दिवस – ६६. वारकरी प्रस्थानत्रयी नित्यनेम पारायण

अनुक्रमणिका

म्हणौनि अक्षरामाजीं सांपडे । कीं कानावरी जोडे । हें तैसें नव्हे फुडें । त्रिशुद्धी गा ॥३१६॥
जैं कहीं दैवें । अनुभविलें फावे । तैं आपणचि हें ठाकावें । होऊनिया ॥३१७॥
पुढती जाणणें तें नाहींचि । म्हणौनि असो किती हेंचि । बोलावें आतां वायांाचि । धनुर्धरा ॥३१८॥
ऐसें शब्दजात माघौतें सरे । तेथ संकल्पाचें आयुष्य पुरे । वाराही जेथ न शिरे । विचाराचा ॥३१९॥
जें उन्मनियेचें लावण्य । जें तुर्येचें तारुण्य । अनादि जें अगण्य । परमतत्त्व ॥३२०॥
जें विश्वाचें मूळ । जें योगद्रुमाचें फळ । जें आनंदाचें केवळ । चैतन्य गा ॥३२१॥
जें आकाराचा प्रांतु । जें मोक्षाचा एकांतु । जेथ आदि आणि अंतु । विरूनि गेले ॥३२२॥
जें महाभूतांचें बीज । जें महातेजाचें तेज । एवं पार्था जें निज- । स्वरूप माझें ॥३२३॥

तें हें चतुर्भुज कोंभावली । जयाची शोभा रूपा आली । देखोनि नास्तिकीं नौकिली । भक्तवृंदें ॥३२४॥
तें अनिर्वाच्य महासुख । पैं आपणचि जाहले जे पुरुष । जयांचे कां निष्कर्ष । प्राप्तीवेऱ्हीं ॥३२५॥
आम्हीं साधन हें जें सांगितलें । तेंचि शरीरीं जिहीं केलें । ते आमुचेनि पाडें आले । निर्वाळलेया ॥३२६॥
परब्रह्माचेनि रसें । देहाकृतीचिये मुसें । ओतींव जाहलें तैसें । दिसती आंगें ॥३२७॥
जरी हे प्रतीति हन अंतरीं फांके । तरी विश्वचि हें अवघें झांके । तंव अर्जुन म्हणे ‘निकें । साचचि जी हें’ ॥३२८॥
कां जें आपण आतां देवो । हा बोलिले जो उपावो । तो प्राप्तीचा ठावो । म्हणोनि घडे ॥३२९॥
इये अभ्यासीं जे दृढ होती । ते भरंवसेनि ब्रह्मत्वा येती । हें सांगतियाची रिती । कळलें मज ॥३३०॥
देवा गोष्टीचि हे ऐकतां । बोधु उपजतोसे चित्ता । मा अनुभवें तल्लीनता । नोहैल केवीं? ॥३३१॥
म्हणौनि येथ कांहीं । अनारिसें नाहीं । परि नावभरी चित्त देईं । बोला एका ॥३३२॥
आतां कृष्णा तुवां सांगितला योगु । तो मना तरी आला चांगु । परि न शके करूं पांगु । योग्यतेचा ॥३३३॥
सहजें आंगिक जेतुलें आहे । तेतुलियाची जरी सिद्धी जाये । तरी हाचि मार्ग सुखोपायें । अभ्यासीन ॥३३४॥
नातरी देवो जैसें सांगतील । तैसें आपणपें जरी न ठकेल । तरी योग्यतेविण होईल । तेंचि पुसों ॥३३५॥
जीवीं चिये ऐसी धारण । म्हणौनि पुसावया जाहलें कारण । मग म्हणे “तरी आपण । चित्त देईजो ॥३३६॥
हां हो जी अवधारिलें । जें हें साधन तुम्हीं निरूपिलें । तें आवडतयाहि अभ्यासिलें । फावों शके ? ॥३३७॥
कीं योग्यतेविण नाहीं । ऐसें हन आहे कांहीं ?” । तेथ श्रीकृष्ण म्हणती “काई । धनुर्धरा ! ॥३३८॥
हें काज कीर निर्वाण । परि आणिकहि जें कांहीं साधारण । तेंहि अधिकाराचे वोडवेविण । काय सिद्धी जाय ? ॥३३९॥
पैं योग्यता जे म्हणिजे । ते प्राप्तीचि अधीन जाणिजे । कां जे योग्य होऊनि कीजे । तें; आरंभिलें फळे ॥३४०॥

