
अनुक्रमणिका
या कुन्देन्दुतुषारहारधवला या शुभ्रवस्त्रावृता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना ।
या ब्रह्माच्युतशङ्करप्रभृतिभिर्देवै: सदा वन्दिता सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापहा ॥
जयांचे केलिया स्मरण । होय सकळ विद्यांचे अधिकरण । तेचि वंदूं श्रीचरण । श्रीगुरूंचे ॥१॥
ते नमस्कारोनि आता ॥
श्रीगणेशाय नमः । श्रीसरस्वत्यै नमः । श्रीविठ्ठलाय नमः ।
श्रीमातापितृभ्यां नमः । श्रीगुरुभ्यो नमः ॥
ॐ नमो भगवते वासुदेवाय ।
रामकृष्णहरि । रामकृष्णहरि । रामकृष्णहरि ॥
श्रीज्ञानेश्वरी नित्यनेम पारायण
क्रमश: नित्यनेम पारायण
अध्याय – ६. ओवी क्र. ४३० – ४५३
अयतिः श्रद्धयोपेतो योगाच्चलितमानसः । अप्राप्य योगसंसिद्धिं कां गतिं कृष्ण गच्छति ॥३७॥
कच्चिन्नोभयविभ्रष्टश्छिन्नाभ्रमिव नश्यति । अप्रतिष्ठो महाबाहो विमूढो ब्रह्मणः पथि ॥३८॥
एतन्मे संशयं कृष्ण छेत्तुमर्हस्यशेषतः । त्वदन्यः संशयस्यास्य छेत्ता न ह्युपपद्यते ॥३९॥
म्हणौनि सांगे, गोविंदा । कवणु एकु मोक्षपदा- । झोंबत होता; श्रद्धा । उपायेंविण ॥४३१॥
इंद्रियग्रामोनि निघाला । आस्थेचिया वाटे लागला । आत्मसिद्धीचिया पुढिला । नगरा यावया ॥४३२॥
तंव, आत्मसिद्धि न ठकेचि । आणि मागुतें न येववेचि । ऐसा अस्तु गेला माझारींचि । आयुष्यभानु ॥४३३॥
जैसें अकाळीं आभाळ । अळुमाळुं सपातळ । विरें आलें; केवळ । वसे ना वर्षे ॥४३४॥
तैसीं दोन्ही दुरावली । जे, प्राप्ती तंव अलग ठेली । आणि अप्राप्तीही सांडवली । श्रद्धा तया ॥४३५॥
ऐसा दोंला अंतरला कां जी । जो श्रद्धेच्या समाजीं । बुडाला; तया हो, जी । कवण गति? ॥४३६॥
पार्थ नैवेह नामुत्र विनाशस्तस्य विद्यते । न हि कल्याणकृत्कश्चिद्दुर्गतिं तात गच्छति ॥४०॥
परि येतुलें हेंचि एक घडे । जें-माझारीं विसांवा पडे’ । तेंहि परी ऐसेनि सुरवाडें । जो देवां नाहीं ॥४३८॥
एऱ्हवीं, अभ्यासाचा उचलता । पाउलीं जरीं चालता । तरी दिवसा आधीं ठाकिता । सोहंसिद्धीतें ॥४३९॥
परि तेतुला वेगु नव्हेचि । म्हणौनि विसांवा तरी निकाचि । पाठीं मोक्षु तंव तैसाचि । ठेविला असे ॥४४०॥
मग, तेथिंचे जे अमोघ । अ-लौकिक भोग । भोगितांही सांग । कांटाळे मन ॥४४२॥
‘हा अंतरायो अवचितां । कां वोढवला भगवंता?’ । ऐसा दिवि-भोग भोगितां । अनुतापी नित्य ॥४४३॥
पाठीं जन्मे संसारीं । परी सकळ धर्माचिया माहेरीं । लांबा उगवे आगरीं । विभवश्रियेचा ॥४४४॥
जयातें नीतिपंथें चालिजे । सत्यद्यूत बोलिजे । देखावें तें देखिजें । शास्त्रदृष्टीं ॥४४५॥
