दिवस – ६९. वारकरी प्रस्थानत्रयी नित्यनेम पारायण

अनुक्रमणिका

युञ्जन्नेवं सदात्मानं योगी विगतकल्मषः ।
सुखेन ब्रह्मसंस्पर्शमत्यन्तं सुखमश्नुते ॥२८॥
या सोपिया योगस्थिती । उकलु देखिला, गा, बहुतीं ।
संकल्पाचिया संपत्ती । रुसोनियां ॥८७॥
तें सुखाचेनि सांगातें । आलें परब्रह्मा आंतौतें ।
तेथ, लवण जैसें जळातें । सांडूं नेणें ॥८८॥
तैसें होय तिये मेळीं । मग सामरस्याचिया राउळीं ।
महासुखाची दिवाळी । जगेसि दिसे ॥८९॥
ऐसें, आपुले पायवरी । चालिजे आपुले पाठीवरी ।
हें, पार्था, नागवे, तरी । आन ऐकें ॥३९०॥
सर्वभूतस्थमात्मानं सर्वभूतानि चात्मनि ।
ईक्षते योगयुक्तात्मा सर्वत्र समदर्शनः ॥२९॥
यो मां पश्यति सर्वत्र सर्वं च मयि पश्यति ।
तस्याहं न प्रणश्यामि स च मे न प्रणश्यति ॥३०॥
तरी मी तंव सकळ देहीं । असे; एथ विचारू नाहीं ।
आणि तैसेचि माझियाठायीं । सकळ असे ॥९१॥
हे ऐसेचि संचले । परस्परे मिसळले ।
बुद्धि घेपे, एवतुले । होआवे गा ॥९२॥
एर्हवीं, तरी अर्जुना । जो एकवटलिया भावना ।
सर्वभूतीं, अभिन्ना- । मातें भजे ॥९३॥
भूतांचेनि अनेकपणें । अनेक नोहे अंतःकरणें ।
केवळ एकत्वचि माझें जाणें । सर्वत्र जो ॥९४॥
मग, तो एक; हा मियां । बोलतां दिसतसे वायां ।
एर्हवीं, न बोलिजे तरी, धनंजया । “तो मीचि” आहें ॥९५॥
दीपा आणि प्रकाशा । एकवंकीचा पाडु जैसा ।
तो माझिया ठायीं तैसा । मी तयामाजीं ॥९६॥
जैसा उदकाचेनि आयुष्यें रसु । कां, गगनाचेनि मानें अवकाशु ।
तैसा, माझेनि रूपें रूपसु । पुरुषु तो गा ॥९७॥
सर्वभूतस्थितं यो मां भजत्येकत्वमास्थितः ।
सर्वथा वर्तमानोऽपि स योगी मयि वर्तते ॥३१॥
जेणें ऐक्याचिये दिठी । सर्वत्र मातेंचि, किरीटी ।
देखिला; जैसा पटीं । तंतु एकु ॥९८॥
कां स्वरूपें तरी बहुतें आहाती । परी तैसीं सोनें बहुवें न होती ।
ऐसी ऐक्याचळाची स्थिती । केली जेणें ॥९९॥
नातरी, वृक्षांचीं पानें जेतुलीं । तेतुलीं रोपें नाहीं लाविलीं ।
ऐसी अद्वैत-दिवसें पाहली । रात्री जया ॥४००॥
तो पंचात्मकीं सांपडे । तरी मग, सांग पां, कैसेंनि अडे? ।
जो प्रतीतीचेनि पाडें । मजसीं तुके ॥१॥
माझें व्यापकपण आघवें । गवसलें तयाचेनि अनुभवें ।
तरी, न म्हणतां, स्वभावें । व्यापकु जाहला! ॥२॥
आतां, शरीरीं तरी आहे । परी शरीराचा तो नोहे ।
ऐसें बोलवरी होये । तें करूं ये काई? ॥३॥
आत्मौपम्येन सर्वत्र समं पश्यति योऽर्जुन ।
सुखं वा यदि वा दुःखं स योगी परमो मतः ॥३२॥
म्हणौनि असो तें, विशेषें । आपणपेयासारिखें ।
जो चराचर देखे । अखंडित ॥४॥
सुखदुःखादि वर्में । कां, शुभाशुभें कर्मे ।
दोनी ऐसीं मनोधर्में । नेणेचि जो ॥५॥
हें सम विषम भाव । आणि काही विचित्र जें सर्व ।
तें मानी, जैसें अवयव । आपुले होती ॥६॥
हें एकैक काय सांगावें? । “जया त्रैलोक्यचि आघवें ।
मी” ऐसें स्वभावें । बोधा आलें ॥७॥
तयाही देह एकु कीर आथी । लौकिकीं सुखदुःखी तयांतें म्हणती ।
परी आम्हांतें ऐसी प्रतीती । “परब्रह्मचि, हा” ॥८॥
म्हणौनि, आपणपां विश्व देखिजे । आणि आपण विश्व होईजे ।
ऐसें साम्यचि एक उपासिजे । पांडवा गा ॥९॥
हें तूंतें बहुतीं प्रसंगीं । आम्ही म्हणों याचिलागीं ।
जे, साम्यापरौती जगीं । प्राप्ती नाहीं ॥४१०॥

