
अनुक्रमणिका
या कुन्देन्दुतुषारहारधवला या शुभ्रवस्त्रावृता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना ।
या ब्रह्माच्युतशङ्करप्रभृतिभिर्देवै: सदा वन्दिता सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापहा ॥
जयांचे केलिया स्मरण । होय सकळ विद्यांचे अधिकरण । तेचि वंदूं श्रीचरण । श्रीगुरूंचे ॥१॥
ते नमस्कारोनि आता ॥
श्रीगणेशाय नमः । श्रीसरस्वत्यै नमः । श्रीविठ्ठलाय नमः ।
श्रीमातापितृभ्यां नमः । श्रीगुरुभ्यो नमः ॥
ॐ नमो भगवते वासुदेवाय ।
रामकृष्णहरि । रामकृष्णहरि । रामकृष्णहरि ॥
श्रीज्ञानेश्वरी नित्यनेम पारायण
क्रमश: नित्यनेम पारायण
अध्याय – ७. ओवी क्र. ८२ ते १०२
॥ पुंडलिकवरदा हरी विठ्ठल श्रीज्ञानदेव तुकाराम ॥
श्रीएकनाथी भागवत
क्रमश: नित्यनेम पारायण
अध्याय – ७, ओवी क्र. ४०७ ते ४९७
श्रीगणेशाय नमः ॥ श्रीसरस्वत्यै नमः ॥ श्रीगुरुभ्यो नमः ॥ श्रीदत्तात्रेयाय नमः ॥ श्रीरुक्मिणीपाण्डुरङ्गाभ्यां नमः ॥
केवळ प्राणधारणा होईल असेच आहारादिकांचे सेवन मुनीने करावे. इंद्रियादिकांच्या प्रियासाठी रूपरसादिकांची आशा ठेवून विषयांचे सेवन करू नये. असे केले असता ज्ञान नष्ट होणार नाही व वाणी आणि मन स्वकर्मापासून च्युत होणार नाही. ॥३९॥
प्राणाभ्यासें क्षुधा अद्भुत । तेव्हां प्राणासीच क्षोभ येत । तेणें काया वाचा चित्त । विकळ पडत इंद्रियें ॥४०९॥
तया प्राणासी आधारू । भलतैसा मिळो आहारु । परी धडगोडांचा विचारु । न करी साचारू पैं प्राणु ॥४१०॥
तैसाचि योगिया पाहीं । तो अभिमान न धरी देहीं । विषयो सेवी परी कांहीं । आसक्ति नाही तयासी ॥४११॥
क्षुधेचिया तोंडा । मिळो कोंडा अथवा मांडा । परी रसनेचा पांगडा । न करी धडफुडा तयासी ॥४१२॥
ज्ञानधारणा न ढळे । इंद्रिये नव्हती विकळे । तैसा आहार युक्तिबळें । सेविजे केवळें निजधैर्ये ॥४१३॥
प्राणास्तव इंद्रिये सबळें । प्राणयोगें देह चळे । त्या देहकर्मा प्राणु नातळे । अलिप्त मेळें वर्ततु ॥४१४॥
त्या प्राणाच्या ऐसी स्थिती । योगियाची वर्तती वृत्ती । सर्व करूनि न करी आसक्ती । देहस्थिति नातळे ॥४१५॥
ब्रह्मादिकांचा देह पाळू । कां सूकरादिकांचा देह टाळू । ऐसा न मानीच विटाळू । प्राणु कृपाळु समभावें ॥४१६॥
तैसेंच योगियाचे कर्म । न धरी उंच नीच मनोधर्म । कदा न देखे अधमोत्तम । भावना सम समभावें ॥४१७॥
आवडी प्रतिपाळावा रावो । रंकाचा टाळावा देहो । ऐसा प्राणासी नाहीं भावो । शुद्ध समभावो सर्वत्र ॥४१८॥
प्राण अपान समान उदान । सर्व संधी वसे व्यान । इतुकी नामें स्थाने पावोनि जाण । न सांडी प्राण एकपणा ॥४१९॥
तैसे उंच नीच वर्णावर्ण । अधमोत्तमादि गुणागुण । देखोनियां योगी आपण । भावना परिपूर्ण न सांडी ॥४२०॥
