
अनुक्रमणिका
- श्रीज्ञानेश्वरी नित्यनेम पारायण क्रमश: नित्यनेम पारायण अध्याय – ६. ओवी क्र. ३६४ ते ३८६
- श्रीएकनाथी भागवत क्रमश: नित्यनेम पारायण अध्याय – ६, ओवी क्र. ३५१ ते ४०३
- उद्धवाची श्रीकृष्णास विनंती व स्तुती (३५१ ते ३५४)
- कृष्ण-उद्धव-सौहार्द (३५५ ते ३६६)
- श्रीकृष्णविरहाच्या कल्पनेने उद्धवाची विव्हळ मनःस्थिती (३६७ ते ३७०)
- उद्धवाची कृष्णास विनंती व स्तुती (३७१ ते ४११)
- श्रीतुकाराम महाराजांची गाथाअभंग क्र. १०८५ ते ११००
- ग्रंथ
या कुन्देन्दुतुषारहारधवला या शुभ्रवस्त्रावृता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना ।
या ब्रह्माच्युतशङ्करप्रभृतिभिर्देवै: सदा वन्दिता सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापहा ॥
जयांचे केलिया स्मरण । होय सकळ विद्यांचे अधिकरण । तेचि वंदूं श्रीचरण । श्रीगुरूंचे ॥१॥
ते नमस्कारोनि आता ॥
श्रीगणेशाय नमः । श्रीसरस्वत्यै नमः । श्रीविठ्ठलाय नमः ।
श्रीमातापितृभ्यां नमः । श्रीगुरुभ्यो नमः ॥
ॐ नमो भगवते वासुदेवाय ।
रामकृष्णहरि । रामकृष्णहरि । रामकृष्णहरि ॥
श्रीज्ञानेश्वरी नित्यनेम पारायण
क्रमश: नित्यनेम पारायण
अध्याय – ६. ओवी क्र. ३६४ ते ३८६
सुखमात्यन्तिकं यत्तद्बुद्धिग्राह्यमतीन्द्रियम् । वेत्ति यत्र न चैवायं स्थितश्चलति तत्त्वतः ॥२१॥
एऱ्हवीं तरी येणें योगें । जैं इंद्रियां विंदान लागे । तैं चित्त भेटों रिगे । आपणपेयां ॥३६५॥
परतोनि पाठिमोरे ठाके । आणि आपुलेयांते आपण देखे । देखतखेवो ओळखे । म्हणे ‘तत्त्व हें-मी’ ॥३६६॥
तिये ओळखीचिसरिसें । सुखाचिया साम्राज्यीं बैसे । मग आपणापां समरसें । विरोनि जाय ॥३६७॥
जयापरतें आणिक नाहीं । जयातें इंद्रियें नेणती कहीं । तें, आपणचि, आपुलिया ठायीं । होऊनि ठाके ॥३६८॥
कां, शस्त्रें वरी तोडिलिया । देह अग्नीमाजीं पडिलिया । चित्त महासुखीं पहुडिलिया । चेवोचि नये ॥३७०॥
ऐसें आपणपां रिगोनि ठाये । मग देहाची वासु न पाहे । आणिकचि सुख होऊनि जाये । म्हणूंनि विसरे ॥३७१॥
सङ्कल्पप्रभवान्कामांस्त्यक्त्वा सर्वानशेषतः । मनसैवेन्द्रियग्रामं विनियम्य समन्ततः ॥२४॥
जें योगाची बरव । संतोषाची राणीव । ज्ञानाची जाणीव । जयालागीं ॥३७३॥
तें अभ्यासिलेनि योगें । सावयव देखावें लागे । देखिलें; तरि आंगें । होईजेल गा ॥३७४॥
तरि तोचि योगु, बापा । एके परी आहे सोपा । जरी पुत्रशोकु संकल्पा । दाखविजे ॥३७५॥
