कल्पना घे सांडी । तें नाहीं इये परवडी । हे महाभूतांची फुडी । आटणी! देखां ॥२९०॥
पिंडें पिंडाचा ग्रासु । तो हा नाथसंकेतींचा दंशु । परि दाऊनि गेला उद्देशु । श्रीमहाविष्णु ॥२९१॥
तया ध्वनिताचें केणें सोडुनि । यथार्थाची घडी झाडुनि । उपलविली, म्यां; जाणुनि । ग्राहीक श्रोते ॥२९२॥
॥ पुंडलिकवरदा हरी विठ्ठल श्रीज्ञानदेव तुकाराम ॥
श्रीएकनाथी भागवत
क्रमश: नित्यनेम पारायण
अध्याय – ६, ओवी क्र. १५० ते १९७
श्रीगणेशाय नमः ॥ श्रीसरस्वत्यै नमः ॥ श्रीगुरुभ्यो नमः ॥ श्रीदत्तात्रेयाय नमः ॥ श्रीरुक्मिणीपाण्डुरङ्गाभ्यां नमः ॥
चरणपूजा (१५० ते १६५)
ऐशी भक्तांची पूजा । तुज आवडे गरुडध्वजा । सुप्रणीत भावो वोजा । चरणी तुझ्या अर्पिल्या ॥१५१॥
तो चरणधूमकेतु तुझा । आमुच्या पापांतें नाशू वोजा । पुनः पुनः गरुडध्वजा । पापसमाजा निर्दळू ॥१५२॥
करितां चरणांचे वर्णन । न धाये देवांचे मन । पुढतपुढती चरणस्तवन । ध्वजलक्षण वर्णिती ॥१५३॥
स्वर्गाय साधुषु खलेष्वितराय भूमन् पादः पुनातु भगवन् भजतामघं नः ॥१३॥
(हे चराचरव्यापका देवा, वामनावतारी आपण आपल्या तीन पावलांनी त्रैलोक्य व्यापून (सत्यलोकापर्यंत जाऊन) ध्वज उभविला. त्रैलोक्यात आपल्या तीन स्रोतांनी पापनाश करीत संचार करणारी गंगा ही आपल्या चरणांची पताकाच आहे. देव व असुर या उभय सैन्यांस अनुक्रमे अभय आणि भय उत्पन्न करणारा, सज्जन लोकांना स्वर्गप्राप्ती करून देणारा आणि दुर्जनांना नरकात ढकलणारा असा हा तुझा दिव्य चरण आम्हा भक्तांचे पाप नाहीसे करून आम्हांस पावन करो. ॥१३ ॥)
चरणु वाढला सर्वांवरी । तो ‘केतु’ बोलिजे कवीश्वरीं । पताका झळकत कवणेपरी । सुरसरी निजगंगा ॥१५५॥
बलिबंधनी आवेश । चरण उचलिला दुराश । नखें भेदला आवरणकोश । जळ बहुवस चालिलें ॥१५६ ॥
चरणस्पर्शे भगवंता । जाहली जीवनासी पवित्रता । ब्रह्मा कमंडली धरितां । शिवें माथां वाहिली ॥१५७॥
चरणध्वजीं पताका ते गंगा । त्रिवाहिनी त्रिपथगा । चरणशोभा श्रीरंगा । नयनभुंगा उल्हासु ॥१५८ ॥
केतु झळकलिया पाठीं । आसुरी सेनेसी भय उठी । दैवी संपत्तीचे पोटीं । अत्यंत उठी आल्हादु ॥१५९॥
आणिक चरणाची कथा । देवांसी स्वर्गसुखदाता । तोच चरणु अधर्मवंतां । होय तत्त्वतां नरकहेतु ॥१६०॥
एक तरले चरण पूजितां । एक तरले चरण ध्यातां । चरण उपेक्षिती सर्वथा । अधःपाता ते जाती ॥१६१ ॥