वेद तो जागेश्वरू । जया व्यवसाय ‘निजाचारु’ । सारासार विचारु । मंत्री जया ॥४४६॥
जयाच्या कुळीं चिंता । जाली ईश्वराची पतिव्रता । जयातें गृहदेवता । आदि ऋद्धि ॥४४७॥
ऐसी निजपुण्याची जोडी । वाढिन्नली सर्वसुखाची कुळवाडी । तिये जन्मे तो सुरवाडीं । योगच्युतु ॥४४८॥
तत्र तं बुद्धिसंयोगं लभते पौर्वदेहिकम् । यतते च ततो भूयः संसिद्धौ कुरुनन्दन ॥४३॥
जे सिद्धांताचिया सिंहासनीं । राज्य करिती त्रिभुवनीं । जे कूजती कोकिल, वनीं । संतोषाच्या ॥४५०॥
जे विवेकद्रुमाचे मुळीं । बैसले आहाति नित्य फळीं । तया योगियांचिया कुळीं । जन्म पावे ॥४५१॥
मोटकी देहाकृति उमटे । आणि निजज्ञानाची पहाट फुटे । सूर्यापुढें प्रगटे । प्रकाशु जैसा ॥४५२॥
तैसी, दशेची वाट न पाहतां । वयसेचिंया गांवा न येतां । बाळपणींच सर्वज्ञता । वरी तयातें ॥४५३॥
॥ पुंडलिकवरदा हरी विठ्ठल श्रीज्ञानदेव तुकाराम ॥
श्रीएकनाथी भागवत
क्रमश: नित्यनेम पारायण
अध्याय – ७, ओवी क्र. ४९ – १०१
श्रीगणेशाय नमः ॥ श्रीसरस्वत्यै नमः ॥ श्रीगुरुभ्यो नमः ॥ श्रीदत्तात्रेयाय नमः ॥ श्रीरुक्मिणीपाण्डुरङ्गाभ्यां नमः ॥
(श्रीभगवान निर्भयतेची किल्ली सांगतात-) मनाने, वाणीने, डोळे, कान इत्यादी इंद्रियांनी जे नाशिवंत दृश्य ग्रहण केले जाते (विषय म्हणून स्वीकारले जाते) ते सर्व मायारूप मनाने कल्पिलेले आहे असे समज. ॥७॥
जें जें ‘वाचा’ वदे । तें तें वाळिजे जल्पवादें । वाचिक सांडविलें वेदें । ‘नेति’शब्दें लाजिला ॥५१॥
जें जें ‘संकल्पें’ आकळिलें । तें तें कल्पित पैं झालें । जें जें ‘अहंकारा’ आलें । तें तें वाळिलें विजातीय ॥५२॥
जें जें ‘इंद्रियां’ गोचरें । तें तें जाण पां नश्वरें । हे नित्यानित्यविचारें । केलें खरें निश्चित ॥५३॥
तोही ‘नित्यानित्यविवेक’ । जाण पां निश्चित मायिक । एवं मायामय हा लोक । करी संकल्प सृष्टीतें ॥५४॥
जेव्हडा देखसी संसार । तेव्हडा मायिक व्यवहार । हा वोळख तूं साचार । धैर्यनिर्धार धरोनी ॥५५॥
जैशी स्वप्नींची राणीव । केवळ भ्रमाची जाणीव । तैसेंचि जाण हे सर्व । भववैभवविलास ॥५६॥
परब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी ज्याची बुद्धी स्थिर झाली नाही असा पुरुष त्रिगुणांपासून उत्पन्न होणाऱ्या दोषाने युक्त होऊन या दृश्य जगामध्ये ईशस्वरूप न पाहता बहुविध विषयच पाहतो. या त्रिगुणदोषाने युक्त असलेली त्याची बुद्धी या भेदानेच वेदविहित कर्म, त्याचे अकरण व वेदविरुद्ध कर्म पाहते. (कोणतेही चांगले वा वाईट कर्म गुणजन्य असल्याने ईशस्वरूपप्रापक नाही, हा सिद्धांत.) ॥८॥