हां, विषयातें निमालिया, आइके । इंद्रिये नेमाचिया धारणी देखे । तरि हियें घालुनि मुके । जीविद्वासी ॥३७६॥
ऐसें वैराग्य हें करी । तरि संकल्पाची सरे वारी । सुखें धृतीचिया धवळारीं । बुद्धी नांदे ॥३७७॥
यतो यतो निश्चरति मनश्चञ्चलमस्थिरम् । ततस्ततो नियम्यैतदात्मन्येव वशं नयेत् ॥२६॥
याही एके परी । प्राप्ती आहे; विचारीं । हें न ठके, तरि सोपारी । आणिक ऐकें ॥३७९॥
आतां नियमुचि हा एकला । जीवें करावा आपुला । जैसा कृतनिश्चयाचिया बोला-। बाहेरा नोहे ॥३८०॥
जरी येतुलेनि चित्त स्थिरावे । तरि काजा आलें स्वभावें । नाहीं, तरि घालावें । मोकलुनी ॥३८१॥
मग, मोकलिलें जेथ जाईल । तेथूनि नियमुचि घेऊनि येईल । ऐसेनि स्थैर्यचि होईल । सवेंचि यया ॥३८२॥
तयातें देखोनि, आंगा घडेल । तेथ अद्वैतीं द्वैत बुडेल । आणि ऐक्य-तेजें उघडेल । त्रैलोक्य हें ॥३८४॥
आकाशीं दिसे दुसरें । तें अभ्र जैं विरे । तैं गगनचि कां भरे । विश्व जैसें ॥३८५॥
तैसें, चित्त लया जाये । आणि चैतन्यचि आघवें होये । ऐसी प्राप्ती सुखोपायें । आहे येणें ॥३८६॥
॥ पुंडलिकवरदा हरी विठ्ठल श्रीज्ञानदेव तुकाराम ॥
श्रीएकनाथी भागवत
क्रमश: नित्यनेम पारायण
अध्याय – ६, ओवी क्र. ३५१ ते ४०३
श्रीगणेशाय नमः ॥ श्रीसरस्वत्यै नमः ॥ श्रीगुरुभ्यो नमः ॥ श्रीदत्तात्रेयाय नमः ॥ श्रीरुक्मिणीपाण्डुरङ्गाभ्यां नमः ॥
उद्धवाची श्रीकृष्णास विनंती व स्तुती (३५१ ते ३५४)
(कृष्णा, ह्या अवतारात तू केलेल्या लीला अखिल लोकांना मंगल व कल्याणकारक अशा आहेत, तुझ्या लीला कर्णमधुर असून त्यांचे श्रवण केले असता प्राणिमात्राला दुसरी इच्छाच राहात नाही. ॥४४ ॥)
तुझे कीर्तिश्रवणाचे आवडीं । लागली कर्णपीयूषी गोडी । तेथ अमृताची चवी थोडी । होय अर्ध घडी न लागतां ॥३५२॥
ऐशी ऐकतां तुझी कीर्ती । सवासना स्पृहा नासती । ते भक्तु तुज न विसंबती । हृदयीं वाहती सर्वदा ॥३५३॥
त्या तुज प्रत्यक्ष श्रीकृष्णासीं । मज न साहवे वियोगासी । सवे लाविली आम्हांसी । सौजन्येसीं स्वामित्वें ॥३५४॥
कृष्ण-उद्धव-सौहार्द (३५५ ते ३६६)
(शय्येवर असताना, आसनावर असताना, तुझ्याबरोबर फिरताना, घरी असताना, स्नान, विहार, भोजन इत्यादी प्रसंगी आम्ही तुझे भक्त तुझी सेवा करीत असू ; तू आमचे सर्वकाल प्रिय करणारा असल्याने तुला सोडणे आम्हांला कसे शक्य आहे ? ॥४५ ॥)
अचाट कार्य पडे थोर । तेव्हां मज पुससी विचार । मी सांगे जो जो मंत्र । तो साचार मानिसी ॥३५६ ॥