चरण वंदिती कां निंदिती । ते निजपदाप्रती जाती । सर्वथा जे उपेक्षिती । अधोगती तयांसी ॥१६२ ॥
चरण वंदितां तरली शिळा । निंदितां उद्धरिलें शिशुपाळा । जे उपेक्षिती चरणकमळा । तयां खळां रौरव ॥१६३॥
ऐकें स्वामिया व्यापका । ऐसा तुझा चरण निका । आमुच्या सकळ पातकां । क्षणार्धे देखा उद्धारु ॥१६४ ॥
जेथ पापाचा जाहला उद्धारु । तेथ सहजचि खुंटला दुराचारु । ऐसा तरावया संसारु । चरण साचारु पैं तुझा ॥१६५॥
कृष्णाचे सर्वनियंतृत्व (१६६ ते १७३)
कालस्य ते प्रकृतिपूरुषयोः परस्य शं नस्तनोतु चरणः पुरुषोत्तमस्य ॥१४॥
(नाकामध्ये वेसण घातली असता बैल जसे ताब्यात राहतात (उच्छृंखल होत नाहीत), त्याप्रमाणे ज्याने ब्रह्मादिक देव देह धारण केल्याने एकमेकांना परस्पर त्रास देणारे असूनसुद्धा आपल्या स्वाधीन ठेवले आहेत (जो त्यांना स्वैर होऊ देत नाही) असा प्रकृतिपुरुषाच्याही पलीकडचा प्रत्यक्ष कालस्वरूपी पुरुषश्रेष्ठ जो तू त्या तुझा चरण आमचे कल्याण करो. ॥१४॥)
तूं काळाचा निजनियंता । काळासी अकाळें न करवे सत्ता । देवांसी अधिकारी स्थापिता । देवनियंता तूं कृष्णा ॥१६७॥
कर्मस्वामी तूं कृष्णनाथा । इंद्रियक्रिया समस्ता । कोणा न करवे अन्यथा । कर्मनियंता श्रीकृष्ण ॥१६८ ॥
ब्रह्मादि शरीरधारी । तुज आधीन गा श्रीहरी । जैसे नाथिले बैल नांगरीं । कृषीवळू धरी स्वामित्वें ॥१६९ ॥
तेथ जो राहे मागे पुढे । तो झोडिजे आसुडें । तुझे आज्ञेवरी रोकडे । वर्तती गाढे कळिकाळादिक ॥१७० ॥
संसारलक्षण शेतासी । अधिकारी जुंपोनि सर्वांसी । निजकर्मे क्षेत्रासी । तूं वाहविसी निजाज्ञा ॥१७१ ॥
रोवोनि अहंकाराची मेढी । महत्तत्त्वांचे खळे झाडी । त्रिगुणदोरें बापुडीं । बांधिशी कडोविकडी जीवपशूतें ॥१७२ ॥
उदोअस्तांचेनि झणत्कारें । देतां निजकर्मांचे फेरे । जो खांदा चुकवोनि वोसरे । तोचि मारें मारिजे ॥१७३॥
जगाचा उत्पत्ति-स्थिति-संहारकर्ता कृष्ण (१७४ ते १९७)
मायेमी तूं अधिष्ठान । यालागीं तूं परम कारण । तुझिये मांडीवरी जाण । क्रीडास्थान प्रकृतिपुरुषां ॥१७५ ॥
तूं मायेहूनि अपारु । प्रकृतिपुरुषांहूनि परु । काळाचा काळ तूं दुर्धरु । सर्वसंहारकर्ता तूं ॥१७६॥
आमुच्या निजसुखा उत्तमा । तुझा चरणविस्तार मेघश्यामा । हेंचि मागों पुरुषोत्तमा । कृपा आम्हांवरी कीजे ॥१७७॥
सोऽयं त्रिणाभिरखिलापचये प्रवृत्तः कालो गभीररय उत्तमपूरुषस्त्वम् ॥१५॥