श्रीशुक उवाच – एवं विज्ञापितो राजन्, भगवान्देवकीसुतः ।
एकान्तिनं प्रियं भृत्यमुद्धवं समभाषत ॥५०॥
(श्रीशुकाचार्य म्हणाले – हे राजा, ह्याप्रमाणे उद्धवाने भगवंताची प्रार्थना केली असता देवकीनंदन परमात्मा वासुदेव आपला प्रिय सेवक व अनन्य भक्त उद्धव याला (ज्ञान) बोलता झाला. ॥ ५० ॥)
एवं यापरी देवकीसुत । पूर्ण पूर्णाशें भगवंत ।
विनविला श्रीकृष्णनाथ । निजभृत्य-उद्धवें ॥४ ॥
‘निजभृत्य’ म्हणणे । उद्धवासी याकारणें ।
निजगुज श्रीकृष्णें । त्यासी बोलणे सर्वदा ॥५॥
जेथ रिगमु नाहीं रुक्मिणीसी । ठावो नाहीं वसुदेवदेवकीसी ।
बळिभद्रा प्रद्युम्नासी । अनिरुद्धासी जे ठायीं ॥६॥
ते ठायीं कृष्णाप्रती । उद्धव असे अहोरातीं ।
यालागी पैं ‘एकांती’ । ज्ञाते म्हणती तयासी ॥७॥
श्रीकृष्णासी वाडेंकोडें । जीवापरीस जें जें आवडे ।
तें उद्धवासी देणे घडे । प्रेम गाढें भक्तांचें ॥८॥
देतां तो जरी नेघे । तरी धांवोनि आलिंगी वेगें ।
न घेतां देवो पायां लागे । भक्तपांगें पांगिला ॥९॥
यालागीं कृष्णासी प्रियकर । उद्धवुचि साचार ।
याहूनि प्रेम थोर । नाहीं सधर आनाचें ॥४१० ॥
यालागीं ‘प्रिय-भृत्य-एकांती’ । ये बिरुदें उद्धवासी साजती ।
तेणें निजस्वामीस विनंती । निजप्रीती पैं केली ॥११॥

सातव्या अध्यायाचा प्रस्ताव (४१२ ते ४२९)