त्या विसराचेनि उल्हासें । मिथ्या भेदु सत्यत्वें भासे । त्या भेदाचेनि आवेशें । अवश्य दिसे गुणदोषु ॥५८॥
जरी भेदूचि नाहीं । तरी गुणदोष कैंचा पाहीं । दिसावया ठावोचि नाहीं । शुद्धाचे ठायीं सर्वथा ॥५९॥
यालागी भेदाच्या उद्भटीं । गुणदोषदृष्टी उठी । तेथें कर्माकर्मत्रिपुटी । भेददृष्टी ठसावे ॥६०॥
भेदें थोर केलें विषम । कर्म अकर्म विकर्म । जन्ममरणादि धर्म । निजकर्म प्रकाशी ॥६१॥
येथ म्हणती ‘कर्म’ कोण । ‘अकर्माचें’ काय लक्षण । ‘विकर्माचा’ कवण गुण । तेंही संपूर्ण परिस पां ॥६३॥
काया वाचा अथवा मन । करिजे तितुकें ‘कर्म’ जाण । सूक्ष्म स्फूर्तीचें जें भान । तें मूळ जाण कर्माचें ॥६४॥
मनसा वाचा देहीं । सर्वथा कर्मबीज नाहीं । ‘अकर्म’ म्हणिजे तें पाहीं । न पडे ठायीं देहवंता ॥६५॥
जें कर्मावेगळे सर्वांगें । जेथ कर्म लावितांही न लगे । जे नव्हे कर्मठाजोगें । तें जाण सवेगें ‘अकर्म’ ॥६६॥
विधिनिषेधजोडपाडें । जेथ विशेष कर्म वाढे । ‘विकर्म’ त्याते म्हणणे घडे । थोर सांकडे पैं याचें ॥६७॥
कर्म सर्वसाधारण । तेंचि विकारातें पावले जाण । उठिले विधिनिषेध दारुण । ‘विकर्म’ जाण ते म्हणिपें ॥६८॥
जे विधीसी नातुडे । तें निषेधाचे अंग चढे । करितां चुके ठाके विकळ पडे । तेंही रोकडे ‘निषिद्धचि’ ॥६९॥
ऐमें कर्म विकारलें । तें ‘विकर्म’ पदें वाखाणिलें । एवं कर्माकर्म दाविलें । विभाग केले तुजलागीं ॥७०॥
अविद्यायुक्त जीव परम । त्यासी नित्यक्रिया तेंचि ‘कर्म’ । नित्य न करणे तें ‘अकर्म’ । ‘विकर्म’ तें निषिद्ध ॥७२॥
ऐशी कर्माकर्मविकर्मत्रिपुटी । भेदानुरूपे वाढली सृष्टीं । तेथ गुणदोषबुद्धीच्या पोटीं । भेददृष्टी वाढती ॥७३॥
अभेदी भेदु कैसा उठी । जेणें गुणदोषीं नांदे दृष्टी । विधिनिषेधी पाडी गांठी । तेही गोठी परियेसीं ॥७४॥
पुरुष एकला एकु असे । तोचि मनोरथपूजे बैसे । ध्येय-ध्याता-ध्यानमिसें । वाढवी पिसें भेदाचें ॥७५॥
तेथें नानापरीचे उपचार । पूजासामग्रीसंभार । ऐसा एकपणी अपार । भेदु साचार वाढवी ॥७६॥
तेथ ‘ध्येय’ उत्तम म्हणे जाण । ‘ध्याता’ नीच होये आपण । तदंगें ‘ध्यान’ गौण । गुणदोष जाण वाढवी ॥७७॥
ध्यानीं गुणदोष विचित्र । ध्येय म्हणे परम पवित्र । ध्याता आपण होये अपवित्र । शौचाचारदोषत्वें ॥७८॥
एवं ध्यानाचिये दृष्टीं । आपणचि आपुल्या पोटीं । गुणदोषांची त्रिपुटी । भेददृष्टी वाढवी ॥७९॥
ध्येय-ध्याता-ध्यान । आघवाची आहे आपण । तें सांडोनियां जाण । गुणदोषलक्षण वाढवी ॥८०॥
उद्धवा हे अवघी सृष्टी । वाढली असे भेददृष्टीं । तेणें भेदें उठाउठी । कर्मत्रिपुटी वाढविली ॥८१॥