जेव्हां भोजन करूं रिघसी । माझें ताट ताटेंसीं मांडिसी । जेवितां नाना विनोद करिसी । निजशेष देसी मजलागीं ॥३५७॥
ब्रह्मादिकां न लभे पंक्ती । तो मी जेवीं तुझिया पांतीं । शेषविभागी जी श्रीपती । केलें निश्चितीं त्वां मज ॥३५८ ॥
मातें धरोनियां हातीं । एकला बैससी एकांतीं । ब्रह्मादिकांची विनंती । तुजप्रती मी सांगे ॥३५९॥
कळों नेदितां कोणासी । तुवां केलें रासक्रीडेसी । तें गुह्य सांगोनि मजपाशीं । गोकुळासी धाडिलें ॥३६० ॥
सेजेचे उठवूनि भीमकीसी । मज आपणाजवळ निजविशी । ते निद्रेचिया सुखासी । समाधि कायसी बापुडी ॥३६१॥
ऐशिया तुझे संगतीं । रात्री भोगिल्या नेणों किती । त्या मज सांडोनि श्रीपती । जाणे निश्चिती करितोसी ॥३६२ ॥
वेळु न गमे चक्रपाणी । मज बोलवू धाडिसी रुक्मिणी । सारीपाटु आम्ही दोघी जणीं । एकासनी खेळिजे ॥३६३॥
जेव्हां व्याहाळिये निघसी । मज आपुले रथीं बैसविशी । दोघां गमन एके रथेंसीं । आजि उबगलासी सांघाता ॥३६४ ॥
जळक्रीडा करितां जळीं । करितां गोपिकांसी रांडोळी । तेव्हाही मी तुजजवळी । स्नानकाळी सर्वदा ॥३६५॥
ऐसें सांगों मी किती । तुजवेगळा श्रीपती । नाहीं झालों अहोरातीं । केवीं म्यां अंती सांडावें ॥३६६॥
श्रीकृष्णविरहाच्या कल्पनेने उद्धवाची विव्हळ मनःस्थिती (३६७ ते ३७०)
आमुचा जीवु आणि प्राण । ते तुझे गा श्रीचरण । तें वियोगदुःख साहावया जाण । समर्थपण मज नाहीं ॥ ३६८॥
आमुचा हाचि लाभु अव्यंग । जे तुझिया पायांचा संयोग । त्यांचा न साहवे वियोग । देहभंग झालिया ॥३६९॥
देह राहेल तरी राहो । अथवा जाईल तरी जावो । तुझ्या चरणांचा वियोग पहा हो । न शके साहों सर्वथा ॥३७० ॥
उद्धवाची कृष्णास विनंती व स्तुती (३७१ ते ४११)
(तुला अर्पण केलेल्या माळा, सुवासिक गंध, वस्त्रे, अलंकार, हे घेऊन आम्ही आमचा शृंगार करीत राहू ; तुला अर्पण केलेल्या अन्नांचा प्रसाद भक्षण करून आम्ही तुझे दास ही दुस्तर माया तरून जाऊ. ॥४६॥)
तुझे कांसेचा पिवळा । येऊनि माझे कांसे लागला । तेंचि कामु म्यां जिंतिला । दृढ जाहला निजकांसे ॥३७३॥
तुवां आपुले हृदयींचें पदक । जेव्हां मज दिधलें देख । तेव्हांचि माया जाहली विमुख । दासां सन्मुख न राहे ॥३७४ ॥
मायेसी असतें मुख । तरी हों लाहती सन्मुख । ते मिथ्या गा निःशेख । वृथा लोक भ्रमले पैं ॥३७५॥
तुझें उच्छिष्ट सेवितां देख । लाजोनि जाये समाधिसुख । निडारला निजात्मतोख । शेषे प्रत्यक्ष निजलाभु ॥३७६॥
