दिवस – ६७. वारकरी प्रस्थानत्रयी नित्यनेम पारायण

अनुक्रमणिका

तरी तैसी एथ कांहीं । सावियाची केणी नाहीं । आणि योग्यतेची काई । खाणी असे? ॥३४१॥
नावेक विरक्तु । जाहला देहधर्मीं नियतु । तरि तोचि नव्हे व्यवस्थितु । अधिकारिया? ॥३४२॥
येतुलालिये आयणीमाजिवाडें । योग्यपण तूतेंही जोडे’ । ऐसें प्रसंगें सांकडें । फेडिलें तयाचें ॥३४३॥
मग म्हणे “पार्था । ते हे ऐसी व्यवस्था । अनियतासि सर्वथा । योग्यता नाहीं ॥३४४॥
नात्यश्नतस्तु योगोऽस्ति न चैकान्तमनश्नतः । न चातिस्वप्नशीलस्य जाग्रतो नैव चार्जुन ॥१६॥
जो रसनेन्द्रियाचा अंकिला । कां, निद्रेसी जीवें विकला । तो नाहीं एथ म्हणितला । अधिकारिया ॥३४५॥
अथवा आग्रहाचिये बांदोडी । क्षुधा तृषा कोंडी । आहाराते तोडी । मारूनियां ॥३४६॥
निद्रेचिया वाटा न वचे । ऐसा दृढिवेचेनि अवतरणें नाचे । तें शरीरचि नव्हे तयाचें ! । मा योगु कवणाचा? ॥३४७॥
म्हणौनि अतिशयें विषयो सेवावा । तैसा विरोधु न व्हावा । कां, सर्वथा निरोधावा । हेंही नको ॥३४८॥
युक्ताहारविहारस्य युक्तचेष्टस्य कर्मसु । युक्तस्वप्नावबोधस्य योगो भवति दुःखहा ॥१७॥
आहार तरी सेविजे । परि युक्तीचेनि मापें मविजे । क्रियाजात आचरिजे । तयाचि स्थिती ॥३४९॥
मितला बोलीं बोलिजे । मितलिया पाउलीं चालिजे । निद्रेही मानु दीजे । अवसरें एके ॥३५०॥
जागणें जरी जाहलें । तरी होआवें तें मितलें । येतुलेनि धातुसाम्य संचलें । असेल सहजें ॥३५१॥
ऐसें युक्तीचेनि हातें । जैं इंद्रियां वोपिजे भातें । तैं संतोषासि वाढतें । मनचि करी ॥३५२॥
यदा विनियतं चित्तमात्मन्येवावतिष्ठते । निःस्पृहः सर्वकामेभ्यो युक्त इत्युच्यते तदा ॥१८॥
बाहेर युक्तीची मुद्रा पडे । तंव आंतु आंतु सुख वाढे । तेथ सहजेंचि योगु घडे । नाभ्यासितां ॥३५३॥
जैसें भाग्याचिये भडसें । उद्यमाचेनि मिसें । मग समृद्धिजात आपैसें । घर रिघे ॥३५४॥
तैसा, युक्तिमंतु कौतुकें । अभ्यासाचिये मोहरा ठाके । आणि आत्मसिद्धीचि पिके । अनुभवु तयाचा ॥३५५॥
म्हणौनि युक्ति हे पांडवा । घडे जया सदैवा । तो अपवर्गीचिये राणिवा । अळंकारिजे ॥३५६॥
यथा दीपो निवातस्थो नेङ्गते सोपमा स्मृता । योगिनो यतचित्तस्य युञ्जतो योगमात्मनः ॥१९॥
युक्ति योगाचे अंग पावे । ऐसें प्रयाग जेथ होय बरवें । तेथ क्षेत्रसंन्यासें स्थिरावें । मानस जयाचें ॥३५७॥
तयातें योगयुक्त तूं म्हण । हेंही प्रसंगें जाण । तें दीपाचें उपलक्षण । निवातींचिया ॥३५८॥
आतां, तुझें मनोगत जाणीवोनी । कांही एक आम्ही म्हणौनि । तें, निकें चित्त देऊनी । परिसावें गा ॥३५९॥
तूं प्राप्तीची चाड वाहसी । परि अभ्यासीं दखु नव्हसी । तें, सांग पां, काय बिहसी । दुवाडपणा? ॥३६०॥
तरी पार्था हें झणें । सायास घेशी हो मनें । वायां बागुल, इयें दुर्जनें । इंद्रियें करिती ॥३६१॥
पाहें पां, आयुष्यातें अढळ करी । जें सरतें जीवित वारी । तया औषधातें वैरी । काय जिव्हा न म्हणे? ॥३६२॥
ऐसें हितासि जें जें निकें । तें सदाचि या इंद्रियां दुखे । एऱ्हवीं, सोपें योगासारिखें । कांहीं आहे? ॥३६३॥