यानि ते चरितानीश मनुष्याः साधवः कलौ । श्रृण्वन्तः कीर्तयन्तश्च तरिष्यन्त्यञ्जसा तमः ॥२४॥
(हे जगदीशा, तू द्वापराच्या शेवटी ज्या लीला केल्यास, त्या लीलांचे श्रवण आणि कीर्तन करून साधुलोक कलियुगात सहज तरून जातील. ॥२४॥)
कथाकौतुकें विचित्रे । नाना परींची चरित्रे । परम पावन पवित्रें । येणे अवतारें त्वां केलीं ॥२५१ ॥
कलियुगी साधुजन । या चरित्रांचे श्रवण कीर्तन । करितां तरले जाण । मायामोह त्रिगुणेंसीं ॥२५२॥
यदुवंशेऽवतीर्णस्य भवतः पुरुषोत्तम । शरच्छतं व्यतीयाय पञ्चविंशाधिकं प्रभो ॥२५॥
(हे पुरुषश्रेष्ठा, यादववंशामध्ये अवतार घेऊन तुला एकशे पंचवीस वर्षे होऊन गेली. ॥२५॥)
अवतरल्या यदुवंशीं । पुरुषोत्तमा हृषीकेशी । संख्या या अवतारांसी । जाहली ते तुजपाशी सांगेन ॥२५३॥
मृत्युलोकीं मनुष्यमर्यादा । शत वर्षे जी गोविंदा । ते अतिक्रमोनि आवदा । अधिक मुकुंदा पंचवीस जाहलीं ॥२५४॥
नाधुना तेऽखिलाधार देवकार्यावशेषितम् । कुलं च विप्रशापेन नष्टप्रायमभूदिदम् ॥२६॥
(हे प्रभो, अखिल प्राणिमात्रांचा तूच आधार आहेस. आता देवकार्यापैकी शिल्लक असे काही राहिले नाही. ब्राह्मणांच्या शापाने हे यादवकुल नाश पावल्यासारखेच झालेले आहे. ॥ २६ ॥)
आतां पुढे येथ कांहीं । देवकार्य उरलें नाहीं । यादवकुळ म्हणसी तेंही । नष्टप्राय पाही उरलेंसे ॥२५५॥
उठवणी आले हतिरुं । कां पांख उपडिल्या पांखरूं । तैसा यादवांचा दळभारू । भूमिये भारु उरला असे ॥२५६॥
निवणाचा फुटका डेरा । कां क्षयो लागल्या राजकुमरा । वणवा आहाळल्या अजगरा । यादववीरां ते दशा ॥२५७ ॥
दारुण ब्राह्मणाचा शाप । नाशला वीर्यशौर्यप्रताप । गळाला वाढिवेचा दर्प । केवळ प्रेतरूप दिसताती ॥२५८ ॥
ततः स्वधाम परमं विशस्व यदि मन्यसे । सलोकालोकपालान्नः पाहि वैकुण्ठकिङ्करान् ॥२७॥
(म्हणून तुझे परम श्रेष्ठ जे वैकुंठस्थान त्याप्रत जर तुझी इच्छा असेल तर चलावे आणि चतुर्दश भुवने व त्यांचे अधिपती जे आम्ही वैकुंठदास त्यांचे पालन करावे. ॥ २७ ॥)
यालागीं जी यादवराया । आम्ही वांछू तुझ्या पायां । वेगु कीजे स्वधामा यावया । सुरवर्या श्रीकृष्णा ॥२५९॥
ऐकें देवकीनंदना । जरी मानेल तुझिया मना । तरी निधिजो जी याचि क्षणा । सुरसेना तिष्ठत ॥२६० ॥
सलोक लोकपाळ जे जे । त्यांवरी तुवां कृपा कीजे । आम्ही किंकर गा तुझे । वचन मानिजे दासांचें ॥२६१ ॥
ऐकें जी वैकुंठनाथा । तुझी थोर आम्हां अवस्था । आदिकरूनि उमाकांता । आणि समस्तां देवांसी ॥२६२॥