प्राणु असोनि देहाभीतरीं । बाह्य वायूसी भेद न धरी । तैशी योगिया भावना करी । बाह्याभ्यंतरीं ऐक्यता ॥४२१॥
पार्थिवेष्विह देहेषु, प्रविष्टस्तद्गुणाश्रयः । गुणैर्न युज्यते योगी, गन्धैर्वायुरिवात्मदृक् ॥४१॥
सुखदुःखादी अनेक गुणधर्म असणाऱ्या विषयांमध्ये वावरत असतानासुद्धा वायूप्रमाणेच योगी (ज्ञानी पुरुष) गुणदोषांपासून अलिप्त राहून त्यांत आसक्त राहात नाही (हे वायूपासून मी शिकलो). ॥४०॥
ज्याप्रमाणे वायू पदार्थाच्या गंधादिकाने लिप्त होत नाही त्याप्रमाणेच हा आत्मस्वरूप जाणणारा योगी पार्थिव शरीरात राहून देहगुणांशी संबद्ध असूनही त्यांत लिप्त होत नाही. ॥४१॥
प्राणवृत्तीची लक्षणे । तुज सांगितली संपूर्णे । आतां बाह्य वायूची चिन्हें । सावधाने परियेसीं ॥४२३॥
वायु सर्वांते स्पर्शोनि जाये । परी अडकला कोठें न राहे । तैसें विषय सेवितां पाहे । आसक्तु नव्हे योगिया ॥४२४॥
असोनि इंद्रियांचेनि मेळें । तो विषयांमाजी जरी खेळे । तरी गुणदोष आसक्ति मेळे । बोधु न मळे तयाचा ॥४२५॥
वस्त्र चंदन वनिता माळा । सदा भोगितां विषयसोहळा । वायु नातळे जेवीं जाळा । तेवीं योगी वेगळा विषयांसी ॥४२६॥
जैसें वारेनी जाळ उडे । परी जाळी वारा नातुडे । तेवीं भोग भोगितां गाढे । भोगी नातुडे योगिया ॥४२७॥
जातया वायूचे भेटी । सुगंध कोटी घालिती मिठी । त्यांची आसक्ती नाहीं पोटीं । उठाउठीं सांडितु ॥४२८॥
तैसा आत्मत्वें योगिया पाहीं । प्रवेशलासे सर्वां देहीं । देह गुणाश्रयो पाहीं । ठायींच्या ठायीं तोचि तो ॥४२९॥
निजात्मदृष्टीचेनि बळें । तो देहगुणांसी नातळे । जैसा गंधावरी वारा लोळे । परी नाकळे गंधासी ॥४३०॥
तेचि परिपूर्ण आत्मस्थिती । राया मी सांगेन तुजप्रती । जैसी आकाशाची प्रतीती । सर्व पदार्थी अलिप्त ॥४३१॥
ज्याप्रमाणे अनंत आकाश चराचराला व्यापूनसुद्धा त्यापासून अलिप्त असते त्याप्रमाणे मुनीने प्रत्येक पदार्थात सर्वांतर्यामी रूपाने असून विश्व व्यापणारा परमात्मा आपणच आहोत अशा समन्वयभावनेने असंगपणाने व एकजिनसीपणाने राहावे. ॥४२॥
विषमी असोनि समत्व । संगी असोनि असंगत्व । भेदु करितां अभेदत्व । यालागीं गुरुत्व आकाशा ॥४३३॥
वैर सर्पामुंगुसांसी । आकाश दोंहीचे हृदयवासी । वैर निर्वैरता आकाशासी । ते स्थिती योगियासी पाहिजे ॥४३४॥
तेणें आकाशदृष्टांतें । ब्रह्मभावें आपणियातें । योगी देखिजे पुरतें । व्यापकत्वें आपुल्या ॥४३५॥
ब्रह्मसमन्वयें पाहतां पाहीं । स्थावरजंगमांच्या ठायीं । तिळभरी वाढी रिती नाहीं । आपण पैं पाहीं कोंदला ॥४३६॥
आकाश सर्व पदार्थी असे । परी असे हे सर्वांसी न दिसे । तेवीं दृश्य-द्रष्टा-अतीतदशें । सर्वत्र असे योगिया ॥४३७॥