यत्र स्नात्वा दक्षशापाद्‌गृहीतो यक्ष्मणोडुराट् । विमुक्तः किल्बिषात्सद्यो भेजे भूयः कलोदयम् ॥३६॥
(याच तीर्थात स्नान करून तारकांचा पती जो चंद्र त्याचा दक्ष प्रजापतीच्या शापामुळे झालेला क्षय तत्काळ नाहीसा झाला आणि त्याला पुनः कला प्राप्त झाल्या. ॥ ३६॥)
ऐका समस्त यादवश्रेष्ठ । प्रभासतीर्थ महावरिष्ठ । जेथिंचेनि स्नाने उडुराट । निस्तरला कष्ट क्षयाचे ॥२९८॥
दक्षे निजकन्या चंद्रासी । सत्तावीस दिधल्या त्यासी । तो रतला रोहिणीसीं । येरां सर्वांसी उपेक्षुनी ॥२९९ ॥
दक्षे शापिलें चंद्रासी । क्षयरोगु लागला त्यासी । तेणें येऊनि प्रभासासी । स्नानदानासी पैं केलें ॥३००॥
स्नानमात्रे केवळ । क्षयरोग गेला तत्काळ । कळा पावला सकळ । शोभे निर्मळ निजतेजें ॥३०१॥
वयं च तस्मिन्नाप्लुत्य तर्पयित्वा पितृन् सुरान् । भोजयित्वोशिजो विप्रान्नानागुणवताऽन्धसा ॥ ३७॥
(आपणही त्या तीर्थात स्नान करून, पितरांना आणि देवांना तर्पणाने संतुष्ट करू या, आणि गुणवान व आदरणीय अशा ब्राह्मणांना सुग्रास अन्न देऊन भोजन घालू या. ॥३७॥)
आम्हीही तेथ स्नान दान । पितृतर्पण देवतार्चन । करूं ब्राह्मणपूजन । जे संपन्न श्रुतिशास्त्रीं ॥३०२॥
नाना परींची पक्वान्ने । गुणाधिक्य मिष्टान्ने । देवां ब्राह्मणांसी भोजनें । नाना दानें विधानोक्त ॥३०३॥
तेषु दानानि पात्रेषु श्रद्धयोक्त्वा महान्ति वै । वृजिनानि तरिष्यामो दानैर्नौभिरिवार्णवम् ॥ ३८ ॥
(सत्पात्र ब्राह्मणांना मोठमोठाली दाने भक्तिभावाने देऊन त्या दानांनी ही महाभयंकर विघ्ने नाहीशी करण्यास नावेच्या साहाय्याने ज्याप्रमाणे समुद्र तरून जाता येतो त्याप्रमाणे समर्थ होऊ. ॥ ३८ ॥)
श्रद्धेचेनि नेटेपाटें । पाहूनि दानपात्रें चोखटे । दान द्यावें गोमटें । भूमी वोलटे जेवीं बीज ॥३०४॥
ब्राह्मणाचे मुख तें क्षेत्र । पालवियेपेढीवीण पवित्र । ऐसें पाहूनि सुक्षेत्र । दानें विचित्र पेरावी ॥३०५॥
विनीततेची सेल वोल । श्रद्धेचे चाडें निर्मळ । शमदमादि बैल सबळ । ते तात्काळ जुंपोनी ॥३०६॥
ऐशिया वोजा परी । बीज पेरिलिया क्षेत्रीं । पीक पिकेल घुमरीं । पुरुषार्थ चारी लगटोनी ॥३०७॥
त्या पिकाचेनि सबळे । पापें तरोनि पैं सकळे । जेवीं नावेचेनि बळें । समुद्रजळें तरिजेती ॥३०८॥
श्रीशुक उवाच – एवं भगवतादिष्टा यादवाः कुलनन्दन । गन्तुं कृतधियस्तीर्थं स्यन्दनान् समयूयुजन् ॥ ३९॥
(श्रीशुकाचार्य म्हणाले-हे कुलभूषण परीक्षिते, याप्रमाणे भगवंतांनी आज्ञा केल्यानंतर यादवांनी प्रभास क्षेत्राला जाण्याचा निश्चय करून आपापले रथ जोडले. ॥३९॥)
शुक म्हणे कौरवनंदना । ऐकें परीक्षिति सज्ञाना । कृष्णे दिधली अनुज्ञा । तीर्थविधाना प्रभासा ॥३०९॥
यादव उठिले गाढे । रथीं जुंपिले जी घोडे । येर धांवती येरांपुढे । चहूंकडे लगबग ॥३१० ॥
तन्निरीक्ष्योद्धवो राजन् श्रुत्वा भगवतोदितम् । दृष्ट्वारिष्टानि घोराणि नित्यं कृष्णमनुव्रतः ॥ ४० ॥
(भगवान कृष्णावर सर्वकाळ अनन्य प्रेम करणाऱ्या उद्धवाने हे सर्व पाहिले, भगवंताचे भाषण ऐकले, मोठे मोठे उत्पात अवलोकन केले – ॥४०॥)
थोर वीरांचे बोभाट । गजरथांचे घडघडाट । द्वारकेमाजी न फुटे वाट । प्रयाण उद्भट प्रभासासी ॥३११॥
हडबडली देखोनि द्वारावती । ऐक राया परीक्षिती । उद्धवास आठवलें चित्तीं । कृष्णवदंती देवांसी ॥३१२॥
कुळनाशासी त्वरित । आजीपासूनि सुमुहूर्त । तोचि देवें प्रस्तुत । कार्यार्थ निश्चित मांडिला ॥३१३॥
उद्धव कृष्णासवें संतत । कृष्णानुमतें तो वर्तत । सुरसंवाद निश्चित । होता श्रुत तयासी ॥३१४ ॥
असतां येथ कृष्णनाथ । द्वारकेमाजी अतिउत्पात । उठिले तें मनोगत । जाण निश्चित कृष्णाचें ॥३१५॥
यादव नेऊनि प्रभासासी । अर्धक्षणे नाशील यांसी । जावया निजधामासी । हृषीकेशी उद्यत ॥३१६॥