जंव जंव भेदाचा जिव्हाळा । जंव जंव विषयांचा सोहळा । पाळिजे इंद्रियांचा लळा । तंव तंव आगळा संसारु ॥८२॥
म्हणून तुझी सर्व इंद्रिये, मन आणि बुद्धी ईशस्वरूपाचे ठिकाणी स्थिर करून हे सर्व दृश्यभूत पसरलेले ब्रह्मांड आपल्या ठिकाणीच आहे असे पाहा. तुझे रूप विश्वव्यापक जो मी त्यामध्येच सामावलेले आहे असे निश्चित लक्ष असू दे. ॥९॥
घमघमित अमृतफळे । वरी सर्पे घातलिया गरळें । तें न सेविती काउळे । सेवनी कळे निजघातु ॥८५॥
तैसें सेवितां विषयांसी । कोण गोडी मुमुक्षासी । प्रतिपदी आत्मघातासी । अहर्निशीं देखती ॥८६॥
आत्मघातु न देखती । ते विषयी विषयो सेविती । जैशी दिवाभीता मध्यराती । असतां गभस्ति मध्यान्हीं ॥८७॥
तैसेंचि विषयसेवन । मुमुक्षांसी घडे जाण । तेणें न चुके जन्ममरण । आत्मपतन तयांचें ॥८८॥
असतां इंद्रियांचा नेमु । करी चित्ताचा उपरमु । ऐसा दोंहीपरी सुगमु । उत्तमोत्तमु हा त्यागु ॥९०॥
इंद्रियें असोतु विषयांवरी । मन रिघों नेदी त्यांभीतरी । हाही त्यागु सर्वांपरी । योगेश्वरी बोलिजे ॥९१॥
मनासी विषयांचे बळ । विषयध्यासें तें चपळ । नव्हे म्हणती तें निश्चळ । ऐक समूळ तो उपावो ॥९२॥
माझें स्वरूप सर्वगत । मनाबाहेरी आणि आंत । जेथ जेथ जाईल चित्त । तेथ तेथ ते असे ॥९३॥
मजवेगळे जावयासी । ठावो नाहीं पैं चित्तासी । स्वदेशी हो परदेशी । अहर्निशीं मज आंतु ॥९४॥
ऐसें निजरूप संतत । पाहतां थोरावेल चित्त । त्या चित्तामाजीं आद्यंत । पाहें समस्त हे जग ॥९५॥
अथवा जीवस्वरूप तुझें चांग । त्यामाजीं पाहतां हे जग । जगचि होईल तुझें अंग । अतिनिर्व्यंग निश्चित ॥९६॥
चरें आणि अचरें । लहानें कां थोरें । जीवरूपी सविस्तरें । पाहें निर्धारे हे जग ॥९७॥
म्हणसी जीवु तो एकदेशी । त्यामाजी केवीं पहावें जगासी । त्यासी ऐक्यता करीं मजसीं । जेवीं कनकेंसी अळंकार ॥९८॥
चिंतितां कीटकी भिंगुरटी । तेचि ते होऊन उठी । तैसा तूं उठाउठीं । होई निजदृष्टी निजतत्त्व ॥९९॥
हो का सैंधवाचा खडा । पडल्या सिंधूमाजिवडा । तो होवोनि ठाके त्याएवढा । तैसा तूं रोकडा मी होसी ॥१००॥
जेथ मीतूंपणाचा भेद । फिटोनि जाईल विशद । परमानंदें शुद्धबुद्ध । मुक्त सिद्ध तूं होसी ॥१०१॥
॥ पुंडलिकवरदा हरी विठ्ठल श्रीज्ञानदेव तुकाराम ॥
श्रीतुकाराम महाराजांची गाथा
अभंग क्र. ११३३-११४२
॥ पुंडलिकवरदा हरी विठ्ठल श्रीज्ञानदेव तुकाराम ॥
संपूर्ण वारकरी प्रस्थानत्रयी नित्यनेम पारायण अनुक्रमणिका
ज्यांना प्रत्यक्षात ग्रंथावरून पारायण करायचे आहे त्यांनी खालील लिंकवरून ग्रंथ मागवावे.







रामकृष्णहरी माऊली 🙏