निजधामास येण्याची देवांची विनंती कृष्ण मान्य करतो (२६३ ते २८०)

श्रीभगवानुवाच- अवधारितमेतन्मे यदात्थ विबुधेश्वर । कृतं वः कार्यमखिलं भूमेर्भारोऽवतारितः ॥२८
(श्रीभगवान म्हणाले -हे सुरश्रेष्ठ ब्रह्मदेवा, तू जे काही बोललास ते मी ऐकले. तुमचे सर्व कार्य मी केले असून भूमीचा सर्व भार मी हलका केला आहे. ॥२८॥)
जो योगज्ञाना मुकुटमणी । मेघगंभीरया वाणी । ब्रह्मयाप्रती चक्रपाणी । हास्यवदनीं बोलिला ॥२६३॥
नादब्रह्म मुसावलें । की निजानंदाचें फळ पिकलें । तैसें श्रीमुखें बोलों आदरिलें । भाग्य उदेलें श्रवणांचें ॥२६४॥
गौरवें म्हणे ‘ब्रह्मदेवा । संतोषलों तुझिया भावा’ । पुत्रस्नेहेंकरूनि तेव्हां । उद्यत खेवा हरि जाला ॥२६५ ॥
आवडी म्हणे विबुधेंद्रा । सत्य तुझी वाङ्मुद्रा । तुझेनि वचनें ब्राह्मणेंद्रा । धराभारा उतरिलें ॥२६६॥

यादवकुळनाशाचा श्रीकृष्णाचा संकल्प (२६७ ते २७४)

सकळ कार्य निःशेख । म्यां संपादिलें देख । तरी उरलें असे एक । थोर अटक मजलागीं ॥२६७॥
तदिदं यादवकुलं वीर्यशौर्यश्रियोद्धतम् । लोकं जिघृक्षद्रुद्धं मे वेलयेव महार्णवः ॥२९॥
यद्यसंहृत्य दृप्तानां यदूनां विपुलं कुलम् । गन्तास्म्यनेन लोकोऽयमुद्वेलेन विनङ्क्ष्यति ॥३०॥
(शक्ती, पराक्रम आणि संपत्ती यांनी हे यादवकुल उन्मत्त झाले असून सर्व त्रैलोक्य जिंकून पादाक्रांत करण्याची हाव धरीत आहे. समुद्राला घातलेली मर्यादा ज्याप्रमाणे त्याच्या विस्ताराला अडविते त्याप्रमाणे ह्या यादवकुलाला मी रोधून ठेवलेले आहे. ॥२९॥ मस्त झालेल्या यादवांच्या विस्तार पावलेल्या कुलाचा नाश न करिता जर मी वैकुंठाला गेलो तर ही पृथ्वी त्यांच्या अन्याय्य अतिक्रमणाने नाश पावेल. ॥३०॥)
हे यादवकुळ येथ । वीर्यशौर्यश्रियोद्धत । धर्म नाशावया उद्यत । अतिदृप्त निजबळें ॥२६८॥
हे छेदूं पाहती धर्ममूळे । म्यां आवरिले असती योगबळे । जेवीं समुद्रातें मर्यादवेळे । असे राखिले नेमूनी ॥२६९ ॥
सांडोनि ऐशियांसी । मज गेलिया निजधामासी । हे प्रवर्ततील अधर्मासी । कोण यांसी वारील ॥२७० ॥
जैसा निर्मर्याद सागरू । खवळल्या सर्वसंहारकरू । त्यासी कोण शकेल आवरूं । तैसा विचारू होईल ॥२७१॥
हे अधर्मपर होतील गाढे । तुम्हांसी पडेल सांकडें । सांगों धांवाल मजपुढे । यांचें रोकडें गाऱ्हाणें ॥२७२ ॥
हे नाटोपती देवां । नाकळती दैत्यां दानवां । हे अधर्म करिती जेव्हां । तुम्हीच मज तेव्हां सांगों याल ॥२७३॥
इदानीं नाश आरब्धः कुलस्य द्विजशापतः । यास्यामि भवनं ब्रह्मन्नेतदन्ते तवानघ ॥३१॥
(आता ब्राह्मणाच्या शापामुळे कुलाचा नाश सुरू झालाच आहे. हे विमल ब्रह्मदेवा, हा नाश पुरता करून नंतर मी (आपल्या स्थानाला जाताना) तुझ्या धामाला येईन. ॥३१॥)
यालागी कुळनाशासी त्वरित । आजिपासोनि सुमुहूर्त । केला असे गा निश्चित । यथोचित यादवां ॥२७४ ॥