कृष्णाने यादवांस प्रभासास का पाठविले ? (३१७ ते ३२०)

म्हणाल ‘कां नेले इतुके दुरी । नाशु न करीच द्वारकापुरी’ । तरी तो सर्वज्ञ श्रीहरी । सूत्रधारी जाणता ॥३१७॥
यादव देवांश निश्चितीं । सातवी पुरी द्वारावती । येथ निमाल्या सायुज्यमुक्ती । हे जाणोनि श्रीपति न नाशी ॥३१८॥
यांसी आहे पदाभिमान । द्वारकेमाजी न घडे निधन । हे जाणोनि जगज्जीवन । करवी प्रयाण प्रभासासी ॥३१९॥
ब्रह्मशापाचें मूळ देखा । प्रभासासी निघाली ते येरिका । हे कळलेंसे यदुनायका । तेथ सकळिकां धाडिलें ॥३२० ॥

उद्धवाची कृष्णास विनंती व स्तुती (३२१ ते ३३१)

स्वकुळ ग्रासोनि श्रीपती । निघेल निजधामाप्रती । हे जाणोनि उद्धव चित्तीं । बहुतां रीती कळवळला ॥३२१॥
बाष्पे कंठ निरोधला । नेत्री अश्रूंचा पूर लोटला । स्वेदु सर्वांगीं चालिला । हृदयीं दाटला हुंदका ॥३२२ ॥
कृष्णवियोग अर्ध क्षण । तेणें निघों पाहे प्राण । विसरला कार्य आठवण । कृष्णवदन निरीक्षी ॥३२३ ॥
वियोगप्राप्तीचे बाण प्रबळ । हृदयीं रुतले अतिसबळ । बुद्धि धैर्येसीं होती विकळ । जीवीं तळमळ लागली ॥३२४॥
एकांत देखोनि श्रीकृष्णासी । धांवोनि लागला पायांसी । मिठी घालोनि चरणेसीं । उकसाबुकसी स्फुदत ॥३२५ ॥
विविक्त उपसंगम्य जगतामीश्वरेश्वरम् । प्रणम्य शिरसा पादौ प्राञ्जलिस्तमभाषत ॥४१॥
(आणि अखिल जगाचा महान स्वामी अशा त्या भगवान कृष्णपरमात्म्याला त्याने एकांतात गाठले, त्याच्या दोन्ही पायांवर शिरसाष्टांग नमस्कार घातला, व हात जोडून तो बोलता झाला. ॥ ४१॥)
जो जगाचा नियंता । त्या काळाचा कृष्ण कळिता । त्याचे चरणी ठेवूनि माथा । विनीतता बोलतु ॥३२६ ॥
उद्धव उवाच – देवदेवेश योगेश पुण्यश्रवणकीर्तन । संहृत्यैतत्कुलं नूनं लोकं संत्यक्ष्यते भवान् । विप्रशापं समर्थोऽपि प्रत्यहन्न यदीश्वरः ॥४२॥
(उद्धव म्हणाला – हे देवाधिदेवा, हे योगेश्वरा, हे पुण्यश्लोका यदुवीरा, खरोखर ह्या सर्व कुलाचा संहार करून तू हा लोक सोडून जाणार आहेस असे मला वाटते; तू महान समर्थ आहेस. ब्राह्मणांचा शाप परत फिरविणे तुला शक्य असूनसुद्धा तू तो फिरविला नाहीस. ॥४२॥)
उद्धव म्हणे यादवेंद्रा । देवेंद्राच्या आदिइंद्रा । योगियांच्या प्रबोधचंद्रा । अकळ मुद्रा पैं तुझी ॥३२७॥
देवांमाजी इंद्र ईशु । त्या इंद्राचा तूं जगदीशु । योगियांमाजी श्रेष्ठ महेशु । त्याचाही ईशु तूं श्रीकृष्णा ॥३२८॥
तुझें जें श्रवणकीर्तन । तें पुण्यासी करी पावन । छेदी संसारबंधन । समाधान कीर्तनें ॥३२९॥
संहारूनि निजकुळासी । सांडोनियां या लोकासी । निजधामा जावों पाहसी । हृषीकेशी निश्चित ॥३३० ॥
नाहं तवाङ्‌घ्रिकमलं क्षणार्धमपि केशव । त्यक्तुं समुत्सहे नाथ स्वधाम नय मामपि ॥४३॥
(हे केशवा, तुझे चरणकमल सोडण्यास अर्धक्षणसुद्धा मी तयार नाही. हे नाथ, मलाही तुझ्याबरोबर तुझ्या स्थानाला घेऊन जा. ॥४३॥)
अन्यथा विप्रशापासी । करावया समर्थ होसी । तें न करूनि कुळ संहारिसी । निजधामासी जावया ॥३३१ ॥

श्रीकृष्णविरहाच्या कल्पनेने उद्धवाची विव्हळ मन:स्थिती (३३२-३५०)