ऐकोनि उद्धवाचे वचन । चातकालागी जेवीं घन ।
तेवीं वोळला जगज्जीवन । स्वानंदघन निजबोधे ॥१२॥
चातकाची तहान किती । तृप्त करूनि निववी क्षिती ।
उद्धवउद्देशे श्रीपती । त्रिजगती निववील ॥१३॥
ऐकतां उद्धवाचे बोल । येताति श्रीकृष्णासी डोल ।
भक्तभाग्य जी सखोल । जाहली वोल प्रेमाची ॥१४॥
ते वोळले भक्तभूमीसी । निजबीज पेरील हृषीकेशी ।
तें पीक पुरेल जगासी । मुक्तराशी मुमुक्षां ॥१५॥
धेनु वत्साचेनि वोरसें । घरा दुभते पुरवी जैसें ।
तेवीं उद्धवाचेनि उद्देशें । जग हृषीकेशें निवविजे ॥१६॥
घरी पाहुणयालागीं । कीजती परवडी अनेगी ।
तेथ बालकें जेवीं विभागी । होती वेगीं न मागतां ॥१७॥
पक्वान्न सेवू नेणती बाळें । तरी माता मुखीं घाली बळें ।
तैसें जनार्दने आम्हां केलें । स्वयें दिधलें निजशेष ॥१८॥
नवल कृपा केली कैशी । कृष्ण उद्धवातें उपदेशी ।
तोचि अर्थ दिधला आम्हांसी । देशभाषीं अर्थितां ॥१९॥
एका जनार्दनु म्हणे । श्रोतां सावधान होणें ।
हे मी तोंडे बोलों कवणें । तिहीं मज करणे सावध ॥४२० ॥
निजभक्ते केली विनंती । निजज्ञान बोलेल भक्तपती ।
श्रवणाची सावध पंक्ती । बैसवा वृत्ति तद्‌बोधे ॥२१॥
येथ मुक्तांचे कोड । पुरे मुमुक्षांची चाड ।
येचिविषयी कथा गोड । श्रवणकवाड उघडेल ॥२२॥
उद्धवें श्रीकृष्ण विनविला । ना तो श्रवणीं डांगोरा पिटिला ।
मुमुक्षां म्हणे चला चला । कृष्ण वोळला निजबोधे ॥२३॥
मोक्षमार्गीचे कापडी । अर्थतृषातृषितें बापुडीं ।
प्रबोधबोधाची पव्हे । उद्धवें रोकडी घालविली ॥२४॥
भक्तिजननी माझी तेथ । कडे घेवोनि होती नेत ।
जनार्दन परमामृत । जाहलें प्राप्त तिचेनी ॥२५॥
ते तुझी भक्ति तत्त्वतां । आम्हांसी असावी सर्वथा ।
तुज मागावी मुक्तता । तंव ते मूर्खता भक्तांची ॥२६॥
साच असावी बद्धता । तरी म्यां मागावी मुक्तता ।
तेचि नाहीं गा तत्त्वतां । मिथ्या मागतां मूर्खत्व ॥२७॥
मीतूंपणेंवीण सहजस्थिती । तुझी असो अभेदभक्ती ।
हेचि मागणे पुढतपुढती । संतांप्रती सर्वदा ॥ २८॥
उद्धवासी ज्ञान गुप्त । उपदेशील कृष्णनाथ ।
एका जनार्दना विनवित । दत्तचित्त तुम्ही दीजे ॥४२९॥
इति श्रीमद्भागवते महापुराणे एकादशस्कन्धे षष्ठोऽध्यायः ॥
इति श्रीमद्भागवते महापुराणे एकादशस्कंधे परमहंससंहितायां एकाकारटीकायां षष्ठोऽध्यायः ॥॥
॥ श्रीकृष्णार्पणमस्तु ॥
सहावा अध्याय समाप्त (श्लोक ५०, ओव्या ४२९)