ऐसा तुझेनि दास्ये सरता जाहला । तुझेनि निजशेषे चर्चिला । तुझी माया मी तरला । जिया धाकु लाविला योगियां ॥३७७॥
(केवळ वायू भक्षण करणारे, तप करणारे, व्रतस्थ वृत्तीने राहणारे, नैष्ठिक ब्रह्मचारी, सर्वसंगपरित्याग केलेले, निर्मळ व शांत असे एकांतिक भक्त ब्रह्मस्वरूप अशा तुझ्या वैकुंठाप्रत जातात. ॥४७॥)
आसनस्थ होऊनि जाणा । आकळावया प्राणापाना । मूळबंधे आकोचना । दृढ धारणा ते करिती ॥३७९ ॥
अंगुले बारा बारा । जिणावया जी वारा । रात्रंदिवस शरीरा । अभ्यासद्वारा आटिती ॥३८०॥
क्षुधेनें खादली भूक । तृषा तहान प्याली देख । जिणोनियां सुखदुःख । अतिनेटक निर्धारें ॥३८१ ॥
सुबुद्धि धरूनियां हातीं । आकळूनि इंद्रियवृत्ती । वैराग्य करित ख्याती । ऊर्ध्वगती निघाले ॥३८२॥
भेदोनि मणिकर्णिका वोवरी । उसळले जी ब्रह्मरंध्रीं । जिणोनियां ब्रह्मगिरी । निशाणभेरी लाविल्या ॥३८३॥
तेथ शांतीचेनि योगें । विलसत सर्वांगें । संकल्पत्यागवेगें । जाहले अंगें चिद्ब्रह्म ॥३८४ ॥
ऐसे योगबळे योगी । माया जिणती अंगोअंगीं । त्याहोनि अतिसुगम मार्गी । आम्हांलागीं त्वां केली ॥३८५॥
(परंतु आम्ही मात्र, हे योगेश्वरा, या कर्ममार्गाने भरलेल्या संसारचक्रात भ्रमण करीत असूनही तुझ्या लीलाचरित्र-संकीर्तनानेच (एरवी तरून जाण्यास कठीण असा) हा गाढ-अज्ञानरूप संसार सहज तरून जाऊ. ॥ ४८॥)
आम्हां कर्ममार्गीचिया कर्मठां । तुवां उपकार केला मोठा । तुझ्या कथेचा श्रवणपाठा । मुक्त दारवंठा मोक्षाचा ॥३८७॥
असो मोक्षाची कथा । चाड नाहीं गा सर्वथा । तुझ्या भक्तांसी तुझी कथा । करितां भवव्यथा न बाधीचि ॥३८८॥
तुझे अभेद भक्तीचे कोड । आम्हां संसारुचि गोड । ठेचूनि त्रिगुणांचे तोंड । भक्त प्रचंड भजताति ॥३८९॥
(तुझ्या लीला, तुझ्या मुखातून स्रवलेले अमृतबोल, तुझे चालणे, हसणे, पाहणे, विनोद हे सामान्य लोकांसारखे म्हणजे त्यांचेच अनुसरण केल्यासारखे दिसते. परंतु, हे प्रभो, तुझ्या ह्या सर्व लीलांचे स्मरण व संकीर्तन करून (आम्ही सहज संसार तरून जाऊ). ॥४९॥)
पुसोनियां संसारभावो । निजपदी देसी ठावो । हा श्रवणकीर्तनलाभ पाहा हो । आम्ही सहजें लाहों निजभक्त ॥३९१॥
स्वभावें कीर्तन करितां । एवढा लाभु होये तत्त्वतां । या तुझिये मुखींच्या कथा गातां । आपणियां देता तूं होशी ॥३९२॥
तुझी गोकुळींची गमनपदें । आवडीं वर्णिती जे आनंदें । त्यांसी खांदी वाऊनि निजबोधे । कीर्तनच्छंदें नाचशी ॥३९३॥
तुवां जे केली लीला । ते आवडी गातां जी गोपाळा । नित्य त्या सेवकांजवळा । अंगें अंगवळा तूं होशी ॥३९४ ॥