ऐसें बोलतां आलें रुदन । न धरत चालिलें स्फुंदन । आसुवी पूर्ण झाले नयन । धांवोनि चरण धरियेले ॥३३२॥
माथा ठेविला चरणांवरी । सखा स्वामी तूं श्रीहरी । आम्हांसी सांडूनियां दुरी । कैशापरी जासील ॥३३३ ॥
तुझिया प्रयाणाची वार्ता । ऐकतांचि गा अच्युता । उभड सांठवेना चित्ता । वियोग सर्वथा न व्हावा ॥३३४ ॥
जळावेगळी मासोळी । तैसा जीवु तळमळी । निष्ठुर जाहलासी अंतकाळीं । वनमाळी मजलागीं ॥३३५॥
तुज गेलियापाठीं । मी दीनवदन ये सृष्टीं । कोणासी सांगों गोड गोष्टी । श्वासु पोटीं न समाये ॥३३६॥
निघोनि गेलिया आत्मा । प्रेतरूप उरे प्रतिमा । तुवां गेलियां निजधामा । तैसें आम्हां होईल ॥३३७॥
तूंचि आम्हां जनक जननी । हा दृढ विश्वास आमुचे मनीं । केवी जातोसी सांडोनि । म्हणोनि लोळणी घातली ॥३३८॥
तूं निघालासी निजधामा । कोणासी निरविलें जी आम्हां । कां रुसलासी पुरुषोत्तमा । बोलु निजकर्मा आमुच्या ॥३३९ ॥
मुकें बाळ सांडोनि क्षितीं । माता रिघों पाहे सती । तें जेवीं ये काकुळती । तैसी गती उद्धवा ॥३४० ॥
गोडु गिळी आमिषकवळु । सवेंचि पारधी आंसुडी गळु । त्या मीनाऐसा विकळु । होय प्रेमळु उद्धव ॥३४१॥
तुज गेलियावरी देवा । म्यां कोणाची करावी सेवा । कां रुसलासी गा यादवा । आमच्या दैवा निश्चित ॥३४२॥
कांटवणे आड क्षितीं । आंधळे सांडूनि जाये सांगाती । तें ग्लानी करी वनांतीं । तैसी गती उद्धवा ॥३४३॥
धांवधावों पायां पडे । धाय मोकलोनि रडे । मज सांडोनि तूंचि पुढे । कोणीकडे जातोसी ॥३४४॥
मी नव्हे पायांवेगळा । क्षण नोसंडी चरणकमळा । तुझें प्रयाण जी गोपाळा । अंतकाळा मज काळु ॥३४५॥
तुझी थोर लागली सवे । मज न्यावें आपणासवें । हेचि प्रार्थीतसें जीवेंभावें । कृपा यादवें मज कीजे ॥३४६॥
तूं गरुडारूढ होसी । तेव्हां कृपेनें बैसवीं पाठीसीं । सांडों नको हृषीकेशी । निजधामासी मज नेई ॥३४७॥
सलगी दिधली जन्मवरी । अंती का त्यागिसी दुरी । कृपाळुवा श्रीहरी । कृपा करीं सर्वथा ॥३४८॥
म्हणसी मी निजकुळासी काळु । तो तुज केवीं होईन कृपाळु । हे न म्हणें तूं दीनदयाळु । अतिस्नेहाळु भक्तासी ॥३४९॥
तुझी कृपा भक्तांवरी । यालागीं मी सलगी करीं । मातें उद्धरीं श्रीहरी । झणे संसारी सांडिसी ॥३५० ॥