११०१. देव भक्तालागीं करूं नेदी संसार । अंगें वारावार करोनि ठेवी ॥ध्रु॥
भाग्य द्यावें तरी अंगीं भरे ताठा । म्हणोनि करंटा करोनि ठेवी ॥२॥
स्त्री द्यावी गुणवंती तीपें गुंते आशा । यालागी कर्कशा करूनि ठेवी ॥३॥
तुका म्हणे साक्ष मज आली देखा । आणीक या लोकां काय सांगों? ॥४॥
११०२. वाघे उपदेशिला कोल्हा । ‘सुखें खाऊं द्यावें मला ॥१॥
अंती मरसी तें न चुके । मजही मारितोसि भुकें’ ॥२॥
येरू म्हणे ‘भला भला । निवाड तुझ्या तोंडें झाला, ॥३॥
देह तो जाणार । घडेल हा परउपकार’ ॥४॥
येरू म्हणे ‘मनीं । ऐसें जावें समजोनि’ ॥५॥
गांठी१८ पडली ठका ठका । त्याचें वर्म जाणे तुका ॥६॥
११०३. जेथे आठवती स्वामीचे ते पाय । उत्तम ते ठाय रम्य स्थळ ॥१॥
रान अथवा घर एकांत लोकांत । समाधान चित्त ते ते घडी ॥ध्रु॥
धन्य तो हा काळ सरे आनंदरूप । वाहातां संकल्प गोविंदाचे ॥३॥
तुका म्हणे लाभकाळ तेंचि जिणें । भाग्य नारायण उत्तम तें ॥४॥
११०४. तुज न भे मी कळिकाळा । मज नामाचा जिव्हाळा ॥१॥
माझा बळिया नेणसी कोण । संतां साहे नारायण ॥ध्रु॥
शंख वधिला सागरीं । वेद घेऊनि आला चारी ॥३॥
कूर्में दैत्य वधिला जेठी । हात पाय लपवी पोटीं ॥४॥
वाराहरूप धरिलें गाढें । धरा प्रतापें धरिली दाढें ॥५॥
हिरण्यकश्यप विदारिला । भक्त प्रल्हाद रक्षिला ॥६॥
वामन झाला दीनानाथ । बळी पाताळी घातला दैत्य ॥७॥
छेदूनियां सहस्रभुजा । कामधेनु आणिली वोजा ॥८॥
शिळा प्रतापें सागरी तारी । स्थापी बिभीषण रावण मारी ॥९॥
मारोनियां कंसराव । पिता सोडविला वसुदेव ॥१०॥
पांचाळीसी गांजितां वैरी । वस्त्रे आपण झाला हरि ॥११॥
गजेंद्र स्मरे ‘राम राम’ । त्यासी पाववी वैकुंठधाम ॥१२॥
तुका म्हणे हरिरूप झाले । पुन्हा जन्मा नाहीं आलें ॥१३॥
११०५. सर्वां भूती द्यावें अन्न । द्रव्य पात्र विचारोन । उपतिष्ठे कारण । तेथें बीज पेरीजे ॥१॥
पुण्य करितां होय पाप । दुग्ध पाजोनि पोशिला साप । करोनि अघोर३ जप । दु:ख विकत४ घेतलें ॥ध्रु॥
भूमी पाहतां नाहीं वेगळी । माळ, बरड, एक काळी । उत्तम निराळी । मध्यम आणि कनिष्ठ ॥३॥
म्हणोनि विवेकें । कांहीं करणें तें निकें । तुका म्हणे फिकें । रुची नेदी मिष्टान्न ॥४॥
११०६. देवावरी भार । वृत्ति१० अयाचित सार ॥१॥
देह देवाचे सांभाळी । सार योजे यथाकाळीं ॥ध्रु॥
विश्वासी निर्धार । ‘विस्तारला विश्वंभर’ ॥३॥
तुका म्हणे व्हावें । बळ एकचि जाणावें ॥४॥
११०७. वर्ततां बासर । काय करावें शरीर? ॥१॥
ठेवा नेमून नेमून । माझें तुमचे पायीं मन ॥ध्रु॥
नेदाविया२० वृत्ती । कोठें फांको जी श्रीपती! ॥३॥
तुका म्हणे भले । जन्मा येउनियां ज्याले ॥४॥
११०८. केली प्रज्ञा मनाशीं । तईं मी दान सत्यत्वेशी । नेईन पायांपाशीं । स्वामी मूळ पंढरीये ॥१॥