(या विश्वाच्या उत्पत्ती, स्थिती आणि लय यांना कारण तूच आहेस ; त्याचप्रमाणे प्रकृती, जीव आणि महत्तत्त्व अहंकारादी यांचा नियंता व संहारकर्ताही तूच आहेस. तीन चातुर्मास्यांनी युक्त असलेला हा संवत्सरात्मक काल (वर्ष) तूच असून तुझ्या प्रचंड वेगाने सर्व ब्रह्मांडाचा संहार करण्यास तूच प्रवृत्त झाला आहेस. खरोखर तू पुरुषश्रेष्ठ आहेस. ॥१५॥)
क्षोभलिया तामसी शक्ती । सृष्टीचा प्रळय करी अंतीं । तेथें बीजरूपी अव्यक्तीं । जीव राहती सूक्ष्मत्वें ॥१७९ ॥
मग उत्पत्तीचे काळवेळे । तीच बीजें विरूढती सकळे । पाल्हेजती स्थितिकाळें । पुष्पफळे सफळित ॥१८० ॥
‘हे गुणक्षोभाची अवस्था । तेथ मी नव्हें प्रळयकर्ता’ । ऐसें म्हणसी जरी कृष्णनाथा । तरी हे कथा परियेसीं ॥१८१ ॥
तुझा साचार जाहलिया भावो । माया महत्तत्त्व आणि जीवो । नासोनियां दास पाहा हो । निजपदी निर्वाहो भोगिती ॥१८२॥
त्या तुज सकळ संहारितां । कोण दुर्घटता कृष्णनाथा । कारणेसी प्रळयकर्ता । तूंचि सर्वथा महाकाळु ॥१८३ ॥
कळों नेदिसी संसारस्थिती । अतिसूक्ष्म काळगती । नाश करिसी अंतीं । निजप्रकृतिविकार ॥१८४ ॥
प्रळयासी प्रमाण मूळ । लव निमेष घटिका पळ । अहोरात्र त्रिकाळ । ‘त्रिनाभी’ केवळ जो म्हणिये ॥१८५॥
ऐसिये गंभीर गतीसीं । मायामहत्तत्त्व नाशिसी । तो तूं ‘महाकाळ’ होसी । हृषीकेशी श्रीकृष्णा ॥१८६॥
सोऽयं तयानुगत आत्मन आण्डकोशं हैमं ससर्ज बहिरावरणैरुपेतम् ॥१६॥
((महाप्रळयकाळी अव्यक्तरूपाने भगवान नारायण असतात.) त्या तुझ्यापासून सामर्थ्य घेऊन पुरुष जन्माला आला आणि त्याने महत्तत्त्वाला आपल्या मायेच्या योगाने धारण केले आणि हेच अखिल विश्वाचे बीज होय. हा विश्व प्रसविणारा गर्भच होय. त्यानेच त्याच मायेच्या योगाने आपल्या स्वरूपापासून अनेक आवरणांनी युक्त असा सुवर्णमय ब्रह्मांडकोश उत्पन्न केला. ॥ १६ ॥)
तुझी लाहोनि वीर्यशक्ती । होये पुरुषासी पुरुषत्वप्राप्ती । तेणें अंगीकारूनि प्रकृती । केलें उत्पत्ती गर्भाधान ॥१८८ ॥
तेचि ते वेळी प्रकृती । महत्तत्त्वीं होय गर्भवती । पंचतत्वेंसी गर्भी धरिती । हिरण्यवर्ण अंडातें ॥१८९॥
ते अमोघ वीर्य प्रबळ । गर्भी विश्वाकार बाळ । धरिती जाहली वेल्हाळ । ब्रह्मांड सकळ अंडामाजीं ॥१९०॥
जैसें गर्भासी उल्ब जाण । तैसें अंडासी बहिरावरण । सप्तधा नेमस्त प्रमाण । तूं निर्माण करविता ॥१९१ ॥