१०७१.बैसाेनि थिल्लरीं । बेडुक सागरा धिक्कारी ॥१॥
नाहीं देखिला ना ठावा। तोंडपिटी करी हांवा ॥ध्रु॥
फुगतें काउळें । म्हणे ‘मी राजहंसा आगळें’॥३॥
गजाहूनि खर। म्हणे ‘चांगला मी फार’॥४॥
मुलाम्याचे नाणें । तुका म्हणे नव्हे सोने ॥५॥
१०७२.मुक्त होता परि बळें झाला बद्ध । घेऊनियां छंद ‘माझें माझें’ ॥१॥
पाप पुण्य अंगीं घेतले जडून । वर्म नेणें, कोण करिता तो ॥ध्रु॥
तुका म्हणे गेलें व्यर्थ वायांविण । जैसा मृग शीण मृगजळीं ॥३॥
१०७३.वरतें करोनियां तोंड । हाका मारितो प्रचंड ॥१॥
राग आळवितो नाना । गातो काय ते कळेना ॥ध्रु॥
आशा धरोनि मनीं । कांहीं देईल म्हणऊनि ॥३॥
पोटा एका साठीं । तुका म्हणे झाले कष्टी ॥४॥
१०७४.जाळी महाकर्मे । दावी निजसुखवर्मे ॥१॥
ऐसें कळलें आम्हां एक । झालों नामाचे धारक ॥ध्रु॥
तपाचे सायास । न लगे घेणें वनवास॥३॥
तुका म्हणे येणें । कळिकाळ हे ठेंगणे ॥४॥

(मासिक पारायण सातवा विसांवा)