नभ न खोंचे सांबळे । जळेना वणव्याचेनि जाळें । नव्हतां ज्वाळांवेगळें । असे सगळे टवटवित ॥४३८॥
तैसीं योगियासी द्वंद्वे सकळे । बाधूं न शकतीं कवणे काळें । नव्हतां द्वंद्वावेगळे । स्वरूप सगळे शोभत ॥४३९॥
योगिया छेदावया लवलाहें । सोडिले शस्त्रांचे समुदाये । तो शस्त्रांमाजी आपणियातें पाहे । न रुपती घाये जेवीं गगना ॥४४०॥
जें जें द्वंद्व बाधूं आलें । तें तें स्वरूप देखे आपुलें । सहजें द्वंद्वभावा मुकलें । अबाधित उरलें निजरूप ॥४४१॥
गगन बुडालें दिसे डोहीं परी तें उदकें भिजलेंचि नाहीं । तैसा असोनियां सर्व देहीं । अलिप्त पाहीं योगिया ॥४४२॥
आकाशा चिखल माखू जातां । तें न माखे, माखे लाविता । तैसा योगिया दोषी म्हणतां । दोषु सर्वथा म्हणत्यासी ॥४४३॥
गगन असोनियां जनीं । मैळेना जनघसणी । तैसा योगिया सकळ कर्मे करूनी । कर्मठपणीं न मैळे ॥४४४॥
मोटे बांधितां आकाशातें । चारी पालव पडती रिते । तेवीं कर्मी बांधितां योगियातें । कर्म तेथे निष्कर्म ॥४४५॥
घटामाजी आकाश असे । तें वाच्य कीजे घटाकाशें । पाहतां घटा सबाह्य समरसें । आकाश असे परिपूर्ण ॥४४६॥
तैसा आत्मा म्हणती देहीं । तंव तो देहा सबाह्य पाहीं । देह मिथ्यात्वें ठायींचे ठायीं । चिन्मात्र पाही परिपूर्ण ॥४४७॥
वायूने प्रेरिलेले मेघ ज्याप्रमाणे आकाशाला स्पर्श करू शकत नाहीत त्याप्रमाणे कालाने उत्पन्न केलेल्या तेज, जल, अन्न यांनी पूर्ण असलेल्या शरीरघटक पदार्थांनी हा स्थिर पुरुष लिप्त होत नाही. ॥४३॥
कडकडीत आभाळें । येऊनि आकाश झांकोळे । त्या समस्तां नभ नातळे । अलिप्त बळें संस्थित ॥४४९॥
तैसेंचि योगियासी । असतां निजात्मसमरसीं । काळें सृजिलिया गुणांसी । वश्य त्यांसी तो नव्हे ॥४५०॥
काळाचे थोर सामर्थ्य जाण । देहासी आणी जरामरण । योगी देहातीत आपण । जन्ममरण न देखे ॥४५१॥
स्वप्नीं चिंतामणी जोडला । सवेंचि अंधकूपी पडला । जागा जाहल्या न म्हणे नाडला । तैसा घडला देहसंगु ॥४५२॥
जो ब्रह्मादि देहांसी खाये । तो काळु वंदी योगियाचे पाये । जो काळाचाही आत्मा होये । निधडा पाहें महाकालु ॥४५३॥
विजू कडकडूनि आकाशीं । तेजें प्रकाशी गगनासी । गगन नातळे ते विजूसी । असोनि तिशी सबाह्य ॥४५४॥
तैसा सत्त्वगुण प्रकाशी ज्ञान । त्यासी योगिया नातळे जाण । ज्ञानस्वरूप निखळ आपण । वृत्तिज्ञान मग नेघे ॥४५५॥
झालिया सूर्यउदयासी । दीपप्रभा नये उपेगासी । तेवीं ‘सहज’ आलिया हातासी । वृत्तिज्ञानासी कोण पुसे? ॥४५६॥
सत्त्वें प्रकाशिले ज्ञान । तें आवडोनि नेघे जाण । अथवा खवळल्या रजोगुण । कर्मठपण त्या न ये ॥४५७॥