निजधामाला जाण्याच्या श्रीकृष्णाच्या आश्वासनाने देवांना आनंद (२७५ ते २८०)

ऐकें सखया प्रजापती । या कुळनाशाचिया अंतीं । तुझिया भुवनावरूनि निश्चितीं । निजधामाप्रती येईन ॥२७५ ॥
ऐसें बोलिला प्रभू । ऐकोनि शंभु स्वयंभू । आनंदला देवकदंबू । समारंभू मांडिला ॥२७६ ॥
जयजयकारु केला सकळीं । परमानंदें पिटिली टाळी । चरण वंदूनि वनमाळी । पुष्पांजळी अर्पिल्या ॥२७७॥
श्रीशुक उवाच – इत्युक्तो लोकनाथेन स्वयंभूः प्रणिपत्य तम् । सह देवगणैर्देवः स्वधाम समपद्यत ॥३२॥
(श्रीशुकाचार्य म्हणाले– याप्रमाणे त्रैलोक्यनाथ बोलल्यानंतर ब्रह्मदेवाने त्याला नमस्कार केला; आणि देवगणांसह तो आपल्या लोकास (ब्रह्मलोकास) निघून गेला. ॥३२॥)
शुक म्हणे परीक्षिती । ऐकोनि कृष्णवदंती । सुरवर आनंदले चित्तीं । आल्हादें करिती अभिवंदनें ॥२७८॥
धाता सविता शूळपाणी । मिळोनियां देवगणीं । कृष्णासी घातल्या लोटांगणीं । चरण वंदूनी निघाले ॥२७९ ॥
एवं वंदूनी श्रीपती । आपुलिया स्थानाप्रती । निघाल्या जी देवपंक्ती । पवनगती विमानें ॥२८०॥

द्वारकेत महोत्पात (२८१ ते २९२)