१०७५.ये हरी मज कृपा देईं दान । नासीं तिमिर दाखवीं चरण । आर्त पुरवावें भेटी देऊन । नको उपेक्षूं आलिया शरण ॥१॥
कामक्रोध अहंकार नको देहीं । आशा तृष्णा माया लज्जा चिंता कांहीं । वास पंढरीचा जन्म सदा देईं । आणीक दुजें मागणे तुज नाहीं ॥ध्रु॥
नाम अखंड हृदयीं राहो वाणी । न पडो विसर क्षण जागृति स्वप्नीं । संतसमागम ऐसा दें लावूनि । आणीक दुजें कांहीं नेणें तुजवांचूनि ॥३॥
पंथपुरिंचा रविसुत पुरे आतां । आड करावा भवसिंधु ऐसा नव्हता । नाहीं अडथळा त्रैलोक्यामाजी सरता । विनवी तुकयाबंधु चरणी ठेवूनि माथा ॥४॥
१०७६.तट्टाचे जातीला नाहीं भीड भार । लाता मारी थोर लहान नेणे ॥१॥
परि तो त्या विशेष मनुष्य होऊन । करी खंड मान वडिलांचा ॥ध्रु॥
बेरसा गाढव माय ना बहीण । भुंके चवीविण भलतेंचि ॥३॥
तुकयाबंधु म्हणे बोकड मातले । न विचारितां आपुले तोंडी मुते ॥४॥
१०७७.मायझवा खर गाढवाचे बीज । तें ऐसें सहज कळों येतें ॥१॥
अपमानिले जेणें श्रेष्ठांचे वचन । तेचि त्याची खूण ओळखावी ॥ध्रु॥
मद्यपी तो पुरा अधम जातीचा । तया उपदेशाचा राग वायां ॥३॥
तुकयाबंधु म्हणे पिसाळलें सुनें। आप पर तेणें न विचारावें ॥४॥
१०७८.मत्स्यकूर्मशेषा कोणाचा आधार? । पृथिवीचा भार वाहावया ॥१॥
काय धाक आम्हां कासयाची चिंता । ऐसा तो असतां साहाकारी ॥ध्रु॥
शंखचक्रगदा आयुधे अपार । वागवितो भार भक्तांसाठीं ॥३॥
पांडवां जोहरी राखिले कुसरी । तो हा बंधुचा कैवारी तुकयाच्या ॥४॥
१०७९.‘राम’ म्हणतां कामक्रोधाचे दहन । होय अभिमान देशधडी॥१॥
‘राम’ म्हणतां कर्म तुटेल भवबंधन । नये श्रम शीण स्वप्नामाजी ॥ध्रु॥
‘राम’ म्हणतां जन्म नाहीं गर्भवास । नव्हे दारिद्र्यास पात्र कधी ॥३॥
‘राम’ म्हणतां यम शरणागत बापुडें । अढळपद पुढे काय तेथें? ॥४॥
‘राम’ म्हणतां धर्म घडतीं सकळ । तिमिरपडळ नासे हेळा ॥५॥
‘राम’ म्हणतां म्हणे तुकयाचा बंधु । तरिजेल भवसिंधु संदेह नाहीं ॥६॥
१०८०.मरोनि जाईन गुणनामावरूनि । तुझ्या चक्रपाणि मायबापा! ॥१॥
चुकविली दु:खें मायेचा वोळसा । तोडोनियां आशापाश तेणें ॥ध्रु॥
केली काया तनु हिंवसी शीतळ । चिंता तळमळ नाहीं ऐसी ॥३॥
काळे तोंड काळ करूनि राहिलें । भूतमात्र झालें सज्जनसखें ॥४॥