हो कां तमोगुणाचेनि मेळे । क्रोधमोहांसी नातळे । गुणातीत झाला बळें । बोधकल्लोळे स्वानंदें ॥४५८॥
आपल्या निर्मलत्वादी गुणांनी जल ज्याप्रमाणे सर्व जगाला पावन करते त्याप्रमाणे मुनी दर्शन, स्पर्श, कीर्तन आदी साधनांनी गंगादिजलाप्रमाणे स्वभावतः स्वच्छ, गोड, मधुर, तीर्थाप्रमाणे पवित्र राहून आपल्या आश्रितांना पवित्र करितो. ॥४४॥
पवित्र व्हावया प्राणियांसी । तीर्थी तीर्थत्व उदकासी । इतुकी लक्षणे योगियासी । अहर्निशी असावीं ॥४६१॥
उदकी रिघाले जे समैळ । ते स्वभावें करी निर्मळ । परी न धरी अहंबळ । जे म्यां हे मळ क्षाळिले ॥४६२॥
तैसें योगियासी भजनशीळ । भावे भाविक जे केवळ । त्यांचे निरसूनि कळिमळ । न धरी बळ गुरुत्वें ॥४६३॥
प्राणु गेला तरी प्राणियांसी । कठिणत्व उपजेना मानसीं । जें जें भेटे तयासी । मृदुता कैसी वर्तत ॥४६४॥
जेवीं चंद्रकिरण चकोरांसी । पांखोवा जेवीं पिलियांसी । जीवन जैसें कां जीवांसी । तेवीं सर्वांसी मृदुत्व ॥४६५॥
जळ वरिवरी क्षाळी मळ । योगिया सबाह्य करी निर्मळ । उदक सुखी करी एक वेळ । योगी सर्वकाळ सुखदाता॥४६६॥
उदकाचे सुख तें किती । सवेचि क्षणे तृषितें होती । योगिया दे स्वानंदतृप्ती । सुखासी विकृती पैं नाहीं ॥४६७॥
उदकाची जे मधुरता । ते रसनेसीचि तत्त्वतां । योगियांचे गोडपण पाहतां । होय निवविता सर्वेद्रियां ॥४६८॥
लागल्या योगियाची गोडी । अमृताची चवी थोडी । ब्रह्मेंद्रादि पदें बापुडीं । अर्धघडीमाजी करीत ॥४६९॥
तापले आले उदकापाशीं । अंगस्पर्शे निववी त्यांसी । तैसीचि दशा योगियासी । स्पर्शे तापासी निवारी ॥४७०॥
उदकें निवविलें ज्यासी । परतोनि ताप होये त्यासी । योगी कृपेनें स्पर्शे ज्यासी । त्रिविध तापांसी निर्मुक्त ॥४७१॥
योगी ज्यासी निववी जिवेंभावें । त्यासी जीव गेलियाही तापु नव्हे । निवालेपणे तो वोल्हावे । स्वानुभवें डुल्लत ॥४७२॥
मेघमुखें अधःपतन । उदकाचें देखोनि जाण । अधःपातें निवती जन । अन्नदान सकळांसी ॥४७३॥
तैसें योगियासी खालुतें येणें । जे इहलोकी जन्म पावणें । जन निववी श्रवणकीर्तनें । निजज्ञाने उद्धरी ॥४७४॥
पर्जन्योदक देखतां जाण । जेवीं निवती सकळही जन । कां गंगादिकांचे दर्शन । करी मोचन पापाचें ॥४७५॥
तैसें योगियाचे दर्शन । भाग्येवीण नव्हे जाण । ज्याणे देखिले त्याचे चरण । करी मोचन भवरोगा ॥४७६॥
न घडे दर्शन स्पर्शन । तरी करावे त्याचे नामस्मरण । इतुकेनि भवमूळ जाण । करी छेदन तें नाम ॥४७७॥
सांडूनि भगवंताचे कीर्तन । केल्या भक्ताचे नामस्मरण । केवीं तुटेल भवबंधन । ऐसें न म्हणा सर्वथा ॥४७८॥
देवासी पूर्वी नामचि नाहीं । त्यासी भक्ती प्रतिष्ठुनि पाहीं । नामरूपादि सर्वही । नानाविलासही अर्पिले ॥४७९॥