पृथ्वी जल अनल अनिल । नभ आणि अहंकार स्थूळ । सातवें तें अतिसबळ । जाण केवळ क्रियासूत्र ॥१९२ ॥
त्या गर्भासी जतनेवरी । तूंचि आंतु आणि बाहेरी । रिघालासी सूत्रधारी । खांबसूत्री जैसा कां ॥१९३॥
ऐसें जग जाहलें दोघांपासूनी । परी तिसरे न देखों कोणी । अवघी सृष्टी दोघीजणीं । दुमदुमुनी भरलीसे ॥१९४॥
वाती लावूनि पाहतां । तिसरें न लगेचि हाता । दुसरी प्रकृती निर्धारितां । तेही सर्वथा टवाळ ॥१९५॥
ऐसा दुजेनवीण एकला । एकलाचि विश्व जाहला । आकळीत कौशल्यकळा । मल्लमर्दना श्रीकृष्णा ॥१९६ ॥
एवं एकलेपणें तूं कर्ता । त्यालागीं लेपु न लगे सर्वथा । कर्म करूनि तूं अकर्ता । तेचि कथा परियेसीं ॥१९७॥
॥ पुंडलिकवरदा हरी विठ्ठल श्रीज्ञानदेव तुकाराम ॥
श्रीतुकाराम महाराजांची गाथा
अभंग क्र. १०२२ ते १०३८
ठेविलिया दिसे रंगा ऐसी शिळा । उपाधि निराळा स्फटिकमणि ॥२॥
नाना भाषामतें आळवितां बाळा । प्रबोध तो मूळा जननीठायीं ॥३॥
तुका म्हणे माझें नमन जाणतिया । लागतसे पायां वेळोवेळां ॥४॥
वाऱ्याहातीं माप चालें सज्जनाचें । कीर्तिमुख त्याचें नारायण ॥ध्रु॥
प्रभा आणि रवि काय असे आन? । उदयीं तंव जन सकळ साक्षी ॥३॥
तुका म्हणे बरा सत्याचा सायास । नवनीता नाश नाहीं पुन्हां ॥४॥
तैसे विष्णुदास नव्हती साबडे । एकाचिया पडे पायां एक ॥ध्रु॥
अक्षरें आणिती अंगासी जाणीव । इच्छा ते गौरव पूज्य व्हावें ॥३॥
तुका म्हणे विधिनिषेधाचे डोहीं । पडले, त्यां नाहीं देव कधीं ॥४॥
निर्भर अंतरी सदा सर्वकाळ । घेतला सकळ भार देवें ॥ध्रु॥
बळिवंत जेणें रचिलें सकळ । आम्हां त्याचे बळ अंकितासी ॥३॥
तुका म्हणे आम्ही देखतचि नाहीं । देवाविण कांहीं दुसरें तें ॥४॥
कासया जीऊन झाला भूमीभार । अनउपकार माते कुशी॥ध्रु॥
निद्रेचा आदर जागरणीं वीट। त्याचे पोटीं कीट कुपथ्याचें ॥३॥
तुका म्हणे दोन्ही बुडविली कुळें । ज्याचे तोंड काळें कथेमाजीं ॥४॥
म्हणोनि बोबड्या उत्तरी। वाचे जपें निरंतरी । नाम तुझें हरी । भव-सागरी तारूं तें ॥ध्रु॥
‘सर्वमय’ ऐसे वेदांचे वचन । श्रुति गर्जती पुराणें । नाहीं आणीक ध्यान । साधनी मज चाड ॥३॥
शेवटी हे ‘ब्रह्मार्पण’ । याचि मंत्राचे कारण। काना मात्रा वायांविण । तुका म्हणे बिंदुली ॥४॥
फावलें फावलें आतां । पायीं संतां विनटलों ॥ध्रु॥
हरिनामाचा शस्त्र घोडा । संसार गाढा छेदिला ॥३॥