तुकयाबंधु म्हणे अवघ्या दशदिशा । मुक्त रे परेशा तुझ्या पुण्यें ॥५॥
१०८१.आता मागतों तें ऐक नारायणा! । भावपूर्वक मनापासूनियां ॥ध्रु॥
असों दे मोकळी जिव्हा जरि गाईल गुण । नाहीं तरि खिळून टाकी परती ॥२॥
मातेचिया परी देखती परनारी । ठेवी नेत्र तरी नाहीं तरि नको ॥३॥
तरी बरें कंटाळा करिती निंदास्तुतीचा । नाहीं तरि कानांचाही देखे प्रयत्न ॥४॥
सकळ इंद्रियांचा निग्रह करूनि, एक । राखावीं, पृथक तोडोनि भ्रम ॥५॥
तुकयाबंधु म्हणे तेचि वाट प्राणां । पडतां नारायणा विसर तुझा ॥६॥
१०८२.नमस्कारी भूतें विसरोनि याती। तेणें आत्मस्थिति जाणितली ॥१॥
परउपकारी वेचियेल्या शक्ति । तेणें आत्म-स्थिती जाणितली ॥२॥
द्वैताद्वैत भाव नाहीं जया चित्तीं । तेणें आत्मस्थिती जाणितली ॥३॥
जयाचिये वाचे नये निंदास्तुती । तेणें आत्मस्थिती जाणितली ॥४॥
उचित अनुचित जाणे धर्मनीति । दृढ भावभक्ति मानव तो ॥५॥
तुकयाबंधु म्हणे वरकड ते येर । संसाराचे खर भारवाही॥६॥
१०८३.चवदा भुवनें लोक तिन्ही दाढे जो कवळी । संपुट तो संबळीमध्ये देखा ॥१॥
उत्पत्तिसंहार करिता जो पाळण । तो नंदा नंदन म्हणवीतसे ॥ध्रु॥
असूर तोडरी दैत्यांचा काळ । झाला द्वारपाळ बळीचा तो ॥३॥
लक्षुमीचा स्वामी क्षीराच्या सागरा । उच्छिष्ट कवळा पसरी मुख ॥४॥
तुकयाबंधु म्हणे चतुरांचा रावो । भावे तो पाहा हो केला वेडा ॥५॥
१०८४.कोण या पुरुषार्थाची गति। आणियेला हातो-हातीं । जाहाज पृथ्वीपति । केली ख्याति अद्भुत ॥१॥
भला पुंडलिका भला । महिमा नवजाय वर्णिला । दगा देऊनि अवघियांला । सांठविलें अविनाश ॥ध्रु॥
केलें एके घरीं केणें । भरलीं सदोदित दुकानें । दुमदुमिलीं सुखाने । हे भाग्याची पंढरी ॥३॥
तुकयाबंधु म्हणे किल्ल्या । संतांचे हाती दिल्या । अंगावेगळे आपुल्या । टाकूनि झाला मेहेमान ॥४॥

संपूर्ण वारकरी प्रस्थानत्रयी नित्यनेम पारायण अनुक्रमणिका


ग्रंथ

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Page Reader Press Enter to Read Page Content Out LoudPress Enter to Pause or Restart Reading Page Content Out LoudPress Enter to Stop Reading Page Content Out LoudScreen Reader Support
error: Content is protected !!
Scroll to Top