अथ तस्यां महोत्पातान् द्वारवत्यां समुत्थितान् । विलोक्य भगवानाह यदुवृद्धान् समागतान् ॥ ३३॥
(थोड्याच कालात, द्वारकेमध्ये मोठमोठे अशुभसूचक उत्पात उत्पन्न झालेले पाहून भगवान एकत्र जमलेल्या यादवकुलातील वृद्ध माणसांना म्हणाले ॥३३॥)
कुळनाशु करणे रोकडें । ऐसें कृष्णे नेमिलें धडफुडें । तंव द्वारकेसी येरीकडे । महोत्पात गाढे उठिले ॥२८१॥
गगनीं निघाले त्रिकेतु । धूमकेतु दंडकेतु । शिखेसहित शिखाकेतु । गगनाआंतु उगवले ॥२८२ ॥
माध्यान्हीं वाजला आघात । दिवसा उल्कापात होत । होत भूतें नागवीं नाचत । गगनाआंत रुदती ॥२८३॥
वृक जंबुक नगराआंत । दिवसा चौबारा कुंकात । नगरी भालुवा भुंकत । जन कांपत देखोनी ॥२८४॥
नगरा आंतुबाहेरी । श्वानांची रडणी भारी । मार्जारकलहो नगरीं । घरोघरी होतसे ॥२८५॥
गाई आरडती मध्यरात्रीं । लेकुरे खेळती झुंझारी । माणसांतें झडपिती घारी । घुंघाती घरोघरी दिवाभीतें ॥२८६॥
वागीश्वरी क्षोभली गाढी । बोली म्हणती आली यमधाडी । कां रे धांवतां तांतडी । आगी उडी घालूं पाहतां ॥२८७॥
भूस्फोट भूमिकंप । अग्निकिरणी तपे आतप । वारेनि सोडिला अहा कंप । लागे झडप खरस्पर्शे ॥२८८॥
धुळोरा उधळत नगरीं । रज भरे डोळ्यांमाझारी । डोळा नुघडवे नरनारी । दिशा चारी धुमधुमित ॥२८९॥
ऐसे नाना परींचे उत्पात । नगरी रुधिरवृष्टि होत । देखोनि यादव समस्त । भयचकित पैं जाहले ॥२९० ॥
यादव मिळोनि थोर थोर । वृद्ध वृद्ध करिती विचार । ये चिन्हें अरिष्टकर । विन्न थोर दिसतसे ॥२९१॥
अवघे आले कृष्णापाशीं । वृत्तांत सांगती तयासी । उद्विग्न देखोनि यादवांसी । हृषीकेशी बोलिला ॥२९२ ॥

कृष्ण यादवांस प्रभासास पाठवितो (२९३ ते ३१६)

श्रीभगवानुवाच – एते वै सुमहोत्पाता ह्युत्तिष्ठन्तीह सर्वतः । शापश्च नः कुलस्यासीद्ब्राह्मणेभ्यो दुरत्ययः ॥ ३४॥
(श्रीभगवान म्हणाले – येथे सर्व बाजूंनी भयंकर मोठे उत्पात (अशुभ प्रकार) होत आहेत; आपल्या कुलाला अनुल्लंघनीय असा ब्राह्मणांचा दुर्धर शाप झालेला आहे. ॥ ३४ ॥)
कृष्ण यादवांसी सांगत । दिवि-भू-अंतरिक्षगत । उठिले जे महोत्पात । सर्वगत सर्वदा ॥२९३॥
देखोनियां चिन्हांसी । मजही आठवलें मानसीं । ब्राह्मणशाप यदुकुळासी । चिन्हें त्यासी सूचकें ॥२९४ ॥
ब्राह्मणांचा शापु खरा । नुल्लंघवे हरिहरां । तुम्ही आतांचि विचार करा । नगराबाहिरा जनु काढा ॥२९५॥
न वस्तव्यमिहास्माभिर्जिजीविषुभिरार्यकाः । प्रभासं सुमहत्पुण्यं यास्यामोऽद्यैव माचिरम् ॥३५ ॥
(म्हणून, हे वृद्ध यादवहो, आपणा सर्वांना जगण्याची इच्छा आहे, तरी आपण येथे राहता उपयोगी नाही; आपण आजच फार उशीर न लावता पुण्यकारक अशा प्रभास क्षेत्राला जाऊ या ॥३५॥)
येथोनि द्वारकेची वस्ती । आम्ही सांडावी समस्तीं । जीवें जियावयाची चाड चित्तीं । तरी प्रभासाप्रती निघावें ॥२९६॥
वेगीं करा रे तांतडी । आजचि निघा लवडसवडी । सांडा घरदारांची गोडी । येथ अर्धघडी न रहावें ॥२९७॥