हरिनामाचे धनुष्य कांडें । विन्मुख तोंडे कळिकाळ ॥४॥
येणेंचि बळें सरते आम्ही । हरीचे नामें लोकीं तिहीं ॥५॥
तुका म्हणे झालों साचे । श्रीविठ्ठलाचे डिंगर ॥६॥
आरुष हा शब्द देवाचा प्रसाद। करविला वाद तैसा केला ॥ध्रु॥
देहपिंड दान दिला एकसरें। मुळीचें तें खरें टांकसाळ ॥३॥
तुका म्हणे झरा लागला नवनीत । सेविलीया हित पोट धाय ॥४॥
भोग ज्याचे तया अंगीं । भिन्न प्रारब्ध जगीं । विचित्र ये रंगीं । रंगे रंगला गोसावी॥ध्रु॥
देह संकल्पासारिखें। एक एकांसी पारिखें। सुख आणि दु:खें । अंगीं कर्मे त्रिविध ॥३॥
तुका म्हणे कोडें। नकळे तयासी सांकडें। त्याचिया निवाडें । उगवें केलें विंदान॥४॥
चिंतनाचा एक लाहो । तुमच्या अहो विठ्ठला! ॥ध्रु॥
नेत्री जळ वाहो सदां । आनंदाचे रोमांच॥३॥
तुका म्हणे कृपादान । इच्छी मन हे जोडी ॥४॥
डोळा बैसलें बैसलें । ध्यान राहोनि संचलें ॥ध्रु॥
सरसावले मन । केले सोज्वळ लोचन ॥३॥
तुका म्हणे सवें । आतां असिजेत देवें ॥४॥
जेथें तेंच नाहीं झालें । झाडा घेतला विठ्ठलें ॥ध्रु॥
वास वासनेसी नाहीं । मन पांगुळलें पायीं ॥३॥
शेष उरला तुका । जीवीं जीवा झाला चुका ॥४॥
आवश्यक ‘देव मनीं’। चिंतनींच सादर॥ध्रु॥
भिक्षा कामधेनु ऐशी । अवकाशी शयन ॥३॥
पांघरोनि तुका दिशा । केला वास अलक्षीं ॥४॥
माझी मज झाली अनावर वाचा । छंद या नामाचा घेतलासे ॥ध्रु॥
लाभाचिया सोसे पुढे चाली मना । धनाचा कृपणा लोभ जैसा ॥३॥
तुका म्हणे गंगासागरसंगमीं । अवघ्या झाल्या ऊर्मि एकमय ॥४॥
ऐसा मना छंद लावीं रे अभ्यास । जया नाहीं नाश ब्रह्मरसा ॥ध्रु॥
जोडी तरी ऐसी करावी न सरे । पुढे आस उरे मागुतालीं ॥३॥
तुका म्हणे ऐसें धरा कांहीं मनीं । यातायाती खाणी चुकतील ॥४॥
थोडाचि स्फुलिंग बहुत दावाग्नि । वाढतां इंधनीं वाढविला ॥२॥
पितयाने तैसा वंदावा कुमर । जयाचें अंतर देव वसे ॥३॥
तुका म्हणे शिरीं वाहावें खापर-। माजी असे सार नवनीत ॥४॥
देव तया जवळी असे । पाप नासे दर्शनें ॥ध्रु॥
काम-क्रोधा नाहीं चाली । भूती झाली समता ॥३॥
तुका म्हणे भेदाभेद । गेला वाद खंडोनि ॥४॥
॥ पुंडलिकवरदा हरी विठ्ठल श्रीज्ञानदेव तुकाराम ॥
संपूर्ण वारकरी प्रस्थानत्रयी नित्यनेम पारायण अनुक्रमणिका
ज्यांना प्रत्यक्षात ग्रंथावरून पारायण करायचे आहे त्यांनी खालील लिंकवरून ग्रंथ मागवावे.








रामकृष्णहरी माऊली 🙏