तोंवरी हें भरी पोट । केला तो मिथ्या बोभाट । नाहीं सांपडली वाट । सईराट फिरतसे ॥ध्रु॥
ज्यावें आदराचे जिणें । स्वामी कृपा करी तेणें । पाळिल्या वचनें । सख्यत्वाचा अनुभव ॥३॥
घडे तैसें घडो आतां । मायबापाची सत्ता । तुका म्हणे चिंता । काय, पाहें मारगा ॥४॥
११०९. नेत्र झांकोनियां काय जपतोसी? । जंव नाहीं मानसीं प्रेमभाव ॥१॥
उघडा मंत्र जाणा ‘राम कृष्ण’ म्हणा । तुटती यातना गर्भवास ॥ध्रु॥
यंत्र मंत्र कांहीं करिसी बुटबुटी । तेणें भूतसृष्टी पावशील ॥३॥
सार तुका जपे बीजमंत्र एक । भवसिंधुतारक ‘रामकृष्ण’ ॥४॥
१११०. संत मारगी चालती । त्यांची लागो मज माती ॥१॥
काय करावी साधनें? । काय एक नव्हे तेणें? ॥ध्रु॥
शेष घेईन उच्छिष्ट । धाय धणीवरी पोट ॥३॥
तुका म्हणे संतापायीं । जीव ठेविला निश्चयीं ॥४॥
११११. जैसे तैसें बाळ मातेसी आवडे । बोलतां बोबडे शब्द गोड ॥१॥
आपुले आवडी लेववी खाववी । पाहोनियां जीवीं सुख वाटे ॥२॥
तुका म्हणे काय देऊं परिहार । काय तें साचार जाणा संत ॥३॥
१११२. देवाचिया वस्त्रा स्वप्नींही नाठवी । स्त्रियेसी पाठवी उंच साडी ॥१॥
गाईचे पाळण नयेचि विचारा । अश्वासी खरारा करी८ अंगें ॥२॥
लेंकराची गांड स्वयें धांवे क्षाळूं । न११ म्हणे प्रक्षाळूं द्विजपाय ॥३॥
तुका म्हणे त्याच्या तोंडावरी१४ थुंका । जातो यमलोका भोगावया ॥४॥
१११३. उरा लावी ऊर आळंगितां कांता । संतांसी भेटतां अंग१७ चोरी ॥१॥
अतीत देखोनि होय पाठिमोरा । व्याह्यासी सामोरा२० जाय वेगीं ॥२॥
द्विजा नमस्कारा मनीं भाव कैंचा? । तुर्काचे दासींचा लेक होय२३ ॥३॥
तुका म्हणे तुम्ही क्रोधासी न यावें । स्वभावा करावें काय कोणी? ॥४॥
१११४. ब्रह्मज्ञान जरि कळे उठाउठी । तरि कां हिंपुटी वेदशास्त्रें? ॥ध्रु॥
शास्त्रांचे भांडण तप तीर्थाटन । पुरीचे भ्रमण याजसाठीं ॥२॥
याजसाठी जप याजसाठी तप । व्यासेंही अमुप ग्रंथ केले ॥३॥
याजसाठी संतपाय हे सेवावे । तरीच तरावें तुका म्हणे ॥४॥
१११५. गायत्री विकोनि पोट३० जे जाळिती । तयां होय गती यमलोकी ॥१॥
कन्येचा जे नर करिती विकरा । ते जाती अघोरा नरकपाता ॥२॥
नाम गाऊनियां द्रव्य जे मागती । नेणें तयां गति कैसी होय? ॥३॥
कैसी होय गती तेच हो जाणती । आम्हांसी संगती नलगे त्यांची ॥४॥
आमुचा सांगाती आहे तो श्रीहरि । नलगे दुराचारी तुका म्हणे ॥५॥

संपूर्ण वारकरी प्रस्थानत्रयी नित्यनेम पारायण अनुक्रमणिका


ग्रंथ

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Page Reader Press Enter to Read Page Content Out LoudPress Enter to Pause or Restart Reading Page Content Out LoudPress Enter to Stop Reading Page Content Out LoudScreen Reader Support
error: Content is protected !!
Scroll to Top