तुझें वर्णिती जे हास्यवदन । त्या भक्तांचें तूं करिशी ध्यान । त्यांचेनि बोलें समाधान । स्त्रीशूद्रां जाण तूं देशी ॥३९५॥
तुझे दृष्टीचे दर्शन । दृश्यातीत निरीक्षण । सर्वत्र देखणेपण । कीर्तनीं गान जे गाती ॥३९६॥
त्यांच्या पाउलांपाउलांसी । आपुलें सर्वांग तूं वोवाळिसी । अंग टाकूनि तिष्ठसी । त्यांपाशीं सर्वदा ॥३९७॥
आपुली गुह्य ज्ञानमुद्रा । त्यांसी अर्पिसी तूं ज्ञानीनरेंद्रा । निजबोधे प्रबोधचंद्रा । त्यांच्या निजभद्रा तूं करिशी ॥३९८॥
रासक्रीडादि नाना छंद । अंगनामंगनादि प्रबंध । कीर्ति अतिशयें विशद । भावार्थे शुद्ध जे गाती ॥३९९ ॥
कां ठकूनियां ब्रह्मयासी । गोपाळवत्से तूं जाहलासी । ऐसऐसिया विनोदांसी । हृषीकेशी जे गाती ॥४०० ॥
त्यांसी सर्वांभूतीं निजात्मता । देशी तूं आपुली सत्ता । त्यांच्या बोलांमाजी वर्तता । कृष्णनाथा तूं होशी ॥४०१॥
मनुष्यनाट्याचेनि योगें । जें जें केलें तुवां अंगें । तें गातां ऐकतां अनुरागें । तरले वेगें निजभक्त ॥४०२॥
म्यांचि केली जे जे आळी । ते त्वां पुरविली सर्व काळीं । त्या मज उपेक्षूनि वनमाळी । अंतकाळीं कां जाशी ॥४०३॥
॥ पुंडलिकवरदा हरी विठ्ठल श्रीज्ञानदेव तुकाराम ॥
श्रीतुकाराम महाराजांची गाथा
अभंग क्र. १०८५ ते ११००
आजिचें झालें भोजन । ‘राम कृष्ण नारायण’ ॥ध्रु॥
तुकयाबंधु म्हणे नास । नाहीं कल्पांती जयास ॥३॥
सांडिला व्यवहार माया लोकाचार । छंद निरंतर हाचि मनीं ॥ध्रु॥
आइकिलें कानीं तें रूप लोचन । देखावया शीण करिताती ॥३॥
प्राण हा विकळ होय कासावीस । जीवनाविण मत्स्य तयापरी ॥४॥
तुका म्हणे आता कोणता उपाव । करूं, तुझे पाव आतुडे तो ॥५॥
लागतसे पायां येतों लोटांगणीं । मात तरी कोणी सांगा याची ॥ध्रु॥
गुण रूप याचे वाणितां या संतां । मज क्षेम देतां सुख वाटे ॥३॥
सर्वस्वे हा जीव ठेवीन चरणीं । पांडुरंग कोणी दावी तया ॥४॥
तुका म्हणे गाईवत्सा तडातोडी । तैसी जाते घडी एकी मज ॥५॥
विठ्ठल माझा गुरु विठ्ठल माझा तारूं । उतरील पारू भवनदीचा ॥ध्रु॥
विठ्ठल माझी माता विठ्ठल माझा पिता । विठ्ठल चुलता बहिणी बंधु ॥३॥
विठ्ठल हे जन विठ्ठल माझें मन । सोईरा सज्जन विठ्ठल माझा ॥४॥
तुका म्हणे माझा विठ्ठल विसांवा। नस्वरित गांवा जाईन त्याच्या ॥५॥
काय हाती लागे भुसाचे कांडणीं । सत्यासि दाटणी करूनि काय? ॥ध्रु॥
कवित्वाचे रूढी पायां पडे जग । सुखावोनि मग नरका जाय ॥३॥