१०५४.आळवीन स्वरें । कैशा मधुरा उत्तरें ॥१॥
ये वो ये वो पांडुरंगें! । प्रेमपान्हा मज दे गे ॥ध्रु॥
पसरूनि चोंची । वचनें ही करुणेचीं ॥३॥
तुका म्हणे बळी । आम्ही लडिवाळे आळीं ॥४॥
१०५५.सकळिकांचे समाधान । नव्हे, देखिल्यावांचून ॥१॥
रूप दाखवीं रे आतां । सहस्रभुजांच्या मंडिता ॥ध्रु॥
शंखचक्रपद्मगदा । गरुडासहित ये गोविंदा! ॥३॥
तुका म्हणे कान्हा! । भूक लागली नयनां ॥४॥
१०५६.पतितपावना । दीनानाथा नारायणा! ॥१॥
तुझें रूप माझे मनीं । राहो, नाम जपो वाणी ॥ध्रु॥
ब्रह्मांडनायका । विश्वजनाच्या पाळका! ॥३॥
जीवींचिया जीवा! । तुका म्हणे देवदेवा! ॥४॥
१०५७.करी हेचि काम । मना जपे ‘राम राम’ ॥१॥
लागो हाचि छंद । मना ‘गोविंद गोविंद’ ॥ध्रु॥
तुका म्हणे मना! । मज भीक द्यावी दीना ॥३॥
१०५८.आपुलिया लाजा । धांवे भक्ताचिया काजा ॥१॥
नाम धरिलें ‘दीनानाथ’ । सत्य करावया व्रत ॥ध्रु॥
घातआघात निवारी । छाया पीतांबर करी ॥३॥
उभा कर कटीं । तुका म्हणे याजसाठीं ॥४॥
१०५९.साधावया भक्ति काज । नाहीं लाज धरीत ॥१॥
ऐसियासी शरण जावें । शक्ती जीवें न वंची ॥ध्रु॥
भीष्मपण केला खरा । धनुर्धरा रक्षिलें ॥३॥
तुका म्हणे साक्ष हातीं । तो म्यां चित्तीं धरियेला ॥४॥
१०६०.धेनु चरे वनांतरीं। चित्त बाळकापें घरीं ॥१॥
तैसें करीं वो माझे आई! । ठाव देऊनि राखें पायीं ॥ध्रु॥
काढितां तळमळी । जीवनाबाहेरी मासोळी ॥३॥
तुका म्हणे कुडी । जीवा प्राणांची आवडी ॥४॥
१०६१.हरिजनाची कोणा न घडावी निंदा । साहात गोविंदा नाहीं त्याचें ॥१॥
रूपा येऊनियां धरी अवतार । भक्तां अभय-करखळां कष्ट ॥ध्रु॥
दुर्वास हा छळू आला अंबऋषी । सुदर्शन त्यासी जाळित फिरे ॥३॥
द्रौपदीच्या क्षोभे कौरवांची शांति । होऊनि श्रीपति साह्य केली ॥४॥
न साहेचि बब्रु पांडवां पारिखा । दुराविला सखा बळिभद्र ॥५॥
तुका म्हणे अंगी राखिली दुर्गंधि । अश्वत्थामा वधी पांडवपुत्रां ॥६॥
१०६२.ज्यासी आवडी हरिनामाची । तोचि एक बहु शुचि ॥१॥
जपे हरिनाम बीज। तोचि वर्णांमाजी द्विज ॥ध्रु॥
तुका म्हणे वर्णधर्म । अवघे आहे सम ब्रह्म॥३॥
१०६३.विठ्ठल हा चित्तीं । गोड लागे गातां गीतीं ॥१॥
आम्हां विठ्ठल जीवन। टाळ चिपुळिया धन ॥ध्रु॥
‘विठ्ठल विठ्ठल’ वाणी । अमृत हे संजीवनी ॥३॥
रंगला या रंगें । तुका विठ्ठल सर्वांगें ॥४॥
१०६४.‘विठ्ठल विठ्ठल’ मंत्र सोपा । करी पापा निर्मूळ ॥१॥
भाग्यवंता छंद मनीं । कोड कानीं ऐकती ॥ध्रु॥
विठ्ठल हे दैवत भोळे । चाड काळे न धरावी ॥३॥
तुका म्हणे भलते याती । विठ्ठल चित्तीं तो धन्य! ॥४॥
१०६५.म्हणे ‘विठ्ठल ब्रह्म नव्हे’ । त्याचे बोल नाइकावे ॥१॥
मग तो हो कां कोणी एक । आदि करोनि ब्रह्मादिक ॥ध्रु॥