ऐसा भक्ती देव थोर केला । आणूनि वैकुंठीं बैसविला । भक्तउपकारें दाटला । मग त्याच्या बोलामाजीं वर्ते ॥४८०॥
देवो भक्तवचनेंकरीं । झाला नर ना केसरी । प्रगटला खांबामाझारी । शब्द करी भक्ताचा ॥४८१॥
आतांही प्रत्यक्ष प्रमाण । दासांचेनि वचनें जाण । पाषाणप्रतिमे देवो आपण । आनंदघन प्रगटे पैं ॥४८२॥
भक्तभावें आभारला । देवो उपकारें दाटला । यालागी नुल्लंघवे बोला । पांगे पांगला भक्तांच्या ॥४८३॥
एवं जेथ भक्तांचे नाम घेणे । तेथ अवश्य देवे धांवणें । भक्तउपकारा उत्तीर्ण होणें । वेगें पावणे यालागीं ॥४८४॥
यालागी भक्ताचे नाम घेतां । तुटती भवबंधनव्यथा । ऐसें सांगतां अवधूता । प्रेम सर्वथा न संडे ॥४८५॥
अग्नी ज्याप्रमाणे तेजस्वी व सर्वभक्षक असून पदार्नोंच्या मलाने लिप्त होत नाही त्याप्रमाणे हा नैष्ठिक मुनी आपल्या तेजाने देदीप्यमान, सामान्य माणसाला ज्याचे स्वरूप अनाकलनीय आहे असा, उदर हेच पात्र करून जे जे येईल त्याच्या गुणदोषाचा विचार न करता सेवन करणारा असा असूनसुद्धा त्यातील मलांनी युक्त होत नाही. ॥४५॥
तैसाचि योगियाही जाण । भगवद्भावें देदीप्यमान । त्यासी धरावया आंगवण । नव्हे जाण सुरनरां ॥४८८॥
हाती न धरवे खदिरांगारु । तैसा योगिया अतिदुर्धरु । तयासी न शके आवरूं । मायाव्यवहारु गुणेंसीं ॥४८९॥
अग्नीसी जेवीं मुखचि पात्र । तैसें योगियासी उदर मात्र । ठेवा ठेवणे विचित्र । नाहीं पात्र गांठीसी ॥४९०॥
अग्नीने जें जें सेवणें । तें जाळूनि आपुल्याऐसें करणें । यापरी सर्व भक्षणे । नाहीं स्पर्शणे मळासी ॥४९१॥
चंदन सुवासे दुर्गंध धुरे । निंब कडू ऊस गोडिरे । तें जाळूनि आकारविकारें । कीजे वैश्वानरें आपणाऐसीं ॥४९२॥
तैसा योगी जें अंगीकारी । तें आत्मदृष्टी निर्धारी । दोष दवडूनियां दूरी । मग स्वीकारी निजबोधे ॥४९३॥
भोग्य जे भोगू जाये । तेथ आत्मप्रतीति पाहे । भोक्ता तद्रूपचि होये । हा भोगु पाहे योगिया ॥४९४॥
अग्नीत पडिलें जें समळ । तें अग्निमुखें होय निर्मळ । योगिया जें सेवी अळुमाळ । परम मंगळ तें होय ॥४९५॥
अग्निमुखी यागु घडे । तेणें अदृष्टें स्वर्ग जोडे । योगियाचे मुखीं जें पडे । तेणें जोडे निजपद ॥४९६॥
आणिक अग्नीचे चिन्ह । ऐक राया सावधान । तेंचि साधकासी साधन । सिद्ध लक्षण सिद्धाचें ॥४९७॥
॥ पुंडलिकवरदा हरी विठ्ठल श्रीज्ञानदेव तुकाराम ॥
श्रीतुकाराम महाराजांची गाथा
अभंग क्र. १२३६ ते १२५३
॥ पुंडलिकवरदा हरी विठ्ठल श्रीज्ञानदेव तुकाराम ॥
संपूर्ण वारकरी प्रस्थानत्रयी नित्यनेम पारायण अनुक्रमणिका
ज्यांना प्रत्यक्षात ग्रंथावरून पारायण करायचे आहे त्यांनी खालील लिंकवरून ग्रंथ मागवावे.








रामकृष्णहरी माऊली 🙏