तुका म्हणे देव केल्याविण साहे । फजिती ते आहे लटिक्या अंगीं ॥४॥
बोलावी हे धर्मनीत । क्षोभें होत नाहीं हित ॥ध्रु॥
मर्यादा ते बरी । वेळ जाणावी चतुरीं ॥३॥
तुका म्हणे बहु । लागे ऐसें बरें मऊ ॥४॥
वेडा झाला वेडा झाला । लांचावला भक्तीसी ॥ध्रु॥
निचाड हा चाड धरी । तुळसी करी दळ मागें ॥३॥
धरिला, मग न करी बळ । तुका म्हणे कळ पायीं ॥४॥
ऐसें द्यावें कांहीं दान । आलों पतित शरण ॥ध्रु॥
संतांचिये पायीं । ठेवि वेळोवेळां डोई ॥३॥
तुका म्हणे तरे । भवसिंधु एकसरें ॥४॥
वाये टाळ टाळ्या टाळी । होईल होळी विघ्नांची ॥ध्रु॥
विठ्ठल आदि अवसानीं। विठ्ठल मनीं स्मरावा ॥३॥
तुका म्हणे विठ्ठल वाणी । वदा, कानी आईका! ॥४॥
पुंडलिका दिला वर। करुणाकरें विठ्ठलें ॥ध्रु॥
मूढ पापी जैसे तैसे । उतरी कासे लावूनि ॥३॥
तुका म्हणे खरें झालें । एका बोलें संतांच्या ॥४॥
ऐसियांचा संग देईं नारायणा! । वोलावा वचना जयाचिया ॥ध्रु॥
उत्तम सेवन शीतळ कंठासी । पुष्ट कांती तैसी दिसे वरी ॥३॥
तुका म्हणे तैसें होईजेत संगे । वास लागे अंगें चंदनाच्या ॥४॥
वाट पाहे उभा भेटीची आवडी । कृपाळू तांतडी उतावीळ ॥ध्रु॥
मागील परिहार पुढे नाहीं शीण । झालिया दर्शन एकवेळ ॥३॥
तुका म्हणे नेदी आणिकांचे हातीं । बैसला तो चित्तीं निवडेना ॥४॥
न दिसे तें दिसों येईल उगलें । नामें या विठ्ठलें एकाचिया ॥२॥
न बोलों तें बोलों येईल उगलें । नामें या विठ्ठलें एकाचिया ॥३॥
न भेटे तें भेटों येईल आपण । करितां चिंतन विठोबाचें ॥४॥
अलभ्य तो लाभ होईल अपार। नाम निरंतर म्हणतां वाचें ॥५॥
तुका म्हणे जीव आसक्त सर्वभावें । तरतील नांवें विठोबाच्या ॥६॥
जीव देईन हा बळी । करीन होळी संसारा ॥ध्रु॥
गेलें मग नये हातां । पुढती चिंता वाटतसे ॥३॥
तुका म्हणे तांतड करूं । पाय धरूं बळकट ॥४॥
आत्मनिष्ठ जरी झाले जीवन्मुक्त । तरी भक्तिसुख दुर्लभ त्यां ॥ध्रु॥
तुका म्हणे कृपा करिल नारायण । तरीच हे वर्म पडे ठावें ॥३॥
कागाचिया गळां पुष्पांचिया माळा । हंसाची ती कळा काय जाणे?॥२॥
मर्कटें अंघोळी लावियेले टिळे। ब्राह्मणाचे लीळें वर्तुं नेणें ॥३॥
जरी तो ब्राह्मण झाला कर्मभ्रष्ट। तुका म्हणे श्रेष्ठ तिहीं लोकीं ॥४॥
॥ पुंडलिकवरदा हरी विठ्ठल श्रीज्ञानदेव तुकाराम ॥
संपूर्ण वारकरी प्रस्थानत्रयी नित्यनेम पारायण अनुक्रमणिका
ज्यांना प्रत्यक्षात ग्रंथावरून पारायण करायचे आहे त्यांनी खालील लिंकवरून ग्रंथ मागवावे.








रामकृष्णहरी माऊली 🙏