नाहीं विठ्ठल जया ठावा। तोही डोळां न पहावा ॥३॥
तुका म्हणे नाहीं । त्याची भीड मज कांहीं ॥४॥
१०६६.एक पाहातसां एकाची दहनें । सावध त्या गुणें कां रे नव्हा? ॥१॥
मारा हाक देवा भय अट्टाहासें । जंव काळाऐसे झाले नाहीं ॥ध्रु॥
मरणाची तंव गांठोडी पदरीं । जिणें तोचिवरी माप भरे ॥३॥
तुका म्हणे धिग, वाहती मारग । अंगा आले मग हालों नेदी ॥४॥
१०६७.संतासी तो नाही सन्मानाची चाड। परि पडे द्वाड अव्हेरि तो ॥१॥
म्हणऊनि तया न वजावें ठाया । होतसे घात या दुर्बळाचा ॥ध्रु॥
भावहीना आड येतसे आशंका। उचितासी चुका घालावया॥३॥
तुका म्हणे जया संकोच दर्शनें । तया ठाया जाणे अनुचित ॥४॥
१०६८.संसारसंगें परमार्थ जोडे। ऐसें काय घडे जाण-तेनो? ॥ध्रु॥
हेंडग्याच्या आळां अवघीं चिपाडें । काय तेथें गोडें निवडावीं ॥२॥
ढेकणाचे बाजे सुखाची कल्पना । मूर्खत्व वचना येऊ पाहे ॥३॥
तुका म्हणे मद्य सांडवी लंगोटी । सांगितला सेटी विचार त्या॥४॥
१०६९.पंढरीये माझें माहेर साजणी! । ओविया कांडणी गाऊं गीतीं ॥ध्रु॥
राही रखुमाई सत्यभामा माता । पांडुरंग पिता माहियेर ॥२॥
उद्धव अक्रूर व्यास अंबऋषि । भाई नारदासी गौरवीन ॥३॥
गरुड बंधु लडिवाळ पुंडलीक । यांचे कवतुक वाटे मज ॥४॥
मज बहु गोत संत आणि महंत । नित्य आठवीत ओवियेसी ॥५॥
निवृत्ति ज्ञानदेव सोपान चांगया । जिवलगा माझिया नामदेवा ॥६॥
नागो जगमित्रा नरहरि सोनारा । रोहिदास कबिरा सोईरिया ॥७॥
परिसा भागवता सुरदास सांवता । गाईन नेणतां सकळिकांसी ॥८॥
चोखामेळा संत जिवाचे सोईरे । न पडे विसर यांचा घडी ॥९॥
जीवींच्या जीवना एका जनार्दना । पाठक हा कान्हा मिराबाई ॥१०॥
आणीकही संत महानुभाव मुनि । सकळां चरणी जीव माझा ॥११॥
आनंदें ओविया गाईन मी त्यांसी । जाती पंढरीसी वारकरी ॥१२॥
तुका म्हणे माझा बळिया बापमाय । हर्षें नांदे सये घराचारीं ॥१३॥
१०७०.जातीचें तें चढे प्रेम । पक्षी स्मरे ‘राम राम’ ॥१॥
ते काय गुण लागती येरां? । कागा न शोभे पिंजरा ॥ध्रु॥
शिक-विलें तें सुजात सोसी। मग मोल चढे त्यासी ॥३॥
तुका म्हणे वेषधारी । हिजड्या नव्हती त्या नारी ॥४॥

संपूर्ण वारकरी प्रस्थानत्रयी नित्यनेम पारायण अनुक्रमणिका


ग्रंथ

2 thoughts on “दिवस – ६६. वारकरी प्रस्थानत्रयी नित्यनेम पारायण”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Page Reader Press Enter to Read Page Content Out LoudPress Enter to Pause or Restart Reading Page Content Out LoudPress Enter to Stop Reading Page Content Out LoudScreen Reader Support
error: Content is protected !!
Scroll to Top